लाहोरीचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची संजय राऊतांची मागणी
आमदार विकास ठाकरेंचं मतदार संघावर असं आहे का लक्ष?नेटीझन्सची विचारणा
पोलिसांनी सारे तथ्य समोर आणले,राजकारण करने योग्य नाही:फडणवीस
संकेत बावणकुळेला पोलिसांनी वाचवलं:वडेट्टीवारांचा आरोप
सुषमा अंधारे गाठणार सीताबर्डी पोलिस ठाणे!
नागपूर,ता.१० सप्टेंबर २०२३: ऑडी कारचालकाने रविवारी मध्यरात्री रामदासपेठ परिसरात भरधाव वेगाने तो थरार घडवून आणला त्याची चर्चा आज देखील महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवरील माध्यमात ’टॉप’ वर होते.समाज माध्यमांवर देखील या घटनेविरुद्ध खरमरीत प्रतिक्रिया उमटल्या.या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज आज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ऑडीचा वेग,वाहनचालकाची मस्ती,बेपर्वा वृत्ती बघून सर्वत्र संतापाची लाट उसळलेली दिसून पडतेय.मूळात धरमपेठच्या लाहोरी बारमधून मद्य प्राशन करुन वेगाची शर्यत लावणा-यांमध्ये आणखी कोण-कोण सहभागी होतं?यावर देखील बरीच खलबते झाली व भाजपच्याच आणखी एका आमदाराचा सुपुत्र याची ही चर्चा समाज माध्यमावर झळकली.!
वेगाच्या या शर्यतीत तो देखील याच कार मध्ये असल्याचा दावा केला जात आहे.परिणामी,अपघात,पळून जाणे,पुन्हा अपघात करने,जमावाने मारहाण करने,पोलिसांच्या स्वाधीन करने या सर्व सोपस्कारात, दूस-या आमदार पुत्रावर कोणाचाही ‘फोकस’ नव्हता कारण ऑडीचा मालक संकेत बावणकुळे असल्याने ,तसेच अपघाताच्या वेळी तोच ऑडी चालवित असल्याचा आरोप करणा-या विरोधकांचेही संपूर्ण ‘लक्ष्य’हे बावणकुळेच असल्याने, त्यामुळे लाहोरी ते रामदासपेठ दरम्यान काय नेमके घडले ,कोण-कोण सोबत होतं,याचे वास्तव महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणायचे असल्यास शिवसेनेचे खासदार संजय राऊत मागणी करतात त्याप्रमाणे, लाहोरी बारमधील सीसीटीव्ही फूटेज तपासले तर भाजपच्या दूस-या आमदार पूत्राच्या उपस्थितीच्या थ्योरीचा खरे-खोटेपणा समाेर येईल,अशी मागणी केली जात आहे.कारण,संकेत बावणकुळे,अर्जुन हावरे व रोनित चित्तमवार यांच्या व्यक्तीरिक्त आणखी एक चौथा ‘मित्र’ऑडीमध्ये सोबत होता,त्या चौथ्या मित्राचे नाव पोलिसांनी का जाहीर केले नाही?असा सवाल केला जात आहे.
पोलिसांचा तर संपूर्ण प्रयत्न संकेत बावणकुळेला देखील चौकशीच्या ससेमि-यातून वाचविण्याचा होता म्हणूनच काल दुय्यम पोलिस उपनिरीक्षकानी माध्यमाला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये फक्त अर्जुन व रोनितचेच नाव त्यांनी घेतले मात्र,आज परिमंडल क्र.२ चे पोलीस उपायुक्त राहूल मदने यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीत कारमध्ये संकेत बावणकुळे असल्याच्या आरोपाला दूजाेरा देत ,संकेतला देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते,असे सांगितले.चालकाला अटक केली व नंतर सूचनापत्र देऊन सोडण्यात आल्याचे मदने यांनी सांगितले.तिघांचेही रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून चालक हा नशेत होता असं प्राथमिक तपासात आढळून आल्याचे मदने यांनी सांगितले.
रामदासपेठमधील थरार घडवल्यानंतर याच दुर्घटनाग्रस्त झालेल्या ऑडीने पळून जात असताना मानकापूर टी-पॉईंट परिसरात पोलो कारला धडक दिली.पोलोवाल्यांनी ऑडीचा पाठलाग करुन मानकापूर पुलावर अडवले.अर्जुन व रोनितला चांगलाच चोप देऊन तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणले.तहसील पोलिसांनी दोघांना सीताबर्डी पोलिसांच्या हवाली केले.सोमवारील सकाळी पोलिसांनी ऑडी ‘टो’करुन सीताबर्डी पोलिस ठाण्यात आणली तेव्हा ऑडीच्या दोन्ही नंबरप्लेट्स कारच्या आत होत्या!
संजय राऊतांनी पोलिसांच्या तपासावर चांगलेच तोंडसुख घेत, एफआयआरमध्ये ऑडी मालकाच्या नावाचा समावेश का नाही?असा सवाल केला.पोलिसांनी संकेत बावणकुळेला वाचवण्यासाठी चालकाची अदलाबदली केली,असा आरोप करीत फडणवीस हे गृहमंत्री पदाच्या लायकीचे नाहीत,अशी जळजळीत टिका त्यांनी केली.
