केंद्रिय मंत्री किरन रिजिजू यांचा नागपूरातून काँग्रेसला सज्जड दम
या ‘खास’कारणाने नागपूरात आलो
महाराष्ट्राचे बौद्ध काँग्रेसच्या मागे गेले याचे तीव्र दुखं: :रिजिजू यांची खंत
काँग्रेसने बाबासाहेबांना आयुष्यभर त्रास दिला
अल्पसंख्याक मंत्रालय काँग्रेसने केले फक्त मुस्लिम मंत्रालय
वक्फ बोर्डचा कायदा पारित होणारच:मी मुस्लिम नसल्याचा काँग्रेसचा दर्जाहिन आरोप
राहूल गांधी सर्वात अपरिपक्व विरोधी पक्ष नेते:रिजिजू यांचा हल्लाबोल
विधान सभा निवडणूकीत बौद्धांनी काँग्रेसच्या दुष्प्रचाराला बळी पडू नये:रिजिजू यांचे आवाहन
मी ‘मुस्लिम’ नाही त्यामुळेच मी जास्त बोलणार…!
नागपूर,५ आॅक्टोबर २०२४: काँग्रेसने केंद्रात, मोदी यांची सरकार पूर्ण बहूमताने आल्यावर संविधान बदलेल,असा चुकीचा नेरेटीव्ह देशभरात पसरवला,महाराष्ट्रातील बौद्ध धर्मिय देखील या चुकीच्या नेरेटीव्हला बळी पडले आणि काँग्रेसला मते दिली मात्र,याच काँग्रेसने आयुष्यभर डॉ.बाबासाहेबांना त्रास दिला,त्यामुळे मी स्वत:बौद्ध धर्मिय असल्यामुळे मला याचे तीव्र दुखं झाले असल्याचे विधान केंद्रिय अल्पसंख्यांक मंत्री व संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी आज हॉटेल तुली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केले.
याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की,नागपूर शहरासोबत माझे फार जुने ऋणानुबंध आहेत.१९९९ ते २००४ दरम्यान मी अनेकदा नागपूरात येऊन गेलो.अटल बिहारी बाजपेयी यांच्यासोबत खादी ग्रामोद्योगसाठी नागपूरातून वर्धा येथे गेलो.गृहराज्यमंत्री असताना देखील नागपूरात आलो,क्रीडा मंत्री असताना तसेच आयुष मंत्रालय माझ्याकडे असताना फूड प्रोसेसिंग निमित्त नागपूरात आलो,आज मी एका ‘खास’कारणाने नागपूरात आलो,नागपूरात बाबासाहेबांनी दीक्षा घेतलेली दीक्षाभूमी आहे,त्याचे दर्शन मी घेतले.बाबासाहेबांनी जो बौद्ध धम्म स्वीकारला त्याचा मी पण अनुयायी आहे मात्र,बाबासाहेबांनंतर मी एकमेव असा बौद्ध धर्मिय मंत्री आहे जो केंद्रिय मंत्री झाला.काँग्रेसच्या सहा दशकांच्या काळात एक ही बौद्ध धर्मिय केंद्रिय मंत्री काँग्रेसने केला नाही,हा बाबासाहेबांचा अपमान नाही का?असा सवाल त्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशात सत्ता आल्यानंतर मी एकमेव असा बौद्ध धर्मिय मंत्री आहे ज्याला केंद्रात मंत्री पद मिळाले.
हे मोदीच होते ज्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘संविधान यात्रा’काढली.संविधानाचे फक्त पुस्तक हातात घेऊन मिरवले नाही तर संविधानाच्या आत जे आहे ती मूल्ये लोकांपर्यंत पोहोचवली.मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच त्यांनी २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून देशभरात साजरा करण्यास सुरवात केली.मात्र,लोकसभा निवडणूकीत देभभरात,विशेषत: महाराष्ट्रात काँग्रेसने ‘संविधान बचाओ’हा फेक नेरेटीव्ह सेट केला,ज्यांनी बाबासाहेब कायदा मंत्री असताना त्यांना खूर्ची सोडायला लावली,पदोपदी त्यांचा अपमान केला,त्याच काँग्रेसच्या मागे महाराष्ट्रातील बौद्ध धर्मिय गेले,याचा माझ्या आत्म्याला दुखं झाले असल्याची खंत याप्रसंगी रिजिजू यांनी व्यक्त केली.
