डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रात सिकलसेल यूनिट ऐवजी सिकलसेलचे अद्यावत रुग्णालयाचे होणार निर्माण:डॉ.माने यांचा दावा
उत्तर नागपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरच्या बांधकामांचा २०१९ पर्यंत संपूर्ण निधी माझ्याच कार्यकाळात:माजी आमदार डॉ.माने यांची माहिती
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१६ नोव्हेंबर २०२४: उत्तर नागपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रात सिकलसेलची एक युनिट सुरु करण्याचे अभिवचन दिले होते,इतकंच नव्हे तर सिकलसेलचे वेगळे अद्यावत असे नवे रुग्णालय सुरु करण्याचे आश्वासन दिले होते,डॉ.बाबासाहेब अनुसंधान केंद्रात सिकलसेलची युनिट उघडण्यास नेमका कोणता अडसर निर्माण झाला?असा प्रश्न केला असता,सिकलसेल हा अत्यंत गंभीर आजार असून रुग्ण जेव्हा आजारी पडतो आणि गंभीर अवस्थेत असतो त्यावेळी रुग्णाला लगेच ऑक्सीजन लावावं लागतं,लगेच रुग्णाला रक्त चढवावं लागतं,त्यासाठी अद्यावत ब्लड बँक असावी लागते,अद्यावत टर्सरी केअरच्या उपाययोजना सज्ज असाव्या लागतात.आकस्मिक संकटावर मात करणारी आयसीसीयू किवा यूनिट असावी लागते,त्यामुळेच सिकलसेलचे वेगळे असे अद्यावत रुग्णालय असणे गरजेचे आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रात फक्त ओपीडी आहे,गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची अजिबात कोणतीही व्यवस्था नाही,अशी माहिती उत्तर नागपूरातील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व विद्यमान उमेदवार डॉ.मिलिंद माने यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना दिली.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले,की आमच्या सरकारने साढे सातशे कोटी रुपये दिले असून उत्तरर नागपूरात १४ मजल्यांची इमारत बांधल्या जाईल, त्या १४ मजल्यांच्या इमारतीत एक मजला हा फक्त ‘सिकलसेल’च्या उपचारासाठीच राखीव असणार आहे.त्या ठिकाणी ब्लड बँक असेल,अद्यावत उपचाराच्या सुविधा असतील.उत्तर नागपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रात फक्त ओपीडी आहे.ओपीडी याचा अर्थच रुग्ण चालत येतो,तपासून घेतो,गोळ्या-औषधे घेतो आणि घरी निघून जातो.भर्ती होऊन उपचार करुन घेण्यासाठी त्या अनुसंधान केंद्रात कोणतीही व्यवस्था नाही.हे अनुसंधान केंद्र म्हणजे मेयो हॉस्पीटलशी संलग्न त्याचे सॅटेलाईट यूनिट आहे.सिकलसेलच्या गंभीर रुग्णांना आम्हाला मेयो किवा मेडीकलमध्ये पाठवावे लागते,त्यामुळे या अनुसंधान केंद्रात मी आमदार असताना सिकलसेलचे यूनिट सुरु केले नाही,असा आरोप चुकीचा असून,मतदारांमध्ये चुकीचा भ्रम पसरविला जात आहे.
ज्यावेळी संपूर्ण सुविधांनी युक्त आणि अद्यावत रुग्णालय निर्माण होईल,जिथे आयसीसीयू यूनिट असेल,केअर यूनिट असले तेव्हाच आम्ही सिकलसेलच्या रुग्णांना सेवा देऊ शकतो.आता काही कालांतराने तिथे १४ मजली इमारत तयार होईल.संपूर्ण इमारतीत उत्तर नागपूरच्या जनतेसाठी वेगवेगळे वैद्यकीय यूनिट कार्यरत राहतील.तिथे बालरोगतज्ज्ञ,प्रसुतितज्ज्ञ,सर्जरी,ऑर्थोपेडीक,चर्मरोग इत्यादी तसेच सिकलसेलचे एक परिपूर्ण यूनिट राहणार असल्याचे डॉ.मिलिंद माने सांगतात.
