त्यांनी ८०० हून अधिक चित्रपटासाठी दहा हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत.आशा भोसले या अष्टपैलू गायिका म्हणून ओळखल्या जातात.आशा भोसले यांनी आपली कारर्कीद सुमारे १९४३ मध्ये सुरु केली होती.१९४३ साली आशा भोसले यांनी दत्ताजी डावजेकर यांनी संगीत दिलेल्या ‘चला चला नव बाळा’ हे गीत ‘माझे बाई’या मराठी चित्रपटासाठी गायले हाेते. तर हिंदी चित्रपटात त्यांचे पदार्पण ’चुनरिया’चित्रपटातून १९४८ साली झाले.या चित्रपटात त्यांनी ‘सावन आया’हे गीत गायले होते.
वयाच्या ९ व्या वर्षी त्यांच्या वडीलांचे निधन झाले त्यामुळे त्यांचे कुटूंब पुण्याहून कोल्हापुरात व त्यानंतर मुंबईला आले.कुटूंबाला हातभार लावण्यासाठी लता मंगेशकर यांच्यासह आशा यांनी देखील पार्श्वगायनास सुरवात केली.त्यांचे पहीले एकल हिंदी चित्रपट गीत १९४९ मधील‘रात की रानी’या चित्रपटासाठी हाेते.वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी ३१ वर्षीय गणपतराव भोसले यांच्याशी कुटूंबियांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले.हे लग्न अपयशी ठरले.तिसरे अपत्य गर्भात असताना आशा यांनी पतीचे घर कायमचे सोडले व माहेरी आल्या.गणपतराव व त्यांचे मोठे बंधू हे आशा यांना कायम मारझोड करीत असल्याचे व माहेरी जाण्यास बंदी घालत असल्याचे सांगितल्या जातं.
आशा यांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पार्श्वगायनास सुरवात केली.सुरवातीला आशा यांनी बी-ग्रेड व सी-ग्रेड समजल्या जाणा-या चित्रपटात पार्श्वगायन केले.यानंतर परिणीता(१९५३),बूट पॉलिश(१९५४)सीआयडी(१९५६)आणि नया दौर(१९५७)या चित्रपटांसाठी गायलेल्या गाण्यांमुळे आशा यांना सुरवातीची लोकप्रियता मिळाली.
बी.आर.चोप्राच्या ‘नया दौर’या चित्रपटात गायलेल्या युगल गीतांनी आशा भोसले यांना स्वत:ची ओळख मिळवून दिली.यानंतर त्यांना त्या काळातील आघाडीच्या सर्व अभिनेत्रींसाठी गाणी गाण्याची संधी मिळाली.बी.आर.चोप्रा यांनी त्यांच्या गुमराह,वक्त,आदमी और इंसान आणि धुंद यासारख्या नंतरच्या चित्रपटात देखील आशा यांच्याकडून अप्रतिम गाणी गाऊन घेतली.
याच काळात संगीतकार ओ.पी.नय्यर यांच्या तालमीत आशा यांचे गाणे बहरले,धुंद झाले आणि बघता-बघता रसिक श्रोत्यांच्या काळजात अगदी वरच्या पातळीवर विराजमान झाले.१९५२ मध्ये छम छम छमच्या संगीत रेकॉडिंगमध्ये नय्यर हे आशा यांना पहील्यांदा भेटले.मंगू या चित्रपटासाठी नय्यर यांनी आशा यांना बोलावले होते नंतर सीआयडी मध्ये आशा यांना गायनाची संधी दिली.नया दौर चे संगीत व गाणी सुपरहिट झाली त्यातून नय्यर-आशाची जोडी देखील सुपरहिट ठरली.नय्यर-आशा यांच्या सुपरहिट गाण्यामधील १९५८ साली हावडा ब्रिज मधील ‘आईये मेहरबां१९६५ सालातील’मेरे सनम मधील ‘ये है रेशमी जुल्फो का अंधेरा’,तसेच ‘जाईये आप कहां जायेंगे ‘चित्रपट किस्मत मधील ‘आओ हूजूर तुमको सितारो मे ले चलू’ही एव्हरग्रीन गाणी सांगता येतील.
