‘बॅट‘चालण्याआधीच जनतेने केले स्टम्प आऊट: पाच कोटी पाण्यात गेल्याची चर्च
विकास ठाकरेंनी गड कायम राखला
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२३ नोव्हेंबर: पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे शहराध्यक्ष व विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला असून आपले प्रतिस्पर्धी सुधाकर कोहळे यांचा ६,१७३ मतांनी पराभव केला.संपूर्ण महाराष्ट्रात भाजपची त्सुनामी आली असताना संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहरात काँग्रेसने सहा पैकी दान जागा खेचून आपले अस्तित्व कायम राखले आहे. विकास ठाकरे यांना एकूण १,०४१,४४ मते प्राप्त झाली.तर भाजपचे सुधाकर कोहळे यांना ९८ हजार ३२० मत मिळाले.
२०१९ च्या निवडणूकीत भाजपतर्फे सुधाकर देशमुख यांना पुन्हा एकदा गडकरी यांच्या आग्रहातून संधी देण्यात आली होती.त्याच वेळी विकास ठाकरेंचा विजय हा निश्चित मानला जात होता.यंदा मात्र,सुधाकर कोहळे यांच्यासोबत चुरशीची लढत ठरली.यंदा वंचितकडून यश गौरखेडे,बसपाचे प्रकाश गजभिये,काँग्रेसमधून निलंबित झालेले अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांच्यासोबत त्यांची लढत होती.वंचितचे यश गौरखेडे यांना एक हजार ४७१ तर नरेंद्र जिचकार यांना ८ हजार १६६ मते मिळाली.
(छायाचित्र : विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारताना)
जिचकार यांनी पश्चिम नागपूर मतदारसंघ गल्लोगल्ली पिंजून काढला होता.जिचकार व विकास ठाकरे यांचे आपसी वैर जगजाहीर आहे.जिचकार यांच्या मागे सुनील केदार यांचा भक्कम पाठींबा असल्याचे सर्वश्रृत आहे.जिचकार यांच्या प्रचार फलाकांवर देखील केदार यांचे छायाचित्र झळकत होते.राज्यात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला,यातील एक कारण पक्षातील गुटबाजी व आपल्याच पक्षातील उमेदवाराला पराभूत करण्यासाठी विरोधकांची मदत करने हे देखील कारण आहे.मात्र,केदारांची ही मात्रा,पश्चिम नागपूरात लागू झाली नाही.विकास ठाकरे यांची वैयक्तिक प्रतिमा व मतदारसंघात त्यांनी केलेली विकास कामे त्यांना तारणारी ठरली.
सुरवातीपासून नरेंद्र जिचकार हे जिंकण्यासाठी नव्हे तर विकास ठाकरे यांना पराभूत करण्यासाठीच निवडणूक लढवित असल्याचा मॅसेज जनतेमध्ये गेला.जिचकार यांनी पश्चिम नागपूरात किमान पाच कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते करतात.अनेक वस्त्यांमधील घरांवर त्यांनी स्लॅब टाकून दिले,अनेकांची लग्न लाऊन दिली,सभेसाठी,प्रचारासाठी महिला,युवा वर्ग सहभागी होण्यासाठी देखील त्यांनी पैसे मोजले मात्र,दहा हजार मतांचा देखील टप्पा त्यांना अविरत परिश्रम करुन गाठता आला नाही.त्यांनी नगरसेवकाची देखील निवडणूक लढू नये,असा सल्ला ठाकरे यांचे समर्थक त्यांना देतात!
जिचकारच नव्हे तर पश्चिम नागपूरच्या मतदारांनी वंचित,बसपा,अपक्ष उमेदवारांना केवळ मत खाण्यासाठीचे ‘डमी‘ उमेदवार म्हणून सपशेल नाकारल्याचं दिसून पडतं.पश्चिम नागपूरात मतदारांनी फक्त दोनच चिन्हा समोरील बटन दाबले,पंजा व कमळ.विकास ठाकरे यांनी १७ व्या फेरीपर्यंत १३ हजार १२० मतांची लीड घेतली जी उर्वरित फे-यांमध्ये कमी-कमी होत गेली मात्र,कोहळे यांना ती पूर्णपणे भरुन काढता आली नाही.शेवटच्या २२ साव्या फेरीपर्यंत विजयाचे अंतर कमी होत ही बढत ६ हजार १७३ मतांची राहीली व विजयामध्ये परिवर्तित झाली.
(छायाचित्र : आमदार विकास ठाकरे यांची मुले केतन ठाकरे व ऋषभ ठाकरे विजयाची खूण दाखवताना)
पश्चिम नागपूरमधून भाजपने वेळेवर भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांना रिंगणात उतरवले त्याच वेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या. या पूर्वी कोहळे यांनी दक्ष्ण नागपूरातून २०१४ मध्ये भाजपकडून दणदणीत विजय मिळवला होता,मात्र २०१९ मध्ये त्यांची तिकीट कापण्यात आली.यानंतर देखील ते शांतपणे पक्षाच्या सर्व कार्यकलापामध्ये सहभागी होत राहीले,याचा लाभ त्यांना मिळाला.त्यांना जिल्हाध्यक्ष करुन ओबीसी मतांची बेगमी करण्यात आली.
नागपूर जिल्हातून ते लढतील असा कयास असतानाच सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पश्चिम नागपूरातून त्यांना उमेदवारी देण्यात आली.सुरवातीला काहीसे नाराज कार्यकर्ते नंतरच्या काळात जोमाने कामाला लागले.भाजपचे संगठन मजबूत असल्यानेच कोहळे यांना ९८ हजारच्यावर मते मिळवता आली.ही मते त्यांच्या वैयक्तिक प्रतिमेऐवजी भाजप पक्षाच्या कॅडरबेस मतांमुळे मिळाली मात्र,काँग्रेसचे विकास ठाकरे हे एकहाती लढत होते.प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या प्रियंका गांधी यांचा रोड शो आयोजित करुन माहोल केला होता.त्यांच्या रोड शोला पश्चिम नागपूरातील जनतेने उस्फूर्त प्रतिसाद दिला होता,दूसरीकडे मध्य नागपूरातील काँग्रेसचे प्रत्याक्षी बंटी शेळके यांच्या समर्थनासाठी देखील प्रियंका गांधी यांनी रोड शो केला मात्र,शेळके यांच्या शेळक्या राजकारणातून रोड शो ला गालबोट लागले.
थोडक्यात,पश्चिमेची लढत जिचकार यांच्या उमेदवारीमुळे चुरशीची होईल असे वाटत असताना पश्चिमेत ‘बॅट’चाललीच नाही व मतदाररुपी पंचांनी शून्यावरच त्यांना स्टम्प आऊट केले,तर कोहळे यांना वेळेवर उमेदवारी दिल्याने त्यांना त्या मतदारसंघात प्रचारासाठी योग्य वेळ मिळालाच नाही.गिट्टीखदान भागात तर भाजपचा उमेदवार कोण आहे?त्यांचे नाव देखील हजारो मतदारांना माहिती नव्हते!विकास ठाकरेंनी गेली पाच वर्षे मतदारसंघ बांधून ठेवला असल्याने त्याचा फायदा त्यांना या निवडणूकीत झाला.याशिवाय उत्तर भारतीय हिंदी भाषिक मतदारांनी देखील भाजपचे उमेदवार कोहळे यांना मत देण्यासाठी स्वीकारले नसल्याचे दिसून पडत आहे.