फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजलोकसभेत मोंदीना अपेक्षित यश मिळाले नाही कारण...

लोकसभेत मोंदीना अपेक्षित यश मिळाले नाही कारण…

लोकसभा-२०२४ निवडणूक निकालाचा मान्यवरांनी उलगडला अर्थ
श्रीमंत माने यांच्या लोकसभा -२०२४ च्या निकालाचे तर्कशास्त्र व सांख्यकिशास्त्रीय वेध घेणारा
‘हा देश आमचा आहे’पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर,ता.१३ ऑक्टोबर २०२४: लोकसभा २०२४ च्या निवडणूकीत असे काय होते ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षीत यश मिळाले नाही?याचे दोन कारण होते,पहीले कारण देशातील मतदारांना अहंकार आवडत नाही आणि दूसरे  मतदारांना गृहीत धरने.२०१४ मध्ये मोदी संपूर्ण बहूमत घेऊन देशाचे पंतप्रधान झाले,त्यावेळी त्यांनी कोणालाही तिकीट दिली तरी ते मोदी यांच्या नावाने निवडून आले होते.२०१९ मध्ये मोदी यांनी पुन्हा तेच केले,त्यावेळी देखील मतदारांनी विचार केला,मोदी यांना आणखी एक संधी द्यायला काय हरकत आहे?त्याच काळात बालाकोट,उरी घडले होते,हा भाग वेगळा.त्या ही निवडणूकीत मतदारांनी उमेदवार नाही तर मोदी यांचा चेहरा बघून मतदान केले.मात्र,२०२४ च्या निवडणूकीत मोदी यांनी जे उमेदवार दिले,मग ते इतर पक्षातून फोडून आणलेले असाेत,त्या उमेदवारांची कामगिरी सुमार असो,मोदींना वाटले, या ही वेळी मतदार डोळे बंद करुन,मोदी यांचा चेहरा बघून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून देतील पण,असे घडले नाही आणि येथे मोदींची चूक झाली,त्यांना लोकसभेत झटका बसला व पूर्ण बहूमत मिळू शकले नाही,असे विश्‍लेषण नामवंत निवडणूक तज्ज्ञ(सी-व्होटर) यशवंतराव देशमुख यांनी केले.
ते आज हॉटेल सेंटर पॉईंट येथे ज्येष्ठ पत्रकार व दैनिक नागपूर लोकमतचे संपादक श्रीमंत माने लिखित लोकसभा -२०२४ च्या निवडणूक निकालाचा अर्थ उलगडणारा‘हा देश आमचा आहे‘पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.पुढे देशमुख म्हणाले की,इंदिरा गांधी यांची प्रतिमा देखील मोदी यांच्यासारखीच होती.इंदिरा गांधींचा चेहरा हा काँग्रेस पक्षाच्या किती तरी टक्के पुढे जाऊन मतदारांना मान्य असणारा चेहरा होता,मोदी यांचा चेहरा देखील भाजप पक्षाच्या किती तरी टक्के पुढे जाऊन मतदारांना मान्य असा चेहरा आहे मात्र,राहूल गांधी यांचा चेहरा हा काँग्रेस पक्षाच्या तुलनेत किती तरी टक्के मागे असणारा चेहरा आहे.मतदारांचे आणखी एक स्वभाव वैशिष्ठ म्हणजे ते जनादेशचा अपमान सहन करीत नाही.महाराष्ट्रात २०१९ मध्ये काय घडले?
महाराष्ट्रात असा कोणता राजकीय पक्ष आहे ज्यांनी जनादेशाचा अपमान  केला नाही?सर्वात मोठी थट्टा ही जनादेशाची महाराष्ट्रात झाली असल्याचे देशमुख म्हणाले.पहाटेचा शपथविधी असो किवा आपापल्या विचारधारांची सत्तेसाठी दिलेली तिलांजली असो.कलेक्टीव विसडम तज्ज्ञांच्या आकलनाच्याही परे असते,जनमानसाच्या परे असते,मतदार राजा सगळ जाणत असतो,मतदाराला गृहीत धरण्याची चूक राजकारण्यांनी करु नये,असे मत याप्रसंगी देशमुख यांनी व्यक्त केले.
