नागपूरात राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्री शपथविधी सोहळा
भाजपकडे १६ केबिनेट ३ राज्यमंत्री
शिवसेना शिंदे गटाचे ११ कॅबिनेट २ राज्यमंत्री:रामटेकमधील आशिष जयसवाल यांना राज्यमंत्री पद
अजित पवाद गटाचे ८ कॅबिनेट १ राज्यमंत्री
नागपूर,जळगाव जिल्ह्याला ३-३ कॅबिनेट मंत्री पद
पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तीन कॅबिनेट एक राज्यमंत्री पद
नाशिक,जळगाव जिल्ह्यात ३-३ कॅबिनेट मंत्री पद
सातारा जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री पद
१६ जिल्ह्यात एक ही मंत्री पद नाही
तिन्ही पक्षांकडून २० नव्या चेह-यांना संधी
सर्व समाज घटकांना समावेश:जातीय समीकरण साधले
नागपूर,ता.१५ डिसेंबर २०२४: फडणवीस यांच्या ३.० सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी सोहळा आज सायंकाळी पावणे पाच वाजता नागपूरातील राजभवनात सुरु झाला,या सोहळ्यात भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी अजित पवार गट तसेच शिवसेना एकनाथ शिंदे गटातील एकूण ३९ मंत्र्यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या कडून मंत्री पदाची शपथ घेतली.यात ३३ कॅबिनेट तसेच ६ राज्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
सर्वात आधी पहील्या क्रमांकावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कामठीतून सलग पाच वेळा आमदार राहीलेले चंद्रशेखर बावणकुळे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.बावणकुळे यांना २०१९ मध्ये मात्र, विधान सभेचं तिकीट ही मिळू शकले नव्हते.देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची चांगलीच खप्पामर्जी बावणकुळेंवर झाली होती.पुढे ओबीसी यांच्या नाराजीनाट्याची कारणे देऊन बावणकुळेंना पुन्हा सत्ताकेंद्रात आणण्याचे काम झाले.आधी भाजप प्रदेशाध्यक्ष व यानंतर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आले.बावणकुळे यांना त्यांच्या संयमाचे व निष्ठेचे फळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे.बावणकुळे हे एकमेव असे नेते आहेत जे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही जवळचे समजले जातात.
यानंतर भाजपचे शिर्डीचे आमदार व माजी मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांनी शपथ घेतली.ते आठ वेळा आमदार राहीले आहेत.तिस-या क्रमांकावर अजित पवार गटाचे कागल मधील आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी शपथ घेतली.हसन मुश्रीफ यांच्या मंत्रीपदावर अनेकांचा आक्षेप होता मात्र,त्यांची जोरदार फिल्डिंग यशस्वी झाली.अल्पसंख्यांक चेहरा म्हणून त्यांना डावलने अजित पवार यांच्या राजकीय नीतीमत्तेत बसणारे तत्व नव्हते.या नंतर भाजपचे कोथरुड येथील आमदार व माजी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शपथ घेतली.ते मूळचे कोल्हापूरचे असले तरी पुणे येथील कोथरुड येथून ते २०१९ पासून आमदारकी लढवित आहेत. फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहील्या काळखंडापासून कॅबिनेट मंत्री आहेत.ते २०१४ पासून तीन वेळा आमदार राहीले आहेत.यानंतर फडणवीस यांचे जीवश्च,कंठस्थ मित्र जामनेर मधील आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शपथ घेतली.
शिंदे गटातील पहील्या मंत्री पदाची शपथ जळगांव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतली.ते पाच वेळा आमदार राहीले आहेत.२०१९ मध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये ते शिवसेनेकडून पाणी पुरवठा मंत्री होते तसेच जळगांवचे पालकमंत्री देखील होते मात्र,२१ जून २०२२ रोजी शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिंदे १६ आमदारांसह गुहावटीला निघून गेले त्यात गुलाबराव पाटील देखील होते.गुलाबराव पाटील यांना त्या निष्ठेचे फळ आजही मिळाले.पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडणारे ते नेते आहेत.शपथग्रहणानंतर त्यांनी शिंदे यांना चरणस्पर्श केला.
यानंतर आठव्या क्रमांकावर भाजपचे एरोली येथील आमदार गणेश रामचंद्र नाईक यांनी शपथ घेतली.१९९५ पासून ते ७ वेळा आमदार राहीले आहेत.यानंतर मालेगांव(बाह्य)चे शिंदे गटाचे आमदार व माजी मंत्री दादाजी भुसे यांचा शपथग्रहण झाला.२००४ पासून ते राजकारणात आहेत.उद्धव ठाकरे सरकारमध्येही ते कृषि मंत्री होते मात्र,शिवसेनेत फुटीनंतर ते शिंदे यांच्यासोबत गेले.शिंदे सरकारमध्येही ते कॅबिनेट मंत्री होते.पालघरचे ते पालकमंत्री होते.शिंदे गटाचेच दिग्रसचे (वादग्रस्त)आमदार संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.ते देखील २००४ पासून आमदार राहीले आहेत.
