डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१६ डिसेंबर २०२४: काल नागपूरातील राजभवनात एकूण ३९ मंत्र्यांचा शपथविधी झाला त्यात अनेक माजी मंत्र्यांना डच्चू मिळाला.सर्वाधिक चर्चा झाली ती भारतीय जनता पक्षाला १३६ जागा मिळून सुद्धा त्या पक्षातील माजी अर्थ,वन,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची.इतर सहयोगी पक्षातील काही माजी मंत्र्यांना डच्चू मिळाला,तो पक्षाच्या रणनीतीचा भाग असू शकतो असे समजले गेले मात्र,भाजपसारख्या देशातील बलाढ्य पक्षातील मुनगंटीवारसारख्या मंत्र्यांना डच्चू मिळणे या मागील कारणांचा शोध घेतला जाऊ लागला,त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रामगिरीवर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ‘सारगर्भित’विधान केले,‘काहींची कामगिरी बरोबर नसल्याने मंत्रीपद मिळालं नसावं!‘त्यांच्या या ही विधानाचा ‘अर्थ’ही शोधला जाऊ लागला.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार विधान सभा निवडणूकी पूर्वी चंद्रपूर विधान सभा मतदारसंघासाठी अपक्ष जोरगेवार यांना भाजपकडून तिकिट मिळण्याची शास्वती असताना मुनगंटीवार हे स्वत: विमानाने दिल्लीत बृजभूषण पाझारे यांना तिकीट मिळावी यासाठी घेऊन गेले होते!गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पाझारे यांना तिकीट देण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे.राज्यातील नेतृत्वाला डावलून सरळ अमित शहा यांच्याकडेच तिकीटाची मागणी करणारी ‘कृती’ ही फडणवीस यांना रुचली नसल्याचा दावा केला जात आहे.
विधान सभेची रणधुमाळी सुरु असताना चंद्रपूरात जोरगेवारांसाठी ‘खास’अमित शहा यांची सभा ठेवण्यात आली त्यावेळी देखील मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे भाजपचे निवडणूक प्रभारी विनोद तावडे यांच्याकडे फोनवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.चंद्रपूरला जोरगेवारांसाठी शहा यांची सभा होते आहे मात्र,माझ्या मतदारसंघात बल्लारपूरात नाही,याचा काय अर्थ समजायचा?’अशी स्पष्ट नाराजी तावडे यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभेची निवडणूकही मुनगंटीवार हे मुळीच लढण्याच्या मानसिकतेत नव्हते.त्यांनी शहा यांच्याकडे ही निवडणूक न लढण्याची आपली भावना व्यक्त देखील केली होती.राज्यातील राजकारणात मुरलेले मुनगंटीवार केंद्रात जाण्यास उत्सूक नव्हतेच.नागपूर,विदर्भातून भाजपचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे केंद्रात मंत्री पदी असल्याने मुनगंटीवारांना केंद्रात मंत्री पद मिळणे दुरापस्तच होते,परिणामी ऐन सभेत महिलांविषयी वादग्रस्त विधान केले अन् पराभव ओढून घेतला .काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी महाराष्ट्रातील या कद्दावर मंत्र्यांचा सहज पराभव केला.यानंतर मुनगंटीवार हे राज्यातील वनमंत्री पदी कायम राहीले.
लोकसभेच्या निवडणूकीत ज्या बल्लापूर मतदारसंघातून त्यांना सर्वात कमी मते मिळाली त्याच मतदारसंघातून ते विधानसभेत लाखभर मते घेऊन विजयी झाले.अवघ्या चार-सहा महिन्यात मतदारांच्या मानसिकतेत परिवर्तन घडण्याचा हा ‘चमत्कार ’कसा घडला,यावर उपरोधिक बोल त्यानंतर ऐकू येऊ आले.त्यांच्या विरोधात काँग्रेसचे संतोष रावत उभे होते ते हरण्यासाठीच,असे स्पष्ट मत बल्लापूरात अनेकांनी ऑन कॅमरा ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केले होते.निवडणूकीनंतर रावत यांनी देखील लाखभर मते घेतली ते मतदारांना दाखवायला की सामना एकतर्फी नाही तर अटीतटीचा झाला आहे!या दोघांच्या खेळीत काँग्रेसकडून इच्छूक उच्चविद्याभूषित डॉ.अभिलाषा गावतुरे यांचा मात्र,अपक्ष म्हणून लढल्यामुळे पराभव झाला.दिल्लीतील काँग्रेसलाच जिंकणारा उमेदवार नको होता,असा हमखास ‘सूर’बल्लारपूरात ऐकू आला.काँग्रेसचे संविधान प्रेम बेगडी असून संविधानातील स्त्री-पुरुष समानता आणि समान संधी या तत्वांवर काँग्रेसलाच विश्वास नसल्याची टिका ही करण्यात आली.काँग्रेसचे खायचे दात आणि दाखवायचे दात यात फरक असल्याची नाराजी बल्लारपूरात उमटली होती.
