फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजनागपूरात काँग्रेस यशाची पुनरावृत्ती करणार का?

नागपूरात काँग्रेस यशाची पुनरावृत्ती करणार का?

(निवडणूक विशेष-विधानसभा २०२४)

काँग्रेसची पहीली यादी जाहीर: ४८ उमेदवारांची घोषणा
पश्‍चिमेतून विकास ठाकरे,उत्तरेतून नितीन राऊत,मध्य नागपूरातून बंटी शेळके यांना पुन्हा तिकीट
फडणवीसांच्या विरोधात पुन्हा एकदा प्रफूल्ल गुडधे पाटील दंड थोपटणार
२०१९ च्या निवडणूकीत सहाही मतदारसंघात भाजपला एकूण ५ लाख १६ हजार २७२ मते
डॉ.ममता खांडेकर
(Senior Jounalist)
नागपूर,ता.२४ ऑक्टोबर २०२४: अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अखेर आपली पहीली यादी जाहीर केली असून, ४८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.महाराष्ट्राच्या उपराजधानीत पुन्हा एकदा काँग्रेसने आपल्या विद्यमान आमदारांवर भिस्त ठेवली असून,२०१९ मध्ये मध्य नागपूर मधून भारतीय जनता पक्षाचे विजयी आमदार विकास कुंभारे यांना विजयासाठी अस्मान दाखवणारे युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बंटी शेळके यांना पुन्हा एकदा मध्य नागपूरमधून काँग्रेसने आज उमेदवारी जाहीर केल्याने, पुन्हा एकदा भाजप-काँग्रेसमध्ये रंगत वाढली आहे.भाजपने मात्र अद्याप मध्य,पश्‍चिम व उत्तर नागपूरमधून आपल्या उमेदवारांची नावे घोषित केली नाही.
नागपूरातील सर्वात हाय-वोलटेज निवडणूक ही राज्याचे माजी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस व काँग्रेसने आज घोषित केलेले उमेदवार प्रफूल्ल गुडधे पाटील यांच्यात रंगणार आहे.महाराष्ट्रात निवडणूकीची घोषणा होण्या पूर्वीच दक्षिण-पश्‍चिममध्ये या दोन्ही उमेदवारांमध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच ‘पोस्टरबाजी’रंगली आहे.
२०१९ च्या निवडणूकीत पाच वर्षे विकासाचे दावे करणा-या भाजपला नागपूर शहरातील उत्तर व पश्‍चिम या दोन जागा गमवाव्या लागल्या होत्या.महत्वाचे म्हणजे २०१९ च्या लोकसभेच्या तुलनेत भाजपच्या विधानसभेतील मतांमध्ये सव्वा लाखांनी घट झाली होती तर काँग्रेसच्या मतांमध्ये २५ हजारांची भर पडली होती.२०१९ च्या निवडणूकीत भाजपने अत्याधुनिक प्रचार यंत्रणेचा वापर करीत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’यांची कर्मस्थळी मोझरीपासून ‘महाजनादेश’यात्रा काढली होती.या यात्रेद्वारे फडणवीस यांनी नागपूरातील जनतेला जनादेश मागितला होता.संपूर्ण निवडणूकीच्या काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,अभिनेता व खासदार रवि किशन,भोजपुरी अभिनेता मनोज तिवारी यांच्यासह स्वत: देवेंद्र फडणवीस,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील सहाही मतदारसंघात जोमात प्रचारसभा घेतल्या.मात्र,त्या प्रचारसभेतील जोश भाजपला मतदान करताना मतदारांत दिसून आला नसल्याचे मतदारांच्या आकडेवारीने स्पष्ट केले.
शहरातील सहाही जागा जिंकण्याचा दावा निवडणूकी पूर्वी केला जात होता.या दाव्यालाही नागपूरकर मतदारांनी छेद देण्याचे कार्य केले. २०१९ च्या निवडणूकीत सहाही मतदारसंघात एकूण ५ लाख १६ हजार २७२ मते पडली होती.चारच महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला ६ लाख ४६ हजार ७५ मते पडली होती.लोकसभेच्या तुलनेत चारच महिन्यात भाजपच्या मतांमध्ये १ लाख २९ हजार ८०३ मतांनी घट झाली,यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार गडकरी यांना एकूण ६ लाख ५५ हजार ०२७ मत मिळाले तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांना ५ लाख,१७ हजार ४२४ मते मिळाली.या निवडणूकीत एकूण ५,४७४ ‘नोटा’ पडले.त्यामुळे यंदाच्या विधानसभेच्या निवडणूकीत देखील भाजपला यंदाचे लोकसभेतील यश राखता येईल का?यावर राजकीय विश्‍लेषक संशय व्यक्त करीत आहेत.

