काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांसाठी ’निर्भय महाराष्ट्र’ची योजना राबवणार
हि-यांवर दिड टक्के तर गरिबांच्या टूथपेस्टवर १८ टक्के जीएसटी: मोदी सरकारची
जनतेप्रति दिसते मानसिकता:नटराजन यांचा प्रहार
नागपूर,ता.११ नोव्हेंबर २०२४: आज या देशात दोन विचारधारेचा लढा सुरु आहे,एका विचारधारेने देशातील नागरिकांना संसाधनांचा ‘हकदार’बनवले तर दुस-या विचारधारेच्या सत्ताधा-यांनी नागरिकांना मोफत योजनेच्या नावाखाली त्यांच्यावर ‘मेहरबानी’दर्शवली,अशी खरमरीत टिका काँग्रेसच्या खासदार मीनाक्षी नटराजन यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. याप्रसंगी मंचावर उमाकांत अग्निहोत्री,राकेश रेड्डी,हर्षद शर्मा आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नटराजन म्हणाल्या,की काँग्रेस देशातील जनतेला ‘हकदार’समजत असल्यानेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पाचसूत्री संकल्प करण्यात आला आहे.प्रत्येक कूटूंबाला वर्षाकाठी किमान तीन लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी योजना राबविली जाईल.महालक्ष्मी योजनेतंर्गत महिलांना महिन्याला तीन हजार रुपये दिले जातील कारण नोटबंदीचा सर्वाधिक फटका हा महिलांच्या बचतीवरच झाला असल्याचे त्यांनी सांगितले.कर्नाटकमध्ये आमच्या या योजनेचा १.२२ कोटी महिलांना लाभ मिळाला असल्याचे त्या म्हणाल्या.महिलांसाठी आमची दूसरी योजना आहे ती म्हणजे सार्वजनिक बस सेवेत महिलांना मोफत प्रवास करता येईल.कनार्टकमध्ये ६० लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे.याशिवाय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतक-यांचे तीन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल.ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतक-यांना ५० हजार रुपये ‘प्रशंसा पत्र’म्हणून दिले जातील.यूपीए सरकारने २००८ मध्ये या आधी देखील शेतक-यांचे ७२ हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे.आमचे सरकार देशातील सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींचे कर्ज माफ करणारे सरकार नाही,असा टोला त्यांनी हाणला.
जातगणनेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत.आमचे सरकार आल्यावर जात-जनगणना केली जाईल.याशिवाय युवांसाठी कौशल्य संपादन करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून ४ हजार रुपये प्रति महिना दिले जाईल.मध्यप्रदेशात आमचे सरकार असताना या योजना आम्ही यशस्वीपणे राबविल्या असल्याचे नटराजन यांनी सांगितले.१०० यूनिटपर्यंत वीज बिल आम्ही माफ करु.
हे सरकार मात्र ’लाडकी बहीण’योजनेचा गवगवा करण्यात मशगुल आहे पण स्वत:च्या गिरेबानात झाकून बघण्याची तसदी घेत नाही,अशी टिका त्यांनी केली.बदलापूरात जे घडले ते अक्षम्य होते.निरागस लहानग्या मुलींसोबत क्रोर्य घडले परंतू गुन्हा नोंदवण्यासाठी गरोदर आईला ४८ तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.नॅशनल ब्यूरो ऑफ क्राईम रेकॉर्डच्या आकड्यानुसार महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये देशात दूस-या क्रमांकावर आहे.हे राज्य सावित्रीबाई फूलेंचे राज्य आहे मात्र,येथील महिला आता निर्भयपणे जगू शकत नाही.त्यामुळे आम्ही ‘निर्भय महाराष्ट्राची’योजना राबवणार असून,महिलांविषयी गुन्ह्यांसाठी तातडीने कारवाई करण्यात येईल.एकेकाळी महाराष्ट्र हा पुरोगामी म्हणून संबोधला जात असे.आर्थिक,सामाजिक,राजकीय अशी अतिशय समृद्ध परंपरा या राज्याला लाभली आहे.ती ओळख आमचे सरकार आल्यावर पुन्हा कायम करु,असा दावा त्यांनी याप्रसंगी केला.