फडणवीस यांनी या घटनेत पोलिसांनी योग्य तपास केला असून सगळी तथ्ये समोर आणली असल्याचे सांगितले. बावणकुळे यांना टार्गेट करुन राजकारण करने चुकीचे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांनी पोलिसांवर दबाव असून संकेत बावणकुळेला वाचवण्यात आल्याचा आरोप केला तर त्याच काँग्रस पक्षाचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी पोलिसांच्या तपासावर संपूर्ण समाधान व्यक्त करुन,घटना माझ्या मतदारसंघात घडली असून माझे माझ्या मतदारसंघाकडे पूर्ण लक्ष असल्याची पुश्ती जोडली.यावर,लाहोरी ते रामदासपेठ दरम्यान रविवारी मध्यरात्री जे घडले त्याकडे विकास ठाकरेंचे लक्ष होते का?असा सवाल केला जात आहे.
चंद्रशेखर बावणकुळे यांनी आज देखील प्रतिक्रिया देत अपराधी कोणी ही असो योग्य कारवाई झाली पाहिजे,असे सांगून मी पुण्यात असून पोलिसांकडून मी संपूर्ण माहिती मागवली असल्याचे ते सांगतात.
फोनवरुन माहिती मागवल्याच्या संदर्भातून सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या चुकीच्या बिलावर स्वाक्षरी करण्यास नकार देणा-या मनपाच्या एका महिला अधिका-याला असाच एक फोन आला होता!कंत्राटदाराच्या बिलावर ताबडतोब सही द्या,असा हूकूमच ‘पलीकडून’सोडण्यात आला होता.‘कॅफो’ला याची कल्पना आहे ते तुमच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही,निर्धास्त रहा,असे आधारेचे बोल देखील ऐकवण्यात आल्याने, त्या महिला अधिकारीने बिलांच्या फाईलवर सही करुन स्वत:ची सुटका करुन घेतली,नाही तर तिच्या एवढ्या वर्षांच्या नोकरीवरच फक्त एका ‘फोन’ने गदा आणली असती!सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकामाचे कंत्राटदार नेमके कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्यांचे कोण असतात, हा किस्सा मनपाच्या वर्तुळात चांगलाच चघळला गेला होता!
आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या सीताबर्डी पोलिस ठाण्याला ’भेट’देणार असल्याची वार्ता आहे,त्या आल्यानंतर मााध्यमांना आणखी एक खाद्य,या पलीकडे काहीही हाती लागणार नाही.खरंच दोषींना शिक्षा हाच अंधारेंचा हेतू आहे का?हीच घटना आदित्य ठाकरेंच्या हातून घडली असती तर?अंधारेंची काय प्रतिक्रिया असती!
थोड्यात,राजकारणाचा भाग सोडला तरी घडलेली थरारक घटना ही कोणाच्याही मनाचा थरकाप उडवणारी होती.नशीब बलवत्तर असल्यानेच ऑडीने धडक दिलेल्या वाहनचालकांचा जीव वाचला.आरोपी कोणीही असला आणि कितीही मोठ्या बापाचा मूलगा असला तरी कायद्यानुसार त्याला शिक्षा झालीच पाहिजे,एवढीच अपेक्षा जनसामान्यांची असते,मात्र,असे घडत नाही. मोठ्या धेंड्यांची मुले ही कायमच ‘निर्दोष‘असतात!संपूर्ण यंत्रणा आरोपींना वाचवण्यासाठी जेव्हा तत्पर होते त्यावेळी राजकारण्यांवरचा विश्वास उडतो.त्यामुळेच राजकारण्यांच्या तोंडी जनतेचा कैवार,शेतक-यांचे हित अश्यासारख्या शब्दांचा तिटकारा वाटतो.विरोधी पक्षातील आमदार देखील जेव्हा एवढ्या गंभीर घटनेवर बोटचेपे धोरण स्वीकारतात तेव्हा जनतेची निराशाच होते.
संकेत बावणकुळे याच्या केसालाही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी पोलिस विभाग घेणारच असा आरोप करीत,ऑडीमधला चौथा मित्र कोण?हे रहस्य ना सत्ताधारी ना विरोधकांना मनापासून उलगडायचे आहे,त्यामुळे हे प्रकरण देखील काही काळानंतर सामान्य जनतेच्या विस्मरणात जाईल याची खात्रीच सत्ताधा-यांना व ‘हितसंबधी’ विरोधकांना असल्याने, या प्रकरणात लाहोरी ते रामदासपेठ दरम्यान नेमके काय घडले?हे साक्षात ब्रम्हदेव पृथ्वीवर अवतरले तरी देखील सत्य समोर आणू शकणार नाहीत,अशी टिका करीत,जनतेने देखील हा अपघात,हा थरार,ही मस्ती,ही बेपर्वाई,हा उन्माद जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर विसरुन जाण्यातच भलाई असल्याचा सल्ला नेटीझन्स देतात.