याच क्रमवारीत अजित पवार गटाचे आणखी एक (वादग्रस्त)आमदार परळीचे धनंजय मुंडे यांानी शपथ घेतली.२०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता.विधान परिषदेतून ते विधान सभेत आले.यानंतर मुंबईच्या मालाबार हिल मतदारसंघातून भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी शपथ घेतली.ते १९९५ पासून ७ वेळा आमदार राहीले आहेत.त्यांनी गुजराती भाषेतून शपथ घेतली.
यानंतर शिंदे गटाचे अर्ध्यवू असलेले व रत्नागिरी जिल्ह्यात दमदार वर्चस्व असलेले आमदार व माजी उद्योग मंत्री उदय सामंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला.ते पाच वेळा आमदार राहीले आहेत.त्यांच्यानंतर भाजपचे जयकुमार रावल यांनी शपथ घेतली.शिंदेखेडा येथून ते २००४ पासून आमदार राहीले आहेत.
यानंतर भाजपच्या पंकजा मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.या निमित्ताने परळीतून व बिड जिल्ह्याला मुंडे बंधू-भगिनीच्या रुपात दोन कॅबिनेट मंत्री पद मिळाले.पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या २०२४ मध्ये आमदार झाल्या आहेत.भाजपच्या संभाजीनगरचे आमदार अतुल सावे यांनी यानंतर शपथ घेतली.२०१४ पासून ते तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.भाजपचेच राळेगाव मतदारसंघाचे अशोक उईके यांचे देखील शपथग्रहण झाले.त्यांच्या रुपाने आदिवासी जमातीला मंत्रीपद पुन्हा एकदा मिळाले.यानंतर शिंदे गटाचे पाटण मतदारसंघाचे आमदार शंभुराज देसाई यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.ते शिंदे सरकारमध्ये देखील मंत्री होते.चार वेळा त्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे.
यानंतर वांद्रे(पश्चिम)चे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शपथ घेतली.ते चार वेळा भाजपचे आमदार राहीले आहेत.
यानंतर इंदापूरचे अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे यांचा शपथविधी झाला.२०१४ पासून ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत.यानंतर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघाच्या अजित पवार गटाच्या आमदार अदिती तटकरे यांनी शपथग्रहण केले.२०१९ पासून त्या दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या.वयाच्या ३६ व्या वर्षात त्या दुस-यांदा यूवा मंत्री ठरल्या आहेत.शिंदे सरकारमध्ये त्या महिला व बालविकास मंत्री होत्या.जयहिंद,जय महाराष्ट्रासोबतच त्यांनी शपथ अखेर ‘जय श्रीकृष्ण’चा उच्चार केला.महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण’योजनेच्या यशस्वीतेत त्यांचा मोलाचा वाटा राहीला आहे.
यानंतर सातारा मतदारसंघाचे भाजपचे शिवेंद्र राजे भोसले यांनी शपथ घेतली.२००४ पासून ते आमदार राहीले आहेत.यानंतर अजित पवार गटाचे सिन्नर मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी शपथ घेतली.२००९ पासून चार वेळा ते आमदार राहीले आहेत.राष्ट्रवादीत फूट झाली तेव्हा ते अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले.यानंतर माण मतदारसंघातून चार वेळा आमदार राहीलेले भाजपचे जयकुमार गोरे यांनी शपथ घेतली.यानंतर अजित पवार गटाचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघाचे आमदार व माती विधानसभा उपाध्यक्ष नरहीर झिरवाळ यांनी शपथ घेतली.२००९ पासून सलग चौथ्यांदा ते आमदार पदी निवडून आले.शपथ संपवताना त्यांनी जय हिंद,जय महाराष्ट्रासोबतच‘जय श्री राम’चा उच्चार केला.