राज्यातील महायुतीची सरकार ही महाभ्रष्टाचारी असल्याची टिका त्यांनी केली.सिंधुदूर्ग मधला छत्रपती शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला.छत्रपती हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.त्यामुळे त्यांच्या पुतळ्याची दूर्दशा बघून तीव्र दुखं झाल्याचे त्या म्हणाल्या.२०३० मध्ये छत्रपती शिवरायांचा ४०० वा जन्म शताब्दी वर्ष आहे.छत्रपतींचा तोच गौरव आमचे सरकार आल्यावर पुर्नस्थापित करु,महाराष्ट्राला विकासाच्या नव्या वाटेवर घेऊन जाऊ,असे आश्वासन त्यांनी दिले.
‘लाडकी बहीण योजने’नंतर महाराष्ट्रात अचानक महागाईने कळस गाठला.
१०० रुपयांचे स्टॅम्प पेपर चक्क ५०० रुपयांचे करण्यात आले.तेलाचा १५ किलोचा डबा १७०० वरुन २१०० रुपयांचा झाला.तूर डाळ पावणे दोनशे रुपयांना मिळते,याशिवाय कोणतीही डाळ १०० रुपयांच्या खाली मिळत नाही,याकडे लक्ष वेधले असता,आमचे सरकार गेल्यावर या सरकारने पेट्रोलवर ४६ टक्के दरवाढ केली तर डिजेलवर ६१ टक्के दरवाढ केली.गरीबांहून गरीब वापरत असलेल्या टूथ पेस्टवर १८ टक्के जीएसटी लावला तर श्रीमंतांची चैन असणा-या हि-यांवर फक्त दीड टक्के जीएसटी लावण्यात आला.यावरुन या सरकारची देशातील नागरिकांप्रतिची मानसिकता दिसून पडते,असा प्रहार त्यांनी केला.
देशाचे उत्पन्न १०० रुपये मानले तर त्यात ३९ टक्के असणारा कर श्रीमंत उद्योगपतींचा कर या सरकारने २७ टक्के केला तर आमच्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांवर असणारा २७ टक्के कर हा या सरकारने ३९ टक्के केला!देशातील प्रत्येक नागरिकाला कराच्या ओझ्याखाली मोदी सरकारने दाबून टाकले आहे.वरुन मोफत योजनेच्या नावाखाली ‘मेहरबानी‘दाखवली जाते,अशी टिका त्यांनी केली.
तुम्ही पण तर महिलांना तीन हजार रुपये,मोफत बससेवा,मोफत वीज इत्यादी योजना देणार आहेत मग ही मेहरबानी नाही का?असा सवाल केला असता,महिलांनी आजपर्यंत पराकोटीचे आर्थिक मागासलेपण भोगले,आज देखील त्यांचा संघर्ष कुठेही संपला नाही,त्यांना बरोबरीत आणण्यासाठी सवलत देणे तसेच आर्थिक आधार देणे गरजचे असल्याचे नटराजन यांनी सांगितले.त्या या योजनेच्या ‘हकदार’आहेत.त्यांना सामाजिक,आर्थिक व राजकीयस्तरावर सशक्त करण्यासाठी आम्ही या योजना राबवणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले.‘ये सशक्तता का कदम है,मेहरबानी का नही’असे त्या म्हणाल्या.
एका प्रश्नाच्या उत्तरात त्या म्हणाल्या की महायुती सरकारला लोकसभेच्या निकालानंतरच ’लाडकी बहीण’योजना आठवली.निवडणूकीत फायदा घेण्यासाठीच त्यांनी ही योजना आणली.एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायची दूसरीकडे देशाच्या राजधानीत जंतरमंतरवर देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्जवल करणा-या महिला कुश्तीपटूंच्या डोळ्यात अश्रू आणायचे काम या सरकारने केले.यांच्या ‘कथनी और करनी’मध्ये महत् अंतर आहे.बहीणी सगळ्यांना लाडक्याच आहेत,आम्हाला देखील महाराष्ट्रातील बहीणींना सशक्त झाल्याचे बघायचे आहे,त्यासाठीत आमचे सरकार आल्यावर आम्ही महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करणार असल्याचा दावा त्यांनी केला.
…………………………….