छत्रपती संभाजी राजेंनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्दाला केला उघडपणे विरोध
परिवर्तन महाशक्तीच्या कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये विदर्भाचा मुद्दा ‘गैरलागू!‘
नागपूर,ता.४ नोव्हेंबर २०२४: शेतकरी संघटनेचे नेते ॲड.वामनराव चटप हे नाव वैदर्भिय आंदोलनात अग्रस्थानी आहे.राम नेवले यांच्या मृत्यूनंतर ही या आंदोलनाची धूरा चटपांनी समर्थपणे पेलली.मात्र,तीन विधानसभा निवडणुका जिंकण्याचा आणि लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या दोन निवडणूकांमध्ये पराभूत झालेले चटप,यंदा आठव्यांदा राजुरा विधानसभेच्या रिंगणात उतरले अाहेत. आज नागपूरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज प्रस्थापितांसोबत एकाच मंचावर बसले असताना,विदर्भाच्या प्रश्नावर त्यांनी सोयीस्कर‘मौन’बाळगले,सातत्याने विदर्भाच्या मुद्दावर आक्रमक भूमिका घेणारे चटप यांनी एका ‘आमदारकी’साठी आपली मान खाली घातल्याची प्रतिक्रिया यानंतर उमटली.
वामनराव चटप हे विश्वासहर्ता गमावलेले नेते असल्याची टिका काही विदर्भवादी नेते करतात.ॲड.अभिजित वंजारी निवडणूक रिंगणात असताना,त्यांचे वडील स्व.गोविंदराव वंजारी हे चटपांचे वर्गमित्र असल्याने अभिजित वंजारींच्या विरोधात नाहीच बोलू शकणार,असे म्हणणा-या चटपांवर, दुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोपही केला जातो.विदर्भाच्या मातीला लाभलेला हा श्राप आहे की विदर्भाच्या नेत्यांचेही पाय ‘मातीचेच‘निघतात,अशी खंत काही विदर्भवादी नेते खासगीत बोलून दाखवतात.नुसती आमदारकी लढण्यासाठी चटपांचे आजचे हे घूमजाव‘लाछनास्पद’असल्याची टिका देखील त्यांच्यावर करण्यात आली.
२०१४ साली आम आदमी पक्षाकडून चटप हे चंद्रपूरमधून निवडणूक लढले होते.त्यावेळी ते तिस-या स्थानी होते.यावरुन वैदर्भियांचा त्यांच्यावरील विश्वास अधोरेखित होतो मात्र,आज नागपूरातील पत्रकार परिषदेत त्यांना वैदर्भिय बाणा दाखवता आला नाही कारण परिवर्तन महाशक्तीकडून मिळालेली आमदारकी त्यांना विदर्भाच्या मुद्दापेक्षा जास्त महत्वाची वाटत होती,असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.काँग्रेसचे कद्दावर नेते रणजित देशमुखांनी विदर्भाच्या मुद्दावर २००४ साली तीन दिवस काँग्रेससाठी प्रचारच केला नाही,त्यानंतर त्यांची राजकीय कारर्कीदच संपली मात्र,चटपांसारखं विदर्भ प्रेम त्यांनी जपलं नाही,असा दाखला विदर्भवादी देतात.चटपांच्या आंदोलनात ज्या विदर्भवाद्यांनी तुरुंगवास भोगला,ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत,त्यांना चटपांनी आपल्या आमदारकीसाठी वा-यावर सोडले,असा आरोप देखील चटपांवर करण्यात येत आहे.
आज पत्रकार परिषदेत वेगळ्या विदर्भावर चटपांना प्रश्न केला असता,त्यांनी शिवसेना-भाजप युतीकडे चेंडू टोलवला.मात्र,वेगळ्या विदर्भावर माझी भूमिका अद्याप ही ठाम आहे,असे म्हटले नाही.वेगळ्या विदर्भावर प्रश्न करताच,छत्रपती संभाजीराजे हे अस्वस्थ झालेत,त्यांनी अनेकदा चटपांच्या मध्ये बाेलण्याचा प्रयत्न केला,त्यांची अस्वस्थता बघता,त्यांनाच वेगळ्या विदर्भावर बोलण्याचा आग्रह धरण्यात आला,यावर छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेत सगळेच आले,महाराष्ट्रातील सगळ्यांना एकत्रित ठेवणे ही माझी देखील भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.परिवर्तन महाशक्तीमध्ये सगळ्या घटकांची वेगवेगळी मते असली तरी सध्या आमचा एकच कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये(किमान समान कार्यक्रम) वेगळा विदर्भ हा विषय नाही,आमचा एकच महाराष्ट्र आहे हीच आमच्या सर्वांची एकच लाईन असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले.वैदर्भिय अचलपूर अमरावतीकर, बच्चू कडू यांनी देखील या प्रश्नावर मौन बाळगणेच पसंद केले.
नागपूरातील एका अखंड महाराष्ट्रवादी यांनी, सर्वात पहीले वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी चर्चेत आणला असल्याचे सांगितले.यानंतर हा मुद्दा स्वतंत्र विदर्भवाद्यांनी आंदोलनाच्या रुपात घेतला.भाजपने यात उडी घेत,तत्कालीन भाजपचे नागपूरातील नेते व तीन टर्मचे विद्यमान खासदार नितिन गडकरी यांनी तर लिखित पत्रच विदर्भवाद्यांना दिले की राज्यात व केंद्रात आमची सरकार आल्यावर वेगळा विदर्भ करणार,देवेंद्र फडणवीस यांनी तर विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्नच करणार नाही,अशी भीमगर्जना केली होती,त्यामुळे विदर्भाच्या मुद्दावर एकमेव चटप हेच राजकारण करीत नसून भाजपने तर वेगळ्या विदर्भाच्या मुद्दावर सर्वाधिक जागा विदर्भातून मिळवून राज्यात व केंद्रात आपली सत्ता स्थापन केली मात्र,वैदर्भियांना दिलेले वचन पूर्ण केले नाही.गडकरी यांनी तर त्याही पुढे जाऊन ‘पक्षाच्या जाहीरनाम्यात दिलेली वचने ही पूर्ण करण्यासाठी नसतात’,अशी मुक्ताफळे उधळली,स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दाच्या आपापल्या सोयीसाठी आणि राजकारणासाठी‘खुळखुळा‘सर्वानी केला,यात शरद पवार यांच्यापासून तर भाजप,काँग्रेस सगळेच आल्याचे ते ‘संतापून’ सांगतात!
……………………