फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणविदर्भात येणा-या मोंदीना काँग्रेसचे दहा प्रश्‍न

विदर्भात येणा-या मोंदीना काँग्रेसचे दहा प्रश्‍न

Advertisements
आमदार विकास ठाकरेंचे पत्रकार परिषदेत मोदींना उत्तरे देण्याचे आव्हान
उद्योग मंत्री उदय सामंतानी विदर्भात यावे संपूर्ण तथ्य समोर ठेऊ
संकेत बावणकुळेविषयी डिसीपीने दिला पुरावा
फडणवीसांना गडचिरोलीविषयी विशेष प्रेम असावे
‘लाडकी बहीण’योजना निवडणूकीच्या तोंडावर ‘लॉलिपॉप’
नागपूरात काँग्रेस विधानसभेच्या सहा ही जागा लढणार
नागपूर,ता.१९ सप्टेंबर २०२४: लोकसभेच्या निवडणूकी पूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात अनेक सभा घेतल्या,अनेक दावे केले,अनेक वचने दिली,अनेक आश्‍वासने दिली मात्र,निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे जे हाल झाले त्याचीच पुर्नरावृत्ती येत्या विधानसभेत होणार आहे, कारण पंतप्रधान मोदी हे पुन्हा विदर्भात येत आहेत,सभा घेणार आहेत,आश्‍वासने देणार आहेत त्यामुळे मोदींना काँग्रेस पक्ष दहा प्रश्‍न विचारु इच्छित आहे ज्याचे उत्तर मोदींनी विदर्भाच्या जनतेला द्यावी,अशी मागणी काँग्रसेचे पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी आज रवि भवन येथे पत्रकारर परिषदेत केली.
नागपूर बुटीबोरीमधील १८ हजार कोटींचा सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला असून विदर्भातील ३ हजार तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवण्यात आले.एमआयडीसीची विकट अवस्था असताना आणि एमएसएमईसाठी कोणताही आधार नसल्याने, विदर्भातील तरुणांना आज पश्‍चिम महाराष्ट्रात रोजगारासाठी स्थलांतर करावे लागत आहे.विदर्भातील तरुणांची बेरोजगारीपासून सूटका कधी होणार?
नागपूरात नुकतेच ९ वर्षांच्या मुलीवर तिच्या ५ वर्षाच्या बहीणीसमोर बलात्कार झाला,अद्याप आरोपीची अटक झाली नाही.नागपूरात २०२३ मध्ये अश्‍या २४७ घटना घडल्या असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजाण लाडक्या बहीणींचे संरक्षण का केले जात नाही?
विदर्भात २०२३ मध्ये १ हजार ४३९ शेतक-यांनी आत्महत्या केली तर अमरावती जिल्हा केवळ ८ महिन्यात शेतकरी आत्महत्याचे केंद्र बनले आहे,विदर्भातील शेतक-यांच्या संकटाकडे तुमचे आणि तुमच्या सरकारचे इतके दूर्लक्ष का आहे?
मोदी यांचे सरकार कृषिविरोधी सरकार का आहे?कापूस,सोयाबीन आणि संत्रा शेतक-यांसाठी आयात-निर्यात आणि हमीभावसारख्या धोरणात भेदभाव का केला जातो?आयात निर्यातीच्या धोरणात गुजरातला एक न्याय आणि महाराष्ट्राला दूसरा न्याय का दिला जातो?
सुपर सीएम फडणवीस यांनी महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे आश्‍वासन दिलं होतं.तरीही विदर्भात दुष्काळाची परिस्थिती कायम असून ४५ सिंचनाचे प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहेत,विदर्भातील कोरडवाहू शेतक-यांचा अजून किती अंत तुम्ही बघणार आहात?
गडचिरोलीमध्ये पालकांनी त्यांच्या दोन्ही मृत मुलांना खांद्यावर घेत १५ किलोमीटरचा पायी प्रवास केला कारण त्यांना रुग्णवाहिकाही उपलब्ध नव्हती.अमरावतीमध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू रुग्णवाहिकेची वाट बघत असताना झाला,हाच तुमचा ‘सबका विकास’आहे का?अद्याप तुमचा ‘विकास’गडचिरोली जिल्ह्यात का पोहोचला नाही?
