फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशअमेरिकेत राहूल गांधी समर्थकांची भारतीय पत्रकाराला मारहाण

अमेरिकेत राहूल गांधी समर्थकांची भारतीय पत्रकाराला मारहाण

‘आज तक‘चे पत्रकार रोहित शर्मा यांना बांग्लादेशवर प्रश्‍न विचारणे पडले महाग
नागपूर,ता.१८ सप्टेंबर २०२४: वृत्त वाहीनी ‘आज तक’चे पत्रकार रोहित शर्मा हे अमेरिकेच्या डलास शहरात काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांचा इव्हेंट कव्हर करायला गेले असता,इव्हेंटच्या पूर्वी शर्मा यांनी सॅम पित्रोदा यांची छोटीसी मुलाखत घेतली.त्यावेळी शर्मा यांनी पित्रोदा यांना ,राहूल गांधी अमेरिकेच्या खासदारांसाेबतच्या भेटीदरम्यान, बांग्लादेशात हिंदूंवर होणा-या हिंसेविषयी प्रश्‍न उपस्थित करतील का?असा प्रश्‍न केला असता,या प्रश्‍नामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार रोहित शर्मा यांच्यासोबत चुकीचे वर्तन करीत त्यांना मारहाण केली.
या घटनेवर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी फक्त खेद व्यक्त केला.काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोहित यांचा मोबाईल हिसकला तसेच पित्रोदा यांची घेतलेली मुलाखत देखील डिलीट केली.या घटनेच्या संदर्भात इंडिया टूडे टीव्हीसोबत बोलताना पित्रोदा यांनी त्यांना या घटनेची माहिती नसल्याचे सांगितले.मी लवकर निघून गेलो होतो कारण मला कार्यक्रमात जाण्यास उशिर होत होता.अशी कोणती घटना घडली असेल तर मी चौकशी करेल व दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.यावेळी त्यांनी प्रसार-प्रचार माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मखलाशी केली.
पित्रोदा म्हणाले की,रोहित शर्मा यांनी ही बाब सार्वजनिकरित्या सांगण्या ऐवजी मला सांगायला हवी होती मात्र,त्यांनी तसे केले नाही.पित्रोदा यांनी सांगितले, की राहूल गांधी यांनी पाकिस्तानचे अमेरिकी खासदार इल्हान उमर(कट्टर भारत विरोधी खासदार ज्याच्यासोबत राहूल गांधी यांच्या भेटीवर भारतात विरोधकांनी बरीच टिका केली) यांच्यासह अमेरिकेतील इतर खासदारांसोबतच्या आपल्या चर्चेत अमेरिकेतील अश्‍वेतांचा मुद्दा,भारत-अमेरिका संबंध,लोकतंत्र,स्वातंत्र्य,आर्थिक मुद्दे,संविधान,बेरोजगारी,उद्योग तसेच कृषि उत्पादनासंबंधी साधकबाधक चर्चा केली असल्याचे पित्रोदा म्हणाले.
पत्रकार रोहित शर्मा यांनी त्यांच्यासोबत घडलेली घटना राहूल गांधी यांच्या प्रेस स्वातंत्र्याच्या दाव्याच्या विरोधात असल्याचे सांगितले.शर्मा हे सायंकाळी ७.३० वा.इरविंग,टेक्सासच्या रिट्ज कार्लटन हॉटेलमध्ये पोहोचले.तिथे काही आयओसी सदस्यांसोबत भेटी नंतर शर्मा यांना सॅम पित्रोदाच्या विला मध्ये घेऊन जाण्यात आले.तिथे जवळपास ३० लोक होते त्यातील काही लोक हे भारतीय होते तर काही आयओसी हे यूएस मधील होते.सगळे राहूल गांधी यांची डीएफडब्ल्यू इंटरनॅशनल विमानतळावर पोहोचण्याची वाट बघत होते.याच दरम्यान पित्रोदा यांनी मला मुलाखत दिली.आम्ही राहूल गांधी यांच्या यात्रेविषयी बोललो.पित्रोदा यांनी शर्मा यांच्या चार प्रश्‍नांवर उत्तम उत्तरे दिली.राहूल यांची यात्रा,पंतप्रधान मोदी यांचा आगामी अमेरिकेचा दौ-यासोबत राहूल यांची तुलना,एनआरआई समुदायाविषयी हे प्रश्‍न होते.