पं.नेहरु हयातीत असताना त्यांनी स्वत:लाच ‘भारतरत्न’ बहाल केले मात्र,बाबासाहेबांना भारतरत्न मिळण्यासाठी १९९० साल उजाडावा लागला जेव्हा अटलबिहारी बाजपेयी पंत्रप्रधान होते.आपल्या समाजाचे लोक काँग्रेसच्या दृष्ट प्रचाराला बळी पडले,ते काँग्रेसच्या चुकीच्या प्रचाराला कसे बळी पडले?बाबासाहेब कधीही काँग्रेसला माफ करु शकणार नाहीत,अशी पुश्ती ही त्यांनी जोडली.पंतप्रधान मोदी यांनीच संविधानातील लाेकतंत्र जिवंत ठेवले,संविधानाला खरी ओळख दिली,बाबासाहेबांच्या कामाला संपूर्ण देशासमोर ठेवले,मोदी यांच्याकडून कधीही बाबासाहेबांचा अपमान झाला नाही उलट,बाबासाहेबांच्या जीवनाशी संबंधित पाच तीर्थस्थळे त्यांनी विकसित केली.महू मधील बाबासाहेबांचे जन्मस्थळ,लंदनमधील त्यांच्या शिक्षणभूमीतील घर राष्ट्रीय संपत्ती म्हणून त्यांनी घोषित केले.संविधानाची निर्मिती दिल्लीत ज्या घरात बसून केली,ज्या घरात त्यांचे महापरिनिर्वाण झाले,ती चैत्यभूमी,नागपूरात जिथे धम्माची दीक्षा घेतली ती दीक्षाभूमी आज बौद्ध धर्मियांचे तीर्थस्थळ झाले असल्याचे रिजिजू म्हणाले.
त्यामुळेच नागपूरातीलच नव्हे तर देशभरातील बौद्ध धर्मियांना माझे आवाहन आहे की ज्या काँग्रेसने १९७५ साली देशात आणिबाणि लादून बाबासाहेबांच्या संविधानाची हत्या केली,बाबासाहेब जिथून जिथून निवडणूका लढले,त्या ठिकाणी त्यांच्या मागे लागून-लागून त्यांचा पराभव केला,त्यांनी आता संविधान हातात घेऊन ‘संविधान बचाओ’चे नाटक करु नये,अन्यथा भाजप रस्त्यावर उतरुन त्यांचा विरोध करेल,असा सज्जड दमच याप्रसंगी रिजिजू यांनी दिला.महाराष्ट्रात एससी,एसटीची लोकसंख्या सर्वात जास्त असल्याने प्रत्येक जिल्ह्यात ‘संविधान भवन’बनवणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.
काँग्रेसने अल्पसंख्यांक मंत्रालय फक्त मुस्लिमांचे मंत्रालय करुन ठेवले होते,अशी खरमरीत टिका करीत,या देशात जैन,पारसी,सिख,ईसाई आदी इतर धर्मिय देखील रहातात याचा विसर काँग्रेसला पडला होता,इतकंच नव्हे तर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष पद कायम मुस्लिमालाच देण्यात आले.हा आयोग देशातील संपूर्ण गरिबांचा आयोग आहे उलट असे काँग्रेसचे धोरण असायला हवे होते.मी सर्व अल्पसंख्यांकांना एकसमान बघतो,देशातील सर्वच अल्पसंख्यांकांसाठी क्रीडा,वसतीगृहे इत्यादी योजनांचा लाभ एकसमान मिळायला हवा,हे माझे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
८ ऑगस्ट २०२४ रोजी वक्फ बोर्ड संशोधन बिल संसदेत सादर करताना काँग्रेसने,तुम्ही मुस्लिम नसल्याने तुम्हाला मुस्लिमांच्या या बिलाविषयी बाेलायला नाही पाहिजे,असे सुनावले होते,या विषयी विचारले असता,मी जेव्हा हे विधेयक संसदेच्या पटलावर ठेवले त्यावेळी काँग्रेसच्या काही सदस्यांनी मला मी मुस्लिम नसल्याने वक्फविषयी तुम्ही कसे बोलू शकता,असा आक्षेप घेतला.यावर मी म्हणालो की मी मुस्लिम नाही त्यामुळेच मी जास्त बोलणार. कारण मुसलमानांच्या नावावर काँग्रेसने जे देशाचे आतापर्यंत अतोनात नुकसान केले तसेच आजपर्यंत मुसलमानांचे काँग्रेसने जे आतापर्यंत नुकसान केले,मुसलमानांना फक्त एक ‘व्होट बँक’म्हणूनच काँग्रेसने आजपर्यंत वापरले, त्यामुळे देश आणि मुस्लिम दोघांचेही अतोनात नुकसान झाले,जर ६० वर्षाच्या काँग्रेसच्या शासनानंतरही मुस्लिमांची इतकी दयनीय स्थिती देशात असेल तर त्याला जबाबदार कोण आहे?असा सवाल त्यांनी केला.