गोड्या पाण्याच्या प्रकल्पाचे आश्‍वासन तुम्ही दिले असतानाही अकोल्यातील ३७३ गावांमध्ये खारट पाण्यामुळे खराब झालेल्या जमिनीचा पोत ,तसेच ही संपूर्ण गावे आरोग्याच्या गंभीर प्रश्‍नाशी झुंज देत आहेत,विदर्भातील या गावांकडे तुमचे लक्ष आहे का?
तब्बल ५५ हजार कोटींच्या समृद्धी महामार्गाला फक्त दोन वर्षातच अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.हा महामार्ग मृत्यूचा महामार्ग असल्याचे सिद्ध झाले आहे,विकसित भारताचा दावा करताना या महामार्गाची अशी अवस्था का आहे?
नागपूर मेट्रोचे उद् घाटन तुमच्याच हस्ते २०१५ मध्ये झाले होते मात्र,आज ही महामेट्राेचा प्रकल्प अपूर्ण आहे.अद्याप शेकडो किलोमीटरचे काम कागदांवरच आहे.महामेट्रोच्या भ्रष्ट कार्यशैलीवर कॅगने ओढलेले ताशेरे हे तुमच्या सरकारचे अपयश नाही का? १४ हजार कोटींचा या प्रकल्पा विषयी विदर्भाच्या जनतेला उत्तर देणार का?

९ वर्षांनंतर देखील बजाज चौक येथील वर्धा रेल्वे पुलाचं काम अपूर्णच आहे.भ्रष्ट युती सरकार फक्त खोटी आश्‍वासने देत असून या भ्रष्टाचारासाठी तुम्ही काय सांगाल?

असे दहा प्रश्‍न याप्रसंगी आ.विकास ठाकरे यांनी उपस्थित करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आगामी विदर्भ दौ-यात याची उत्तरे द्यावीत,अशी मागणी त्यांनी केली.
याप्रसंगी बुटीबोरी येथील सोल पॅनल प्रकल्प या संदर्भात प्रश्‍न विचारला असता,काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांनी, या प्रकल्पासाठी एमओयू साईन झाला होता,३०० एकर जागेचे निर्धारण झाले होते,क्लिअरेंस देखील मिळाला तसेच पॉवर टेरिफ देखील देण्यात आले असताना, हा उद्योग दूस-या राज्यात गेला,उद्योग मंत्री विदर्भात येऊन खोटे बोलत असल्याचे ते म्हणाले.उदय सामंत खोटी अाश्‍वासने लपवण्यासाठी तथ्य लपवत असतात,असा आरोप विकास ठाकरे यांनी केला.उदय सामंतांने विदर्भात यावे व या प्रकल्पांच्या माहितीसाठी आम्हाला बोलवावे,आम्ही संपूर्ण कागदपत्रांसह त्यांना पुरावे सादर करु,असे आव्हान विकास ठाकरे यांनी केले.
काँग्रेसची सरकार आल्यानंतर ‘लाडकी बहीण’योजना बंद केली जाईल,असा आरोप महायुतीचे नेते करतात,याकडे लक्ष वेधले असता,काँग्रेसनेच अनेक जनकल्याणकारी योजना देशात राबविल्या असल्याचे ते म्हणाले.संजय गांधी निराधार योजना ही काँग्रेसचीच योजना असून, निवडणूकीच्या तोंडावर महायुतीच्या सरकारने ‘लाडकी बहीण’योजना आणली असून ही योजना म्हणजे ’निवडणूकीसाठीचा लॉलिपॉप’असल्याची कोटी त्यांनी केली.आमची सरकार आल्यानंतर आम्ही लाडक्या बहीणींसाठी आणखी वेगळ्या योजना आणू,असे उत्तर त्यांनी दिले.
आज देखील ‘लाडकी बहीण’योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी पुन्हा एकदा अनिल वडपल्लीवार यांचा नामोल्लेख केला.वडपल्लीवार हे काँग्रेसी असून नाना पटोले व विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख असल्याचे ते सांगतात.काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’योजना बंद करण्याचा हा डाव असल्याचा आरोप महायुतीचे नेते करतात.याकडे लक्ष वेधले असता,वडपल्लीवर यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन ते काँग्रेसच्या वतीने नव्हे तर वैयक्तीकरित्या या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले असल्याचे स्पष्ट केले आहे, त्यामुळे काँग्रेसचा याच्याशी  संबंध नाही,असे ठाकरे म्हणाले.त्यांना वडपल्लीवारांचा वापर करावा लागत आहे याचा अर्थ ते किती भ्याले आहे,हे लक्षात येतं,अशी कोटी विकास ठाकरे यांनी केली.
अंबाझरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाविषयी प्रश्‍न केला असता,ज्याने ते पाडले त्याच्याकडूचन पैसे वसूल केले पाहिजे.शासन आता ते बांधण्यासाठी १५ कोटी रुपये खर्च करणार आहे,हा पैसा त्या खासगी विकासकाकडून शासनाने वसूल करावा,अशी आमची मागणी आहे.आरोपी स्वत:च न्यायालयात गेला आहे.आता सांगतात वीस एकर मध्ये बांधून देतो,हा सर्व बनाव असून अंबाझरी उद्यान ही महानगरपालिकेच्या मालकीचे असून त्वरित हे उद्यान जनतेसाठी खुले करावे.४४ एकरची जागा खासगी व्यक्तीच्या घशात आम्ही जाऊ देणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.दोन दिवस आधीच मुख्यमंत्र्यांना अंबाझरी उद्यान जनतेसाठी खुले करावे,असे पत्र दिले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
विदर्भाच्या प्रश्‍नावर व शेतक-यांच्या दशेवर तुम्ही पंतप्रधानांना अनेक प्रश्‍न विचारली मात्र,तुमचेच भंडाराचे खासदार डाॅ.प्रशांत पडोळे हे अतिवृष्टिची पाहणी करताना कारच्या बाेनटवर बसून फोटो शूट करतानाचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे,ही संकटग्रस्त शेतक-यांची थट्टा नाही का?असा प्रश्‍न विचारला असता,या घटनेविषयी मला काहीच माहिती नसल्याचे उत्तर विकास ठाकरे यांनी दिले.अशी घटना घडली असेल तर हे चुकीचं असल्याचे त्यांनी सांगितले.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी पासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर सालई-अब्बूलटोला दरम्यान असणारा राष्ट्रीय महामार्ग ५४३ वरील जीर्ण पूल काल कोसळला,याच रस्त्यावरुन गडचिरोली,देवरी भागातील अधिकारी,नेते आवागमन करतात मात्र,पूलाची जीर्णावस्थेची दखल ग्रामस्थांनी अनेक तक्रारी करुन देखील घेण्यात आली नाही,परिणामी चिचगड-देवरी या दोन प्रमुख मार्गांना जोडणारा पूलच कोसळ्याणे आता ग्रामस्थांसमोर बिकट समस्या उभी झाली आहे.या प्रश्‍नाकडे विकास ठाकरे यांचे लक्ष वेधले असता,गडचिरोली जिल्ह्यातच प्रचंड प्रमाणात दुरावस्था असल्याचे ते म्हणाले.या सर्व प्रसंगाची चौकशी झाली पाहीजे,अब्जो रुपयांचा फंड विदर्भात आणल्या जात असल्याची वल्गना केली जाते,या फंडाचा उपयोग कसा होत आहे,कोणत्या कामासाठी होत आहे,कंत्राटदार कश्‍यारितीने काम करीत आहे,कामात दर्जा आहे का किवा कश्‍याही पद्धतीने कामे उरकून फक्त बिले उचलली जात आहे?फक्त गोंदिया जिल्ह्यातील या पूलाचीच नव्हे तर नागपूरातील अनेक प्रकरणांची देखील चौकशी झाली पाहिजे,असे ते म्हणाले.