नय्यर-आशा यांची जोडी तुमसा नही देखा(१९५७)एक मुसाफिर एक हसीना(१९६२)आणि कश्मीर की कली(१९६४)या चित्रपटात देखील लोकप्रिय झाली.एक मुसाफिर एक हसीना चित्रपटातील ‘मै प्यार का राही हूं’हे गीत,कश्मीर की कली मधील दिवाना हूआ बादल,इशारो इशारो मे दिल लेनेवाले ही रफी साहेबांसोबतची युगलगीत लोकप्रियतेच्या उच्चांकावर विराजमान होती.ओ.पी.नय्यर यांच्यासाठी आशा भोसले यांनी शेवटचे गाणे १९७४ साली चित्रपट ‘प्राण जाये पर वचन ना जाये‘साठी गायले.ते गीत होते ‘चैन से हमको कभी आपने जीने ना दिया’.१९७२ मध्ये ते वेगळे झाले.
आशा यांनी संगीतकर रवी यांच्यासाठी देखील अनेक लोकप्रिय गाणी गायली.रवि यांच्या संगीतरचनेत आशा यांनी गायलेले ‘चंदा मामा दूर के’ही सुमधूर लोरी गायली जी एका रात्रीत सर्व मातांमध्ये लोकप्रिय झाली.याशिवाय किशोर कुमार यांच्यासोबत ‘ सी ए टी कॅट,कॅट माने बिल्ली’
चित्रपट दिल्ली का ठग यासाठी हे कॉमिक युगल गीत गायले जे खूप लोकप्रिय झाले.आशा यांनी काजल चित्रपटासाठी गायलेले भजन ‘तोरा मन दर्पण कहलाये हे देखील श्रोत्यांना भक्तीरसात न्हाऊन गेले.
शंकर जयकिशन यांनी आशा यांच्याकडून ‘पर्दे मे रहने दो पर्दा ना उठाओ’,जिंदगी एक सफर है सुहाना हे गीत गाऊन घेतले.पर्दे मे रहने दो यासाठी आशा यांना दूसर फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.आशा यांनी शंकर जयकिशन यांच्यासाठी बूट पॉलिश(१९५४)श्री ४२०(१९५५)जिस देश मे गंगा बहती है(१९६०)जंगली(१९६१)एन इव्हनिंग इन पॅरिस(१९६८)आणि कल आज और कल(१९७१)साठी देखील गाणी गायली आहेत.आशा यांनी ‘मेरा नाम जोकर’ साठी देखील गाणे गायले आहे.
आशा भोसले यांनी त्यावेळचे सुप्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मन यांच्यासोबत देखील पार्श्वगायन केले.सचिन दा यांच्या मात्र आवडत्या गायिका लता मंगेशकर या होत्या.परंतु,१९५७ ते १९६२ या काळात सचिन दा यांनी आशा भोसले यांच्याकडून काला पानी,काला बाजार,इंसान जाग उठा,लाजवंती,सुजाता आणि तीन देवियां अश्या अनेक चित्रपटात पार्श्वगायन करुन घेतले.१९६३ साली देखील सचिन दा यांनी बिमल रॉय यांच्या बंदिनी साठी ‘अब के बरस मेरे भैया को बाबूल’हे गीत तसेच १९६७ साली ज्वेल थीफ मध्ये ‘रात अकेली है बूझ गये दिये’हे अत्यंत मोहक गाणे गाऊन घेतले.
यानंतर आशा यांची जोडी संगीतकार आर.डी.बर्मन म्हणजेच राहूल देव बर्मन म्हणजेच पंचम यांच्यासोबत जमली.आशा यांनी पंचम सोबत कॅबरे,रॉक,डिस्को,गझल आणि शास्त्रीय गाणी देखील रेकॉर्ड केली.त्यांच्या भागीदारीने हिंदी चित्रपटांतील पाश्चात्य गाण्यांना एका नव्या दिशेने नेले आणि १९७० चे दशक हे याच प्रकारच्या गाण्यांनी ढवळून निघाले.चित्रपट कारवा मधील ‘पिया तू अब तो आजा’,पुढे १९७१ मधील हरे रामा हरे कृष्णा मधील ‘दम मारो दम’असो १९७२ मधील दूनिया चित्रपटातील ‘दूनिया में लोगो को धोका ’किवा १९७३ साली आलेल्या यादो की बारात मधील ‘चुरालिया है तुमने जो दिल को’कोण विसरु शकणार आहे?