माने यांनी लोकसभा -२०२४ च्या निकालाचे विश्‍लेषण करणारे पुस्तक लिहले आहे,अठरा महिन्यात नवे सेन्सेक्स येतील,पुढील लोकसभा निवडणूकीत तर ३३ टक्के महिलांना आरक्षण लागू असणार आहे,गेल्या ७० वर्षात ज्या निवडणूका देशात झाल्या त्यात दोन -तृतीयांश विद्यमान म्हणजे ‘सिटींग‘खासदार आणि आमदारांचा त्यांच्या मतदारसंघात परावभ झाला आहे.आता तर त्यांचा मतदारसंघ महिलांसाठी आरक्षीत..होणार असेल तर पाच वर्ष ते कशाला मतदारसंघ बांधून ठेवण्यासाठी काम करतील?येत्या पाच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात ‘रिम्यूट’चं बटण दाबल्या जाणार आहे ,की जनादेशाचा अर्थ ही वेगळा असणार आहे.त्यामुळेच महिलांसाठी आरक्षीत जागां असाव्या.
ज्याप्रमाणे अनुसूचित जाती-जमाती,ओबीसींसाठी राखीव जागा आहे,त्याच धर्तीवर महिला उमेदवारांसाठी राखीव जागांची तरतूद करणे अपरिहार्य असल्याचे देशमुख यांनी सांगितले.महत्वाचे म्हणजे घटनेप्रमाणे लोकसभेची निवडणूक लढण्यास महिला तयार आहेत मात्र,मतदार तयार आहेत का?याचा ही विचार करावा लागेल.लोकांच्या मनात आले तर ते शून्यातूनही नेता उभा करतात.महिला देखील तेव्हा दम ठोकून सांगतील ’हा देश आमचा आहे,होता आणि राहणार’.

श्रीमंत माने यांनी या पुस्तकाला हेच नाव का दिले?ते इतर कोणतंही नाव देऊ शकले असते  पण या नावात एक ‘आग्रह’आहे.ज्यावेळी आम्ही जनादेशाची व्याख्या करतो तेव्हा आग्रह,दुराग्रह,परिणाम,शंकांच्या पलीकडे ती असते.मी आजपर्यंत ४० देशांच्या निवडणूका जवळून बघितल्या.त्या वेळी मला भारत देशाच्या मतदारांविषयी श्रद्धेचा भाव मनात निर्माण होतो.जगाची तुलना केली असता भारतात एवढी वाईट स्थिती नाही याचं समाधान वाटतं.निवडणूकीचे परिणाम कसे ही येऊ देत,जगाच्या तुलनेत भारताचा मतदार हा अधिक सुजाण असल्याचे देशमुख म्हणाले.तो जनादेश ‘आपला’असतो.आपल्या मनासारखा नसला तरी तो आपला आहे त्यामुळेच त्या जनादेशाचा ‘आदर’करा,असा सल्ला त्यांनी दिला.

ही गोष्ट इंदिरा गांधी यांच्याकडून शिकण्यासारखी असल्याचे ते म्हणाले.१९७७ चा जनादेश इंदिरा गांधी यांनी मोठ्या मनाने स्वीकारला होता.त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना तुरुंगात टाकले नाही.१९७५ च्या आणिबाणिसाठी देखील त्यांनी जनतेची माफी मागितली होती.इंदिरा गांधी माझ्यासाठी ‘खलनायिका’ठरल्या नाही तर ‘महानायक’यासाठी ठरल्या कारण त्यांनी जनादेशाचा आदर केला होता.१९७७ मध्ये त्या विरोधात बसल्या व १९८० मध्ये त्याच जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले.जनतेने त्यांचे ‘मोठेपण’ बघितले त्यामुळेच त्यांना पुन्हा सत्तेची संधी दिली.नवीन पिढी हेच शिकते,हा आमचा असा देश आहे.आज ज्याप्रमाणे विरोधकांमध्ये मनभेद झाले आहेत जनता ते सुद्धा पाहत आहे.जनता आज देखील ‘बडे दिलवालो को वोट देना पसंद करती है‘,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.
