फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजया कारणांमुळे झाला मध्य नागपूरातून प्रवीण दटके यांचा विजय..

या कारणांमुळे झाला मध्य नागपूरातून प्रवीण दटके यांचा विजय..

उमेवाराची प्रतिमा

मुस्लिमांचीही मते
हलबा एकवटल्याने इतर समाजाची वज्रमूठ
काँग्रेसने हलबा समाजाचा उमेदवार दिला नाही
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२३ नोव्हेंबर २०२४: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल हा भरपूर उलटफेर करणारा असला तरी मध्य नागपूरातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण दटके यांना विजय सुकर करणारी अनेक कारणे चर्चिली जात आहेत.या मतदारसंघातून अगदी मतदानाच्या दिवसापासून काँग्रसेचे बंटी शेळके यांचा विजय खात्रीशीर मानल्या जात होता मात्र,प्रवीण दटके यांनी ११ हजार ५१६ मतांनी शेळके यांचा पराभव केला.दटके यांना एकूण ९० हजार ५६० मते तर बंटी शेळके यांना ७८ हजार ९२८ मते मिळाली.
‘सत्ताधीश’ने या विजयाच्या कारणांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता,दटके यांची प्रतिमा, शेळके यांच्यापेक्षा सरस असल्याचे एक कारण समोर आले. ,बंटी शेळके यांच्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाबाबत पराकोटीचा आक्षेप मतदारांना होता.शेळकेसारखे व्यक्तिमत्व मध्य नागपूरचा आमदार म्हणून या भागातील अनेक मतदारांनाच नको होता.२०१९ मध्ये शेळके यांचा अवघ्या पावणे चार हजार मतांनी भाजपचे विकास कुंभारे यांनी पराभव केला होता,तो ‘निसटता’पराभव हा ‘अपवाद’असल्याचे सांगत,त्या वेळची शेळके यांची प्रतिमा वेगळी होती,पाच वर्षांत मध्य नागपूरातून वाहणा-या नाग नदीतून बरेच पाणी वाहून गेले असून,शेळके यांना आमदारकी देऊन विधानसभेत पाठविण्यास या मतदारसंघातील मतदारांचे मत बनलेच नाही.शेळके यांनी या मतदारसंघात ७९ हजारच्या जवळपास मते घेतली असली तरी विजयाची माळ त्यांच्या गळ्यात त्यांच्या वादग्रस्त प्रतिमेमुळेच पडू शकली नाही.
या मतदारसंघात एकूण ३ लाख ४१ हजार २५२ मतदार असून एकूण १ लाख ५५ हजार ६९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावाल होता.यात ६०३ मते ‘नोटा’ला पडली असून ५६ मते ही अवैध ठरली.इतर मते अपक्षांना पडली.हलबा समाजाने उभे केलेल्या अपक्ष रमेश पुणेकर यांनी २३ हजार ३०३ मते घेतली असली तरी हलबांसोबतच त्यात, भाजप व काँग्रेसला मिळणा-या मतांचा देखील त्यात समावेश आहे,हे विसरता येत नाही.त्यामुळे पुणेकर यांच्या मतांनी दटके यांचा विजय सुकर केला किवा शेळके यांच्या पराभवास हातभार लावला,हे गृहितक चुकीचं ठरतं.
या मतदारसंघात दटके यांच्या विजयाला आणखी एका महत्वाचा हातभार लावला तो म्हणजे ‘मुस्लिम लायब्ररी’या मुद्दाने.काँग्रेसच्या काळात लीजवर मिळालेली ही जागा मुस्लिम लायब्ररी साठी मिळालेलीअसताना देखील त्यावर अनेक दशके अनाधिकृत हॉटेल उभारण्यात आले होते. ‘काँग्रेस ये जगह दबा के बैठी थी’अशी भावना मुस्लिमांनामध्ये होती.दटके यांनी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा या अतिक्रमणासाठी आवाज उठवला होता.त्यांच्याच प्रयत्नातून अनाधिकृत हॉटेलचे बांधकाम पाडले गेले व मुस्लिम लायब्ररीचा मार्ग मोकळा झाला.ही बाब या मतदारसंघातील मुस्लिम मतदारांनी लक्षात ठेवली.दटके हे विधान परिषदेचे आमदार झाल्यावर मध्य नागपूरच्या विकासकामांसाठी त्यांनी चांगला निधी खेचून आणला.ही विकासकामे करताना हिंदू-मुस्लिम असा कोणताही धार्मिक भेदाभेद पाळला नाही त्यामुळे दटके यांची उमेदवार म्हणून मुस्लिमांमध्ये चंागली प्रतिमा निर्माण झाली होती.या शिवाय काँग्रेस मुस्लिम मतदारांना आपला ‘गुलाम’समजते, फक्त निवडणूक जिंकूण देणारी व्होट बँक समजते अशी देखील नाराजी पसरली होती.
परिणामी,या मतदारसंघातील जो हलबा समाज भाजपपासून वेगळा होऊन रमेश पुणेकर यांच्या पाठीमागे एकवटला होता,त्याची संपूर्ण ‘भरपाई’दटकेंना मिळालेल्या मुस्लिम मतदारांनी केली.याशिवाय तीन वेळा या मतदारसंघातून हलबा समाजाच्या उमेदवाराला प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन देखील चौथ्यांदासुद्धा हलबाच उमेदवारासाठी हलबा समाजाने अट्टहास धरला व अखेर भाजपशी काडीमोड करुन रमेश पुणकरांच्या पाठीमागे आपले बळ उभे केले,ते बघता इतर समाजालाही ही ‘राजकीय कुरघोडी’पसंद पडली नाही व इतर समाज हा दटके यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील्याचा दिसून पडतो.
