नागपूर,ता.५ नोव्हेंबर २०२४: काँग्रेस पक्षाला देशातील मुस्लिम समुदायाने गेली अनेक दशके भरभरुन साथ दिली मात्र,काँग्रेस पक्ष हा मुस्लिम समुदायासोबत कधीही राहत नाही,रामगिरी महाराजांनी मुस्लिम समुदायाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरले मात्र,काँग्रेसने मुस्लिमांचा साथ न देता गप्प राहणे पसंद केले,काँग्रेसच्या या दुटप्पी भूमिकेच्या आणि नैतिकतेच्या विरोधात उद्या बुधवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी नागपूरात काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांच्या रोड शो व भट सभागृहातील सभेत राहूल गांधींना काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा आज पत्रकार भवनात स्वातंत्र्य सैनिक अमर शहीद मजीद खान सेनेचे अध्यक्ष मेहमुद खान यांनी पत्रकार परिषदेत दिला.
काँग्रेसने आजपर्यंत स्वत:च्या राजकारणासाठी मुस्लिम,दलित,ओबीसी व मराठा समाजाचे शोषण केले असल्याचा आरोप याप्रसंगी मेहमुद खान यांनी केला.काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी मुस्लिमांच्या उत्थानासाठी मेहमुद रहेमान समितीचे गठन केले.त्यांनी केलेली मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याबाबतची शिफारश काँग्रेसचे मुख्यमंत्री अशाेक चव्हाण तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी कधीही अमलात आणली नाही.आपली सत्ता आता महाराष्ट्रातून जाणार हे बघून त्यांनी घाईघाईत आरक्षण दिले मात्र,ते न्यायालयात टिकू शकले नाही,काँग्रेसच्या संधीसाधू मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम समुदायाच्या भावी पिढ्यांचे आयुष्याचे नुकसान केले असल्याचा आरोप मेहमूद खान यांनी केला. आरक्षण रद्द झाल्याने अनेक मुस्लिम विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते.
कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसने मुस्लिम समुदायांची मते घेण्यासाठी अनेक आश्वासने दिली मात्र,अद्याप ही पूर्ण केली नाही.हिजाब विषयीची भूमिका,मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण,बजरंग दलावर बंदी घालणे,मुस्लिमांना उपमुख्यमंत्री पद दिले जावे,अशी अनेक आश्वासने पूर्ण न केल्याने,मुस्लिम समुदाय काँग्रेसचा विरोध करीत असल्याचा दावा मेहमूद खान यांनी केला.
या आंदोलनात किती मुस्लिमांचा सहभाग असणार आहे?असा प्रश्न केला असता,वीस हजारांच्या वर मुस्लिम हे राहूल गांधीना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करणार असल्याचे मेहमूद खान यांनी सांगितले.
याप्रसंगी मध्य नागपूर मतदारसंघाचे उमेदवार सुफियान,दक्षिण नागपूर मतदारसंघाचे उमेदवार हाजी मोहम्मद मोबीन ताजी व पश्चिम नागपूर मतदारसंघाचे उमेदवार ॲड.मेहमूद खान उपस्थित होते.