राहीला प्रश्न वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणेचा तर,हा मुस्लिमांचा कायदा नसून ‘देशाचा’कायदा आहे.वक्फ बोर्ड कडे कुठेही नोंदणी नसलेली जी लाखो हेक्टर जमीन आहे ती देशाची जमीन आहे,सरकार म्हणून देशाच्या जमीनीबाबत काही चुकीचे कायदे भूतकाळात झाले असतील तर ती चूक दुरुस्त करने आमची जबाबदारी आहे.त्यामुळेेच मी मुस्लिम नाही तरी पण अल्पसंख्यांक मंत्रालयाचा मंत्री असल्यामुळे लाखो,करोडाे गरीब मुसलमानांना जो न्याय आजपर्यंत मिळाला नाही,वक्फ बोर्डच्या बेनाम संपत्तीचा आजपर्यंत जो चुकीचा उपयोग झाला,काही मुस्लिमच फक्त या जमीनींचा वापर करुन करोडपती,अरबपती बनले,त्या जमीनीचा वापर या पुढे मुस्लिम धर्माच्या गरीब महिला,मुलांसाठी तसेच मुस्लिमांमध्येच जो मागास वर्ग व इतर लहान-लहान वर्ग आहे,त्यांना न्याय देण्यासाठी मी आणखी मोठ्याने,संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात बोलणार आहे,असा इशारा देत,संसदेच्या संयुक्त समितीकडून या विधेयकामध्ये जी सुधारणा करण्याची शिफारिश झाली,त्या विधेयकावर मी आणखी प्रखरतेने मी बोलणार आहे आणि या देशाच्या जमीनीवर फक्त काही मुस्लिमांनी जो कब्जा करुन ठेवला आहे तो आम्ही सरकार म्हणून होऊ देणार नाही,सरकारची संपूर्ण प्रतिबद्धता आहे की आम्ही मुुस्लिमांना न्याय देऊनच थांबणार,असे ते म्हणाले.
राहूल गांधी यांनी हरियाणा विधान सभा निवडणूकीतील सभेत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टिका करीत हे दोघेही देशात नफरत पेरित असून आम्ही ‘मोहब्बत की दूकान’चालवित असल्याचे विधान केले तसेच कर्नाटकात भाजप ’ऑपरेशन लोटस’चालवित असून आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.यावर रिजिजू यांना प्रश्न विचारला असता,राहूल गांधी सारखा नेता विरोधी पक्ष नेता होतो हाच देशाला लागलेला श्राप असल्याची कठोर टिपण्णी केली.राहूल गांधींनी कधीही संविधान वाचले नाही ना कधी संविधानाची उर्जा समजून घेतली.त्यांच्या मुखातून ‘संविधान’ हा शब्द निघणे हा देखील संविधानाचा अपमानच असल्याचे रिजिजू म्हणाले. सम्राट अशोक व राजा कनिष्क नंतर या देशातून राजे-महाराजांचे राज्य कधीचेच अस्तंगत झाले असून आता ‘प्रजेचे’राज्य असल्याचे सांगून, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनंतर देशातील पहीला केंद्रिय मंत्री हा आज बौद्ध धर्मिय आहे.इतका मोठा कालखंड यासाठी जाऊ द्यावा लागला.म्हणून मला काँग्रेसचा खूप राग येत असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.ही आपले अस्त्वि आपल्या आत्म्याला स्पर्शनारी बाब असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्टीट करीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देणे ही निवडणूका समोर ठेऊन केलेली कृती असल्याचे लिहले.यावर प्रश्न विचारला असता,काल मंत्री मंडळाची
प्रदीर्घ बैठक पार पडली त्यात मराठीसह पाली,प्राकृत अश्या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला.महाराष्ट्रात निवडणूक असल्यामुळे नव्हे तर मराठी ही देशातील एक गौरवशाली भाषा असल्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले.ही देशासाठी गर्वाची बाब असून काँग्रेसवाल्यांनी याचा योग्य पद्धतीने अभ्यास केला नसल्याचा टोला त्यांनी हाणला.