फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणकन्हान येथे लाडक्या बहीणींसाठी औद्योगिक वसाहत

कन्हान येथे लाडक्या बहीणींसाठी औद्योगिक वसाहत

Advertisements

उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

नक्षल भागातही विकासात्मक जडणघडण

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल

‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर,ता.२७ सप्टेंबर २०२४: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ’योजनेत वर्षाला ४६ हजार कोटींची उलाढाल होणार आहे.त्या अनुषंगाने तो पैसा इतरत्र खर्च हाेण्या ऐवजी पुन्हा बाजारात यावा यासाठी उद्योग धोरणात लाडक्या बहीणींचा देखील समावेश केला असून कन्हान येथे शंभर एकर जागेवर लाडक्या बहीणींसाठी औद्योगिक वसाहत निर्माण करणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सांमत यांनी हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.तो गौरव योजनांसाठी नसून राज्याच्या औद्योगिक धोरणामध्ये, राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये त्यांनाही प्राधान्य मिळावे, हक्काची जागा मिळावी, उद्योजक म्हणून त्यांनाही आपली ओळख निर्माण करता यावी यासाठी लवकरच विदर्भात महिलांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे सूतोवाच त्यांनी केला.
हॉटेल सेंटर पॅाईंट येथे महाराष्ट्राच्या औद्योगिक यशाला अधोरेखित करणा-या ‘महाराष्ट्राची औद्योगिक भरारी’ या विशेष समारंभासाठी ते नागपूरात आले होते.
आजपासून महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात उद्योग क्षेत्रात काय केलं,याचा लेखाजोखा उद्योजकांसमोर,पत्रकारांसमोर,समाजातील प्रत्येक घटका समोर असावा,आमच्या योजनांचा लाभ किती लाभाथ्यांना झाला याची देखील माहीती असावी,यासाठी महाराष्ट्राची उद्योग भरारी हा उपक्रम राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.आज या उपक्रमात पूर्व विदर्भातील कार्यक्रम आज नागपूर येथे होता,असे त्यांनी सांगितले.गडचिरोलीतील जिल्ह्यांमध्ये किती गुंतवणूक झाली आहे,किती रोजगार निर्माण झाले याची माहिती आम्ही येथील उद्योजकांना व तरुणांना देण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.महाराष्ट्र हा उद्योगांमध्ये कसा पहील्या क्रमांकावर कसा आहे याचे देखील सादरीकरण आजच्या कार्यक्रमात केले असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री महाराष्ट्र रोजगार निर्मिती योजना,या योजनेचे भरीव काम राज्यात कसे झाले आहे,याची देखील माहिती आम्ही दिली.स्टार्ट अप महाराष्ट्रात किती सुरु झाले,याचाही पुराव्यानिशी दाखला आम्ही सादर केला.मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही आम्ही महाराष्ट्राच्या तालुकास्तरावर पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो असून गेल्या दोन वर्षात ३५ हजार नवीन उद्योजक आम्ही तयार केले असल्याचा दावा त्यांनी केला.
अमरावती येथील पंतप्रधान टेक्सटाईल पार्क योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला.त्यात दहा हजार कोटींची गुंतवणूक होणार असून सुमारे एक लाख तरुणाईला रोजगार मिळू शकतो.आम्ही त्याच टेक्सटाईल पार्क परिसरात कौशल्य विकसित करणारे केंद्र सुरु करणार असल्याची माहीती त्यांनी दिली.ही सूचना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यानी मला केली होती,ती सूचना आम्ही अमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कसाठी कच्चा माल कापूस असल्यामुळे कापूस उत्पादक शेतक-यांना देखील त्या उद्योगाचा प्रचंड फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
७५ हजार कोटींची गुंतवणूक एकट्या गडचिरोली जिल्ह्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले.गडचिरोलीमध्ये प्रचंड खनिजे आहेत.महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हाचा समतोल विकासाचे ध्येय आम्ही ठेवले असल्याचे ते म्हणाले.पूर्व विदर्भाचा विकास सांगतानाच,कोकणात देखील कोकाकोलाची फॅक्टरी,डिफेन्सचा प्रकल्प आणला.आज आम्ही मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कर्जवाटप,विश्‍वकर्मा योजना,खादी ग्रामोद्योगात कोणती भरीव कामगिरी केली,याचा देखील आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मागच्या लोकसभेचा अनुभव बघता,फेक नेरेटीव्ही विरोधकांनी सेट केला होता,त्याची त्यांना सवय लागली आहे त्यामुळे उद्योग मंत्रालयाबाबत देखील विरोधक फेक नेरेटीव्ह सेट करु पाहत आहे,असा आरोप करीत,त्यामुळेच आम्ही संपूर्ण सादरीकरणासह जनतेसमोर आलो आहोत.आम्ही जे काही केले त्याचे पुरावे देखील ठेवले.या सादरीकरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‘याचा देखील समावेश असल्याने काही लोक टिका करु शकतात की उद्योग विभागामध्ये या योजनेचे सादरीकरण का केलं?याचे कारण की उद्योग विभागामध्ये व्यापार हा देखील सेक्टर येतो.वर्षाला ४६ हजार कोटी रुपये लाडक्या बहीणींच्या पर्समध्ये येणार आहे,त्याची बचत होणार नाही तर ते खर्च होणार आहेत.याचा अर्थ ४६ हजार कोटींची बाजारात उलाढाल होणार आहे,त्यामुळे याचे देखील सादरीकरण आम्ही या कार्यक्रमात केले असल्याचा खुलासा त्यांनी केला.या योजनेला किती उदंड प्रतिसाद मिळाला,याची सर्वांना कल्पना असल्याचे ते म्हणाले.