यानंतर भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी शपथ घेतली.ते तीन वेळा आमदार राहीले आहेत.२०१४ मध्ये ते राष्ट्रवादीत होते यानंतर ते भाजपात गेले.त्यांनी ‘जय भीम’अशी मानवंदना केली.यानंतर शिंदे गटाचे फायरब्रॅण्ड आमदार व प्रवक्ते संजय शिरसाट यांचा शपथविधी झाला.ते संभाजी नगर(पश्चिम)मधून आमदार आहेत.चार वेळा ते आमदार राहीले आहेत.त्यांनी देखील शपथ संपवल्यानंतर ‘जय श्री राम’चा जयघोष केला.शिंदे गटाचेच आेवळा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी यानंतर शपथ घेतली.ते देखील चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.शिंदे गटाचेच महाड येथील भरत गोगावले यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या स्मृतीला अभिवादन करुन शपथेची सुरवात केली.ग्रामपंचायत सदस्य पासून आपली राजकी कारर्कीद सुरु करणारे भरत गोगावले हे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री बनले.यानंतर अजित पवार गटाचे वाई मतदारसंघाचे मकरंद जाधव यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.ते सिविल इंजिनिअर आहेत.यानंतर कणकवली(जि.रत्नागिरी)मधून भाजपचे आमदार नितेश राणे यांचा शपथविधी पार पडला.ते २०१४ पासून आमदार आहेत.महाराष्ट्रातील जनतेचा एक ही दिवस असा जात नाही जेव्हा उद्धव ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विधानावर नितेश राणे यांची प्रतिक्रिया आली नसेल.आज ही ते हिंदूत्वाचे गोडवे गात भगवा शर्ट परिधान करुन आले होते.त्यांच्या शपथविधीला भाजपचे खासदार व माजी मंत्री नारायण राणे अर्वाजून उपस्थित होते.यानंतर भाजपचेच खामगाव मतदारसंघाचे आकाश फुंडकर यांनी शपथ घेतली.ते ३ वेळा आमदार राहीले आहेत.भाजपच्याच अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी देखील कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.ते देखील तीन वेळा आमदार राहीले आहेत.
यानंतर कॅबिनेट मंत्री पदी सर्वात शेवटी शिंदे गटाचे राधानगरीचे आमदार प्रकाश आबेटकर यांनी शपथ घेतली.२०१४ पासून ते तिस-यांदा आमदार झाले आहेत.त्यांनी देखील शपथ ग्रहणानंतर राज्यपालांकडून पुष्पगुच्छ स्वीकारल्यानंतर शिंदे यांचे चरणस्पर्श केले.
यानंतर राज्यमंत्री पदी सर्वात पहीली शपथ भाजपच्या पर्वती(पुणे)येथील आमदार माधुरी मिसाळ यांनी शपथ घेतली.२००९ पासून त्या चार वेळा आमदार राहील्या आहेत.यानंतर शिंदे गटाचे रामटेकचे आमदार आशिष जयसवाल यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.रामटेकमधून काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक यांनी या निवडणूकीत जयसवाल यांच्या तोंडचे पाणी पळवले होते मात्र,जयसवाल यांनी विजय खेचून आणला.रामटेकमधून २०१९ मध्ये आशिष जयसवाल हे अपक्ष म्हणून लढले होत.यानंतर ते शिंदे गटात सहभागी झाले.तीन वेळा ते रामटेकचे आमदार राहीले आहेत.
यानंतर राज्यमंत्री म्हणून भाजपच्या वर्धा येथील आमदार पंकज भोयर यांनी शपथ घेतली.ते २०१४ पासून आमदार आहेत.भाजपच्याच जिंतूर मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी यानंतर शपथ घेतली.त्या दोन वेळा आमदार राहील्या आहेत.त्यांनी देखील शपथग्रहणानंतर जय हिंद,जय महाराष्ट्रासोबतच ‘जय श्री राम’चा जयघोष केला.त्यांच्या राज्यमंत्री पदाच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्याचा १४ वर्षांचा मंत्रीपदाचा वनवास संपला आहे.यानंतर अजित पवार गटाचे पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनी शपथ घेतली.ते देखील दोन वेळा आमदार झाले आहे.सर्वात शेवटी शिंदे गटाचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.ते २०१९ नंतर दुस-यांदा आमदार झाले आहेत.अश्यारितीने आज ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला असून यात ३३ कॅबिनेट ६ राज्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळा पार पडला.