महाराष्ट्रात लोकसभेचा जो २०२४ चा निकाल आला त्यामुळेच उर्वरित भारतात त्याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.उत्तर प्रदेशमध्ये तीच जनता,‘ये तो होना ही था’असं बेधडक सांगते.(उत्तर प्रदेशात भाजपला लोकसभेच्या ८० पैकी फक्त ३२ जागा मिळाल्या,२०१९ मध्ये भाजपला उत्तर प्रदेशात ६४ जागा मिळाल्या होत्या तर महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजपला यंदा फक्त ९ जागा मिळाल्या,या दोन्ही राज्यांनी दगा दिल्यानेच मोदींना पूर्ण बहूमताचा आकडा गाठता आला नाही).
याप्रसंगी एक्झीट पोलवर देखील टोला हाणत एक्झीट पोल हे कधीही ‘सीट का हिस्सा नही होते’.असे ते म्हणाले.हरियाणात भाजप व काँग्रेसच्या जय-पराभवाचे विश्‍लेषण करताना,हरियाणात १७ अशा जागा होत्या जिथे काँग्रेसमुळेच काँग्रेसचा पराभव झाला तर ५ अश्‍या सीट्स होत्या जिथे आम आदमी पक्षामुळे त्यांचा पराभव झाला.२२ अश्‍या सीट्स होत्या जिथे भाजप व काँग्रेस यांना समसमान मतांची टक्केवारी होती,मात्र निकाल वेगळे लागले. त्या २२ व ५ जागांवर काँग्रेसने आधीच योग्य रणनीती आखली असती तर काँग्रेस ४७ आणि भाजप ३७ असा निकाला लागला असता.हरियाणात जनतेला बदल हवा हाेता.जनतेला हरियाणातील सरकार बदलायची होती.जनतेने भाजपच्या विरोधात तिथे काँग्रेसला मत दिले मात्र,काँग्रेसच्या बलाढ्य नेता व मुख्यमंत्री पदाच्या दावेदाराने हरियाणात काँग्रेसचा खेळ बिघडवला.त्यामुळे भाजपलाच आता प्रश्‍न पडला आहे हरियाणात आम्ही जिंकलो कसे?
२००५ मध्ये अटल बिहारी बाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा लोकसभेत पराभव झाला त्यावेळी तत्कालीन काँग्रेसचे मंत्री अर्जुनसिंग यांनी माझ्याकडे त्या निवडणूकीचे मर्म उलगडताना,त्यांच्याकडे अटल बिहारी यांच्यासारखा चेहरा होता,आम्हालाच कळत नाही आहे काँग्रेस जिंकली कशी?अशी भावना व्यक्त केली होती,अशी आठवण याप्रसंगी देशमुख यांनी सांगितली.तेच हरियाणात भाजपसोबत घडले.भाजपला आश्‍चर्य वाटत आहे ते जिंकले कसे?हरियाणात काँग्रेसच्या बाहूबली नेत्याने अशी खेळी केली की आठ ते दहा अपक्ष असे निवडून आले पाहिजे जे मला मुख्यमंत्री म्हणून समर्थन देतील.राजकारणात कधीही ‘कंट्रोल डिटोनेशन’होत नाही,असे देशमुख यांनी सांगितले.अनपेक्षीतपणे जय-पराभवाची मीमांसा करताना,चुकीच्या जागेवर दोषारोपण केल्या जातं.