मात्र,बांग्लादेशातील हिंदूंवर होणा-या हिंसेबाबत प्रश्‍न विचारताच सगळा माहोल बदलला.राहूल गांधी अमेरिकेच्या खासदारांसोबतच्या भेटी दरम्यान बांग्लादेशात मारल्या जाणा-या हिंदूंविषयी देखील चर्चा करतील का?असा प्रश्‍न विचारला असता,हे राहूल आणि अमेरिकी खासदारांवर निर्भर करतं ते कोणते मुद्दे घेतात,मी त्यांच्या बाजूने यावर काही सांगू शकणार नाही,असे पित्रोदा म्हणाले मात्र,त्याच वेळी एक व्यक्ती जोरात ओरडला व माझा हा प्रश्‍न ‘विवादास्पद‘असल्याचा आक्षेप घेतला.क्षणार्धात त्या व्यक्तीच्या बाजूने इतर अनेक व्यक्ती उभे झाले.राहूल गांधीच्या एडवांस चमूतील एका व्यक्तीने माझा मोबाईल हिसकला आणि ‘बंद करा,बंद करा’म्हणत ओरडू लागला.
या घटनेने सॅम आणि मी दोघेही अवाक झालो मात्र,राहूलच्या चमूने जणू निर्णयच घेतला होता,एका व्यक्तीने माझा माईक हिसकण्याचा प्रयत्न केला मात्र,मी माईक त्या व्यक्तीच्या हाती लागू दिला नाही.ते हेतुपुरस्सर माझी रेकॉर्डिग थांबविण्यात यशस्वी झाले होते.त्यांनी माझा मोबाईल जबरदस्ती हिसकला.याच वेळी पित्रोदाला त्यांनी राहूल गांधींना भेटण्यासाठी विमानतळावर पाठवून दिले.
यानंतर जवळपास १५ लोक माझ्या खोलीत आले आणि मला मुलाखतीमधला शेवटचा प्रश्‍न डिलीट करण्यास सांगू लागले.मी त्यांना समजावले की त्या प्रश्‍नामध्ये विवादास्पद असे काहीही नाही पण एखाद्या पत्रकारासोबतचे त्यांचे कृत्य हे अनैतिक आहे.पण,ते जणू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.त्यांनी माझा मोबाईल हिसकला व मोबाईलसोबत छेडछाड करु लागले.

मुलाखत डिलीट करण्याचा प्रयत्न करु लागले,शेवटी त्यांनी फोटो लायब्ररीतून ते डिलीट केले.ते ‘रिसेंटली डिलीटेड‘फोल्डरपर्यंत नाही जाऊ शकले कारण ते उघडण्यासाठी ‘फेस आयडी‘ची गरज होती.
त्यातील एकाने चतुराईने मोबाईल माझ्या चेह-यासमोर आणला आणि ते फोल्डर अनलॉक झाले,शेवटी त्यांनी त्या ही फोल्डरमधून ती मुलाखत डिलीट केली.यानंतर  icloud सुद्धा तपासले,मात्र माझा फोन एयरप्लेन मोडवर असल्याने व्हिडीयो सिंक होऊ शकला नाही.
जवळपास ३० मिनिटांपर्यंत माझा खासगीपणा व माझ्या पत्रकारितेच्या सर्व मर्यादाचे राहूल गांधींच्या समर्थकांनी उल्लंघन केले.काही लोक तर माझा मोबाईल चार दिवस परत न करण्याविषयी चर्चा करीत होते.मी फार प्रयत्नाने त्यांच्याकडून आपला मोबाईल परत मिळवला.माेबाईल माझ्या हातात नसल्यामुळे मी आपातकालीन ९११ क्रमांकावरही कॉल करु शकलो नाही.हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर मी पित्रोदाला टेक्स्ट मॅसेज करुन घटनेची माहिती दिली.यावर त्यांनी उद्या पुन्हा मुलाखत घेऊ असे उत्तर पाठवले मात्र,असे घडले नाही,असे पत्रकार शर्मा सांगतात.
