शेळके समर्थक मैदानात: कारणे दाखवा नोटीस मागे घेण्याची पत्रकार परिषदेत केली मागणी
पटोलेंवर पुन्हा एकदा घणाघात:पदाला मान,पटोलेंना नाही
मध्य नागपूरातील पदाधिकारी पश्चिम नागपूरात प्रचारात दंग: शेळकेंच्या समर्थकांचा आरोप
नागपूर,ता.३ डिसेंबर २०२४: महाराष्ट्रात कधी नव्हे तो राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा अवघ्या १६ जागांवर आला आहे,हे कोणाचे अपयश आहे?प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच काल ज्यांनी मध्य नागपूरातील काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली त्या पक्षातीली मोठ्या नेत्यांचा हा पराभव असून, या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत त्या सर्वांनी तात्काळ राजीनामा द्यावा,पटोलेंविषयी बंटी शेळकेंना जी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली ती तात्काळ मागे घ्यावी,आम्ही बंटी शेळकेंसाठी आर-पारची लढाई लढण्यास तत्पर आहोत,असा इशारा आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत नागपूर शहर युथ काँग्रेस अध्यक्ष तोसिफ खान,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे इरफान काझी,ज्येष्ठ काँग्रेसी नेते सेवादलाचे बबनराव दुरुगकर,अश्रफ खान आदी यांनी दिला.
मध्य नागपूरात बंटी शेळके यांच्या विजयासाठी आम्ही तरुणाईने दिवसरात्र खूप परिश्रम घेतले,फक्त काही तासांची झोप घेत होतो मात्र,काँग्रेसचे मध्य नागपूरातील मोठे नेते,पदाधिकारी हे पश्चिम नागपूरात प्रचारात व्यस्त होते,असा आराेप शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांचे नाव न घेता शेळके यांच्या समर्थकांनी याप्रसंगी केला.
पटोले यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची दुर्गती झाली,असा घणाघात त्यांनी केला.पक्षाचे शीर्षस्थ नेते राहूल गांधी,प्रियंका गांधी यांनीच विचार केला पाहिजे जे प्रदेशाध्यक्ष स्वत: २२० मतांनी जिंकून येतात ते इतरांना काय विजयी करतील?असा टोला त्यांनी हाणला.काल बंटी शेळकेंच्या विरोधात ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ते सर्व प्रियंका गांधी यांच्यासोबत प्रचार रथावर नागपूरात चढण्यास आतूर झाले होते मात्र,मध्य नागपूरात मतदानाच्या दिवशी ते सगळे नेते कुठे होते?असा सवाल त्यांनी केला.
एका तरुण उम्दा कार्यकर्त्याला ज्याने दोन वेळा टक्करीची लढत मध्य नागपूरातून दिली,स्वत:च्या कर्तृत्वातून तिकीट खेचून आणले त्याला ‘कारणे दाखवा’नोटीस पाठवणे योग्य नाही,असे त्यांनी ठणकावले.बंटी याने पटोले यांना संघाचा ‘दलाल’नव्हे तर ‘एजेंट’संबोधले होते,दलाल व एजेंट या शब्दांच्या अर्थात खूप फरक आहे.एजेंट हा उदईसारखे घर पोखरत असतो.एकीकडे भाजप व संघाने नागपूर ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची शपथ घेतली आहे,अश्यावेळी बंटी शेळके हाच एकमेव त्यांना दमदार टक्कर देत आहे.दुसरीकडे पटोले यांना २८८ पैकी फक्त १६ जागा जिंकता आल्या,अश्यावेळी त्यांनी नैतिकतेच्या आधारावर शेळके याला नोटीस पाठवण्या ऐजवी स्वत: पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.
लोकसभेत याच पटोलेंनी काँग्रेसला १३ खासदार निवडून दिले,याकडे लक्ष वेधले असता,पटालेंनी नव्हे तर काँग्रेस पक्षाने १३ खासदार निवडून पाठवले असल्याचे ते म्हणाले.आमच्यासाठी २०१९ पासून पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाखाली ज्या गतिवधी होत आहेत त्या महत्वाच्या आहेत.नागपूर शहरात काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष ज्या तेली समजातील होत्या,ओबीसींचे प्रतिनिधित्व करीत होत्या,ज्यांनी ओबीसींना परत काँग्रेसकडे आणण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले त्या प्रज्ञा बडवाईक यांना एका रात्रीत पटोले यांनी पदावरुन मुक्त केले व नॅश नुसरत अली यांना पद बहाल केले.२०१९ पासून पक्षासाठी नॅश अलीने कोणती कामगिरी केली?त्यांना बंटी शेळकेंच्या विरोधात कालच्या पत्रकार परिषदेत मंचावर बसण्याचा काय नैतिक अधिकार आहे?असा सवाल त्यांनी केला.बंटी शेळके हाच भाजप आणि संघासोबत आर-पारची लढाई लढत असल्याचा दावा त्यांनी केला.आम्ही प्रदेशाध्यक्ष पदाचा सन्मान करतो पण पटोलेंचा नाही,असा सरळ हल्ला त्यांनी केला.