महत्वाचे म्हणजे विदर्भाच्या एकूण ६२ जागांपैकी भाजपने २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत ४५ जागांवर विजय मिळवला होता तर लोकसभा २०२४ मध्ये विदर्भाच्या १० पैकी फक्त ३ जागा भाजपला जिंकता आल्या आहेत. विशेष म्हणजे ,२०१९ च्या निवडणूकीत नागपूरात लोकसभा निवडणूकीत मिळालेली मतदारसंघनिहाय आघाडी एकाही भाजपच्या उमेदवाराला कायम राखता आली नाही.२०१४ च्या निवडणूकीत भाजपला नागपूरातील सहाही मतदारसंघात यशा सह ५ लाख ३७ हजार २०८ मते पडली होती.२०१४ ते २०१९ या पाच वर्षात नागपूरात अनेक विकास कामे झाली.सिमेंट रस्ते,मेट्रो रेल्वे,उड्डाणपूल,शैक्षणिक,आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था,एम्स नागपूरात आले.त्यामुळे २०१९ च्या निवडणूकीत मतांचा पाऊस पडणार अशी अपेक्षा भाजपची होती.परंतु,भाजपच्या अपेक्षांना चांगलाच सुरुंग लागला आणि सहा पैकी दोन जागांवर पराभव तर दोन जागांवर निसटता विजय मिळाला.भाजपची मते वाढण्या ऐवजी कमी झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.