२०१९ च्या निवडणूकीत मुस्लिमांची मते ही भाजपचे त्यावेळेचे उमेदवार विकास कुंभारे यांना मिळाली नव्हती तर ती एमआयएच्या उमेदवाराच्या पाठीशी राहीली होती,हे विशेष.यावेळी मध्य मधील मुस्लिम मतदारांनी राजकीय पक्ष न बघता उमेदवार बघितला,असे सांगण्यात आले.याशिवाय महायुती सरकारची ‘लाडकी बहीण’योजनेचा लाभा मुस्लिम महिलांना देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा देखील फायदा दटके यांच्या मतदानात झाला.मध्य नागपूरातील प्रत्येक मुस्लिम बहूल मतदान केंद्रातून दटके यांना ४०० ते ५०० मते मिळाली आहेत.
काँग्रेसचे बंटी शेळके या मतदारसंघातून विजयी होत आहेत,ही केवळ ‘हवा‘होती,व ती देखील शेळके यांच्या कार्यकर्त्यांनी पसरवली होती,असे देखील बोलले जात आहे.स्वत: बंटी शेळके व त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिमा मध्य नागपूर मतदारसंघात अतिशय खराब असून नुसता राडा करणे,भांडणे,वादविवाद करणारा उमेदवार व गुंडप्रवृत्तीचे कार्यकर्ते,अशी प्रतिमा शेळके यांची मतदारसंघात असल्याची दिसून पडली.नगरसेवक असताना देखील सभागृहात साधकबाधक चर्चा न करता,राडा करने,सभागृहाचे गांर्भीय घालवणे,आक्षेपार्ह्य वर्तन करने इत्यादी असे अनेक अरोप शेळके यांच्यावर झाले होते.
याशिवाय मतदानाच्या दिवशी दूपारी मोमिनपुरातील मतदानकेंद्रावर शेळके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी संथ मतदानाला घेऊन जो धुडगुस घातला तो देखील तेथील मतदारांना रुचला नाही,परिणामी शेळके यांना मतदान करणा-यांनी हात आखडता घेतला. छाती ठोकून-ठोकून बंटी शेळके यांची ड्रामेबाजी रांगेत उभ्या असणा-या मतदारांना रुचली नाही.त्या क्षणी लाठीचार्ज झाला असता तर अनेक मुस्लिम महिला बुरखा घालून रांगेत उभ्या होत्या,त्यांना इजा झाली  असती,असा रोष ऐकू आला.बंटी शेळके यांच्या मेलाड्रामाचा मजा त्याचे कार्यकर्ते लृटत होते,असा संताप मतदारांच्या मनात दाटला.याशिवाय मतदानाच्या दिवशी सायंकाळी शिल्लक ईव्हीएम मशीन घेऊन जाणा-या शासकीय गाडीवर झालेली दगडफेक,शिविगाळ,मारहाण व मध्य नागपूराचे वातावरण खराब करणे,हे देखील तेथील सुजाण व जागरुक मतदारांना रुजले नाही.कोतवाली पोलिस ठाण्यासमोरील संपूर्ण घटना ही बंटी शेळके यांच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांमुळेच घडली,असे उघडपणे तेथील जनता सांगते.या घटनेनंतर भाजपच्या समर्थकांनी दिलेले ‘मुल्ला काजी भाग गये’हे नारे,शेळके यांच्या गुंडांमुळे ऐकावे लागले,अशी नाराजी मुस्लिमांमध्ये पसरली.याशिवाय बंटी शेळके यांची प्रतिमा ही ‘व्यसनी’व अम्ली पदार्थांच्या नशेत राहत असल्याची प्रचलित आहे.
काँग्रेसने बंटी शेळकें ऐवजी हलबा समाजाचा उमेदवार दिला असता तर काँग्रेसला पराभव पत्कारावा लागला नसता.असे घडले असते तर दटके यांचा विजय कठीण झाला असता.दटके यांचा विजय काँग्रेसने बंटी शेळकेसारख्या वादग्रस्त उमेदवाराला तिकीट देऊन केला.मध्य नागपूरात हलबा समाजाची ६० हजाराच्या जवळपास मतपेढी आहे,त्यातील रमेश पुणेकर यांना फक्त २३ हजारच्या जवळपास मते मिळाली,इतर हलबा मतदार हे भाजपच्या पाठीमागे परंपरागतरित्या उभी राहीलेली दिसून पडली.

(छायाचित्र: विधानसभा निवडणूक अधिकारी यांच्याकडून विधानसभा आमदार झाल्याचे प्रमाणपत्र स्वीकारताना)

याशिवाय करोना काळात दटके यांनी या मतदारसंघात जातपातविरहीत केलेली समाजसेवा,याचे देखील फळ त्यांना विजयाच्या रुपाने चाखायला मिळाले.दटके यांचे वडील स्व.प्रभाकरराव दटके यांनी मध्य नागपूरातून निवडणूक लढवली होती.त्यांना २८ हजार मते मिळाली होती तर काँग्रेसचे अनिस अहमद यांना ३५ हजार मते मिळाली होती.प्रवीण दटके यांनी वडीलांचा झालेला परावभ आज धूवून काढला,असेच आता म्हणावे लागेल.

……………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या