फडणवीस यांचं एक विधान फार गाजले की एक वेळ मी नागपूरचं पालकमंत्री पद सोडेन पण गडचिरोलीचे नाही,या मागे काय रहस्य आहे?असा प्रश्‍न केला असता,फडणवीसांची ही ईच्छाशक्तीच म्हणावी लागेल की गडचिरोली अगदी दूर्गम भाग असल्यामुळे त्यांना गडचिरोलीचा विकास करायचा असेल,असा उपरोधिक टोला हाणत,फडणवीसांना गडचिरोलीतच कामाचा जास्त स्कोप असेल,असे ते म्हणाले.यावर, पालकमंत्र्यांच्या त्याच गडचिरोलीत मायबापाला आपल्या चिमुकल्यांचे पार्थिव खांद्यावर १५ किलोमीटरपर्यंत चालत घेऊन जावं लागतं,असे विचारले असता,फडणवीस यांनी फक्त जिल्हा नियोजन समितीच्या बैठकां व्यतिरिक्त किती दौरे केले गडचिरोलीचे हे पालकमंत्री म्हणून त्यांना विचारायला हवे,अशी पुश्‍ती आमदार अभिजित वंजारी यांनी जोडली.सुरजागडच्या उत्खननाच्या प्रकल्पाशिवाय या सरकारला गडचिरोलीच्या गंभीर मूलभूत सुविधांबाबत कोणताही रस नसल्याची टिका त्यांनी केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांचे सुपुत्र संकेत बावणकुळे यांच्या अडीच कोटीच्या ऑडीचा थरार,या घटनेबाबत विकास ठाकरे यांनी संकेतला क्लीन चिट दिल्याचा बाबीकडे लक्ष वेधले असता,कोणी जर दोषी नसेल तर कोणी कितीही आरोप केले तरी त्याला दोषी ठरवता येत नसल्याचे ठाकरे यांनी सांगितले.ऑडी संकेतची आहे हे सिद्ध झालं,गाडीची जप्ती पोलिसांनी केली आहे.त्याचे बयाण देखील नोंदवले आहे.सुषमा अंधारे यांना तर चंद्रशेखर बावणकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करायची ईच्छा होती का?असा सवाल त्यांनी केला.पोलिसांनी हयगय केली या प्रकरणात असं तुम्हाला वाटत नाही का?असा सवाल केला असता,काय हयगय केली पोलिसांनी?असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला.मला डिसीपीकडून संपूर्ण पुरावे मिळाले,त्या पुराव्याच्या आधारावर मी माझे मत व्यक्त केले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.जोपर्यंत पोलिसांनी मला पुरावा दाखवला नाही तोपर्यंत आमचा देखील आरोप संकेत बावणकुळेंवर होता,असे ते म्हणाले.पोलिसांनी पुरावा दाखवल्यानंतर कसे म्हणणार हा पुरावा खोटा आहे?मग खरा पुरावा ज्यांच्याकडे आहे त्यांनी तो आणून दाखवावा,असे आव्हान त्यांनी केले.पोलिसांनी संकेत ऑडी चालवित नसल्याचा पुरावा जर विकास ठाकरे यांना दिला आहे तर ऑडीमध्ये चौथा मित्र कोण?हे देखील ठाकरे यांना माहिती झाले असावे,तो चौथा कोण आहे?असा प्रश्‍न केला असता,तो चौथा कोण होता हे मला माहीती नाही,मला जो पुरावा दाखवला त्यात संकेत गाडी चालवत नव्हता,एवढंच स्पष्ट होतं,असे ते म्हणाले.
नागपूरात सहा विधानसभा जागांपैकी काँग्रेस किती जागा लढणार?विदर्भातील ६२ पैकी आघाडीत काँग्रेसला किती जागा मिळणार?असा प्रश्‍न केला असता,नागपूरात काँग्रेस सहा पैकी सहा जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.विदर्भातील जागांबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.
आमदार अनिल बाेंडे यांच्या वादग्रस्त विधानाबाबत छेडले असता,ते राहूल गांधी तर सोडा सामान्य माणसाच्या जीभेला तरी चटका देऊ शकतात का?असा सवाल त्यांनी केला.अलीकडे काही आमदारांमध्ये वादग्रस्त बोलण्याची हिंमत आली कूठून?आ.संजय गायकवाड म्हणतो,राहूल गांधीची जीभ कापेल,तर अनिल बोंडे म्हणतो राहूल गांधींच्या जीभेला चटका देईल,नीलेश राणे म्हणतात,मशिदी मध्ये खूसून मारु,महायुतीच्या या आमदारांच्या विधानांना मोदी आणि शहांचे समर्थन आहे का?नसल्यास ते अशी विधाने थांबवत का नाहीत?असा सवाल त्यांनी केला.
……………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या