२०१४ मध्ये नागपूरात सहाही विधान सभा मतदारसंघात भाजपला ५ लाख ३७ हजार २०८ मते तर काँग्रेसला ३ लाख ३ हजार ७८ मते मिळाली होती.२०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपला ५ लाख १६ हजार २७२ मते मिळाली तर काँग्रेसची मते वाढून ४ लाख ६१ हजार ९५२ पर्यंत पोहोचली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रिय मंत्री नितीन गडकरींचा गड असूनही नागपूर जिल्हयाच्या बारा जागांपैकी फक्त सहा जागा भाजपला गेल्या विधानसभेत जिंकता आल्या.स्वत: मुख्यमंत्री फडणवीस हे पन्नास हजारच्या मताधिक्याने जिंकून आले.त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांना पराभूत केले.सध्या तेच आशिष देशमुख भाजपच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष आहेत!
सर्वाधिक चुरशीधी लढत दक्षिण मध्ये झाली होती.या मतदारसंघात भाजपने तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापून मोहन मतेंना उमेदवारी दिली होती.त्यामुळे कोहळे समर्थक नाराज होते,याशिवाय शिवसेना व भाजपच्याच इच्छूकांनी बंडखोरी केली होती.दुसरीकडे काँग्रेसचे गिरीश पांडव यांनाही प्रमोद मानमोडे यांच्यामुळे बंडखोरांचा सामना करावा लागला होता.शेवटच्या फेरीपर्यंत या मतदारसंघात घमासान सुरु होते.मोहन मते अवघ्या चार हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते तर सुधाकर कोहळे हे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत.
मध्य नागपूरात काँग्रेसचे युवा राष्ट्रीय नेतृत्व बंटी शेळकेंनी सुरवातीला सातत्याने प्रत्येक फेरीत आघाडी घेऊन भाजपचे दोन टर्मचे आमदार विकास कुंभारे यांना चांगलाच घाम फोडला होता मात्र,एमआयएमच्या उमेदवाराने मध्य नागपूरातील मुस्लिमांची तब्बल आठ हजारपेक्षा अधिक मते घेतल्याने, बंटी शेळकेंवर अवघ्या पावणे चार हजार मतांनी पराभव पत्करण्याची वेळ आली.उत्तरच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र,२०१९ च्या निवडणूकीत बसपाचा हत्ती फारसा चाललाच नाही,त्यामुळे मत विभाजन झालेच नाही आणि  काँग्रेसचे डॉ.नितीन राऊत यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली,भाजपचे डॉ.मिलिंद माने यांना पराभवाचे तोंड बघावे लागले.
पश्‍चिम नागपूर-
पश्‍चिमेत तर काँग्रेसचे उमेदवार व माजी महापौर विकास ठाकरे यांच्या अस्तित्वाचीच लढाई होती.त्यांना महानगरपालिकेच्या निवडणूकीत पराभूत व्हावे लागले होते कारण,त्यांच्या परंपरागत मतदारसंघाची ‘पुर्नरचना’ करण्यात आली होती.नागपूरातील भाजपच्या कद्दावर नेत्यांनी विकास ठाकरे यांचा पुन्हा महानगरपालिकेत प्रवेश होऊ देणार नाही,हा ‘प्रण’ पूर्ण केला होता,परिणामी,२०१९ ची निवडणूक ही विकास ठाकरे यांच्यासाठी त्यांच्या राजकीय अस्तित्वाचीच लढाई ठरली होती.त्यांनी राज्यमंत्र्यांचा दर्जा प्राप्त असलेले व गडकरी यांच्या विशेष जिव्हाळ्याचे उमेदवार सुधाकर देशमुख यांचा पराभव केला होता.
सुमारे तीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या भाजपचा अभेद्य किल्ला काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी ध्वस्त केला होता.त्यांनी भाजपचे सुधाकर देशमुख यांचा पराभव केला होता.ठाकरे यांना ८३ हजार मते तर सुधारक देशमुख यांना ७७ हजार मते पडली होती.
देशमुख यांनी पहील्याच फेरील  ६०२ मतांची आघाडी घेल्याने काँग्रेसच्या गोटा अस्वस्थता पसरली होती.मात्र,दुस-याच फेरीत ती काँग्रेसने भरुन काढली.हा आकडा ७ व्या फेरीपर्यंत कायम होता.मात्र,धरमपेठ,शंकरनगर भागातील मतमोजणीतून दोघांच्याही मतांमधील अंतर भरुन निघाले होते.शेवटच्या २ फे-यांमध्ये सुधाकर देशमुख आघाडीवर होते.तत्पूर्वीच ठाकरे हे आघाडीत फार पुढे निघून गेले होते. ती भरुन काढणे देशमुखांना शक्य झाले नाही. १ लाख ७८ हजार ५९६ मतांमधून देशमुख यांना ७६ हजार ८८५ मते मिळाली तर विकास ठाकरे यांना ८३ हजार २५२ मते मिळाली ज्या द्वारे त्यांनी देशमुखांचा विजयी किल्ला ध्वस्त केला.
ठाकरे यांचे नेतृत्व महापौर झाल्यावर प्रकाश झोतात आले होत.मात्र,विधानसभेत दोन वेळा पराभव झाल्याने त्यांच्या समोर राजकीय अस्तित्वाचे संकट गहिरे झाले होते.अनेकांनी त्यांना भाजपात जाण्याचा सल्ला ही दिला.त्याची चर्चा ही भरपूर झाली मात्र,पराभूत झालेले ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम राहीले.अखेर यशाची माळ २०१९ च्या निवडणूकीत त्यांच्या गळ्यात पडली.
