फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजधार्मिक उत्सव म्हणजे ‘विकास’ नव्हे: गिरीश पांडव

धार्मिक उत्सव म्हणजे ‘विकास’ नव्हे: गिरीश पांडव

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१६ नोव्हेंबर २०२४: प्रचाराचा रोख सध्या महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंग’ तसेच ‘एक है तो सेफ है’ याकडे वळला आहे. दक्षिण नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्या विरोधात उभे असणारे भारतीय जनता पक्षाचे तिस-या टर्मचे उमेदवार मोहन मते हे सातत्याने  दक्षिण नागपूरात भव्य-दिव्य असे लाखोंच्या संख्येने संपूर्ण विदर्भातून भाविकांची उपस्थिती असणारे, धार्मिक कार्यक्रम आयोजित करीत असतात.रेशिम बाग येथे त्यांनी वादग्रस्त विधान करणारे धीरेंद्रशास्त्री यांचा तीन दिवसीय प्रवचनाचा कार्यक्रम असो किवा दिघोरीच्या मैदानात संतांचा मेळावा असो,हिंदू मतदारांना प्रभावित करणारे कार्यक्रम आयोजित केले,धार्मिक उत्सव म्हणजेेच नागरिकांचा  विकास आहे,असं तुम्हाला वाटतं का?असा प्रश्‍न केला असता,धार्मिक उत्सव म्हणजे विकास नव्हे,गोरगरिबांचा विकास म्हणजे विकास असतो,असे उत्तर दक्षिण नागपूर मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी खास ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना सांगितले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले,की गोरगरीब,सर्वसामान्य जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करणे,बेरोजगारीचा भीषण प्रश्‍न सोडवणे,महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न,शेतक-यांचा प्रश्‍न ,गृहीणींचे कंबरडे मोडणारी महागाईचा प्रश्‍न,या सर्व प्रश्‍नांवर तोडगा काढणं म्हणजे विकास आहे.केवळ सिमेंट-काँक्रिटचे रस्ते बनवणे किवा भव्य-दिव्य धार्मिक उत्सव आयोजित करणे म्हणजे विकास नाही,असे त्यांनी सांगितले.
यंदा दक्षिण नागपूर मतदारसंघात ‘तांडव’होणार आहे,असे विधान माध्यमांशी बोलताना त्यांनी केले होते,याबाबत विचारले असता,तांडव याचा अर्थच भगवान शंकर जेव्हा आपले तिसरे नेत्र उघडतात तेव्हा ते तांडव करतात असा होतो,आता दक्षिण नागपूरच्या मतदारांनीच रुद्र रुप धारण केलं आहे,भगवान शंकराचं रुप धारण केलं आहे आणि जनता,मतदारंच आता तांडव करणार आहे आणि मनुवादी विचारांच्या लोकांना सत्तेच्या हद्दपार करणार आहे,हेच तांडव यंदा दक्षिण नागपूरात होणार असल्याचा दावा गिरीश पांडव यांनी केला.
गेल्या निवडणूकीत पांडव यांनी ८० हजार ३२६ मते घेतली तर भाजपचे मोहन मते यांनी ८४ हजार ३३९ मते घेतली मात्र,बसपाचे शंकर थूल यांनी ५ हजार ६६८ तसेच अपक्ष सतीश होले यांनी साढे पाच हजारांच्या जवळपास मते घेतल्याने गिरीश पांडव यांचा विधान सभेत जाण्याचा मार्ग हूकला व अवघ्या चार हजार मतांनी त्यांना पराभव पत्कारावा लागला,यंदाच्या निवडणूकीकडे कसे बघता?असा प्रश्‍न केला असता,जी निवडणूक पार पडली त्याचा जास्त विचार करीत नसल्याचे पांडव यांनी सांगितले.ज्या दिवशी निवडणूक संपली,निकाल लागल, त्याच्या दुस-याच दिवसापासून मी पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या संपर्कात राहीलो,कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहीलो,लोकांचे प्रश्‍न,समस्या समजून घेतल्या,त्यांची सोडवणूक केली,मी आमदार नसताना देखील दक्षिण नागपूर मतदारसंघात तीस ते पसतीस कोटींची कामे केली आहे.करोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांना धान्याचे किट असो,सेनिटायझर पुरवणे असो,प्राणवायूचा पुरवठा असो मी सदैव सर्वसामान्य जनतेसाठी तत्पर आणि उपलब्ध होतो ,त्यामुळेच मी पाच वर्षांपूर्वी काय झाले याचा विचार न करता,येणा-या निवडणूकीत दक्षिण नागपूरातील जनता माझी ही जनसेवेची कामे लक्षात घेऊन माझा विजय निश्‍चित करेल,असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
२३ नोव्हेंबर रोजी तुमच्या या मेडीकल चौकातील कार्यालयात विजयाचा गुलाल उधळल्या जाणार आहे का?असा प्रश्‍न केला असता,शंभर टक्के असे उत्तर देत,महाराष्ट्राच्या जनतेनीच ठरवले आहे की महाराष्ट्रात आता ‘परिवर्तन’घडवायचे आहे आणि महाराष्ट्रात जे परिवर्तन घडणार आहे त्याची सुरवात आणि दिशा दक्षिण नागपूरातूनच होत असल्याचा दावा याप्रसंगी त्यांनी केला.
………………
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या