नागपूर,ता.१८ नोव्हेंबर २०२४: उत्तर नागपूरात येणारे मिलिंद इंजिनिअरिंग कॉलेज मिहानमध्ये पळवण्यात आल्याचा आरेाप विरोधक करतात,याबाबत भाजपचे उत्तर नागपूरचे उमेदवार व माजी आमदार डॉ.मिलिंद माने यांना ‘सत्ताधीश’ने विचारले असता,मिलिंद इंजिनिअरिंग कॉलेज उत्तर नागपूरात येणार होते यात संपूर्ण तथ्य आहे.मात्र,त्यासाठी केवळ ८ एकरची नागपूर सुधार प्रन्यासची जागा देण्यात आली होती.आम्ही या कॉलेजसाठी नासुप्रकडे जागा मागायला गेलो असता,नासुप्रने भाडेतत्वावर जागा देण्यास संमती दिली आणि एका वर्षाचं भाडं ४८ लाख रुपये मागितले.याचाच अर्थ ता-हयात कॉलेजचे भाडे ४८ लाख रुपये कोणतेही सरकार देणार नाही.
त्या कॉलेजच्या जीआरमध्येच नमूद आहे की हे महाविद्यालय १०० एकर जागेवर निर्माण होईल,नासुप्रच्या ८ एकर जागेमध्ये एवढे मोठे मिलिंद इंजिनिअरिंग कॉलेज बसूच शकत नव्हते.आता उत्तर नागपूरात १०० एकर जागा कुठून आणायची?कॉलेजच्या अटी- शर्थीमध्येच शंभर एकर जागेची अट आहे,हे विरोधकांना माहिती नाही का?
आमच्याकडे एवढी जागा उपलब्ध नसल्यानेच मिहानमध्ये ते कॉलेज गेलं,ही तांत्रिक बाब आहे.आमच्या उत्तर नागपूरात डॉ.बाबासाहेब अम्यूझमेंट पार्कसाठी १३० एकर जागा राखीव होती,त्या जागेचा मी प्रस्ताव देखील दिला होता ,परंतू ती जागा २००१च्या डीपी प्लॅनमध्ये डॉ.बाबासाहेब अम्यूझमेंट पार्कसाठी राखीव होती.११ वर्ष काँग्रेसचे उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी काहीच काम नाही केलं.परिणामी ती १३० एकर जागा ११ वर्षांनंतर मूळ मालकाला परत करावी लागली.
मूळ मालकाने ती जागा खासगी विकासकांना विकली,त्यावर प्लॉट्स पडले,भिंती निर्माण केल्या.आता तिथे पुन्हा आंदोलन सुरु झाले.सरकार आता पुन्हा मूळ मालकाकडून ती जागा विकत घेईल,विकत घेतल्यानंतर अम्यूझमेंट पार्क बनेल.परंतू,२००१ ते २०११ पर्यंत नितीन राऊत यांनी डॉ.बाबासाहेबांच्या नावाने अम्यूझमेंट पार्क बनवण्यासाठी का पुढाकार घेतला नाही?असा सवाल डॉ.माने करतात.वीस वर्षांपैकी १७ वर्ष नितीन राऊत हे मंत्री होते.महाविकासआघाडीच्या काळात तर ते कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री होते.तरी त्यांना जाग का नाही आली?त्यांचीच सरकार होती ना?
मी पण २०१४ ते २०१९ पर्यंत उत्तर नागपूरचा आमदार होतो परंतू तोपर्यंत त्या जागा बिल्डरच्या घश्यात गेल्या होत्या.आता त्या बिलर्ड्सकडून १३० एकर जागा परत मिळवणे हे काय सोपं काम असतं का?मी तर मिलिंद इंजिनिअरिंग कॉलेजसाठी त्या जागेचा प्रस्ताव दिला होता,काँग्रेसच्या सरकारने तो का मान्य नाही केला?असा सवाल ते करतात.
आता तर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचे रुग्णालय मिहानमध्ये घेऊन जात असल्याची अफवाह देखील पसरवली जात आहे.हे रुग्णालय मिहानमध्ये जात नसून उत्तर नागपूरातच साढे पाच एकर जागेवर निर्माण होणार आहे.तिथे १४ एकर माळ्यांची इमारत बांधण्यासाठी आणखी ४ एकर जागा पाहिजे.२ एकर जागा आपल्याकडे विमा कंपनीची उपलब्ध आहे.२ एकर जागेवर इंदिरा गांधी शाळा असून त्या जागेवर शाळेचा ताबा आहे.लीज वरची जागा नितीन राऊतांनी दिली,मग त्यांनी ती परत का नाही घेतली?असा सवाल डॉ.माने करतात.