सेमिनरी हिल्सच्या निसर्गरम्य परिसरात झालेल्या मतमोजणी केंद्रावर काँग्रेसचा विजय होत असल्याची खबर कार्यकर्त्यांना मिळाली अन्..एसएफएस महाविद्यालयाच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.पहिल्या फेरीत भाजपच्या उमेदवारीची आघाडी पाहून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता मात्र,दुस-या फेरीपासून विकास ठाकरे यांचे मताधिक्य वाढत गेले अन् परिसर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फूलून गेला.‘वा रे पंजा..आ गया पंजा’घोषणेने आसमंत निनादू लागला.फटाक्यांची आतिशबाजी,ढोल ताश्‍यांचा गजर व कार्यकर्त्यांचा जल्लोषातून विकास ठाकरे यांची विजयी यात्रा निघाली.
काँग्रेसचा हा परंपरागत गड असून १९६२ पासून सुशीला बलराज यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.यानंतर १९७८ मध्ये  भाऊ मूळक,१९८० व १९८५ मध्ये गेव्ह आवारी पर्यंत हा गड काँग्रेसचाच राहीला आहे.यानंतर मात्र,१९९० व १९९५ मध्ये भाजपचे विनोद गुडधे पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसपासून हिसकावला.त्यांचेच सुपूत्र प्रफूल्ल गुडधे पाटील हे २०१४ नंतर यंदा ही काँग्रेसकडून दक्षिण-पश्‍चिममध्ये फडणवीस यांच्या विरोधात दंड थोपटून उभे आहेत.
यंदा मात्र,या मतदार संघात विकास ठाकरे यांचा  सामना कोणाशी होणार ते नाव भाजपने अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे.महत्वाचे म्हणजे भाजपचे सुधाकर देशमुख यांनी उमेदवारी अर्ज आधीच घेऊन ठेवला आहे तर दुसरीकडे विकास ठाकरे यांचे कट्टर विरोधी नरेंद्र जिचकार हे पूर्णत:‘बगावतच्या मूडमध्ये’असल्याने त्यांनी देखील पश्‍चिम नागपूरातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.येत्या २३ नोव्हेंबर रोजी या मतदारसंघातून विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडते,हे बघणे नागपूरकरांसाठीही औत्सुक्याचा विषय आहे.
पूर्व नागपूर-
२०१९ मध्ये पूर्व नागपूरचे भाजपचे विजयी आमदार कृष्णा खोपडे यांना १ लाख ०३,९९२ मते मिळाली होती तर काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांना ७९ हजार ९७५ मते मिळाली.बसपाचे सागर लोखंडे यांना ५ हजार २८४ मतते,वंचितचे मंगलमूर्ती सोनकुसरे यांना ४ हजार ३३८,अपक्ष बबलू गेडाम यांना ४८७ तर या मतदारसंघात ‘नोटा’चे बटण ३ हजार,४६० मतदारांनी दाबले होते!एकूण मते १ लाख,९८ हजार,२०९ होती तर कृष्णा खोपडे हे २४ हजार १७ मतांनी विजयी झाले होते.
पूर्व नागपूरमध्ये आमदार कृष्णा खोपडेंनी विजयाची हॅटट्रिक नोंदवली होती.ते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील अशी भाजपला अपेक्षा होती मात्र, काँग्रेसच्या पुरुषोत्तम हजारेंनी खोपडे यांना वरचढ होऊ दिले नाही.खोपडे फक्त २४ हजारांच्या फरकाने जिंकून आले होते.
यंदा हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला सुटला असून शरद पवार गटाने या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसेचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे ही लढत तुल्यबळ न होता भाजपसाठी एकतर्फी झाल्याची चर्चा आहे तर दूसरीकडे अजित पवार गटाच्या रणरागिणी व झुंजार नेत्या आभा पांडे यांनी आज पूर्व नागपूरातून ‘अपक्ष ’उमेदवारी अर्ज भरुन या लढतीत चांगलीच रंगत आणली आहे.शक्ती प्रदर्शनातून आभा पांडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला.या मतदारसंघातील अनेक बूथवर आभा पांडे यांची चांगली पकड आहे तर दूसरीकडे पूर्व नागपूरात विकासाचा जोरदार झंझावात केल्याने विजय माझाच आहे,असा दावा खाेपडे करतात.काँग्रेसचे गिरीश पांडव हे देखील बंडखोरींच्या मूडमध्ये असल्याचे दिसून पडत आहेत.
पूर्व नागपूराची जागा आघाडीने राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडली असून पूर्व नागपूरातून शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांच्या नावाची घोषणा झाली असून,काँग्रेसच्या गोटात तीव्र नाराजी आहे.या मतदारसंघात काँग्रेसकडून पुन्हा एकदा ‘सांगली पॅटर्न’च्या पुर्नरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्य नागपूर-

