Advertisements

खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सातव्या दिवशी स्वर्गीय सुरांची अनुभूती
नागपूर, १९ डिसेंबर: खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या सातव्या दिवशी, आज पंडित निलाद्री कुमार, तबला वादक ओजस अढीया, ग्रॅमी अवॉर्डने सन्मानित राकेश चौरासिया, उस्ताद तोफिक कुरेशी यांच्या सतार, तबला, बासरी व तालवाद्यांच्या अद्भुत संगमाने ईश्वरीय सूरसाधनेची सुरेल अनुभूती लाभली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून कलागुणांचा संगम असलेला हा खासदार सांस्कृतिक महोत्सव हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, महामेट्रोचे प्रबंध निर्देशक श्रावण हर्डीकर, सुनील मेंढे, देशोन्नतीचे प्रकाश पोहरे, परशू ठाकूर, दादाराव केचे, प्रेरणा कॉन्व्हेन्टचे जोशी, राहुल पांडे, मोहित शाह आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी श्रुती तृप्त करणारा शास्त्रीय राग जयजयवंती सादर करण्यात आला. सप्तसुरांचा लाघवी अनुनय, नम्र आराधना, आळवणी, आर्जव तसेच खट्याळ सूरक्रीडा, वाद्यवादना द्वारे दिले, घेतलेले व लीलया पेललेले मधुर आव्हान रसिकांना सुखावून गेले. संगीताच्या या ऐश्वर्यसंपन्न मैफिलीला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कीबोर्ड वर अग्नेलो फर्नांडिस आणि घटम वर गिरिधर उदुपा यांनी अननुभूत साथ दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व डॉ रिचा सुगंध यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, शैलेश ढोबळे, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, रेणुका देशकर, अब्दुल कादीर, प्रमोद पेंडके यांनी केले.
******
उस्ताद झाकीर हुसेन यांना आदरांजली-
पंडित निलाद्री कुमार, तबला वादक ओजस अढीया, ग्रॅमी अवॉर्डने सन्मानित राकेश चौरसिया, उस्ताद तोफिक कुरेशी यांच्या ह्रुदयात सदैव वास करणारे व कायम प्रेरणास्रोत ठरलेले उस्ताद झाकीर हुसेन यांच्यावर यावेळी चित्रफित दाखवून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
***
नागपूरकर रसिक खूश तर जग खूश; पंडित निलाद्री कुमार
कार्यक्रमादरम्यान नागपूरकर रसिकांची मनापासून दाद मिळाल्यावर जगातील कोणत्याही रसिकाला खूश करता येते. नितीन गडकरी यांनी रोड बनवून वाहतुकीचे मार्ग प्रशस्त केले तद्वतच आम्ही कलाकार संगीत साधना करीत कलेचा मार्ग उजळण्याच्या प्रयत्न करतो, असे उद्गार पं. निलाद्री कुमार यांनी यावेळी काढले.
**बाल कलाकारांतर्फे स्वा. सावरकरांची दिव्यगाथा
– जाज्वल्य इतिहासाने उजळला खासदार
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात बाल कला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे ‘अनादी मी अनंत मी – गाथा स्वातंत्र्यवीर सावरकरांची’ हा संगीत, नृत्य, वाद्य, नाट्यमय कथेचा स्तुत्य कार्यक्रम सादर करण्यात आला. इयत्ता १ ते ९ चे ३७५ विद्यार्थी यात सहभागी झाले होते.
शिवाजी महाराजांची आरती – जय जय शिवराया, हे हिंदू नृसिंहा, सागरा प्राण तळमळला, अनादी मी, शतजन्म, जयोस्तुते आदी गीतांमधून, प्रत्येक शब्दांत प्रखर तत्वज्ञान मांडणाऱ्या स्वा. सावरकर यांची जीवनमूल्ये प्रभावीपणे उलगडण्यात आली. विराज विक्रांत वैद्य ने स्वा. सावरकर यांच्या भूमिकेत छाप सोडली.
कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना मधुरा रोडी गडकरी, संहिता लेखन आशुतोष अडोणी, नियोजन सचिन बक्षी, संगीत संयोजन श्रीकांत पिसे, नृत्य संयोजन प्रियंका अभ्यंकर, ऋषिकेश पोहनकर, नाट्य संयोजन रोशन नंदवंशी, भाग्यश्री चिटणीस, विक्रांत साल्पेकर, ताल संयोजन रवी सातफळे, स्वर वाद्य मार्गदर्शन शिरीष भालेराव, गायन मार्गदर्शक यामिनी पायघन , रसिका बावडेकर, नेहा इंदुरकर यांचे होते. बाल कला अकादमीचे कार्यकर्ते सुबोध आष्टिकर, मंगेश देशमुख, प्रीति नौकरकर, उर्वशी डावरे, कल्याणी पिदडी यांचे सहकार्य लागले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी यांचे हस्ते स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे रवींद्र फडणवीस आणि सीमा फडणवीस यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
****
२५ हून अधिक हजार विद्यार्थी करणार २० रोजी ‘मनाचे श्लोक’चे पठण
नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जागतिक विक्रम साधणार
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनाचे श्लोक’ चे पठण एकाचवेळी २५ हजार हून अधिक विद्यार्थी करणार आहेत. हा एक जागतिक विक्रम ठरणार असून त्याची ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया’ मध्ये नोंद केली जाणार आहे.
या उपक्रमात नागपुरातील १७५ शाळांचे २८ हजार ३२९ विद्यार्थी व १२ ५ शिक्षक सहभागी होत आहेत. याशिवाय, ‘वंदेमातरम् ‘ या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने यावेळी हे विद्यार्थी वंदेमातरम् गीताचे सामूहिक गायन करणार आहेत. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडिया’ चे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या उपक्रमाचे संयोजक विजय फडणवीस व अनिल शिवणकर असून नरेश कामडे, योगेश बन, किशोर बागडे, हरीश केवटे व राजू कनाटे यांचेसह महाराष्ट्र शासनाचे शिक्षक विभाग, महानरपालिकेचा शिक्षण विभाग, शाळांचे मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभत आहे.
…
केवळ ‘डिजिटल पासेस’ उपलब्ध-
खासदार सांस्कृतिक महोत्सवामध्ये २० ते २३ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सर्व ‘लाईव्ह इन कन्सर्ट ‘ च्या मोफत प्रिंटेड पासेस संपल्या आहेत. त्यामुळे रसिकांना केवळ डिजिटल स्वरूपातील पासेस मिळतील. या पासेस विविध प्रसिध्दी माध्यमांवर असलेला ‘क्यूआर कोड ‘ स्कॅन करून मोबाईलवर प्राप्त करता येतील व कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. पासेससाठी कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
Advertisements

Advertisements

Advertisements