लोकसभेच्या निवडणूकी पूर्वीच या पाचही भाषांना अभिजात दर्जा मिळणार होता मात्र,संपूर्ण अभ्यासाअंती हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘वन नेशन व इलेक्शनवर’विचारलेल्या प्रश्नावर येत्या हिवाळी अधिवेशनात पहील्याच सत्रात आखरी दिवसाच्या पूर्वी हे विधेयक संसदेच्या पटलावर ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बहूमतामुळे तुम्ही काँसेसी खासदारांना संसदेत बोलू देत नाही असा आरोप राहूल गांधी करतात,याकडे लक्ष वेधले असता,राहूल यांना बोलता कुठे येतं?अशी कोटी रिजिजू यांनी केली.अटल बिहारी बाजपेयींच्या काळात आमच्या सारखे नव्याने खासदार झालेल्या सभासदांना खूप काही शिकायला मिळत होतं कारण एवढ्या उच्च कोटीची बौद्धिक चर्चा संसदेत घडत असे.आज नवीन खासदारांना संसदेत चांगली चर्चाच ऐकू येत नाही,सकाळ-संध्याकाळ विरोधक फक्त मोदी,संघ,श्री रामाला शिव्या श्राप देताना आढळतात,संसद म्हणजे बाजारहाट नाही,संसदेत बोलण्याचे काही नियम आहेत.लोकसभा अध्यक्षांच्या खूर्ची जवळ बटण आहेत,ज्या सदस्यांच्या बोलण्याचा क्रम असतो त्याचाच माईक हा सुरु होत असतो,राहूल गांधी तर सारखे-सारखे बोलण्यासाठी उभे होतात,त्यांचा माईक त्या वेळी बंद असतो त्यामुळे ते असा वायफळ आरोप करतात,असे रिजिजू यांनी सांगितले.
मोदी सरकार संविधान बदलणार आहे हा नेरेटीव्ह आता प्रभावीपणे चिपकून गेला आहे,तो कसा दूर करणार?असा प्रश्न केला असता,मोदी सरकार आपल्या कामातून याला उत्तर देईल,असे त्यांनी सांगितले.
राजकीय प्रतिउत्तर विरोधकांना देण्यासाठी महाराष्ट्रात भाजपकडे दलित नेतृत्व कुठे आहे?असा प्रश्न केला असता,मी पक्षाचा फक्त प्रभारी असून या विषयीचा निर्णय मी घेऊ शकत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.
बिहारमधील महाबोधी,महावीरा बौद्ध मठांचा ताबा बौद्धांकडेच का दिला जात नाही?असा प्रश्न केला असता,मठा विषयीचा कायदा हा केंद्राचा कायदा नसून बिहार सरकारचा कायदा असल्याचे ते म्हणाले.या ठिकाणी हिंदूंचे देखील देवस्थान आहे त्यामुळे खूप जणांच्या हातात या विहारांचे व्यवस्थापन आहे त्यामुळे आधी ही बाब स्पष्ट करावी लागेल,असे ते म्हणाले.
मणिपूरविषयी प्रश्न केला असता, मणिपूरचा प्रश्न हा काँग्रेसच्याच चुकीच्या धोरणांमुळे चिघळला असा सरळ आरोप त्यांनी केला.अनेक देशविरोधी ताकतची शक्ती त्या भागात वाढली.मणिपूरमध्ये भारत सरकारच्या विरोधात लढा नाही तर आपापसात आहे.फक्त मैतेई-कुकींमध्येच नाही तर नागा-कुकी,कुकी-कुकींमध्येच संघर्ष आढळून येतो.हा प्रश्नांवर तोडगा काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतात अनेक राज्यात म्यामारमधील रोहिंग्ये मुसलमान,बांग्लादेशी,अफगाणी मुसलमान अवैधरित्या सर्व खोटी कागदपत्रे बनवून राहत आहेत,यावर काय उपाययोजना करत आहात?असा प्रश्न केला असता,यासाठीच मोदी सरकारने एनआरसी कायदा लागू केला.मात्र,राज्य सरकारचे देखील सहकार्य यासाठी गरजेचे अाहे.देश सुरक्षत तेव्हा होईल जेव्हा काँग्रेस हे मुस्लिमांकडे ‘व्होट बँक’म्हणून बघणे बंद करेल,घूसखोरांकडे ते मतांची बेगमी म्हणून बघतात,आम्ही त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोणातून बघतो,अशी पुश्ती त्यांनी जोडली.मुस्लिम घूसखोरांच्या प्रश्नावर,विरोधक हे विरोधकांच्या भूमिकेत न दिसता भारत विरोधी भूमिकेत दिसतात,अशी खरमरीत टिका त्यांनी केली.
पत्रकार परिषदेला राज्याचे अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम,माजी आमदार डॉ.मिलिंद माने,भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे,जनसंपर्क प्रमुख चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.