याप्रसंगी ‘रेवडी ’संस्कृतीवर विस्तृत विश्‍लेषण करताना देशमुख यांनी सांगितले की हिमालचसारख्या राज्यात टॉयलेट टॅक्सचा मुद्दा असो किवा जुनी पेशंन योजना,सर्व पक्षांच्या सर्व नेत्यांना माहिती असतं की जुनी पेंशन योजना देशात लागू होऊच शकत नाही,’रेवडी आप दे तो सकते है मगर वापस ले नही सकते’त्यामुळे विराेधक देखील या रेवडी संस्कृतीत उतरुन,सत्ता पक्षापेक्षा आम्ही जास्त देऊ,या स्पर्धेत उतरतात आणि अर्थव्यवस्थेचा बट्याबोळ करतात.जनतेला देखील या रेवड्या अावडत असतात,त्यांना माहिती असतं आताच मिळेल,पाच वर्ष त्यांच्याकडून लृबाडलेला हा माल त्यांना पुन्हा पुढील पाच वर्ष मिळणार नाही आहे.त्यांना कोणताही अपराधबोध होत नाही.रेवड्या नको,शाळा,रुग्णालये,रस्ते द्या.हे त्यांना मिळणार नाही,हे मतदारांनाही कळतं मात्र,गेल्या ७० वर्षात ते हे राजकारण्यांना सांगत नाही,रेवड्या घेऊन घेतात.जनतेच्या भल्यासाठी राजकीय नेत्यांना कटू निर्णय देखील घेणे क्रमप्राप्त आहे पण ते हे पराभवाच्या भीतीने घेत नाही,असे देशमुख म्हणाले.मोदींचा नोटबंदीचा निर्णय हा असाच कटू निर्णय होता त्यासाठी त्यांनी धाडस दाखवले,जनतेला भरपूर त्रास झाला मात्र त्यांनी तो निर्णय स्वीकारला,भ्रष्टाचा-यांचे या निर्णयामुळे कंबरडे मोडले,त्यांचा निर्णय चुकीचा असेलही पण ‘नीयत’साफ होती,असे देशमुख यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की,२०१४ मध्ये लाट होती,उमेदवारांचा चेहरा न बघता जनतेने मतदान केले.२०१९ मध्ये अजून एक टर्म द्यावी असा विचार करुन जनतेने पुन्हा मतदान केले,२०२४ मध्ये मात्र निवडणूक वेगळी होती,अहमदनगर जिल्ह्यात हीच चर्चा होती की यावेळी मतदान करताना पक्ष बघितला आणि उमेदवार ही बघितला,ती चर्चा निकालानंतर खरी ठरली.मतदारांनी उमेदवाराचे बोलणे,वागणे,केलेले काम, मतदान करताना बघितले .मतदारसंघात उमेदवार आला की नाही,काम केले की नाही,उद्धटपणे काय काय बोलला,कसा वागला,उमेवाराचे मेरिट-डिसमेरिट बघूनच त्याने मतदान केले.त्यामुळे २०२४ च्या निकालात धक्कादायक असे काही नाही.माने यांचं पुस्तक वाचायला मिळाले नाही मात्र,ते चाळल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींचा लोकसभेच्या निवडणूकीवर प्रभाव असू शकतो,हे जाणवलं तसेच दुसरी गोष्ट कळाली ती म्हणजे ईव्हीएमची शंका फोल ठरली.
आमच्याकडे शोभाताई बच्छाव साढे पाच हजार मतांनी जिंकून आल्या.भाजपने यावर आक्षेप घेत पाच ईव्हीएम मशीनमधली मतमोजणी झालीच नसल्याचा आक्षेप घेतला.रात्री साढे दहा वाजेपर्यंत पुन्हा त्या पाच ईव्हीएम मशीन मधली मते मोजल्यानंतर बच्छाव यांचा साढे तीन हजार मतांनी विजय घोषित करण्यात आला.मी निवडणूक अधिका-याला विचारले या पाच ईव्हीएम मशीनमधले मत का मोजण्यात आले नाही?यावर उत्तर देत ते अधिकारी म्हणाले की ज्या मशीन्स टॅम्पर्ड वाटतात,त्यातील आकडे प्रत्यक्ष झालेल्या मतदानाच्या आकड्यांशी जुळत नाहीत,ज्यांचा डिस्पले दिसत नाही इत्यादी कारणामुळे कायद्यानुसार त्या मशीन मधील मत मोजली जात नाही.ज्या वेळी जय-पराजय मधील आकड्यांमध्ये फरक खूप जास्त असतो,अश्‍या मशीन्स मधील, मत मोजणीतून तो फरक भरुन निघू शकत नाही त्यावेळी अश्‍या मशीन्समधील मते मोजली जात नाही.त्या अधिका-याने सांगितले हे कारण पटण्यासारखे होते.त्यामुळेच लोकशाहीत कोणी कोणाला गृहीत धरणे योग्य नसल्याचे तांबे यांनी सांगितले.