एकीकडे राहूल गांधी अमेरिकेतील मिडियासोबत भारतातील माध्यमांच्या लोप पावत असणा-या अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी बोलत होते ,दूसरीकडे त्यांचीच चमू एका पत्रकाराला त्यांना न आवडणा-या प्रश्‍नामुळे झुंडशाहीतून गप्प बसवती झाली.मजेदार बाब म्हणजे प्रेस क्लबच्या इवेंट मॉडरेटरने नंतर हाच प्रश्‍न राहूल गांधींना विचारला जो काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स ’माध्यमावर देखील ट्टीट करण्यात आला.
रोहित शर्मा हे अमेरिकेच्या वाॅशिंगटनमधील पुरस्कार विजेते पत्रकार आहे.अमेरिकेत पत्रकारांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे आहेत,मग तो पत्रकार कोणत्याही समुदाय,देश किवा धर्म,वंशाचा असो.या घटनेच्या विरोधात दोषींना कठोर शिक्षा होऊ शकते.
पंतप्रधान मोदी यांनी १५ सप्टेंबर राेजी एका सभेत याच घटनेचा उल्लेख करुन ‘जे मोहब्बत की दूकान चालवतात,ज्यांच्या तोंडात संविधानाच्या गोष्टी आहेत तेच संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन करीत आहेत’अशी टिका राहूल गांधींवर केली.
या घटनेच्या विरोधात आज दिल्लीतील प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाच्या कार्यालया समोर देशातील नामवंत पत्रकारांनी आज प्रदर्शन केले.
यूएस ते नागपूर….
जी घटना यूएसमध्ये घडली अगदी तशीच घटना मध्य नागपूरात २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीच्या वेळी घडली.तिथे ही खुल्या मंचावर भारतीय जनता पक्ष,काँग्रेस व इतर राजकीय पक्षांचे उमेदवार,नेते यांना आमंत्रित करुन खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती.मात्र,काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांना पहिल्यांदा बोलण्याची संधी मिळाली आणि ते भाजपच्या नीती व कारभारावर भरभरुन बोलले.यानंतर भाजपचे माजी महापौर,तत्कालीन नेते दयाशंकर तिवारी यांना बोलण्याची संधी मिळाली मात्र,सूत्र संचालन करणारे संजय मिरे यांनी वेळेवर मुद्दे संपवण्याची बाब सांगताच, सर्वांच्या समोर दयाशंकर तिवार यांनी मिरे यांच्या थोबाडीत जोरात हाणली!
या घटनेनंतर सभास्थळी जोरदार राडा झाला.खुर्च्यांची फेकाफेक झाली.या सर्व गोंधळाचे चित्रण घटनास्थळी उपस्थित एका महिला पत्रकारानेही केले होते.भाजपचे समर्थक यांनी तिवारी यांच्या आदेशावरुन महिला पत्रकाराच्या हातातून तिचा मोबाईल हिसकला!तो लॉक होता मात्र,जबरन लॉक उघडायला लावला.मोबाईलच्या गॅलरीत महिला पत्रकाराच्या कुटूंबियांची खासगी छायाचित्रे होती,ती सर्व धुंडाळण्यात आली.जबरन घटनेची संपूर्ण व्हिडीयो रेकाँर्डिग आणि छायाचित्रे भाजपच्या युवा समर्थकांनी डिलिट केली. भाजप समर्थकांचे हे कृत्य त्या महिला पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन नव्हते का?
या घटनेची नागपूरातील सर्व माध्यमांनी ठलकपणे दखल घेतली होती.थोडक्यात,अलीकडच्या काळात नेते तसेच समर्थकांमध्ये पराकोटीची ‘असहिष्णूता’आढळून येत असून,कोणताही राजकीय पक्ष असो,सत्य दाखवणे,सत्य छापणे,सत्य सांगण्याचा प्रयत्न करणा-या पत्रकारांच्या विरोधात धाकदपटशाहीतून,झूंडशाहीच्या मानसिकतेतून संविधानविरोधी कृती घडताना दिसून पडते.यूएस पासून नागपूरपर्यंतच्या घटनेमध्ये नेते हे जरी वेगळे असले तरी प्रवृत्ती आणि कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी हीच होती,यात दुमत नाही.
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या