१९९५ मध्ये मुनगंटीवार हे शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये पाच वर्षे मंत्री होते.महत्वाचे अर्थखाते त्यांच्याकडे होते,ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील होते.शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्याकडून अर्थ खाते काढून घेण्यात आले व फडणवीस यांनी ते स्वत:कडे ठेवले.अजित पवार यांचा युतीमध्ये समावेश झाल्यानंतर फडणवीस यांनी अर्थखाते अजित पवारांना सोपवले.मुनगंटीवार यांच्याकडे दुय्यम समजल्या जाणारे वन खाते राहू दिले.२०१४ मध्ये राज्यात फडणवीस सरकारमध्ये मुनगंटीवार यांचे चांगलेच वजन होते.त्यावर विधानसभेत अनेकवेळा विरोधकांनी कोपरखळ्या मारल्या.फडणवीस यांच्या बाजूला जरी आज बसले आहात तरी अधिक जोशाने काम करु नका,कधी मंत्री पदाची तुमची खूर्ची रिकामी होईल हे कळणार देखील नाही,हे जणू ‘वास्तवच’विरोधक मुनगंटीवारांना सूचवित होते,त्यावेळी मुनगंटीवार हसून,माझी काळजी करु नका,तुमचं नैराश्य तुमच्याचकडे ठेवा,असे उत्तर देते झाले.यंदा मात्र विरोधकांचा ‘दावा’खरा ठरला.फडणवीसांनी फक्त फक्त बल्लारपूरच नव्हे तर संपूर्ण चंद्रपूर जिल्हाच मंत्री पदमुक्त ठेवला.
मुनगंटीवार मंत्री राहून फायदा काय झाला?असा सरळ प्रश्न तेथील जनतेनी केला होता.बल्लारपूरात विकासाची गंगा ही ‘मिशन-कमिशन’मध्येच वाहत गेल्याची टिका तेथील विरोधकांनी केली.चंद्रपूर,बल्लारपूरात येणा-या प्रत्येक प्रकल्पातून ५० ते १०० कोटी कसे येतील यावर त्या प्रकल्पाचे यश ठरत होते.बल्लारपूरातील अनेक शेतकरी हे शेजारच्या तेलांगणात एखाद्या बंधूवा मजूरांसारखे राबते झाले.त्यांचे आधार कार्ड जप्त करुन ठेवल्या जातात,त्यांना शेतात झोपड्या बांधून दिल्या जातात,अतिशय हलाकीचे जीवन बल्लारपूरातील शेतकरी हा तेलांगणात व्यतीत करीत आहे,हे दाहक वास्तव देखील अनेक शेतकरी कुटूंबियांनी ‘सत्ताधीश’कडे व्यक्त केले.सर्वाधिक बाल लैंगिक शोषण हे मुनगंटीवारांच्या मतदारसंघात व चंद्रपूर भागात घडल्या असा अहवाल देखील एका दैनिकांनी प्रसिद्ध केला आहे..आई-वडील तेलंगणात असल्यामुळे लहान बालके हे सहज टार्गेट ठरली.मुनगंटीवार यांच्या विकास गंगेतील प्रवाह शेतक-यांच्या दारात पोहोचलाच नाही त्यामुळे अनेक गाव ओसाड पडली.राेजगार हमी योजना देखील मर्जीतील ठेकदारांच्या घश्यात गेली.तेथील जिल्हा परिषदेच्या विविध योजना देखील मंत्र्यांच्या लाथार्थ्यांनाच चालवण्यासाठी मिळाल्या.
