नागपूर,ता.१८ नोव्हेंबर २०२४: उत्तर नागपूरचे मंत्री व पालकमंत्री नितीन राऊत यांचे रवि भवनात कॉटेज क्रमांक ५ आहे,या ठिकाणी उत्तर नागपूरची जनता आपली कोणतीही समस्या सांगण्यासाठी गेली असता त्यांना रवि भवनाचे कार्यालय उत्तर नागपूरच्या जनतेसाठी नाही म्हणून हकलून लावण्यात येतं.ते कार्यालय धनदांडग्यांकडून फक्त पैसे कमविण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप उत्तर नागपूर काँग्रेसचे माजी वॉर्ड अध्यक्ष संजय मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत केला.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,रविभवनाच्या कॉटेजमध्ये उत्तर नागपूरची जनता किवा कार्यकर्ता गेला तर ,हे ऑफिस पालकमंत्र्यांचे आहे,हे महाराष्ट्रासाठी आहे,उत्तर नागपूरच्या जनतेसाठी नाही,उत्तर नागपूरच्या जनतेने त्यांची गा-हाणी बेझनबागच्या कार्यालयात येऊन मांडावी,असे सांगितले जाते.ज्या उत्तर नागपूरच्या जनतेच्या मतांवर नितीन राऊत निवडून येतात,त्यांना अशी वागणूक दिली जाते.
सुरवातीला ते फक्त आमदार होते तेव्हा जनतेचे काम करायचे,मंत्री झाल्यावर लोकांचे नाही,धनदांडग्यांची कामे करायची,जिथून काही फायदा होतो,अश्या लोकांची कामे त्या कॉटेजमधून होतात.हा काँग्रेसचा वॉर्ड अध्यक्ष म्हणून माझा स्वत:चा अनुभव असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
आजपर्यंत उत्तर नागपूरातून बहूजन समाजवादी पक्षाकडून जेवढे उमेदवार उभे राहीले ते राऊत यांना टक्कर देण्यासाठी सक्षम नव्हते.पहील्यांदा बसपने माजी नगरसेवक मनोज सांगाेळे हा टक्करीचा उमेदवार दिला आहे.
आजपर्यंत उत्तर नागपूरच्या मतदारांपुढे हाच प्रश्न होता की नितीन राऊतांना मत दिले नाही तर भाजपचा उमेदवार निवडून येईल,जर बसपाच्या उमेदवाराला मत दिले नाही तरी भाजप निवडून येईल.या मजबुरीतूनच आतापर्यंत उत्तर नागपूरच्या मतदारांनी नितीन राऊतांना मतदान केले.यावेळी मात्र,असे घडणार नाही.
मनोज सांगोळे यांना मी फक्त नावाने ओळखतो,ते नगरसेवक आहेत इतकंच मला माहिती आहे.ते माझे मित्र नाहीत मात्र,नितीन राऊतांना भाजपचे उमेदवार टक्कर देऊ शकत नसल्यानेच मी सांगोळे यांना उत्तर नागपूर मतदार संयोजन समितीकडून समर्थन जाहीर केले असल्याचे पत्रकार परिषद घेऊन संजय मेश्राम यांनी सांगितले.