नागपूर,ता.१२ नोव्हेंबर २०२४: गेल्या दहा वर्षांपासून रामटेक लोकसभेसाठी मोर्चेबांधणी करणारे व नागपूर जिल्ह्यात तळागाळाशी खोलवर नातं असणारे काँग्रेसचे माजी राज्यमंत्री राजेंद्र मूळक यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून त्यांचा लढा शिंदे गटातील विद्यमान आमदार आशिष जयसवाल यांच्यासोबत आहे.रामटेकमध्ये यावेळी जयसवाल यांच्याविरुद्ध तगडा,प्रस्थापित व लोकप्रिय नेता उमेदवार असल्याने रामटेकमध्ये अनेक मतदारांनी आनंद व्यक्त केला असून यावेळी रामटेकमध्ये ‘चिन्ह‘नसून ‘चेहरा’चालत असल्याचे खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना मत व्यक्त केले.
महाविकासआघाडीत रामटेकची जागा महत् प्रयासानंतर देखील काँग्रेसला सुटली नाही,परिणामी शिवसेना ठाकरे गटाने या मतदारसंघातून विशाल बरबटे या आपल्या खंद्या कार्यकर्त्याला तिकीट दिले.परिणामी,रामटेक विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत असून अपक्ष राजेंद्र मूळक,मित्र पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटातील विशाल बरबटे तसेच महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार आशिष जयसवाल यांच्यात लढत होणार आहे.
जमीनीस्तरावर मात्र,अपक्ष राजेंद्र मूळक व रामटेक मतदारसंघात एकछत्र अधिराज्य गाजवणारे आशिष जयसवाल यांच्यात रणागंण पेटले आहे.
रामटेकमध्ये सध्या माजी खनिकर्म राज्यमंत्री असलेले आशिष जयसवाल यांच्या विरोधात उत्खनना संबंधी भ्रष्टाचाराचा मुद्दा,रेती माफिया तसेच विकासाचा मुद्दा देखील गाजत आहे.यासोबतच बेरोजगारी,महागाई,शिक्षण,आरोग्य,स्थानिक मुद्दांवर देखील रामटेकमधील मतदार भरभरुन बोलत आहे.
याप्रसंगी बोलताना त्यांच्या समर्थकांनी सांगितले की,मूळक यांनी रामटेक मतदारसंघात ज्या जमीनीस्तरावर जाऊन काम केलं ते जनतेच्या मनात आहे.रामटेकमध्ये खासदार पंजाचा असल्याने आमदार देखील पंजाचाच हवा,असे अनेक मतदारांचे म्हणने आहे,आघाडीच्या राजकारणात हे कितपत योग्य आहे?अशी विचारणा केली असता,या पदाधिका-यांनी सांगितले की भर सभेत आमचे नेते सुनील केदार स्पष्टपणे सांगतात की मातोश्रीच्या मीठाला बेईमान झालेल्याला निवडून आम्ही येऊ देणार नाही,यामुळे केदार व काँग्रेसचे रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी मूळक यांना निवडून आणनार असल्याची भूमिका घेतली.
एका समर्थकाने सांगितले की ही रामटेकवासियांसाठी आन,बान आणि सन्मानची लढाई आहे.विद्यमान आमदार यांनी गेल्या वीस वर्षांपासून रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी कोणतेही काम केले नसून फक्त स्वत:चा विकास केला.इतकंच नव्हे तर महिलांसाठी अतिशय खासगी बाब असलेली सॅनिटरी पॅड खुलेआम वाटण्याचे लज्जास्पद काम त्यांनी केले.महिलांना सॅनिटरी पॅड वाटणे ही जर महायुतीच्या विकासाचे धाेरण असेल तर त्यांची विकासाची संकल्पना ही बोगस असल्याचे ते म्हणाले.सॅनिटरी पॅड वाटण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षेसाठी धोरण राबवालया हवे होते.रामटेकमध्ये शिक्षण,आरोग्य,चांगले रस्ते,बेरोजगारीची भीषण समस्या आहे,त्यांची सोडवणूक केली असती तर त्यांच्या विकासाची संकल्पना आम्हाला मान्य असती असे मत त्यांनी व्यक्त केले.
