फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणनागपूरात सहा पैकी चार भाजपच्या तर दाेन जागा काँग्रेसच्या खात्यात

नागपूरात सहा पैकी चार भाजपच्या तर दाेन जागा काँग्रेसच्या खात्यात

भाजपचे फडणवीस,कृष्णा खोपडे,मोहन मते पुन्हा विजयी:कोहळे,डॉ.मिलिंद माने पराभूत

दटकेंचा मध्य मध्ये दणदणीत विजय
काँग्रेसच्या विकास ठाकरे,नितीन राऊतांनी गड राखला
नागपूर,ता.२३ नोव्हेंबर २०२४: शहरातील विधानसभेच्या सहा ही जागांसाठी अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत दक्ष्ण-पश्‍चिम मतदारसंघातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयी झाले असून,पूर्वमध्ये कृष्णा खोपडे यांनी मताधिक्याचे सर्व रेकॉर्ड मोडले असून जवळपास सव्वा लाख मतांच्या मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार दुनेश्‍वर पेठे यांचा पराभव केला.दक्ष्णेत विद्यमान आमदार मोहन मते यांनी पुन्हा एकदा दक्ष्ेतील लंका सर केली असून पुन्हा एकदा काँग्रेसचे प्रतिस्पर्धी गिरीश पांडव यांचा पराभव केला.
उत्तर नागपूर मतदारसंघात मात्र डॉ.मिलिंद माने पुन्हा एकदा पराभूत झाले असून काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत हेच उत्तरेचे बादशहा असल्याचे सिद्ध झाले,तर पश्‍चिमेत काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी आपली जागा कायम राखली.त्यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर काेहळे यांचा पराभव केला.
मध्य नागपूर मतदारसंघातून भाजपने तीन टर्मचे हलबा समाजाचे आमदार विकास कुंभारे यांना तिकीट न देता विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांना मैदानात उतरवले.हलबा,मुस्लिम बहूल मतदारसंघ असताना ही त्यांनी काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांचा दारुण पराभव केला.
निवडणूकीची घोषणा होताच,नागपूरात काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता.एकमेव दक्ष्ण-पश्‍चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जागा सर्वाधिक सुरक्ष्त मानली जात होती.काँग्रेसने पुन्हा एकदा प्रफूल्ल गुडधे पाटील यांना रिंगणात उतरवले होते.फडणवीस यांना १,२९,४०१ मते मिळाली तर प्रफूल्ल गुडधे पाटील यांना ८९ हजार ६९१ मते मिळाली.फडणवीस यांनी पाटील यांचा ३९ हजार ७१० मतांनी पराभव केला.
नागपूर पूर्वमधून तीन टर्मचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांना १,६३,३९० मते मिळाली असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दुनेश्‍वर पेठे यांना अवघे ४८ हजार १०२ मतच मिळवता आली.या मतदारसंघातून अजित पवार गटाच्या बंडखोर नेत्या आभा पांडे यांना ९ हजार ४०२ मते मिळाली.नागपूरातून सर्वाधिक मताधिक्याने खोपडे यांनी विजय संपादन केला असून त्यांनी पेठे यांचा १ लाख १५ हजार २८८ मतांनी पराभव केला.
नागपूर मध्यमधून भाजपचे प्रवीण दटके यांना. ९० हजार ५६० मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे बंटी शेळके यांना ७८ हजार ९२८ मते मिळाली.त्यांनी बंटी शेळके यांचा ११ हजार ६३२ मतांनी पराभव केला.
नागपूर पश्‍चिम मधून काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले असून त्यांना एकूण १,०४,१४४ मते मिळाली असून भाजपचे सुधाकर कोहळे यांना ९८ हजार ३२० मते मिळवता आली.याच मतदारसंघातून बहूचर्चित झालेले अपक्ष नरेंद्र जिचकार यांना ८ हजार १६६ मते मिळाली.वंचितचे यश गौरखेडे यांना १ हजार ४७१ मते मिळाली.
दक्ष्ण नागपूरातून भाजपचे मोहन मते यांनी पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली असून त्यांना एकूण १,१७,५२६ मते मिळाली तर काँग्रेसचे गिरीश पांडव यांना १,१८,६८ मते मिळाली.
उत्तरेतून पुन्हा एकदा काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले असून त्यांनी भाजपचे डॉ.मिलिंद माने यांचा २८ हजार ४६७ मतांनी पराभव केला.एकूण ३० फे-यांमध्ये मतमोजणी पार पडली.नितीन राऊत यांना १,२७,८७७ मत मिळाले तर डॉ.माने यांना ९९ हजार ४१० मते मिळाली.
थोडक्यात,२०१९ च्याच निकालाची पुर्नरावृत्ती २०२४ मध्ये देखील झालेली दिसून पडते.२०१९ मध्ये ही उत्तर व पश्‍चिम नागपूरची जागा भाजपकडून काँग्रेसच्या याच दोन्ही उमेदवारांनी खेचून आणली होती.२०१४ मध्ये मात्र भाजपच्या सहा पैकी सहा जागा आल्या होत्या.
…………………………….
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या