किशोर-आशाच्या जोडगोडीने गायलेल्या जवानी दिवानी मध्ये ‘जाने जा ढूंढता फिर रहा’बुढ्ढा मिल गयो मध्ये ’भली भली सी एक सूरत’सागर चित्रपटात ‘ओ मारिया ओ मारिया’या गीतांनी एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
आशा यांनी १९८९ साली आर डी बर्मनसोबत लग्न केले आणि सूर आणि संगीताचा हा संगम बर्मन यांच्या मृत्यूपर्यंत कायम होता.मात्र,बर्मन यांच्या अति सिगारेट व मद्य सेवनामुळे आशा या पंचम यांच्या शेवटच्या काही काळात वेगळ्या राहू लागल्या होत्या.
आशा यांनी ए.आर.रहमान यांच्यासोबत रंगीला चित्रपटात १९९४ साली ‘तन्हा तन्हा’हे गीत गायले.त्यांचेच ‘रंगीला रे’हे गीत ब्लॉकबस्टर ठरले. रक्षक चित्रपटातील ‘मुझे रंग दे मुझे रंग दे’लगान चित्रपटातील ‘राधा कैसे ना जले’ताल चित्रपटातील ‘कही आग लगे लग जाये’ही लोकप्रिय हिंदी तर काही तेलगू गाणी देखील आशा यांनी संगीतकार रहमान साठी गायली आहेत.
संगीतकार अनु मलिक यांच्यासाठी बाजीगर चित्रपटासाठी ’किताबे बहोत सी लिखी होगी तुमने’तसेच ‘ये लम्हा फिलहाल’ हे गाणे फिलहाल चित्रपटासाठी गायली असून अनु मलिक यांच्या वडीलांसाठी सरदार मलिक यांच्यासाठी १९६० साली ‘सारंगा‘ चित्रपटासाठी आशा यांनी आपला स्वर दिला होता.
आशा यांना १९६६ साली दस लाख चित्रपटातील ‘गरिबो की सूनो वाे तुम्हारी सुनेगा’१९६८ साली पर्दे मे रहने दो’फिल्म शिकार,१९७१ साली ‘पिया तू अब तो आजा’फिल्म कारवांसाठी,१९७२ साली फिल्म हरे रामा हरे कृष्णा चित्रपटातील ’दम मारो दम’चित्रपट नैना साठी १९७३ साली ‘होने लगी है रात’या गाण्यासाठी,१९७४ साली प्राण जाये पर वचन ना जाये या चित्रपटातील ‘चैन से हमको कभी आपने जीने ना दिया’या गाण्यासाठी तसेच १९७८ साली आलेल्या डॉन चित्रपटातील ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’या गाण्यांसाठी सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायनाच्या फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले असून १९९६ साली रंगीला चित्रपटातील गायनासाठी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.२००१ साली आशा भोसले यांना फिल्म फेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला असून १९८१ साली उमराव जान तसेच १९८६ साली इजाजत चित्रपटातील ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है‘या गीतासाठी
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.याशिवाय २००२ साली ‘राधा कैसे ना जले’ तसेच २०११ साली आयफा जीवनगौरव पुरस्काराने आशा यांना सन्मानित करण्यात आले.सर्वात मोठा सन्मान आशा भोसले यांचा भारत सरकारकडून दादासाहेब फालके तसेच पद्मविभूषणसारखा पुरस्कार देऊन झाला.
ऑक्टोबर २००४ मध्ये द वेरी बेस्ट ऑफ आशा भोसले,द क्वीन ऑफ बॉलीवूड या अल्बमचे संकलन केले.यात अाशा यांनी १९६६ पासून २००३ दरम्यान प्रदर्शित झालेल्या अल्बम आणि हिंदी भाषेतील चित्रपटांसाठी रेकॉर्ड केले होते,त्यांचा समावेश आहे.२०१३ साली वयाच्या ७९ व्या वर्षी ‘माई‘या चित्रपटात ६५ वर्षाच्या आईची मुख्य भूमिका साकारली जिला अल्झायमर आजार असतो व जिला तिच्या मुलांनी सोडून दिलं असतं.आशा यांनी २०२० मध्ये आशा भोसले ऑफिशियल नावाने यूट्यूब चॅनल देखील सुरु केले.त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमधेय नोंद आहे.