त्यामुळे उद्योग भरारीचा उपक्रम आम्ही नागपूरपासून सुरु केला असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्व विदर्भात आलेले उद्योग,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून सुरु झालेले उद्योग,नवीन स्टार्ट अप,एमएसईमीमध्ये आम्ही केलेले काम,खादी ग्रामोद्योगमध्ये केलेले काम आणि आमच्या नवनवीन योजनांची माहिती आज आम्ही सादर केल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या समतोल औद्योगिक विकासासाठी कटिबद्ध होऊन ज्या भागात आजवर उद्योगाची चाके रुजली नव्हती त्या भागात आम्ही लक्ष केंद्रीत केले. गत दोन वर्षात विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला संपूर्ण भारतात अव्वल आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, जागतिक गुंतवणुकदारांचे लक्ष आता महाराष्ट्राकडे वेधून घेतले आहे. नक्षल भागात विकासात्मक जडणघडणीतून गडचिरोली जिल्ह्याचे स्वरूप आता पूर्णतः बदलून दाखविले आहे. आजवर नक्षलवादी जिल्हा म्हणून जी ओळख होती ती मिटविण्यात आपले शासन यशस्वी ठरल्याचे गौरवोद्गार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काढले.
 एमआयडीसीने उद्योजकांना केवळ जागा उपलब्ध करून देणे या उद्देशापर्यंतच सीमित असलेल्या महामंडळाचे स्वरूप आता आपण पूर्णपणे बदललेले आहे. चांगल्या उद्योजकांना, विदेशी गुंतवणुकदारांना, विदेशातील उद्योजकांना जर राज्यात निमंत्रित करायचे असेल तर त्यासाठी औद्योगिक क्षेत्राला अत्यावश्यक असणारी पायाभूत सेवा सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता आणि काम करणा-या कामगारांच्या आरोग्याची शाश्वतता जपणे याला आम्ही प्राधान्य दिले. या प्रयत्नांमुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला गती मिळाल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.
विदर्भातील औद्योगिक क्षेत्राच्या पायाभूत सोईसुविधांसाठी आम्ही प्राधान्याने लक्ष दिले आहे. यात पूर्व विदर्भासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते, वीज, मलनिःसारण व्यवस्था, पोलिस स्थानक या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. उद्योजकांबरोबर कामगारांनाही सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. त्यांचेही आरोग्य सुदृढ राहण्याची गरज आहे. एमआयडीसीच्या क्षेत्रात केंद्र सरकारची रुग्णालये साकारावीत यासाठी कोणताही मोबदला न घेता त्यांना रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याचे उद्योगमंत्री सामंत यावेळी म्हणाले.
विदर्भातील कापूस उत्पादक शेतक-यांना औद्योगिक क्षेत्राची जोड मिळावी यासाठी अमरावतीमध्ये पीएम टेक्सटाईल्स पार्कची निर्मिती करण्यात येत आहे. यासाठी सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यामाध्यमातून होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राला एक वेगळी दिशा आपण देत आहोत. नागपूर विभागात सुमारे१ हजारापेक्षा अधिक हेक्टर भूखंड वाटप करून यातून ४२ हजार ९३७.४३ कोटी रुपये गुंतवणूक आली असल्याचे त्यांनी सांगितले. यातून २९ हजार ९२७ रोजगारांची निर्मिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगवाढीला चालना मिळून ८० हजार रोजगार निर्मिती यामाध्यमातून झाली आहे. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती उपक्रमाद्वारे ३५ हजार जणांना रोजगार मिळाला आहे. हे उद्योग विभागाचे यश आहे. विदर्भातून कोणताही प्रकल्प स्थलांतरित होत नसून उलट परकीय गुंतवणूक वाढत असल्याचे ते म्हणाले.
गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक ७५ हजार कोटी रुपये झाली असून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला असल्याचा दावा त्यांनी केला. राज्यातील युवकांमध्ये कौशल्य रुजावीत यासाठी सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्रांना स्थानिक पातळीवरील उद्योजकांनी पुढे येऊन त्यात सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
………………………………….
यांचा होता सहभाग-
‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या उपक्रमात आ. आशीष जायस्वाल, अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) तथा समन्वयक महाराष्ट्राची उद्योग भरारी प्रदीप चंद्रन, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे, मुख्य अभियंता राजेश झंझाळ, उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शिवकुमार मुद्दमवार, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष विशाल अग्रवाल,वर्धा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, हिंगणा इंडस्ट्रीज  असोसिएशनचे पी. मोहन, लॉयड ग्रूपचे संचालक तथा प्रकल्प  प्रमुख व्यंकटेशन, आवादा ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक मुर्तुझा, बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशनचे घिमे, परनार्ड रिकार्ड इंडियाचे संचालक राजेंद्र देशमुख यांच्यासह पूर्व विदर्भातील विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान एमआयडीसी, डायरेक्टोरेट आफ इंडस्ट्रीज, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. उद्योग विभागातर्फे व्यवसायासाठी देण्यात येणारे अनुदान, पीएम विश्वकर्मा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना, युवा कार्यप्रशिक्षण योजना तसेच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले.
………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या