फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणमहाराष्ट्रातील वाचकांना येणार अनुभवांच्या पुर्नप्रत्याची प्रचिती;डॉ. नीलम गोऱ्हे

महाराष्ट्रातील वाचकांना येणार अनुभवांच्या पुर्नप्रत्याची प्रचिती;डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर हिवाळी अधिवेशनांच्या ऐतिहासिक वाटचालीवर येणार ग्रंथ

-उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकारांची बैठक
 – संपादकीय मंडळ गठित
नागपूर,ता.१६ डिसेंबर २०२४: नागपूरात महाराष्ट्र विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन म्हणजे राजकारण्यांचा पुर्नजन्मच असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.नागपूरातील हिवाळी अधिवेशनाची नागपूर,विदर्भातील जनता,आम्ही राजकारणी,पत्रकार हे अक्षरश: वाट बघत असतात त्यामुळे जबाबदारीची जाणीव ही वाढते.‘वरिष्ठ सभागृहाची आवश्‍यकता आणि महत्व’हे जे पहिले पुस्तक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते ३ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यवर्ती सभागृह,विधान भवन,मुंबई येथे प्रसिद्ध झाले त्यावर पत्रकारांनी खूप परिश्रम घेतले,एकूण चार ग्रंथा नंतर आता हे पाचवे पुस्तक ‘नागपूर येथील हिवाळी अधिवेशने:विधान परिषदेतील ऐतिहासिक पाऊलखुणा’ही मध्यवर्ती संकल्पना ठेऊन ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा मानस असल्याचे मत डॉ.नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.हा ग्रंथ म्हणजे हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत घडलेल्या अनेक घटना तसेच परिसरातील आठवणींना उजाळा असून, महाराष्ट्रातील वाचकांना त्या सर्व अनुभवांच्या पुर्नप्रत्याची प्रचिती असणार आहे.
नागपूरातील विधान भवनातील त्यांच्या कक्षावरील राष्ट्रकुल संसदीय मंडळ सभागृहात पार पडलेल्या  डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ पत्रकारांच्या बैठकीत त्यांनी वरील मत व्यक्त केले.याप्रसंगी ग्रंथ निर्मितीसाठी संपादकीय मंडळ देखील गठित करण्यात आले.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने विदर्भ विकासासह अनेक सामाजिक प्रश्नांवर सभागृहात झालेल्या चर्चा ते लोकाभिमूख शासन निर्णयापर्यंतचा एक मैलाचा टप्पा नागपूर विधानभवनाने अनुभवला आहे. येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांपासून ते अनुशेषापर्यंत अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा हिवाळी अधिवेशनात झाल्या आहेत. याचा आढावा घेणारा परिपूर्ण संदर्भ ग्रंथ साकारावा असा मानस आहे. येथील तिन्ही पिढ्यांचा सहभाग असलेले सशक्त संपादक मंडळ या ग्रंथाची दिलेल्या मुदतीत अभ्यासपूर्ण निर्मिती करेल असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
येथील विधानभवनात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकारांची विशेष बैठक उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी निमंत्रीत केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील राष्ट्रकुल समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस विधानभवनचे सचिव 2 (कार्यभार) विलास आठवले, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने, नागपूर विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, माजी संपादक सुधीर पाठक, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र  व इतर सन्माननिय पत्रकार उपस्थित होते.  संपादक आणि ज्येष्ठ पत्रकारांनी आपले योगदान देण्याचे सहर्ष मान्य केले.
विधी मंडळाशी संबंधित जी चार ग्रंथे प्रसिद्ध होणार  आहेत त्यात शंभर भाषणे,विधेयकावरील चर्चा इत्यादी पैलू आले असून नागपूरातील हिवाळी अधिवशेनासंबंधी ग्रंथात वेगळे पैलू अपेक्षीत असल्याचे नीलम गो-हे म्हणाल्या.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची विधान परिषदेतील भाषणे हे ऐतिहासिक दस्तावेज असल्याचे वाटत असल्यास ती देखील प्रसिद्ध करता येईल.हा पाचवा ग्रंथ सर्वस्वी पत्रकारांशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले.यात किस्से,विनोद आणि घटना यांना परिपूर्ण वाव आहे.विदर्भातील शेतकरी,संत्र्याला भाव,कापूस,तूर डाळ,सोयाबिन या विषयांवर वर्षानुवर्ष हिवाळी अधिवेशनात चर्चा घडल्या.मी आणि संजय राठोड ट्रॅक्टर घेऊन हिवाळी अधिवेशनात शिरण्याचा प्रयत्न केला होता,अशी गंमत त्यांनी सांगितली.
