वाय दर्जाची सुरक्षा ठरली देखावा: तीन पैकी दोन आरोपी अटकेत
पोलिसांचा बिश्नोई गँगवर संशय: उत्तर प्रदेश,हरियाणातील शूटरचा घटनेत सहभाग
पुण्यातील व्यक्तीने बोलावले शूटर: चर्चेला उधाण
फॉरेंसिक चमू घटनास्थळी
गृहमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी
मुंबई,दि.१२ ऑक्टोबर २०२४: आमदार झिशान सिद्धीकी यांच्या वांद्रे पूर्व कार्यालया समोरच आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास तीन आराेपींकडून काँग्रेसचे माजी मंत्री व विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून,ही घटना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याचे अपयश असल्याचे सांगून, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे,अनिल देशमुख,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,विद्या चव्हाण,काँग्रेसचे नेते सचिन सावंत,भाई जगताप,समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आदी यांनी फडणवीसांना नैतिकतेच्या दृष्टिकोणातून राजीनामा मागितला आहे.
आज मुंबईत देवी विसर्जन असल्यामुळे पोलिस, बंदोबस्तात असल्याची संधी साधून हे हत्याकांड घडवून आणण्यात आले.प्रत्यक्षदर्शी यांच्या सांगण्यानुसार फटाक्यांच्या आवाजातच गोळ्यांच्या आवाजाची सरमिसळ झाली.शूटर यांनी तीन राऊंड फायर केल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे पंधरा दिवसां पूर्वीच बाबा सिद्धीकी यांना धमकी मिळाली होती.त्या अनुषंगाने बाबा सिद्धीकी यांना ‘वाय ’दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली होती,तरी देखील तीन आरोपी येतात व ९.९ एम.एम च्या बंदुकीने त्यांच्या छातीचा वेध घेतात,हे गृहखात्याचे सपशेल अपयश असल्याचे सांगून विरोधकांनी फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी केली आहे.
एका आठवड्या पूर्वीच अजित पवार गटाचे भायखळा विधानसभा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांची मध्यरात्री हत्या करण्यात आली होती.त्यांच्या मानेवर,हातावर,पोटावर व छातीवर गंभीर जखमा होत्या.जे.जे.रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची शाई वाळली देखील नव्हती, तर वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली.
लीलावतीमध्ये त्यांना घेऊन गेले असता,त्यांचा मृत्यू झाला होता.बाबा सिद्धीकी यांचे सलमान,शाहरुख तसेच संजय दत्त यांच्यासोबत फार जिव्हाळ्याचे संबंध होते.या हत्याकांडाची माहिती मिळताच,संजय दत्त यांनी लीलावतीमध्ये धाव घेतली.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस,मोहित कंबोज,आशिष शेलार आदी हे देखील लीलावतीत पोहोचले.अजित पवार व प्रफूल्ल पटेल यांनी देखील लीलावती गाठले.
दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यातील एका आरोपीचे नाव ‘शिवा’असल्याचे समोर आले आहे.हे दोन्ही आरोपी उत्तर प्रदेश व हरियाणा येथील शार्प शूटर असून तिसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला.या हत्याकांडा मागे लाॅरेंस बिश्नोई गटाचा हात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत असून,बाबा सिद्धीकी यांचे सलमान खानला असलेले पाठबळ,या हत्याकांडा मागे असण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.
सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना,आश्चर्य वाटतं सत्तेत असतानाही अजित पवार गटाच्या नेते,पदाधिकारी यांची हत्या होते आहे,भूजबळ यांना स्वत:ला पोलिस ठाण्यात माहिती काढण्यासाठी व आरोपींच्या अटकेसाठी जावे लागत आहे.यावरुन महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची काय स्थिती आहे हे लक्षात येत असल्याची टिका सुळे यांनी केली.हाच का छत्रपती शिवाजी महाराजांचा,शाहू,फूले,आंबेडकरांचा महाराष्ट्र?एकाच आठवड्यात दोन-दोन राजकीय हत्या!गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतात काय?पुण्यातील घाटात सामुहिक बलात्कार होतो,सत्तेत असणा-या दोन-दोन नेत्यांची हत्या होते,सरकार करते काय आहे?नैतिकतेची जाणीव ठेऊन फडणवीसांनी तात्काळ राजीनामा द्यावा,अशी मागणी सुळे यांनी केली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक पदीच रश्मी शुक्ला यांची असंवैधानिक नियुक्ती केली असल्याची टिका केली.सिद्धीकी यांची हत्या होने ही सरकारची नामुष्किच आहे तरी पण मी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणार नाही कारण आता,जनताच त्यांना सत्तेवरुन खाली उतरवणार आहे. या सरकारचाच गुन्हेगरांना पाठींबा असून ,लहान लहान मुली या देखील सुरक्षीत नाहीत.बाबा सिद्धीकी साररखे नेते सुरक्षीत नाही.याचे कारण,सत्ताधा-यांचा आपल्या राजकीय फायदासाठी रणनीतीचा परिणाम हा दिसतो आहे,अशी टिका त्यांनी केली.
