फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपारडीत आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

पारडीत आठ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार

अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर,ता.१६ सप्टेंबर २०२४: पारडीतील शामनगर भागात मजूरी करणा-या दाम्पत्यांच्या आठ वर्षीय चिमुकलीवर ३० ते ३५ वर्ष वयोगटाच्या अज्ञात इसमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना काल रविवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली.
पिडीतेचे आई-वडील हे मजूरीचे काम करीत असून काल देखील ते कामावर गेले होते.पिडीत मुलगी आपल्या ६ वर्षीय बहीणीसोबत अंगणातच खेळत असताना एका अज्ञात इसमाने त्यांना एका व्यक्तीचे नाव विचारुन चिमुकल्या त्या व्यक्तीला ओळखतात का?म्हणून विचारणा केली.त्या पूर्वी एका महिलेला देखील आरोपीने,अशोक नावाच्या व्यक्तीला ओळखता का?तो कुठे राहतो?अशी विचारणा केली होती,त्या महिलेने अश्‍या नावाचा व्यक्ती इथे राहत नसल्याचे सांगितले.यानंतर त्याने अंगणात खेळत असणा-या पिडीतेला तीच विचारणा केली.

पिडीता व तिची बहीण एकटेच असल्याचे व त्यांचे आई-वडील घरात नसल्याची संधी साधून आरोपीने आठ वर्षीय चिमुकलीला घराच्या आत नेले व बळजबरी केली.याच वेळी पिडीतेची लहान बहीण देखील सोबत होती,चिमुकल्यांनी घाबरुन आरडाओरड केल्यावर आरोपी हा पसार झाला.
मात्र,पिडीत चिमुकलीला योनि मार्गात गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.पारडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक रंजीत शिरसाट यांनी पिडीतेला काल रात्रीच वैद्यकीय उपचारानंतर सुटी देण्यात आल्याची माहिती दिली.

महत्वाचे म्हणजे अशीच एक बलात्काराची घटना यशोधरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत घडली तर हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पित्याने आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटनेची नोंद झाली.

पारडीच्या घटनेतील मजूर दाम्पत्य हे गोंदियामधून नागपूरात मोल मजुरीसाठी आले आहेत.पिडीतेच्या वडीलांना अपघात झाल्याने हे कुटूंब परत आपल्या गावी गेले होते.तीन महिन्या पूर्वीच हे कुटूंब नागपूरात परतले होते.कालच्या धक्कादायक घटनेमुळे पिडीत चिमुकली अत्यंत घाबरली असून, आता ती गोंधळलेल्या अवस्थेत वेगवेगळी बाब पोलिसांना सांगत आहे.तिला सलग घटनाक्रम देखील सांगता येत नसल्याची माहिती समोर आली आहे.एकच गोष्ट पेालिस खात्यातील अनेक जण तिला वारंवार विचारत असल्यामुळे जे ते सांगत आहेत,आता तेच पिडीत बालिका बोलत असल्याची बाब सूत्राने दिली.

अत्यंत विकृत लैंगिकतेच्या घटनेला ही चिमुरडी सामोरे गेली असून, अशीच घटना महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईतील बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन अवघ्या पावणे चार वर्षांच्या चिमुरड्या विद्यार्थिंनींसोबत घडली.आरोपी अक्षय शिंदे याने चिमुकलींच्या निष्पाप अज्ञानाचा फायदा उचलत आपल्या वासनांध कृत्याची पूर्तता केली होती.या घटनेमुळे संपूर्ण राज्यात प्रचंड जनक्षोभ उसळला व मोठे जनआंदोलन देखील झाले.तशीच घटना काल महाराष्ट्राच्या उपराजधानीत देखील घडली व समाजात खुलेअाम वावरणा-या काही लिंगपिसाट मनोविकृतांच्या वासनांध कृत्याला निष्पाप चिमुकल्या या बळी पडत असल्याच्या घटना वाढत असल्याचे दिसून पडत आहे.

महत्वाचे म्हणजे नागपूर हे शहर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असून बलात्कार व लैंगिक शोषनाच्या घटनांचा चढता आलेख, हा बालकांच्या आणि महिलांच्या सुरक्षीत जगण्याला आव्हान देणारा आहे.निश्‍चितच पोलिस विभाग घरोघरी सुरक्षा पुरवू शकत नाही मात्र, तरी देखील दिवसाढवळ्या आपली मनोविकृत लैंगिक भूक भागवण्यासाठी ‘सावज’शोधत फिरणा-या लिंगपिसाटांवर जरब बसावी,अशी कृती पोलिसांकडून होणे गरजेचे आहे.

कोलकत्याच्या आर.जी.कर.रुग्णालयातील प्रकरणात तर एका वरीष्ठ पोलिस अधिका-याने आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मृतक महिला डॉक्टरच्या पालकांनी केल्यानंतर पोलिसांची प्रतिमा देशभरात आधीच डागाळलेली असताना,बदलापूराच्या घटनेत एफआयआर दाखल करण्यासाठी चिमुकल्या पिडीतेसोबत गर्भवती आईलाच १२ तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्याचा अक्षम्य प्रकार घडला त्याची दखल न्यायालयाच घ्यावी लागली.

कोणत्याही पोस्को प्रकरणात कायदे कितीही कठोर असले तरी त्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ही असंवेदनशील असल्यास पिडीतांना न्याय मिळत नसतो.बदलापूरच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या कठाेर टिकेला पोलिस विभागाला सामोरे जावे लागले होते.किमान नागपूरात घडणा-या चिमुकल्यांसोबत घडणा-या बलात्काराच्या घटनेत नागपूर पोलिसांनी संवेदनशीलतेने घटनेचा तपास करुन तात्काळ आरोपींच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी केली जात आहे.
………………………………..

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या