पत्रकारांनी येत्या चार महिन्यात या आठवणी शब्दबद्ध करुन संपादक मंडळाकडे द्यावा,यातील दोन महिने ग्रंथाच्या छपाईसाठीच लागेल.पुढील वर्षी ऑगस्टमध्ये हा ग्रंथ मुंबई किवा नागपूरात प्रकाशित करता येईल.अनेक ज्येष्ठ पत्रकार व निवृत्त संपादक यांना वयोमानामुळे लिखाण करणे आता शक्य नसेल तर त्यांनी तरुण पत्रकार हाताशी धरुन लेख पाठवावे,असा मोलाचा सल्ला देखील त्यांनी दिला.सर्वस्वी मराठी भाषेत असलेल्या या ग्रंथात चार ते पाच लेख हे हिंदी मध्येही प्रसिद्ध करता येईल.नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या अनुभवावर आधारित हा ग्रंथ पुढील पिढीसाठी,राज्यशास्त्र,समाजशास्त्र इत्यादी विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी राहील,अशी या ग्रंथाची महत्ता गो-हे यांनी सांगितली.इतकंच नव्हे तर सभागृहातच नव्हे तर सभागृहा बाहेर परिसरात, एखाद्या घटनेबाबत लोक काय बोलले?हे देखील अधोरेखित करता येईल.
दैनिक लोकमतचे विदर्भ संपादक श्रीमंत माने यांनी,प्रा.बी.टी.देशमुख यांच्याकडे ग्रंथासाठी अमूल्य अशी अनुभवसंपदा असल्याचे सूचवले.अमरावतीला त्यांच्याशी संपर्क केल्यास तो बहूमाेल,अनुभवी ठेवा ग्रंथात समाविष्ट करता येईल,असा सल्ला माने यांनी दिला.हिवाळी अधिवेशनात सर्वात प्रदीर्घ आणि तेवढीच गंभीर चर्चा ही विदर्भाच्या अनुशेषावर झाली आहे,यावर देखील बहूमोल प्रकरणे ग्रंथात समाविष्ट करता येईल.विदर्भाच्या विकासात हिवाळी अधिवेशनात घडलेल्या चर्चेतून काय साध्य झाले,अनुशेषाच्या अनुषंगाने विदर्भात काय काम झाले?याचा देखील समावेश ग्रंथात करता येईल,असे मत माने यांनी व्यक्त केले.
२००२ साली तत्कालीन विधान परिषदेचे भाजपचे आमदार नितीन गडकरी व काँग्रेसचे आमदार रणजित देशमुख यांनी ‘अनुशेषन र्निमूलन फंड’ देखील सुरु केला असल्याची आठवण त्यांनी करुन दिली.आमदार हांडे हे महात्मा फूले यांच्या अवमानना प्रकरणामुळे सभागृहातच रडले होते.सभागृहात चर्चा घडत असल्या तरी त्याचे पडसाद बाहेर पडत असतात.गोपीनाथ मुंडे हे गोवारी हत्याकांड घडले त्यावेळी आम्हा पत्रकारांकडे आले व त्यांच्यासोबत चलण्यास सांगितले.तिथे गेल्यावर त्या भीषण घटनेचे गांर्भीय लक्षात आले,वेळेवर आणि सोबत गेल्यामुळे हा अनुभव घेता आला.परिणामी,नागपूरातील हिवाळी अधिवेशनातील विधेयके व अधिवेशन काळात घडलेल्या घटना असे दोन भाग केल्यास ग्रंथ आणखी चांगला होईल,असे मत माने यांनी व्यक्त केले.
दैनिक सकाळचे निवृत्त निवासी संपादक भुपेंद्र गणवीर यांनी विधान परिषदेवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोर्चे धडक देत असत. भव्य मोर्चे येत. त्यांची चर्चा होत होती. कापूस ते कापड, सहकार, कापूस खरेदी हमीभाव आदी प्रश्न गाजत होते. विदर्भातील अनुशेष, सिंचनाचे प्रश्नांवर वादळी चर्चा होत. मुंबईतून शिवसेनेचे आमदार विधान परिषदेवर निवडून येत. त्यात मुंबईच्या प्रश्नांवर विधान परिषद गाजविणारे तीन आमदार चर्चित होते. त्यात प्रमोद नवलकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल,असे त्यांनी सांगितले.
माजी संपादक शैलेश पांडे यांनी,ग्रंथातील रटाळपणा व घटनांची पुनरावृत्ती टाळाणे गरजेचे असल्याचे सांगितले.नागपूरातील हिवाळी अधिवेशनाला प्रदीर्घ असा इतिहास आहे.त्यात अधिवेशनाचे वार्तांकन करणा-या अनेक पत्रकारांना ४०-४० वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव आहे.या पत्रकारांचे वैयक्तिक अनुभव हे देखील ग्रंथात समाविष्ट झाल्यास ग्रंथ अधिक रोचक बनेल.पत्रकारांनी सांगावे ते विधान परिषदेचे वार्तांकन कसे शिकले,कसे शिकत गेले,तारांकित,अतारांकित प्रश्‍नांमध्ये सुरवातीच्या काळात त्यांचा कसा गोंधळ उडाला,या आठवणींमुळे ग्रंथाला एक विलक्षण किंबहून असाधारण स्वरुप प्राप्त होईल,असा सल्ला पांडे यांनी दिला.वैयक्तिक आठवणींची गुंफण केल्याने ग्रंथ अधिक वाचनीय आणि संग्रहणीय होईल.
