विकास ठाकरे समर्थक आणि नरेंद्र जिचकार यांच्यात राडा
नागपूरातही नेत्यांचे हित वर…
हरियाणाच्या पराभवातून काँग्रेसने कोणताही धडा घेतला नाही
काँग्रेसला भाजप नाही तर काँग्रेसच हरवते:कार्यकर्त्यांची खंत
नागपूर,ता.११ ऑक्टोबर २०२४: हरियाणात आपल्या नेत्यांचे हित वर आणि पक्षाचे हित तळाशी राहिले,अशी खंत, राहूल गांधी यांनी गुरुवारी हरियाणा राज्यातील पक्षनेत्यांच्या गटबाजीवर व्यक्त केली.हरियाणाच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी ‘सत्यशोधन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय दिल्लीत चिंतन बैठकीत झाला मात्र,महाराष्ट्राच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना हरियाणाच्या पराभवातून काँग्रेसच्या नेत्यांनी कोणताही धडा घेतला नसल्याचे नागपूरात कालच्या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
पश्चिम नागपूरात सुरेंद्रगढ येथे काँग्रेसचा माजी नगरसेवक कमलेश चौधरी याने आयोजित केलेल्या भुवनेश्वरी माता मंदिरात जस गायनाच्या कार्यक्रमात ,काँग्रेसचे निलंबित नेते नरेंद्र जिचकार यांनी मंचावरुन राजकीय भाषणबाजी करताच,पश्विचिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांचे खंदे समर्थक दिपक वानखेडे यांनी आक्षेप नोंदवला.ते नरेंद्र जिचकार यांच्या अगदी बाजूलाच मंचावर उभे होते.जिचकार यांनी या क्षेत्रात त्यांनी कसे सामाजिक दातृत्वाची कामे केली,चष्मे वाटले,आरोग्य शिबिर लावले,चिकन गुनिया,डेंग्यूने संक्रमित या वस्तीमध्ये फॉगिंग मशीन फिरवली इत्यादी,इत्यादी कामांची जंत्रीच वाचायला सुरवात केली.
जनतेला संबाेधित करताना जिचकार म्हणाले की माझ्यासोबत कमलेश देखील सुनील केदार यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम नागपूरात कामात जुंपला आहे.कमलेश याचे वडील व काँग्रेसचे नगरसेवक दिवंगत दिलीप चौधरी यांच्या निधनानंतर आम्ही कमलेशसाठी तिकीट मागितले होते मात्र,ते नाकारण्यात आले,तरी देखील आम्ही कमलेशला डंके की चोटवर नगरसेवक म्हणून निवडून आणले.त्यावेळी आमच्या सोबत परिणय देखील होता.ज्या वेळी आम्ही या प्रभागात प्रचार करत होतो,आमचे पोस्टर फाडण्यात आले,आम्हाला धमक्या देण्यात आल्या,त्यानंतर सुद्धा आम्ही कमलेशला निवडून आणले.
याच वेळी त्यांनी, विकास ठाकरे यांचे नाव न घेता,आज पण आमचे पोस्टर फाडून टाकल्या जात आहे,आज ही आमच्यासोबत जे आहेत त्यांना धमकावणे सुरु आहे. नगरसेवक बनायचे असेल तर काम करावे लागेल,घाणेरडा व्हिडीयो टाकून नरेंद्र जिचकारला बदनाम केले जात आहे,असा आरोप केला.मी हजार घरात रोजगार दिला,हजार घरांना आधार दिला.सगळ्यात जास्त वेळ मी या भागात वावरतो,गरीबांचे अश्रू पुसतो.बारा हजारांच्या वर ज्याने डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या त्याला काय बदनाम कराल?दिढ महिने चिकन गुनियाचा प्रकोप या ठिकाणी होता…
विकास ठाकरेंचे समर्थक दिपक वानखेडे याच वेळी मंचाच्या समोर उभे असलेल्या कमलेश चौधरीला हाताच्या इशाराने,हे चालणार नाही,असा इशारा वारंवार करीत होते व कमलेश दिपक वानखेडे यांना बोटाच्या इशा-याने तुम्ही बोलू नका,असा इशारा करीत होता.यानंतर दिपक वानखेडे यांच्या संयमाचा कडेलाेट झाला व त्यांनी जिचकार यांच्या हातातील माईक हिसकावत,हा राजकीय मंच नाही,राजकीय भाषण कसे करतो?असे माईक मध्ये दरडावले.यानंतर कमलेश याने मंचाकडे धाव घेतली.त्याच वेळी ठाकरे यांच्या एका समर्थकाने मंचावरुन जिचकार यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला.
कमलेश व जिचकारांचे समर्थक विकास ठाकरेंच्या त्या समर्थकाला धक्काबुक्की करु लागले व बघता बघता काँग्रेसचा देवीचा जस चा कार्यक्रम राजकीय आखाड्यात परिवर्तित झाला!पश्चिम नागपूरात विकास ठाकरेंचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांनी कंबर कसली आहे.नरेंद्र जिचकारला पश्चिम नागपूरातून विधान सभा निवडणूक जिंकून आणण्यासाठी केदार यांनी पूर्ण पाठबळ लावले आहे,हे कोणापासूनही लपून राहीलेले नाही,केदारांना रामटेकची पुनरावृत्ती पश्चिम नागपूरात करायची आहे मात्र,रामटेकमध्ये त्यांचा विरोधक शिंदे गटाचे राजू पारवे होते,पश्चिम नागपूरात काँग्रेसचेच सिटींग आमदार आहेत,हे विसरता येत नाही.