काल बंटी शेळकेंच्या विरोधात प्रदेश पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेतल्यानेच आम्ही बंटी शेळकेंच्या समर्थनात आज पत्रकार परिषद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.गरज पडल्यास आम्ही देखील राहूल गांधींपर्यंत जाऊ,असा इशारा त्यांनी दिला.शेळके यांच्या पराभवाला हातभार लावणारा ‘जातीची माती’खाणारा देखील होता,असा टोमणा रमेश पुणेकर यांचे नाव न घेता त्यांनी मारला.शहराध्यक्ष विकास ठाकरेंनी सर्वात आधी पुणेकर याला जाब विचारणे अपेक्षीत होते,मात्र,विकास ठाकरे यांनी पुणेकरला कोणतीही नोटीस पाठवली नाही.माजी नगरसेवक फिरोज खान याला देखील शेळके विरोधात पत्रकार परिषद घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नव्हता,असे शेळके समर्थक म्हणाले.पुणेकर यांना बंटीच्या विरोधात उभा केला या चर्चेत तथ्य आहे का?असे विचारले असता,यात तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले.
मध्य नागपूरातून बंटी शेळके यांचा २०१९ मध्ये केवळ चार हजार मतांनी निसटता पराभव झाला,यंदा भाजपचे प्रवीण दटके ११ हजार मतांनी जिंकले,ईव्हीएमबाबत जो सर्व्हे पुढे येत आहे त्यात मध्य नागपूर मतदारसंघातही मतदानापेक्षा जास्त मतदान झाल्याची बाब पुढे आली आहे,या विषयी विचारले असता,ही बाब खरी असल्याचे ते म्हणाले.सायंकाळी ६ वा.निवडणूक आयोगाने ५४ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले,यानंतर ६२ टक्के सांगितले.मतमोजणीच्या दिवशी चक्क ६५ टक्के मतदान झाल्याचे घोषित केले.संपूर्ण महाराष्ट्रातच ७८ लाख मतदान वाढल्याचे निवडणूक आयोग दावा करत आहे जे अविश्वसनीय आहे.मध्य नागपूरात तर झाडून-पुसुन सर्व मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले,प्रत्येक मंदिराचे अध्यक्ष,कमेटी सदस्य भगवे दुपट्टे घालून ‘जय श्री राम’चे नारे देताना आढळत होते.पाण्यासारखा पैसा या निवडणूकीत ओतला असल्याचा आरोप त्यांनी केला.
राहूल गांधी हे नेहमी ‘डरो मत’असे कार्यकर्त्यांना सांगतात.त्यामुळेच काँग्रेसी कार्यकर्त्यांमध्येही निर्भयता आली आहे.आम्ही त्यांच्या ‘डरो मत’या आव्हानाचा आदर करुनच ही पत्रकार परिषद घेत आहोत,आमच्या भावना ते समजून घेतील,ते जो काही निर्णय घेतील,त्याविषयी आम्ही पुन्हा पत्रकार परिषद घेऊ,असे ते म्हणाले.मात्र,काल ज्यांनी कोणी बंटी शेळकेंच्या विराेधात पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्वत:च्या घरी किवा कार्यालयात तरी काँग्रेसचा झेंडा लावला होता का?मध्य नागपूरात बंटी शेळकेच्या प्रचारात एकदा तरी आले होते का?रॅलीत भाग घेतला किवा सभेत सहभागी झाले होते का?याचे उत्तर त्यांनी द्यावे,असे आव्हान त्यांनी केले.
बंटी शेळकेंनी त्यांच्या पराभवानंतर नाना यांना ‘संघाचा एजेंट’म्हणून हिणवले,त्या विरोधात पक्षाने शेळके यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून ,काल प्रदेश व शहर पदाधिकारी यांनी शेळकेंविरोधात पत्रकार परिषद घेतली होती.यात प्रदेश सरचिटणीस व व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अतुल कोटेजा,दक्ष्णचे उमेदवार गिरीश पांडव,प्रशांत धवड,कमलेश समर्थ,हैदर अली दोसानी,संजय महाकाळकर,आसिफ कुरैशी,माजी महिला शहराध्यक्ष नॅश नुसरत अली,चंदू वाकोडीकर,प्रदेश युवक उपाध्यक्ष तौसिफ खान,अनिल बानबाकोडे,गुड्डू तिवारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.मध्य नागपूरातून ३६ जणांनी उमेदवारी मागितली होती,शेळके यांना २०१९ नंतर पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली,पक्षाने त्यांच्यावर जामात्र,शेळके यांनी नाना पटोले व शहराध्यक्ष विकास ठाकरेंवर बिनबुडाचे आरोप केले,पक्षाच्या नेत्यांबद्दल अपशब्द काढले,पक्षांतर्गत बाब पक्षाच्या व्यासपीठावर न मांडता जाहीरपणे वाच्यता केली.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा तनमनधनाने प्रचार केला असा दावा काल पत्रकार परिषदेत प्रदेश व शहर पदाधिका-यांनी केला होता.शेळके यांनी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात आरोप केल्यास त्यांना जशास तसे उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
कालच्या पत्रकार परिषदेला प्रतिउत्तर म्हणून आज बंटी शेळके यांचे समर्थक मैदानात उतरलेले आढळून आले.शेळके हे शहरात नसून दिल्लीत असल्याचे देखील एका समर्थकाने सांगितले.