रामटेकमध्ये चिन्ह चालतंय,नेतृत्व चालतंय कि चेहरा चालतोय?अशी विचारणा केली असता प्रहारचे कारेमोरे यांनी सांगितले की या मतदारसंघात परिवर्तनाची त्सुनामी येणार आहे.गावागावात मतदारांनी ठरवून टाकलं आहे की वीस वर्षात ज्या उमेदवाराला आम्ही आमदार म्हणून निवडून दिले,त्या आमदारांनी आमचा भ्रमनिरास केला,त्यांनी दाखवलेले विकासाचे स्वप्न हे फक्त ‘गांजर’निघाले,त्यामुळेच आता रामटेकच्या मतदारांना परिवर्तन हवे व त्यामुळेच येत्या २३ तारखेला परिवर्तनाची त्सुनामी रामटेकवासियांना बघायला मिळेल.गेल्या वीस वर्षात मतदारसंघाचा विकास म्हणजे रस्ते व नाले नसून रोजगारासाठी काेणतेही प्रकल्प रामटेकमध्ये आणले गेले नाही,अशी टिका देखील त्यांनी केली.चांगले शिक्षण,आरोग्य या मूलभूत सुविधा देखील पुरविण्यात विद्यमान आमदार आशिष जयसवाल अपयशी ठरले असल्याचे कारेमोरे म्हणाले.
ज्या ज्या गावात आशिष जयसवाल फिरत आहेत लोक त्यांना अक्षरश: परत पाठवित असल्याचे दृष्य आहे.त्यांच्यासोबत प्रचारासाठी माणसे मिळत नाही,त्यांची पर्यटनाची व्याख्या देखील फोल ठरली असल्याचे कारेमोरे यांनी सांगितले.
‘बॅट’विरोधकांच्या विराेधात नाही तर रामटेकच्या जनतेच्या कामांत छक्का मारण्यासाठी-राजेंद्र मूळक
याप्रसंगी बोलताना राजेंद्र मूळक यांनी सांगितले की ही निवडणूक आहे,निवडणूक हर एक पातळीवर लढायची असते,निवडणूक कोणतीही असो,ती लढताना उमेदवार,उमेदवाराचे व्यक्तित्व ,उमेदवाराचा पक्ष,उमेदवारासोबत असणारी मंडळी इत्यादी या सर्व एकत्रित बाबींमधून निवडणूकीचं वातवारण बनत असतं त्यामुळे रामटेकची निवडणूक ही यंदा ‘चिन्हा’वर नसून ‘चेह-यावर’लढल्या जात आहे,यावर मी हेच सांगेल की निवडणूक त्याच पद्धतीने लढायची असते.
यंदा काँग्रेसचा ‘पंजा’हे अधिकृत चिन्ह नसून ‘बॅट’हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे,या बॅटने छक्का मारणार आहात का?असा प्रश्न केला असता,निवडणूकीत बॅट छक्का मारण्यासाठी मिळाली नसून रामटेकमध्ये जनतेची कामे करण्यासाठी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.पुढील पाच वर्ष सर्वसामान्यांची कामे होण्यासाठी,रामटेकचा विकास करण्यासाठी ही ’बॅट’ मिळाली असल्याचे ते म्हणाले.
तुम्ही काँग्रेसचे निष्ठावान नेता आहात,काँग्रेसमधून झालेले निलंबन याकडे कसे बघता?असा प्रश्न केला असता,माझे निलंबन झालेच नाही,ते कागदावर झालेले निलंबन असल्याचे त्यांनी सांगितले.
विजयाच्या समीकरणाविषयी बोलताना,काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्यासह विद्यमान खासदार श्यामकुमार बर्वे,राष्ट्रवादी काँग्रेस,अपक्ष,जिल्हा परिषदचे नेते,सभासद,गोंडवाना पक्ष,प्रहार जनशक्ती,शिवसेना ठाकरे गटाचे नेते,कार्यकर्ते यांच्यासह अनेक पक्ष व कार्यकर्त्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने अनेकांचे समर्थन मला मिळत असल्याने तसेच रामटेकच्या जनतेचा प्रचंड प्रतिसाद बघता विजय निश्तिचत आहे,असा दावा त्यांनी केला.माझा विजय ही आता प्रत्येकासाठी एक ‘चळवळच’झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
२३ नोव्हेंबर रोजी विजयाचा गुलाल तुम्हीच उधळणार का?असा प्रश्न केला असता,शंभर टक्के,असा विश्वास ते व्यक्त करतात.