तांबे यांनी देखील मतदारांना अहंकार आवडत नसल्याचे सांगितले.निवडणूक रोखे यावर बोलताना तांबे म्हणाले की अमेरिकेची निवडणूक मला जवळून पाहता आली.तिथे उमेदवारांचे उद्योगपती जाहीररित्या रोखे घेतात.उमेदवारांना उद्योगपतींकडून रोखे घेण्यासाठी बंधने नाहीत.हा विरोधाभास भारतात आहे.भारतात निवडणूक रोख्यांच्या संदर्भात पारदर्शता दिसत नाही.ज्याने रोखे घेतले त्याला मदत देण्यात आली,ही ‘लिंकिंग’योग्य नाही.हा फार मोठा घोटाळा आहे.हे नैतिकतेत बसत नाही.आपल्याकडे उद्योगपती अदानी उघडपणे हे फक्त मिलिंद देवरा यांच्या प्रचारात दिसले,याचे कारण त्यांचे कौटूंबिक संबंध आहेत.
माने यांनी त्यांच्या पुस्तकात रेवडी संस्कृतीवर ही लिहले असून कोणीही या रेवडी संस्कृतीवर टिका करीत नाही.तरुण कार्यकर्त्यांसाठी ही चिंतेची बाब आहे.आज देशात २ टक्के लोकांकडे ९८ टक्के संपत्ती आहे आणि ९८ टक्के लोकांकडे फक्त २ टक्के संपत्ती आहे.‘लग्न पहावं करुन’तसंच ’निवडणूक पाहावी लढून’अशी परिस्थिती निर्माण झाली असून, निवडणूक लढणे हे फार कठीण झाले आहे.सध्या नवरात्र सुरु आहे,देवीच्या जागरमध्येही साड्या  वाटण्यात आल्या,याची चर्चा न केलेली बरी.निवडणूकीचं राजकारण आज फार वेगळ्या दिशेने गेले असून यावर बंधणे यायला हवी.अतिरेकी स्पर्धेवर आळा घातला गेला पाहिजे.वैचारिक मतभेद असले तरी विरोधकांना सोबत घेऊन बसणे,पुन्हा या परंपरेकडे वाटचाल करावी लागेल,असे तांबे यांनी सांगितले.

माने यांनी प्रत्येक निवडणूकीनंतर असेच पुस्तक लिहावे,अशी अपेक्षा व्यक्त करीत मुंबईत पत्रकार सुधीर कुलकर्णी यांनी महाराष्ट्रात ,२०१९ च्या विधानसभा निवडणूकीनंतर ‘चेक मेट’पुस्तक लिहले,अडीच वर्षात आघाडीची सरकार गडगडली.राजकारण हे सुधारलं पाहिजे,सुधारुन पुढे चाललं पाहिजे,असे ते म्हणाले.

पुस्तका मागची भूमिका मांडताना लेखक श्रीमंत माने म्हणाले की,पुस्तका बद्दल लिहणा-याने बोलू नये हा प्रघात असला तरी,काय लिहलं,ही भूमिका सांगणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात लोकसभा -२०२४ च्या निवडणूकीत पाच टप्प्यात मतदान झाले जे या पूर्वी कधीच झाले नाही.माझ्या मतदारसंघात १९ एप्रिल रोजी पहिल्याच टप्प्यात मतदान झाले त्यामुळे उर्वरित टप्प्प्यांच्या मतदानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी मोकळा झालो.या निवडणूकीच्या केलेल्या विष्लेशनात हेच सिद्ध झालं,मतदारांना गृहीत धरलेलं आवडत नाही.ज्येष्ठ  विधितज्ज्ञ ॲड.फिरदौस मिर्झा यांनी प्रवासात माझं पुस्तक वाचलं आणि मला फोन केला.तर्कशास्त्रासोबतच संख्याशास्त्राचाही चांगला उपयोग केल्याचे कौतूक त्यांनी केले.
