बल्लापूरचे वंचितचे उमेदवार सतीश मालेकर (गुरुजी) यांचा आरोप
बेरोजगारीची समस्या भीषण:प्राथमिक शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा
बल्लारपूर,दिनांक ८ नोव्हेंबर २०२४: देशात बेरोजगारीची समस्या ही भीषण झाली असून तरुणांच्या हाताला काम नाही,त्यांच्या हाताला काम देण्यासाठी व त्यांना वाममार्गावर जाण्यापासून वंचित ठेवण्यासाठी,त्यांना दिशा देण्यासाठी,याेग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन बल्लापूर मतदारसंघाचे वंचित बहूजन आघाडीचे अधिकृत उमेदवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.
आज देशात अनुसूचित जाती-जमाती,ओबीसी समाजाचे समाजातील स्थान हे अधोगतीकडे जात आहे,असा आरोप करीत त्यांना पुन्हा समाजात सन्मान मिळवून देण्यासाठी व त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी मी वंचितची उमेदवारी स्वीकारली असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न ही भीषण आहेत.आज जिल्हा परिषद शाळेत वर्ग सातपर्यंत शिकवण्यासाठी फक्त एक किवा दोन शिक्षक आहेत.दोन शिक्षकांवर सात वर्गांचा भार पडलेला आहे.सरकारी शाळेच्या इमारतींची दूर्दशा ही शब्दात मांडता येण्यासाखी नाही.प्राथमिक शिक्षकांवर तर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढत चाललेला असल्याचे त्यांनी सांगितले.यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असून ज्याप्रकारे विदर्भात शेतक-यांच्या आत्महत्या होत आहेत त्याच धर्तीवर येत्या काळात विदर्भातील शिक्षकांच्या आत्महत्या होत असताना आपल्याला पाहायला मिळेल,असा इशारा त्यांनी दिला.त्यामुळे शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा बोजा काढून टाकला पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.
या देशात अदानी-अंबानीसारख्या उद्योगपतींवरील १६ लाख कोटींचे कर्ज संसेदत ठराव करुन माफ केले जाते मात्र,महाराष्ट्रातील शेतक-यांवरील दीड-दोन लाख कोटींचे कर्ज केंद्राची सरकार माफ करण्यास धजत नाही,असा आरोप त्यांनी केला.एकीकडे शेतक-यांच्या सोयाबिन,कापूस,तूर,संत्र्याला भाव मिळत नाही आहे पण दूसरीकडे राज्यातील सरकार हे ‘लाडकी बहीण’योजनेतून वर्षाला ४६ हजार कोटी वाटून राहीली आहे.यासाठी या सरकारने रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून दर आठवड्याला साढे तीन हजार कोटींचे कर्ज घेतले असून राज्यावर साढे सात हजार कोटींचे कर्ज चढवले,येत्या काळात ते ९ लाख कोटींपर्यंत होईल,याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकावर ६२ हजारांचे कर्ज झाले आहे,त्यामुळे येत्या काळात निवडणूका संपताच ही योजना बंद पडणार असून महायुती सरकारने लाडक्या बहीणींना फक्त निवडणूकीपुरती आमिष दाखवले असल्याचा व जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी केला.
एकीकडे लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला १५०० रुपये वाटायचे दूसरीकडे त्याच लाडक्या बहीणींच्या डोळ्यात महागाई वाढवून पाणी आणायचे,अशी टिका त्यांनी केली.१५ किलो खाद्य तेलाचे भाव १८०० वरुन २४०० रुपयांपर्यंत पोहोचले.सरकारची लृट इथंच थांबत नाही तर जे गोरगरीब आपल्या शेतीच्या व्यहवारासाठी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेत होती त्याची किंमत या लाडक्या सत्ताधा-यांनी ५०० रुपये केली!ही जनतेची लृट नाही का?असा सवाल त्यांनी केला.तूरडाळ,हरभरा असो किवा कोणतीही डाळ व कडधान्ये,महागाईने लाडक्या बहीणींचे आर्थिक कंबरडे मोडले असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यामुळेच या देशाचा आर्थिक भोंगळ कारभार सुधारण्यासाठी,देशातील तरुणांना योग्य दिशेने नेण्यासाठी,देशातील तरुणाईच्या हाताला काम मिळण्यासाठी व बेरोजगारीचा भीषण प्रश्न सोडवण्यासाठी मी वंचितची उमेदवारी स्वीकारली असल्याचे त्यांनी सांगितले.
बल्लारपूरमध्ये भाजपचे तगडे व कद्दावर नेते व मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सामना कसा कराल?असा प्रश्न केला असता,मला आव्हान स्वीकारण्याची सवय असल्याचे ते म्हणाले.मी एका बँकेचा अध्यक्ष असून बँकेच्या निवडणूकीत देखील माझ्यासमोर तगडे आव्हान होते.प्रतिस्पर्धकाला पराभूत करुन मी बँकेचा अध्यक्ष झालो.गेल्या वीस वर्षांपासून अनुसूचित जाती-जमाती,ओबीसी समाजाला जागवण्याचे सामाजिक काम करीत आहे.मी बहूजनांचे प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे.समाज असो किवा शेतकरी,त्यांचे प्रश्न मी गेल्या वीस वर्षांपासून सोडवत आहे ,आजपर्यंत अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम मी घेतले त्यामुळे मी सर्वाना परिचित असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे माझ्या समोर या निवडणूकीत कितीही तगडे आव्हान असले तरी हे आव्हान देखील मी सहज पेलवणार असून,समोरच्या तगड्या उमेदवाराला पराभूत करुन विधान सभेत जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.