उत्तर नागपूरातील सुप्रसिद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर जे बांधण्यात आले तिथे फक्त सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असून उत्तर नागपूरातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ग्रंथालय नाही,या भव्यदिव्य वास्तूचा उपयोग आजूबाजूच्या झोपडपट्यातील विद्याथ्सर्थ्यांना कोणताही उपयोग नाही,असा आरोप केला जातो,शैक्षणिक या सेंटरचा कोणताही फायदा होत नाही याकडे लक्ष वेधले असता,मतदारांना अपूर्ण माहिती दिली जात असल्याचे डॉ.माने सांगतात.कन्व्हेंशन सेंटरच्या बांधकामाचे भूमिपूजन २०१४ मध्ये झाले.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.२२ कोटी रुपये या सेंटरच्या बांधकामासाठी मंजूर झाले.पहीला निधी मिळाला आणि भूमिपूजन झालं मात्र लगेच २०१४ मध्ये विधानसभेच्या निवडणूका झाल्या.त्या निवडणूकीत काँग्रेसचे आमदार निवडणूक हरले.तिथे फक्त जमीन होती आणि रेकॉर्डवर फक्त २२ कोटींचा निधी होता.मी निवडून आल्यानंतर त्या सेंटरच्या बांधकामाकडे जातीने लक्ष दिले.
२२ कोटींमध्ये त्या ठिकाणी आम्ही फक्त तिथे पायवा खोदू शकलो आणि पिलर्स उभारु शकलो.यातच २२ कोटी रुपये संपले.हे बांधकाम करणारा मुंबईचा एक ठेकेदार होता,त्या ठेकेदाराने फाशी लाऊन आत्महत्या केली.त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळले नाही मात्र,त्यानंतर एक वर्ष नवा ठेकेदार शोधण्यास आम्हाला लागला.शेवटी त्याच्या लहान भावालाच आम्ही ठेका दिला आणि त्याला मी आमदार असताना पहीला धनादेश ५२ कोटी रुपयांचा दिला आणि या कन्व्हेंशन सेंटरच्या बांधकामाला सुरवात झाली.यानंतर १५ कोटी दिले,२० कोटी दिले,असं करत- करत त्या कन्व्हेंशन सेंटरचे बांधकाम २०१९ पर्यंत पूर्ण झाले.एकूण पाच वर्ष सेंटरच्या बांधकामाला लागले.
तिथे खूर्च्या कोणत्या रंगाचा असाव्या,स्लॅब कोणत्या रंगाचा असावा,विद्यूत रचना कशी असावी,बाबासाहेबांचा पुतळा कसा असावा,पूर्णाकृती असावा कि अर्धांकृती,बसलेला असावा
की उभा असावा,पुतळ्यासाठी ऑन लाईन मतदान घेतले,पुतळा ७ कोटींचा बसलेला अवस्थेत सुप्रसिद्ध मूर्तीकार रवि यांच्याकडून तयार करुन घेतला,त्याचे सात पैकी तीन कोटी रुपये देऊन झाले,चार कोटी रुपये अद्याप द्यायचे आहेत,अश्याप्रकारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर २०१९ पर्यंत पूर्ण तयार झाले.यानंतर ठेकदार याने सांगितले की हे सेंटर पूर्ण तयार झाले असून याचे आता लोकार्पण करा,मात्र यानंतर महाविकासआघाडीचं सरकार राज्यात आलं.अडीच वर्षांनंतर महायुतीचं सरकार आलं व १४ एप्रिल रोजी त्याचे ते सेंटर सुरु झाले.
तिथे कोणतेही राजकीय कार्यक्रम होत नाही,तिथे शाळांचे कार्यक्रम,शाळांचे स्नेह संमेलन होतात,वैचारिक कार्यक्रम,नाटके होतात.विद्यार्थ्यांसाठी जे ग्रंथालय आहे ते देखील सुरु झाले आहे.माझी मुलगी देखील त्या ग्रंथालयात अभ्यासासाठी जाते.आता यूपीएससी,एमपीएससीच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थी देखील त्या ग्रंथालयात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत अभ्यास करताना दिसतात.उन्हाळ्यात तिथे विद्यार्थी गर्मीत अभ्यास करायचे,तिथे कूलरची व्यवस्था नव्हती,ती करण्यात आली.
असे असले तरी इतर महत्वाच्या संकल्पना या सेंटरमधील अद्याप अपूर्ण आहेत.आर्ट गॅलरी,जेवणाच्या सोयीसाठी कॅन्टिन चालवणारे,बँकेची व्यवस्था नाही,दिल्लीच्या कन्व्हेंशन सेंटरच्या धर्तीवर येथे रोजगाराची संधी देणारी व्यवस्था निर्माण होणार होती मात्र,असे घडले नाही.ईमारत तयार आहे आता समाजकल्याण विभागाने लवकरात लवकर या अपूर्ण उपक्रमांची तसदी घ्यावी व ही वास्तू लोकोपयोगी बनावावी,असे आवाहन डॉ.माने करतात.