या पुस्तकाचे प्रकाशन नागपूरातच व्हाचे ही माझी ईच्छा होती जी आज पूर्ण झाली.यशवंत देशमुखांची देखील पूर्णपणे अभ्यासाचा प्रवाह निवडला,राजकीय टाळला,अशी प्रशंसा मिळाली.हे पुस्तक राज्याशास्त्राचे विद्यार्थी यांना देखील उपयोगी पडेल,असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माने यांचे गेल्या ४० वर्षापासूनचे जुने मित्र असणारे व त्या काळातील सातारा क्रीकेट चमूमध्ये असणारे १२ पैकी ९ मित्र या प्रकाशन सोहळ्याला अवार्जून उपस्थित होते.त्यांच्या उपस्थितीसाठीही माने यांनी आनंद व्यक्त केला. .
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले लाेकमतचे चेअरमन व माजी राज्यसभा खासदार डॉ.विजय दर्डा यांनी देखील मनोगत व्यक्त केले.संपादक होण्यासाठी माने यांच्याकडे शब्दांची श्रीमंती असल्याचे ते म्हणाले.मनाची श्रीमंती,सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती माने यांच्यात असल्याचे त्यांनी सांगितले.बातम्या,लेख,विषय,समस्या,अभ्यासपूर्वक विश्‍लेषण,सहकार्यांशी चर्चा ही त्यांची वृत्ती आहे.आज इंटरनेटच्या काळात तर प्रत्येक लिहणारा संपादकच झाला असल्याची कोटी त्यांनी केली.संपादकामध्ये मोठे होण्याची क्षमता असावी लागते.आमचे क्षेत्र असा ‘भटारखाना’ आहे की जवळचे दुखावतात,ज्यांना ओळखत नाही ते आपले होतात.ज्यांच्या हातात सत्ता ते सुद्धा भीती दाखवतात,असे ते म्हणाले.
एकदा मी अटल बिहारी बाजपेयी यांना विचारले तुम्ही निवडणूक हा हरलात?प्रमोद महाजनमुळे हरलात का?तर त्यांनी उत्तर दिले ‘मेरी समज हार गई!’इंदिरा गांधींसोबत मी २१ दिवस प्रवास केला तर मोदींसोबत माझी मैत्री संसदेतील भाषणानंतर झाली.ते आपले शत्रू नाहीत,वैचारिक मतभेद असू शकतात,हे मी माझ्या वडीलांकडून शिकलो.आणिबाणिच्या काळात जॉर्ज फर्नाडिस आमच्या घरी राहीले,इंदिरा गांधी यांनी विचारले,तुमच्या घरी कसे राहीले?यावर वडीलांनी उत्तर दिले,’कूछ तो होगा जो मेरे घर रहे’.
तसाच मतदार हा देखील खूप चाणाक्ष आहे.माझ्या देशाचा मतदार हा अमेरिकेच्या मतदारांपेक्षा हूशार आहे.तो प्रयोगशील आहे.ते असे का मत देतात,याचे खूप छान विश्‍लेषण या पुस्तकात केले आहे.उमेदवारांची मतदारसंघाप्रतीची निष्ठा आणि प्रामाणिकपणा महत्वाची असून तीच आज आढळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.जेव्हा उमेदवारांकडे बेरोजगारी,कायदा सुव्यवस्था यावर बोलण्यासाठी काहीच नसतं त्यावेळी ते ‘जाती’चा आधार घेतात.लोकप्रतिनिधींनी ही शपथ घ्यावी की किमान माझ्या मतदारसंघात मी प्रामाणिकपणे काम करेल,लोकशाहीला आणखी समृद्ध करेल,अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी लेखकाला शुभेच्छा प्रदान केल्या.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ विधितज्ज्ञ ॲड.फिरदौस मिर्झा,ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.प्रदीप आगलावे,सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर,माजी राज्य माहिती आयुक्त राहूल पांडे,विदर्भ सहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते,डॉ.पिनाक दंदे,आमदार विकास ठाकरे,प्रफूल्ल गुडधे पाटील,नरेंद्र जिचकार,विदर्भवादी नितिन रोंघे ,पत्रकार,साहित्यिक आदी उपस्थित होते.
…………………………
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या