ही घटना ऐकून माझ्या अंगावर काटा आला आहे,अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिली.काय चाललंय मुंबईत?बाबा सिद्धीकी एक दिलखुलास व्यक्तिमत्व होते.गृहमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे.बाबा सिद्धीकी हे महाराष्ट्राचे माजी मंत्री होते,आमदार होते,आमदाराचे वडील होते,त्यांच्यावर अशी पाळी यावी?मी या घटनेचा जाहीर निषेध करतो.झिशानच्या दुखात मी सहभागी आहे.गृहमंत्र्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे.महाराष्ट्रात अशी घटना पुन्हा होऊ नये,हे फारच भयानक घडले.
भाजपचा आमदार स्वत: ऐन पोलिस ठाण्यात पोलिसां समोरच गोळीबार करतो,तर अश्या सत्ताधा-यांच्या राज्यात दूसरे काय घडणार?महाराष्ट्रात कधीही असं वातावरण नव्हतं,अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली.
असा मृत्यू खेदजनक असल्याचे अंबदास दानवे म्हणाले.महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे धिंधवडे निघाले असून सत्ताधारी हे आमदारांचे संरक्षरण करु शकत नाही आहे,वाय दर्जाची सुरक्षा असतानाही हत्या होते,हे सत्ताकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचे उदाहरण असल्याची टिका त्यांनी केली.
बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते नंतर ते अजित पवारांसोबत गेले.अश्या माजी मंत्र्यांवर वाय दर्जाची सुरक्षा असताना गोळीबार होतो,ही घटना महाराष्ट्रासाठी दूर्देवीच आहे.या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो,महाराष्ट्रात काय घडतंय हे जनता बघत असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात संरक्षण फक्त दिल्लीच्या नेत्यांनाच मिळतं का?असा सवाल विद्या चव्हाण यांनी केला.सुपा-या घेऊन हत्या होत आहेत,गृहमंत्र्यांचा पोलिस विभाग करतो काय आहे?बलात्कार,हत्या सतत घडत असून गृहखातं फडणवीसांकडे असणं हीच मूळात लाजिरवाणी बाब असून गृहखांत फडणवीसांकडे असल्याने गुन्हेगारीच्या घटना महाराष्ट्रात वाढल्या असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
महाराष्ट्र आता गुन्हेगारीमध्ये देशात दुस-या क्रमांकावर असल्याचे भाई जगताप म्हणाले.पण,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असे काही वावरतात जसं महाराष्ट्रात सगळं काही आलबेल आहे.फडवीसांनी तातडीने राजीनामा द्यावा,अशी मागणी भाई जगताप यांनी केली.
देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत आज झालेला गोळीबार हा महाराष्ट्रात सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा असल्याचे शरद पवार म्हणाले.
अश्या पद्धतीने बाबा सिद्दीकी आपल्यातून निघून जाईल याची मी कल्पना देखील केली नव्हती असे अशोक चव्हाण म्हणाले.राजकीय क्षेत्रातील अनेक वर्षांपासूनचा मी एक चांगला मित्र गमावला.
सिद्दीकी यांची हत्या ही चिंतेची बाब असून सरकारने कठोर कारवाई करावी असे भाजपचे माजी आमदार किरिट सोमैय्या म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना,रात्री ९.३० वा.ही घटना घडली असून उत्तर प्रदेश व हरियाणातील दोन शार्प शूटर्सला पोलिसांनी पकडले असल्याची माहिती दिली.पोलिसांना कठोर कारवाईचे निर्देश दिले असून कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे ते म्हणाले.मुंबईची पोलिस सक्षम असून ही केस जलद् न्यायालयात(फास्ट ट्रॅक कोर्ट)मध्ये चालवली जाईल व लवकरात लवकर गुन्हेगारांना शिक्षा होईल,असे आश्वासन त्यांनी दिले.
सिद्दीकी यांनी आज सकाळी ११ वाजून ११ मिनिटावर विजयादशमीच्या शुभेच्छा एक्स वर दिल्या होत्या.आपल्या ट्टीटमध्ये त्यांनी ‘सभी को दशहरा की हार्दिक शुभकामनाएं! यह दशहरा आप सभी के लिए सुख, शांति और समृद्धि लेकर आए’अश्या शुभेच्छा प्रदान केल्या होत्या.हे त्यांचे शेवटचे ट्टीट ठरले.
……………