नितीन राऊत वीस वर्षांच्या काळात २ एकर जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेजसाठी मिळवू शकले नाहीत,११०० कोटी रुपये काँग्रेसच्या सरकारने जाहीर केले होते.नितीन राऊतांनीच उत्तर नागपूरात मोठमोठे फलक सर्वदूर लावले होते,त्यांच्या सरकारचे आभार मानण्यासाठी,एक खडकू अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी त्या काळात दिले नाही आणि सर्व पैसे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात पळवले मग त्यावेळी नितीन राऊतांनी का बोंबा नाही ठोकल्या.११०० कोटींपैकी एक ही रुपये न आणता फक्त जाहिरातबाजी केल्याचा संताप याप्रसंगी डॉ.माने व्यक्त करतात.
जाणूनबुजून खोटा नॅरेटीव्ह पसरवला की डॉ.आंबेडकर रुग्णालयही मिहानला जाणार आहे,एकखडकू दिला नाही उलट आमच्या सरकारने या रुग्णालयासाठी साढे सातशे कोटी रुपये दिले.यावरही नितीन राऊत म्हणतात साढे सातशे कोटी रुपये कमी झाले!यावर ही आमच्या सरकारने १०० कोटी आणखी वाढवले,आता साढे आठशे कोटी रुपये झाले.आता ते सांगतात,सरकार आमच्या पुढे झुकलं! ते त्यांच्या सरकारला झुकवून ११०० कोटी उत्तर नागपूरच्या विकासासाठी आणू शकले नाही ते चोराच्या उलट्या बाेंबा ठोकत आहेत.उत्तर नागपूरच्या जनतेची दिशाभूल करने राऊतांनी थांबवले पाहिजे.‘
‘संविधान बदल रहे है’हा असाच आणखी एक फेक नॅरेटीव्ह काँग्रेसने हाती घेतला आहे.बौद्ध समाजाच्या सर्व बुद्धीजीवींना माहिती आहे की डॉ.बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानात एक अनुस्वार (कॉमा) देखील कमी जास्त होऊ शकत नाही.गोंड-गोवारी शब्दातला फक्त एक कॉमा लावण्यासाठी किती दशके आंदोलने सुरु आहेत,११० गोवारी बांधव मरण पावले पण एक कॉमा नाही लाऊ शकत आहेत.एवढे मोठे लिखित संविधान बदलणे शक्य आहे का?असा सवाल ते करतात.
काँग्रेसने सकारत्मक कामे उत्तर नागपूरात करावी,जनतेचा विश्वास संपादन करावा मग जनते पुढे जाऊन मत मागावे न की खोटे नॅरेटीव्ह पसरवून,वीस वर्ष मिळाली काम करण्यासाठी परंतू भकास करुन टाकले उत्तर नागपूर,मला पाचच वर्ष मिळाली काम करण्यासाठी तर मी ५०० कोटी रुपयांचे काम करु दाखवले.
आता जे काही उत्तर नागपूर दिसतंय ते केंद्रिय मंत्री नितीन गडकरी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे दिसतंय,वीस वर्ष नितीन राऊतांनी उत्तर नागपूर सडवून टाकले.पहीले उत्तर नागपूरात ८० झोपडपट्ट्या होत्या,राऊतांनी २० झोपडपट्ट्या मतपेढीतुन वाढवून टाकल्या.एलआयसी चौकातून उत्तर नागपूरात येताना एखाद्या खेड्यामध्ये आलो असल्याचा भास होत होता.उत्तर नागपूरला राऊत ‘सिंगापूर’करण्यासाठी निघाले होते मात्र,त्यांच्या वीस वर्षांच्या काळखंडात उत्तर नागपूराला त्यांनी ‘भकासपूर’करुन ठेवले.
हा खोटारडेपणा काँग्रेसने थांबवावे आणि बुद्धीजीवी बौद्ध समाजाला मुर्ख समजणे थांबवावे,बौद्ध समाजाला आव्हान करताना डॉ.माने यांनी ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा अपमान केला,दोन वेळा त्यांना लोकसभेत निवडून येऊ दिले नाही,बाबासाहेबांना घटना समितीत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला,बाबासाहेबांनीच सांगितले आहे की ‘काँग्रेस हे जळतं घर आहे’बाबासाहेबांचा पदोपदी अपमान काँग्रेसने केला.त्यांना ‘भारतरत्न’उपाधी अटल बिहारी बाजपेयी हे पंतप्रधान असताना मिळाली,बाबासाहेबांचे तैलचित्र संसदेत लागू दिले नाही आणि भाजपला दूषणे देतात?भाजपचा जन्मच १९८४ साली झाला,मग बाबासाहेबांचा पदोपदी अपमान करणारे कोण होते?हे आंबेडकरी समाजाने समजून घ्यावे,असे आवाहन डॉ.मिलिंद माने करतात.