स्वयंपाकाच्या आवडीमुळे अाशा या यशस्वी रेस्टाॅरेंट व्यवसायात उतरल्या.दुबई व कुवेतमध्ये ‘आशा‘नावाने ओळखले जाणारे रेस्टॉरेंट त्या चालवतात.इतर अबु धाबीच्या खालदिया मॉल,दोहाच्या व्हिलेजिओ आणि बहरीनच्या सिटी सेंट्रल मॉल,कैरो,इज्पितमध्ये त्यांचे रेस्टॉरेंट आहेत.
त्यांना तीन अपत्य असून हेमंत भोसले,वर्षा भोसले तसेच आनंद भोसले अशी त्यांची नावे आहेत.गणपतराव भाेसले यांच्यासोबत त्या १९४९ ते १९६० पर्यंत नात्यात होत्या.
यानंतर त्यांचे नाव सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी.नय्यर यांच्यासोबत जुळले.आशा भोसले यांना आजचा मुकाम हासिल करण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला.गीता दत्त,शमशाद बेगम आणि त्यांची थोरली बहीण लता मंगेशकर यांनी नाकारलेली गाणी आशा भोसले यांच्या वाट्याला येत होती.आशा यांना ही गाणी आवडत नसे मात्र,प्रपंचासाठी त्यांनी सर्व प्रकारची गाणी गायली.आपले क्षेत्र स्थिर करण्यासाठी आशा यांच्यावर साम,दाम,दंड भेदाची नीती अवंलबविण्याचा देखील आरोप झाला.त्यांचे आयुष्य घडविण्याची संधी वारंवार त्यांना नशीब आणि परिस्थितीमुळेच मिळत गेली.लता मंगेशकर यांचे स्वीय सचिव गणपतराव यांच्यासोबत लग्नानंतर आशा यांच्या आयुष्यात खूप वादळ आलेत.गणपतराव यांच्यासोबत घटस्फोटानंतर देखील आशा यांनी भोसले आडनावच चित्रपटसृष्टित कायम ठेवले कारण लता ‘मंगेशकर‘ या आडनावाखाली त्यांना कोणताही स्वत:चा परिघ निर्माण करने शक्य नव्हते.आशा भाेसले यांच्या आवाजाच्या पट्टीचा सर्वात आधी सर्वात चांगला वापर करुन घेणारे संगीतकार ओ.पी.नय्यर हेच होते.काश्मीर की कली मध्ये याचा प्रत्यय येतो.जाईये आप कहां जायेंगे…हे गाणे कळस होते.
आशा-नय्यर अध्याय हा आशा यांच्यासाठी जरी लोकप्रियतेच्या उच्चांकावर नेणारा होता तरी नय्यर यांच्यासाठी मात्र,आयुष्यातून उठवणारा होता.आशा-नय्यर यांच्या सबंधांच्या काळात नय्यर हे विवाहीत होते व चार मुलांचे पिता होते.त्यांच्या पत्नीला नय्यर यांच्या या संबंधांतून खूप वेदना झाल्या मात्र,आर्थिकदृष्टया त्या संपूर्णत:नय्यर यांच्यावरच अवलंबून असल्यामुळे त्यांनी तो धोका फार वेदनेतून पचवला.१९५८ पासून १९७२ पर्यंत आशा-नय्यर यांचा हा सुरेल स्वर आणि संगीताचा सफर सुरु राहीला.नय्यर सारखा विवाहित पुरुष तर घटस्फोटिता आशा भोसले हे मुंबईत खुलेआम वावरत राहीले.मात्र,१४ वर्षांनंतर हे नातं संपुष्टात आले.ओ.पी.नय्यर यांच्या पत्नीने आपल्या चार मुलांसाठी नय्यर यांना घटस्फोट न दिल्याने आशा भोसले नय्यर सोबत लग्न करु शकल्या नाही.त्याच वेळी या दोघांचीही मुले मोठी झाली होती.परिणामी,आशा यांनी स्वत:हून हे संगीतमय नातं संपुष्टात आणलं.तोपर्यंत आशा भोसले या पार्श्वगायनाच्या क्षेत्रात सर्वात वरच्या पायरीवर पोहोचल्या होत्या कारण नय्यर हे फक्त आशा यांच्याकडूनच गाणी गाऊन घेत होते.लता मंगेशकर यांना तर नय्यर स्वत:च्या स्टूडियोजवळही फटकू देत नव्हते.नय्यरसाठी शेवटचे गाणे १९७२ साली आशा यांनी ‘चैन से हमको कभी आपने जीने ना दिया‘गायले असून यात आशा यांनी आपले संपूर्ण दु:खं ओतले होते,असं म्हटल्या जातं.
