उमेदवारांकडे मतदारांना सांगण्यासारखे काहीच नाही का?नागपूरकरांचा प्रश्न
यंदा नागपूरकर मतदारांच्या चर्चेत‘नोटा’चीच चर्चा
नागपूर,ता.१८ नोव्हेंबर २०२४: आज काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्या प्रियंका गांधी यांनी नागपूरात काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य रोड शो केला ,पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी अवस्थी चौकातून रोड शो ची सुरवात झाली.प्रियंका यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी एकच गर्दी केली.प्रियंका यांनी रोड शो दरम्यान लहानग्या चिमुकल्याकडून फूलांचा हार स्वीकारत लोकांना अभिवादन करीत,हात उंचावत एकच माहोल केला.मात्र,मध्य नागपूरच्या उमेवाराच्या प्रचारासाठी रोड शो करीत बडकस चौकात आल्यानंतर नेमका या ठिकाणी भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.प्रश्न संघ मुख्यालय हाकेच्या अंतरावर होते हा नाही,प्रश्न हा ‘हेतू’चा होता.मूळात मध्य नागपूरातील या भागात विना परवानगी रातोरात काँग्रेसच्या उमेदवाराने मोठमोठे जाहीरातपर स्वत:चे फलक लावले होते,अगदी दूकानदारांची दूकाने देखील झाकोळली गेली असे येथील अनेकांनी खास ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना सांगितले.
विना परवानगी फलक लागल्यानंतर स्वाभाविक आहे प्रशासन यावर कारवाई करुन फलक काढणार त्यातून वाद उद् भवून ‘माहोल’बनविण्याचा काँग्रेसच्या उमेदवाराचा हेतू हा मुळीच समर्थनीय म्हणता येणार नाही.पश्चिममधील प्रियंका गांधींचा रोड शो कोणत्याही वादविवादाशिवाय जबरदस्तरित्या पार पडू शकतो मात्र,मध्यमध्ये मूळात काँग्रेसच्या उमेदवारामधील काही ‘अंगभूत (र्दु) गुणांमुळे’राडा होणे स्वाभाविक होते आणि घडले ही तसेच.प्रियंका गांधी या महाराष्ट्रसारख्या सुसंस्कृत राज्यात पहील्यांदा रोड शो करीत होत्या,मात्र मध्य नागपूर मतदारसंघात खालच्या स्तरावरील राजकारणामुळे त्याला गालबोट लागलेच, जे नागपूरच्या सुजाण मतदारांना मुळीच रुचले नाही व सोशल मिडीयावर या घटनेवर टिकेची झोड उठली.हा राडा स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी ‘प्रायोजित’होता,असे येथील अनेक नागरिक सांगतात.
मध्य नागपूरातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार बंटी शेळके यांचा या मतदारसंघातील एका अत्याधुनिक व्यापार पेठेचे बांधकाम करणा-या मजुरांना मध्यरात्री शिविगाळ करणारा एक व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे.हूक्का पार्लरवर पडलेल्या धाडीत बंटी शेळके देखील पकडला गेला होता,असे या भागातील जनताच सांगते तर लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या विरोधात नागपूरातील काँग्रेसच्याच काही नेत्यांनी काम केले व गडकरी यांना पडद्या मागून मदत केली,त्यात बंटी शेळके यांचे देखील नाव चर्चेत हाेते,हे विसरता येत नाही.परिणामी,पाच वर्ष नगरसेवक असताना बंटी शेळके यांनी त्यांच्या प्रभागात केलेली किती विकास कामे आहेत,जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी केलेले काम,कोविड काळात काही मोठ्या रुग्णालयाकडून झालेली ‘वसुली‘या सर्वांचा विचार येत्या विधान सभेच्या निवडणूकीत होणार असून, मध्य नागपूरची जनता त्यांचा आमदार ‘कसा’असावा?यावर शिक्कामोर्तब करणार आहे.महाभ्रष्टाचारी ,राडेबाज,अम्ली पदार्थांच्याआहारी गेलेले उमेदवार या ऐवजी मध्य नागपूरात ‘नोटा’ला किती पसंदी मिळेल,याचा उलगडा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
पूर्व नागपूर मतदारसंघात आज तीन वर्ष जुना एक व्हिडीयो चांगलाच व्हारयल झाला.पूर्व नागपूरात भाजपचे तीन टर्मचे आमदार कृष्णा खोपडे चौथ्यांदा निवडणूकीच्या मैदानात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निलंबित झालेल्या अपक्ष उमेदवार आभा पांडे यांच्यात यंदा तगडी लढत आहे.२०१९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांनी कृष्णा खोपडे यांचा विजय अवघ्या काही हजारांवर आणून ठेवला होता.यंदा ते देखील अपक्ष म्हणून मैदानात आहेत तर हा मतदारसंघ आघाडीतील शरद पवार गटाला सुटला असल्यामुळे ,राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दुनेश्वर पेठे या मतदार संघातून निवडणूकीच्या रिंगणात आहे.मात्र,असे असले तरी खरी लढत ही बलाढ्य कृष्णा खोपडे व अपक्ष आभा पांडे यांच्यातच रंगली आहे.परिणामी,प्रचाराचा दिवस संपण्याचा एक दिवस पूर्वी आभा पांडे यांचे पती बिज्जू पांडे यांचा धिक्कार करणारा एक व्हिडीयो आज सर्वदूर व्हायरल झाला,यावरुन नागपूरात पराभवाच्या भीतीतून, राजकारणाचा स्तर किती खाली घसरला आहे,याची प्रचिती नागपूरकर जनतेला आली.
तीन वर्षांपूर्वी आभा पांडे यांच्या एका कार्यकर्त्याचे वाहन ठेवण्यावरुन एका युवकाशी भांडण झालेआपापसातील हाणामारीत जैन समाजाच्या त्या तरुणाचे नाक फूटले होते,बिज्जू पांडेंचा कार्यकर्ताने मारहाण केली म्हणून,ही बातमी त्यावेळी चांगलीच प्रसिद्ध झाली होती.काल रात्री पार पडलेल्या बैठकीत मध्य नागपूरातील जैन समाजाच्या शीर्षस्थ नेत्यांनी आभा पांडे यांना आपले समर्थन जाहीर केले अन्,आज तीन वर्षांपूर्वीचा एका जैन तरुणाला मारहाण झाल्यानंतर निषेध करणारा तो व्हिडीयो अचानक सर्वदूर व्हायरल झाला व ‘बिज्जू पांडे गुंडा है,बिज्जू पांडे हाय-हाय’चे नारे देणारे तरुण हे नेमके कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत,हे जनतेला देखील चांगल्याने माहिती आहे.
…………………………………
तळटीप:-
सध्या एका फार मोठ्या पक्षाचे मोठे नेते माजी गृहराज्यमंत्री नागपूर व ग्रामीणमधील एकूण १२ मतदारसंघासाठी पर्यवेक्षक बनून मागील तीन महिन्यांपासून नागपूरात आपल्या २२ शिलेदारांसह तळ ठोकून ‘हॉटेल‘मध्ये बसले आहेत जे फक्त रात्रीच बैठकीसाठी हॉटेलमधून बाहेर पडतात कारण त्यांच्याच पक्षातील १२ ही उमेदवार त्यांना मुळीच जुमानत नसल्याचे चित्र उमटले आहे!)