मध्य नागपूरात भाजपचे विकास कुंभारे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली.शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कुंभारे यांनी कॉंग्रेसचे बंटी शेळके यांचा ४ हजार मतांनी पराभव केला.‘सत्ताधीश’ने त्यांच्या या विजयाला ‘लाजिरवाणा विजय’संबोधले होते कारण,भाजपच्या

बडबोल्या नेत्यांनी विकास कुंभारे हे १५ हजार पेक्षा अधिक मतांनी विजयी होतील,असा दावा केला होता.मध्य नागपूरची मतमोजणी २२ फे-यांमध्ये पार पडली होती.त्यात बंटी शेळकेंनी १२ फे-यांमध्ये आघाडी मिळवली होती.पाचव्या फेरीमध्ये कुंभारे यांना मिळालेली ११ हजार ६९२ मतांची आघाडी निर्णायक ठरली होती.तर शेवटच्या ५ फे-यांमध्ये काँग्रेसचे बंटी शेळकेंनी लीड घेत भाजपचे मताधिक्य चांगलेच कोंडीत पकडले होते.बूथ क्र.५२ चा ‘१७ सी ’फॉर्म मिळाला नाही.यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आक्षेप घेतला.मतदाना संदर्भात संपूर्ण तपशील या फॉर्ममध्ये असतो.परंतू तोच नसल्याने अखेर या बूथवरील मतदान यंत्राणी गणना रद्द करण्यात आली.यानंतर मतदान केंद्र ७५ व ७६ मधील मशीन बदलताना योग्य काळजी घेण्यात आली नसल्याचा आक्षेप बंटी शेळकेंनी नोंदवला.त्यामुळे या दोन केंद्रांवरील यंत्रांची देखील गणना घेण्यात आली नाही.या तिन्ही केंद्रांवरील एकूण मते १७६० असल्याची माहिती समोर आली होती.
नियमानुसार संबंधित यंत्रांमध्ये एकूण मते एकूण आघाडीपेक्षा कमी असल्यास रद्द केलेल्या फे-यांची गणना केली जात नाही.या नियमाचा थेट लाभ कुंभारे यांना मिळाला.अन्यथा त्यांची लीड अवघ्या दीड हजारांवर आली असती.मतदान केंद्र २६२ संदर्भातही तक्रार नोंदवली गेली होती.विकास कुंभारे यांना एकूण ७५ हजार ६९२ तर बंटी शेळके यांना ७१ हजार ६८४ मते मिळाली होती.एमआयएमचे अब्दूल शरीफ पटेल यांनी ८ हजार ५६५ मते खेचली तर वंचितचे कमलेश भगतकर आणि बसपाचे धर्मेंद्र महाडिक यांना दोन हजार मतांचाही टप्पा गाठता आला नव्हता.भगतकर यांना १ हजार ६१४ तर महाडिक यांना १ हजार ९७१ मते मिळाली होती.
दक्षिण-पश्‍चिम

यंदा पुन्हा दक्षिण-पश्‍चिममध्ये भाजपचे देेवेंद्र फडणवीस व काँग्रेसचे प्रफूल्ल गुडधे पाटील यांच्यात २०१४ प्रमाणे सामना रंगणार आहे.२०१४ मध्ये फडणवीस यांना १ लाख१३ हजार ९१८ मते मिळाली होती तर प्रफूल्ल गुडधे पाटील यांना ५४ हजार ९७६ मते मिळाली.२०१९ मध्ये मात्र,फडणवीस विरुद्ध काँग्रेसचे अाशिष देशमुख यांच्यात लढत झाली होती.भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या दक्ष्ीण-पश्‍चिमला भेदणे तसे सोपे नाही.नागपूरमधून सलग तिस-यांदा तर आतापर्यंत पाच वेळा भाजपचा हा गड फडणवीसांनी राखला आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहीलेले फडणवीस यांनी २०१९ च्या लढतीत अगदी पहील्याच फेरीपासून आघाडी घेतली होती.मुख्यमंत्र्यांना एक लाखाच्या मताधिक्याने विजय,भेट देण्याचा संकल्प भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला होता.मात्र,तो पूर्ण झाला नाही.फडणवीस यांना १ लाख ०९ हजार २३७ तर आशिष देशमुख यांना  ५९ हजार ८९३ मते मिळाली होती.२०१४ च्या तुलनेत काँग्रेसच्या मतांमध्ये अल्प वाढ झाली होती.वंचितचे रवी शेंडे यांना ८ हजार ८२१ तर बसपाचे विवेक हाडके यांना १ हजार मतांचा आकडा गाठण्यासाठी २७ व्या फेरीची वाट पाहावी लागली होती.अपक्ष उमेदवार प्रशांत पवार यांना फक्त ३३४ मते मिळाली.नोटाची संख्या मात्र,३ हजार ६४ वर पोहोचली होती.या संपूर्ण निवडणूकीत ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’चा चांगलाच परिणाम जाणवला.

दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील ४ ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता.त्यामुळे त्या मशीन्सला बाजूला ठेऊन २७ फेरींची मतमोजणी आटोपली.त्यानंतर तंत्रज्ञाना बोलावून चारही मशीन सुधारण्यात आल्यानंतर मतमोजणी सुरु केली.सायंकाळी ७ वाजता मुंबईवरुन मुख्यमंत्री फडणवीस नागपूरात येणार असल्याने अधिका-यांनी मतमोजणीसाठी धावपळ करीत प्रक्रिया पूर्ण केली होती.
दक्षिण नागपूर-
दक्षिणचा गढ २०१९ मध्ये भाजपच्या मोहन मते यांनी सर केला होता.यंदा देखील त्यांनाच तिकीट देण्यात आले आहे,काँग्रेसने अद्याप दक्ष्णेतून आपला उमेदवार जाहीर केला नाही.शेवटच्या फेरीपर्यंत दक्ष्णीच्या निकालाने उत्कंठा वाढवून ठेवली होती.काँग्रेसचे गिरीश पांडव यांनी ७ ते ११ व्या फेरीपर्यंत भाजपची आघाडी कमी करीत मतेंवर कुरघोडी केली होती.यानंतर मते यांनी पुन्हा मतांची आगेकुच केली.१७ व्या फेरीमध्ये पांडव यांनी पुन्हा आघाडी घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली होती.पुढच्याच फेरी मते यांनी पांडव यांना मागे टाकल व यानंतर मतांची आघाडी राखत विजयाचा गुलाल उधळला.ही मतमोजणी सीताबर्डीच्या बचत भवनात पार पडली होती.

 

११ व्या फेरीत गिरीश पांडव यांनी ४२३ मतांची आघाडी घेतली होती तर पुढच्या १६ व्या फेरीपर्यंतमते यांची आघाडी कायम राहीली.१७ व्या फेरीत पुन्हा गिरीश पांडव यांनी १३४८ मतांची आघाडी घेतल्याने भाजपच्या गोटात शांतता पसरली.१८व्या फेरीत मते यांनी ८१ मतांची आघाडी घेतली.यानंतर शेवटच्या फेरीपर्यंत दोन्हीकडील कार्यकर्ते हे शांत राहून अटीतटीची ही लढत अनुभवत राहीले.विजयी मतांची खात्री होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून एकच जल्लोष साजरा केला.

२०१४ मध्ये भाजपच्या सुधारक कोहळे यांनी काँग्रेसचे सतीश चतुर्वेदी यांचा या मतदारसंघात ४३ हजार २१४ मतांनी पराभव केला होता.मात्र,२०१९ च्या चुरशीच्या लढतीत मते हे अवघ्या ४ हजार १३ मतांनी विजयी झाले.२०१४ मध्ये देशात मोदींच्या झंझावाता पुढे काँग्रेसचे नागपूर शहरातही पानितप झाले होते.दक्षीण नागपूरात काँग्रेसला २०१४ मध्ये ३८ हजार १० मते मिळाली होती.गिरीश पांडव यांनी २०१९ च्या निवडणूकीत काँग्रेसला संजीवनी देण्याचे काम केले होते.पांडव यांना ८० हजार ३२६ मते मिळाली होती.पांडव यांना विजयाने थोडक्यात हुलकावणी दिली होती.
पांडव यांनी फेर मत मोजणीची मागणी केली होती.निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर असलेले आकडे आणि प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिका-यांकडू जाहीर होणारे आकडे यात तफावत होती.शिवाय मशीनमधील आकडेही योग्य दिसत नसल्याचे नमूद करीत पांडव यांनी निवडणूक निर्णय अधिका-यांकडून फेर मतमोजणीची मागणी केली मात्र,ती अमान्य करण्यात आली.
उत्तर नागपूर- 