ज्येष्ठ पत्रकार व नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान दिंड्या,आंदोलने,मोर्चे यावर देखील प्रकरण असावे,असा सल्ला दिला. हे शेतक-यांच्या प्रश्‍नावर विधान भवनात चक्क बैलगाड्या घेऊन आले,याचा दूरवर

परिणाम झाला होता.आज सुरक्षेच्या कारणांवरुन बैलगाड्या,ट्रॅक्टर विधान भवनापर्यंत आणने शक्य नसल्याने ‘आंदोलनाचे बदलते स्वरुप ‘यावर देखील एखादे प्रकरण असायला हवं,असा सल्ला त्यांनी दिला.याशिवाय विधान भवनाच्या या इमारतीच भूमिपूजन १९१२ साली झाले,१९१४ साली ही इमारत बनली.११० वर्षांची ही इमारत असून यावर देखील एखादा रंजक लेख ग्रंथात असायला हवा,असे मत व्यक्त केले.
दैनिक तरुण भारताचे माजी संपादक सुधीर पाठक यांनी एकात्मिक महाराष्ट्रात विदर्भ कसा सम्मिलित झाला,वरिष्ठ सभागृह कधी पासून सुरु झाले,विरोधक व सत्ताधा-यांमध्ये रंगलेले कलगीतुरे,रा.सु.गवई यांचा ‘मिडीयाचा डब्बाच’सभागृहात फिरायचा,अगदी वार्ताहर गॅलरीत देखील यायचा,त्या आठवणी,सभागृहातील हक्कभंग,सदस्यांना दिलेले सभापती,उपसभापतींने दिलेली समज,मेसवाणी नावाच्या इसमाला सभापतींनी सभागृहात बोलावून माफी मागायला लावणे कारण त्याला मिळालेला ब्लॉक दुस-या कोणाला तरी अलॉट करने त्याला भारी पडले,निवृत्त पत्रकारांच्या आठवणी इत्यादी संदर्भातून ग्रंथ आणखी समृद्ध करता येईल,असे मत पाठक यांनी व्यक्त केले.
दैनिक हितवादचे ज्येष्ठ पत्रकार विकास वैद्य यांनी स्वत: उपसभापती डॉ.नीलम गो-हे यांना वरिष्ठ सभागृहाचा प्रदीर्घ अनुभव आहे,त्यांचेही सभागृहातील आठवणी,सभागृह चालवित असतानाचे अनुभव ग्रंथात समाविष्ट करण्याचा सल्ला त्यांनी दिला. शैलेश पांडे यांनी विकास वैद्य हे इंग्रजी दैनिकातील वरिष्ठ पत्रकार असल्याने त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभूत्व असल्याचे सांगितले.त्यामुळे ग्रंथात मराठीसोबतच हिंदी व इंग्रजी भाषेतील पत्रकारांचे देखील लेख असावे,अनुभवांना भाषेची मर्यादा असू नये,असा सल्ला दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अनिल परब,.मनिषा कायंदे आदी यांच्या निवृत्तीनिमित्त सभागृहात केलेली दिलखेचक मिश्‍किली अश्‍या अनुभवाचा देखील समावेश ग्रंथात करता येईल,असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ.ममता खांडेकर यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार अतुल पेठकर,दैनिक देशोन्नतीचे श्री.उत्तरवार,न्यूज १८ चे वरिष्ठ प्रतिनिधी रवी गुळकरी आदी यांनी देखील निर्मित होणा-या ग्रंथाबाबत आपली मते सादर केली.या सर्व सूचना डॉ.नीलम गो-हे व त्यांच्या शासकीय चमूने लिहून काढल्या.
 या प्रस्तावित ग्रंथासंदर्भात चर्चा करताना यातील मजकूर हा संशोधन व संदर्भाच्या दृष्टीने पूरक असावा असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. विशेषतः हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करताना पत्रकारांनी जे अनुभवले ते यात प्रतिबिंबित झाल्यास त्यातील वाचनियता वाढेल यावर सर्वांचे एकमत झाले.
यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकार व संपादक यांना ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्व’ या महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या प्रती देऊन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

(छायाचित्र : दैनिक सकाळचे निवृत्त निवासी संपादक भूपेंद्र गणवीर यांना ग्रंथाची प्रत देताना उपसभापती डॉ.नीलम गो-हे)
संपादकीय मंडळ-
‘नागपूर येथील हिवाळी अधिवेशने – विधानपरिषदेतील ऐतिहासिक पाऊलखुणा’ या ग्रंथाच्या परिपूर्ण निर्मितीसाठी संपादकीय मंडळ निश्चित करण्याचा सर्वांच्या वतीने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. यात कार्याध्यक्ष प्रदीप मैत्र, सदस्य म्हणून श्रीपाद अपराजित, श्रीमंत माने, गजानन निमदेव, रमेश कुलकर्णी, शैलेश पांडे, भुपेंद्र गणवीर, महेश उपदेव, प्रभाकर दुपारे, मनिष सोनी, आनंद निर्वाण, विकास वैद्य, नागपूर – अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे, समन्वय संपादक निलेश मदाने यांचा समावेश आहे.
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या