लातूर महामार्गासाठीचे संविधान चौकातील आमरण उपोषण आंदोलन ‘स्थगित’
१७ तारखेपासून सुरु होते आंदोलन
१२३ जणांचा अपघातात मृत्यू:९२७ कोटींचा प्रकल्प
नागपूर,ता.२७ सप्टेंबर २०२४:मागील पंचवीस वर्षांपासून ५२ किलोमीटरचा लातूर-मुरुड-टेंभूर्णी महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम रखडले आहे.मागच्या दोन वर्षांपासून या महामार्गासाठी लातूरकर जनतेने आंदोलन उभारले आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे तीन वेळा लातूरला येऊन गेलेत.लोकसभा निवडणूकीच्या वेळी देखील,‘ लातूर-मुरुड-टेंभुर्णी या ५२ किलोमीटर रसत्याबद्दल बोलायलाही मला लाज वाटते’,असे भर सभेत बोलले होते.महामार्गावर आतापर्यंत १२३ अपघाती मृत्यू झाले असून हजारो अपघात घडले असताना देखील गडकरी यांनी २४ डिसेंबर २०२१ रोजी लातूर मधील टाऊन हॉल येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या महामार्गाचे लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमात दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण न केल्याने गडकरी यांच्याच मतदारसंघात १७ सप्टेंबर पासून संविधान चौकात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट लातूर जिल्ह्यातर्फे आमरण उपोषण सुरु होते.आज शरद पवार यांना गडकरी यांनी दिलेल्या ‘शब्दा’नंतर हे उपोषण ‘स्थगित’करण्यात आले असल्याचे लातूर जिल्हा अध्यक्ष संजय शेटे यांनी माध्यमांना सांगितले.
या महामार्गावर येत्या तीन महिन्यात काम सुरु करण्याचा शब्द गडकरी यांनी शरद पवारांना दिला असल्याचे त्यांनी सांगितले.कोणत्याही शासकीय कामासाठी पंचेचाळीस दिवसांची प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.या पूर्वी आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ गडकरी यांना भेटण्यासाठी गेले असता,त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागणीला तत्वत: मान्यता देत असल्याचे पत्र देतो,असे सांगितले जे आंदोलनकर्त्यांनी मान्य केले नाही व आपले उपोषण सुरुच ठेवले.अखेर सलील देशमुख यांच्या पुढाकारातून, शरद पवार यांच्यासोबत गडकरी यांचे बोलणे झाले व येत्या तीन महिन्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्र.६३ वरील ५२ किलोमीटरच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरु करण्याचा ‘शब्द‘ शरद पवार यांना दिल्याने, उपोषणकर्त्यांनी संविधान चौकातील आपले आंदोलन स्थगित केले.
मात्र,तीन महिन्यांनंतर देखील त्यांची मागणी मान्य झाली नाही तर,या पेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, लातूर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तबले,नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे व समस्त शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचे शेटे यांनी आभार मानले.
……………………..