उत्तर नागपूरमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने डॉ.नितीन राऊत यांच्यावर विश्‍वास दाखवला आहे व त्यांनाच उमेदवारी दिली.२०१४ मध्ये बसप फॅक्टरमुळे भाजपचे डॉ.मिलिंद माने विजयी झाले होते.विशेष म्हणजे त्या निवडणूकीत तिस-या क्रमांकावर असलेले नितीन राऊत यांनी २०१९ मध्ये विजय खेचून आणत त्या पराभवाचे चांगलेच उट्टे काढले.राऊत यांना ८६ हजार ८२१ मते मिळाली.भाजपचे डॉ.मिलिंद माने यांना ६६ हजार १२७ मते मिळाली.२० हजार ७१८  मतांनी राऊत यांनी माने यांचा पराभव केला.बसपचे सुरेश साखरे यांनी २३ हजार २३३ मते घेतली होती.राऊत यांनी पहील्या फेरीपासूनच मतांची आघाडी घेतली होती.ती अखेरपर्यंत कायम राहीली.२०१४ मध्ये उत्तर नागपूरातील सीमावर्ती भाग कळमना,नारा व इतर भाग तसेच  जरीपटका भागातून मिळालेल्या मतांमुळे भाजपचे माने हे विजयी झाले होते मात्र,२०१९ मध्ये राऊत यांनी या भागांवर आपले वर्चस्व कायम ठेवले.विशेष म्हणजे २०१९ मध्ये लोकसभेत गडकरी यांना या भागातून मिळालेली आघाडीही माने हे कायम ठेऊ शकले नाहीत.पहील्याच फेरीत राऊत यांनी १२३७ मतांची लीड घेतली होती.पहील्याच फेरीत राऊत यांना ५ हजार ४८४ मते मिळाली होती,ती अखेरपर्यंत कायम राहीली.२०१४ मध्ये बसपाच्या ज्या हत्तीला मतांचे भरभरुन दान मिळाले होते,माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना ५५ हजार ४८७ मते मिळाली होती ती २०१९ मध्ये साखरे यांना कोणत्याही फेरीत दोन हजार मते ही मिळवताना दिसून पडली नाही.
२०१४ मध्ये डॉ.मिलिंद माने यांना ६८ हजार,९०५ मते मिळाली होती तर नितीन राऊत यांना ५०,०४२ मते मिळाली व ते तिस-या स्थानावर होते.दुस-या क्रमांकावर बसपाचे किशोर गजभिये होते मात्र,२०१९ मध्ये राऊत यांना २०१४ च्या तुलनेत ३६ हजार ७७९ मते मिळाली होती.यंदा देखील राऊत हे या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार असून भाजपने मात्र,आपला उमेदवार अद्यापही गुलदस्त्यात ठेवला आहे.या मतदारसंघातून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम तसेच माजी नगरसेवक संदीप गवई यांची नावे आघाडीवर आहेत.
२०१९ च्या निवडणूकीचे आणखी एक वैशिष्ठ म्हणजे १६ हजार मतदारांनी त्या निवडणूकीत ‘नोटा’चा वापर केला होता.नोटाचा वापर अडीच पटींनी वाढला होता.
थोडक्यात,नागपूरातून भाजपने तीन तर काँग्रेसच्या चार उमेदवारांची घोषणा झाली आहे,उर्वरित जागेवरील उमेदवारांची घोषणा ही देखील येत्या एक-दोन दिवसात होईल,मात्र,काँग्रेसला गटबाजी पलीकडील,२०१९ च्या यशाची पुर्नरावृत्ती जमेल का?याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
………………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या