हे गीत इतकं लोकप्रिय झालं की आशा भोसले यांना १९७३ साली या गाण्यासाठी फिल्म फेअरचा अवार्ड मिळाला.मात्र,आशा भाेसले या त्या समारंभात गेल्याच नाही.परिणामी या गीताचे संगीतकार ओ.पी.नय्यर यांना ती ट्रॉफी देण्यात आली.घरी परतताना नय्यर यांनी आपल्या वेगात असलेल्या कारमधून बाहेर फेकून दिली!त्यांच्यासोबत असणारे त्यांचे एक मित्र आणि वाहन चालक हे देखील त्यांच्या या कृतीने स्तब्ध झाले.अश्या रितीने आशा यांच्याकडे ती ट्रॉफी कधी पोहोचलीच नाही.
आशा-नय्यर यांच्या संबंधामुळे नय्यर यांचे कुटूंबिय आधीच त्यांच्यापासून दूर गेले होते तर दूसरीकडे आशा भोसले यांनी देखील एका झटक्यात नय्यर यांच्यासोबत संबंध तोडले होते.नय्यर यांना आपल्या चुकीची जाणीव होई पर्यंत वेळ निघून गेली होती!१९९४ साली नय्यर यांनी आपला बंगला,कार,बँक खाते इत्यादी संपूर्ण मालमत्ता सोडून दिली व एका अनोळखी कुटूंबात पेइंग गेस्ट म्हणून राहू लागले कारण कुटूंबियांसमोर जाण्याची त्यांच्यात हिंमत झाली नाही.त्यांचे कुटूंबिय देखील त्यांना स्वीकारायला तयार नव्हते!
याच काळात आशा यांची ओळख आर.डी.बर्मन यांच्यासोबत झाले.यानंतर आशा भाेसले यांनी १९८० मध्ये त्यांच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान आर.डी.बर्मनसोबत लग्न केलं.या दोघांचेही पूर्वीचे लग्न तुटले होते.१९९४ मध्ये आर.डी यांना ह्दयाचा दौरा पडला त्यावेळी अाशा या रुग्णालयात त्यांच्यासोबत होत्या.याच ह्दयघातात आर.डींचे निधन झाले.मात्र,एेंशीच्या दशकाच्या शेवटच्या काही वर्षात आशा या आर.डींपासून वेगळया राहत होत्या.याच काळात आर.डी हे घोर आर्थिक विवंचनेत अडकले होते.
आशा यांच्या सर्वात मोठ्या मुलाचे नाव हेमंत असून वर्षा या मधल्या कन्या होत्या.हेमंत वैमानिक होते तर वर्षा या संडे ऑर्ब्जवर व रेडीफसाठी स्तंभ लिहत होती.सर्वात धाकटा आनंद भोसले आहे जाे बिजनेसमन आहे.हेमंत यांचे निधन झाले असून वर्षा यांनी ८ ऑक्टोबर २०१२ साली आत्महत्या केली.अगदी लहान वयात आशा आणि वडीलांचा घटस्फोट,आशा यांचा आपल्या संगीत व्यवसायात अतिरेकी वावर,वर्षा यांचे ही लग्न अपयशी ठरणे व घटस्फोट होणे या सर्व कारणांमुळे वर्षा ही मानसिकरित्या खचली होती. आशा यांच्याकडे आता फक्त आनंद असून त्यांची पाच नातवंडे देखील आहेत.