काँग्रेसच्या गटबाजीतनू बाजी ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूने पलटते,हे हरियाणाच्या निवडणूकीने सिद्ध केल्यावरही महाराष्ट्रातील नेते हे गटबाजीच्या ग्रहणातून अद्याप सुटायला तयार नाहीत,याची खंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये असून,काँग्रेसच्या उमेदवाराला भाजप नव्हे तर काँग्रेसच हरवते,असा उघड आरोप ते करताना दिसतात.राहूल गांधी यांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास,नेत्यांचे हित वर तर पक्षाचे तळाशी….!का नाही हरियाणाची पुनरावृत्ती नागपूरात व महाराष्ट्रात होणार?
विकास ठाकरे यांना लोकसभेची उमेदवारी घोषित झाल्यावर श्रेष्ठींनी कान टोचल्या नंतर केदार हे फार उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयात ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पोहोचले होते.लोकसभेच्या प्रचारात केदार हे रामटेकमध्ये रणनीती आखत असल्यामुळे नागपूरात ठाकरे यांच्या प्रचारात फिरकलेच नाही.विकास ठाकरे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विशाल मुत्तेमवार,अभिजित वंजारी हे एका गटाचे मानले जात असून,केदार,वडेट्टीवार,अा.नितीन राऊत,सतीश चर्तुवेदी,थोरात व प्रफूल्ल गुडधे पाटील हे दुस-या गटात मोडतात. भाजपचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केदार यांचे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत,हे राजकीय नेत्यांच्या अनेक भाषणातून स्पष्ट झाले.केदार यांना तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी गडकरी यांची मदत लाभली,अशी देखील चर्चा रंगली.
हेच केदार मात्र ,फडणवीस यांच्या मतदारसंघातून दक्षीण-पश्चिम मधून त्यांचे खंदे समर्थक प्रफूल्ल गुडधे पाटील यांच्यासाठी तिकीट आनणार असून,रामटेकमध्ये रश्मी बर्वे यांच्यावर झालेल्या अन्यायाचे उट्टे काढण्यासाठी सज्ज झाले असल्याची चर्चा आतापासूनच रंगली आहे. एकीकडे पश्चिम नागपूरातील काँग्रेसच्या विद्यमान आमदार विकास ठाकरे यांना अडचणीत आणने,नरेंद्र जिचकारांच्या मागे पाठबळ उभे करने,दूसरीकडे फडणवीस यांच्या मतदारसंघात काँग्रेसचाच आमदार जिंकून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याची तयारी ठेवणे,हा ‘विरोधाभास‘ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच पचनी पडत नाही आहे.
नागपूर आणि ग्रामीण नागपूरमधील संपूर्ण बारा जागेवर काँग्रेसचा विरोधक हा भाजपचाच असला पाहिजे न की काँग्रेसचा आमदार किवा उमेदवार,अशी अपेक्षा हे कार्यकर्ते व्यक्त करतात.निदान राहूल गांधी यांच्या कानटोचणीचा तरी परिणाम काँगेससारख्या अखिल भारतीय राजकीय पक्षाच्या नेत्यांवर होईल का?की त्याची उपरती महाराष्ट्राच्या निवडणूकीनंतरच, हरियाणाच्या निकालाच्या पुर्नरावृत्तीनंतर, काँग्रेसच्या बाहूबली नेत्यांना होईल?असा आर्त प्रश्न ते करतात.
राजकारणात नेता महत्वाचा नसतो तर नेत्याच्या मागे कोण आहे हे सर्वात जास्त महत्वाचं असतं,मागचे बदलले की राजकारण बदलतं…हे २०१९ च्या निवडणूकीनंतर महाराष्ट्राच्या जनेतेने अनुभवले आहे,२०१९ मध्ये काँग्रेसला विरोधात बसण्यासाठीच महाराष्ट्राच्या मतदारांनी कौल दिल होता.२८८ पैकी फक्त ५४ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या.अर्थात सगळ्याच जागेवर काँग्रेसने निवडणूक लढली नव्हती.शिवसेनेच्या पूर्णत:बदललेल्या धोरणामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा २०१४ नंतर सत्तेचा स्वाद चाखता आला होता मात्र,अडीच वर्षातच शिंदे यांच्या बंडामुळे पुन्हा काँग्रेस सत्तेपासून दूर झाली.
या पार्श्वभूमीवर, त्यामुळेच काँग्रेस नेत्यांकडून आघाडी धर्मासोबतच पक्षाशी निष्ठा हे निकष सत्ता आणण्यासाठी गरजेचे असून ,आपल्याच उमेदवारांना पाडण्याच्या खेळात, पुन्हा पुढील पाच वर्ष सत्तेसाठी आणखी वाट बघावी लागेल,असा इशारा देखील काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता देण्यास विसरत नाही.
……………………………….
(तळटीप- ‘सत्ताधीश’ने या घटनेसंबंधी नरेंद्र जिचकार व कमलेश चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता,संपर्क होऊ शकला नाही.कॉल रिसिव्ह झाले नाही)