भाजप,अजित पवार तसेच शिंदे गटाने २० नवे चेहरे आज दिले.भाजपने ९ तर शिंदे गटाने ६ नव्या चेह-यांना संधी दिली.अजित पवार यांनी ५ नवे चेहरे दिले.भाजपचे १६ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री आहेत.शिंदे गटाचे ९ कॅबिनेट व २ राज्यमंत्री तर अजित पवार गटाचे ८ कॅबिनेट व १ राज्यमंत्री आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरत गोगावले,संजय शिरसाट,प्रताप सरनाईक,प्रकाश आबिटकर,आशिष जयसवाल या नव्या चेह-यांना संधी दिली असून अजित पवार गटाचे आमदार योगेश कदम,नरहरी झिरवाळ,कोकाटे,मकरंद पाटील,बाबासाहेब पाटील,इंद्रनील नाईक आदींचा पहिल्यांदा मंत्री पदी समावेश झाला.भाजपने नितेश राणे,शिवेंद्र राजे भोसले,अशोक उईके,आकाश फूंडकर,जयकुमार गोरे आदी या नवीन चेह-यांदा समावेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहील्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात सर्व जातींचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून भाजपच्या १९ मंत्र्यांपैक ७ ओबीसी ६ मराठा २ कुणबी,१ अनुसूचित जाती,१ अनुसूचित जनजाती तसेच २ इतर समाजाचे आहेत.शिंदे गटाच्या ११ मंत्र्यांपैकी ३ ओबीसी,५ मराठा,१ कुणबी,१ अनुसूचित जाती व १ इतर समजाचा मंत्री आहे.अजित पवार गटाच्या एकूण ९ मंत्र्यांपैकी ४ ओबीसी,३ मराठा-कुणबी,१ अनुसूचित जनजातीचे मंत्री आहेत.
याशिवाय भाजपने सातारा जिल्ह्यात २,शिंदे गटाने १ व अजित पवार गटाने १ असे एकूण ४ कॅबिनेट मंत्री दिले.यात शिवेंद्रराजे भोसले,सातारा(भाजपा)जयकुमार गारे,माण-खटाव(भाजप)शंभुराज देसाई,पाटण(शिंदे गट)तसेच मकरंद पाटील,वाई(दादा गट)यांचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात भाजपने गिरीश महाजन,जामनेर,संजय सावकारे,भुसावळ,असे दोन तर शिंदे गटाने गुलाबराव पाटील,जळगाव (ग्रामीण)अशी तीन मंत्री पदे दिली आहेत.
नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाचे दादा भुसे ,मालेगाव,तर दादा गटाचे माणिकराव कोकाटे,सिन्नर तसेच नरहरी झिरवाळ,दिंडोरी असे तीन कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहेत.
पुणे जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सह दत्तात्रय भरणे हे इंदापूरमधून कॅबिनेट मंत्री आहेत.याशिवाय भाजपचे चंद्रकांत पाटील कोथरुड मधून कॅबिनेट तर माधुरी मिसाळ पर्वतीमधून राज्यमंत्री झाले आहेत.असे ३ कॅबिनेट तर १ राज्यमंत्री पद पुणे जिल्ह्याला मिळाले.
रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे गटाचे उदय सामंत,भाजपचे कणकवलीतून नितेश राणे तर शिंदे गटाचे योगेश कदम दापोली मधून असे एकूण २ कॅबिनेट व १ राज्यमंत्री पद मिळाले आहे.
रायगड जिल्ह्यातून दादा गटाच्या आदिती तटकरे श्रीवर्धन मतदारसंघातून तर शिंदे गटाचे भरत गोगावले महाड येथूून असे २ कॅबिनेट मंत्री मिळाले.
कोल्हापूर जिल्ह्याला दादा गटाचे कागलमधून हसन मुश्रीफ तर शिंदे गटाचे राधानगरीतून प्रकाश आबिटकर असे २ कॅबिनेट मंत्री मिळाले.
नागपूर जिल्ह्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह,चंद्रशेखर बावणकुळे कामठीतून एक एक कॅबिनेट तर रामटेकमधून शिंदे गटाचे आशिष जयसवाल यांच्या राज्यमंत्री पदातून एकूण २ मंत्री पद मिळाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातून शिंदे गटाचे संजय राठोड,दिग्रस,भाजपचे राळेगावचे अशोक उईके तसेच दादा गटाचे पुसदचे इंद्रनील नाईक असे दोन कॅबिनेट व १ राज्यमंत्री पद मिळाले.
मुंबई जिल्ह्यातून भाजपचे आशिष शेलार,वांद्रे तसेच मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा असे दोन कॅबिनेट मंत्री मिळाले आहेत.
संभाजी नगर जिल्ह्यातून भाजपचे अतुल सावे तसेच शिंदे गटाचे संजय शिरसाट असे २ कॅबिनेट मंत्री मिळाले.
याशिवाय नगर जिल्ह्यातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील,धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल,,बुलढाणा जिल्ह्यातून भाजपचे आकाश फूंडकर तर दादा गटाचे लातूर जिल्ह्यातून बाबासाहेब पाटील यांना असे प्रत्येकी १ कॅबिनेट मंत्री पद मिळाले.
राज्यातील १६ जिल्ह्यातून मात्र एक ही मंत्री पद नाही.थोडक्यात,तिन्ही पक्षातील अनेक मंत्र्यांना मात्र डच्चू मिळाला आहे.
……………………….