(छायाचित्र : चंद्रपूर येथील मुनगंटीवार यांचे घर)
मुनगंटीवार मंत्री असतानाच बल्लापूरातील प्रोटीन फॅक्टरी बंद पडली.किमान ५०० लोकांचा रोजगार बुडाला. ८०० कोटी खर्च करुन बल्लारपूरात बॉटनिकल गार्डन निर्माण केले,६० रुपये तिकीट लावले त्या गार्डनमध्ये दिवसभरात ६० लोक ही येत नाही.सगळीकडे झुडपे वाढली,८०० कोटींच्या गार्डनचे कोणतेही मेंटेनस नाही,संपूर्ण लॉन खराब झाले,सरकारी बॉटनिकल गार्डनमध्ये एक खासगी हॉटेल सुरु असून सर्रास मद्याची विक्री होते.मंत्री असूनदेखील बल्लारपूरात ५०० लोकांचाही रोजगार निर्माण केला नसल्याचा आरोप केला जातो.
राज्यात ३३ कोटी झाडे लावण्याची योजना ही देखील पैसे खाऊ ठरली.शासकीय रुग्णालयातील एका बॉन्सायसाठी १४ हजार किंमत मोजल्या गेली.अधिष्ठाताही गप्प बसले.शासकीय मेडीकल कॉलेजमधील एनआरए,टेली मेडीसीनच्या कर्मचा-यांना गत पाच महिन्यांपासून पगार मिळाला नाही.गेल्या तीन वर्षांपासून मेडीकल कॉलेज १९० स्वच्छता कर्मचारी मागत आहे मात्र,वॉर्ड बॉय यांना स्वच्छता करण्याची फर्मान सोडण्यात आले!अतिशय अस्वच्छतेमुळे त्या रुग्णालयात जन्मणारे प्रत्येक दुसरे बाळ हे संक्रमित होत असून माता व बाळाला संक्रमणातून गंभीर धोका निर्माण होत आहे.नंदूरबार नंतर चंद्रपूर हे माता व बालमृत्यूसाठी कूप्रसिद्ध झाले आहे.
तेथील शासकीय महाविद्यालयात ९ वी व १० वी विद्यार्थी हे गणित व विज्ञान शिक्षक नसल्याने मोर्चा काढत आहेत.मुनगंटीवारांच्या मंत्री पदाच्या काळात प्रचंड भ्रष्टाचारातून चंद्रपूर जिल्हा हा ५० वर्ष मागे गेला,असा सरळ आरोप विरोधक करतात.वनमंत्री असताना शेतक-यांच्या शेतातच नर्सरी लावण्यात आल्या.वन विभागाच्या या प्रतापामुळे ‘मारोगा’गावातील शेतकरी आता वन्य प्राण्यांच्या भीतीने शेतात देखील जात नाही.गेल्या चाळीस वर्षांपासून जमीन कसत असल्याने,शेतक-यांना मिळालेली ‘जबरान जोत’च्या जमीनी देखील त्यांच्या ताब्यातून काढून घेण्यात आल्या!जबरान जोतची जमीन वनमंत्र्यांच्या काळात वन विभागासाठी ‘वन जमीनी’झाल्या.दोनशे एकरपेक्षा जास्त जबरान जमीनी वनमंत्र्यांच्या अधिका-यांनी शेतक-यांकडून जबरीने काढून घेतल्या,एवढा तीव्र संताप वनमंत्र्यांच्याविषयी तेथील शेतकरी,विद्यार्थी,नागरिक आणि शासकीय कर्मचा-यांच्या मनात असताना,लाख भर मते घेऊन ते निवडून आले मात्र,ते आता मंत्री बनले नाही,हे बघून कोणीही मोर्चे काढले नाही,कुठेही उद्रेग झाला नाही.शेतकरी,विद्यार्थी,नागरिकांचे जीवन उधवस्त करणा-या याच आपल्या विकासा गंगेमुळे त्यांना यंदा दिवस रात्र प्रचार करावा लागला,गल्लोगल्ली मत मागण्यासाठी फिरावे लागले.
मंत्री पदाने हुलकावणी दिल्याने ते आज गडकरी यांच्या दारी देखील जाऊन आले.गडकरी यांनी किमान नागपूरात मेट्रो असो किवा उड्डाण पूले,सिमेंटचे रस्ते आणले त्यामुळे विकास दिसून तरी पडतो,मुनगंटीवारांकडे त्यांच्या मतदारसंघात विकासाचे कोणतेही ‘मॉडल’दाखवण्यासारखे नाही.परिणामी,गडकरी त्यांना राज्यातल्या राजकारणात किवा दिल्लीच्या दरबारात मंत्री पद देण्यासाठी कोणते सहाय्य करतात,याकडे आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
……………………………….