(छायाचित्र : आशा भोसले व मुलगी वर्षा )
१९८७ साली आशा भोसले पहीली अशी पार्श्वगायिका होती ज्यांना ग्रॅमी अवार्डसाठी नामांकित करण्यात आले होते मात्र,आशा भोसले यांच्यावर त्यांच्या काळातील सह गायिकांवर अन्यायाच्या देखील आरोप होत असतात.सुमन कल्याणपूर,हेमलता,शारदा,अनुराधा पोडवाल तसेच अलका याज्ञिक यांचे नाव घेतले जाते.असेच आरोप लता मंगेशकर यांच्यावर देखील झाले होते.इतकंच नव्हे तर यांचीच लहान बहीण उषा मंगेशकर हिला देखील पुढे येऊ देण्यात आले नाही,असा आरोप होत असतो.या दोन्ही बहीणींमध्येच आपापसात हेवेदावे व एकमेकींची गाणी पळवणे यासारखे आरोप देखील झालेत.सी.रामचंद्र यांच्या संगीत संयोजनेत ‘ए मेरे वतन के लोगो’या गीताचा सराव आधी आशा भोसले यांच्यासोबतच झाला होता मात्र,लता यांना याबाबत कळताच त्यांनी सी.रामचंद्र यांच्यावर दबाव टाकून हे देशभक्तीपर गाणे पळवले व तत्कालीन पंतप्रधान नेहरु यांच्या समोर सादर करुन अजरामर केले.
(छायाचित्र : आशा भोसले व मुलगा आनंद )
या दोघी बहीणींनी पार्श्वगायनात टॉपवर राहण्यासाठी व चित्रपटसृष्टीतील संगीत क्षेत्रावर राज करण्यासाठी साम,दाम,दंड भेदाची नीती अवलंबविली असा आरोप केला जातो.या दोन्ही बहीणींनी संपूर्ण जगात देशाचा मान वाढवला मात्र,सह गायिकांवर अन्यायामुळे यांची निंदा देखील केली गेली.अनेक दशके या दोघी बहीणींची एवढी मक्तेदारी संगीत क्षेत्रावर होती की कोणी तितकीच प्रतिभावान बाहेरील गायिका ती तोडू शकलीच नाही.सुमन कल्याणपूर याचे ज्वलंत उदाहरण आहे.अनेक फिल्मी पत्रिकांमध्ये हे किस्से प्रसिद्ध झालेत.अनेक प्रतिभावान गायिकांचे करिअर संपवण्याचा आरोप देखील त्यांच्यावर केला जातो.
आशा यांचे मोठे पुत्र हेमंत यांनी १९८५ साली एअर होस्टेस साजिदासोबत प्रेमविवाह केला होता.त्या हिंदू धर्म स्वीकारुन रमा भोसले बनल्या.त्यांना एक मुलगी आहे मात्र,लग्नाच्या २५ वर्षांनंतर रमा यांनी आपल्या ६१ वर्षीय पतीवर हेमंत यांच्यावर प्रतारित करण्याचा आरोप लावला व बांद्राच्या कौटूंबिक न्यायालयात याचिका दाखल केली मात्र,हेमंत यांचे निधन झाले व अवघ्या दहा दिवसात आशा भोसले यांनी साजिदाला घरा बाहेर काढले.आता न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे.
दूसरी घटना सुप्रसिद्ध अभिनेत्री साधना यांच्यासोबतचा आहे.साधना ही पतीसोबत मुंबईतील खार येथील एका बंगल्यात ५० वर्षांपासून राहत होती.त्यांच्या फ्लॅट ज्या इमारतीत होता त्याच इमारतीत त्या इमारतीचा बिल्डर देखील राहत होता.बिल्डरची नजर खूप आधीपासून त्या बंगल्यावर होती.साधना पतीच्या निधनानंतर फार एकटी होती त्यांची कोणतीही संतान देखील नव्हती.स्थितीचा फायदा घेऊन बिल्डरने आशा भासलेला साधनाच्या बंगल्याला विकून मोठी रक्कम देण्याचे लालूच दाखवले,आशा भासले यासाठी तयार झाल्या.२०१० साली साधनाला घरातून हाकलण्यासाठी त्या बिल्डरने सगळे हतकंडे अपनवले आणि कायद्याच्या कचाट्यात साधना यांना पकडण्यासाठी कंबर कसली.बिल्डरने साधनाला बंगल्या ऐवजी फक्त लहानश्या भागातील भाडेकरु साबित करण्याचा प्रयत्न केला.इतकंच नव्हे तर साधनाला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देखील दिली,ज्या विरोधात साधना यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली,त्यामुळे बिल्डरला अटक करण्यात आली.
आशा भोसले यांनी यानंतर सांताक्रूझ पोलिस ठाण्यात साधनाच्या विरोधात एफआयआर दाखल केली.साधना फक्त ग्राऊंड फ्लोरवरची भाडेकरु असून ती गच्चीवर जाऊ शकत नाही,अशी तक्रार त्यांनी नाेंदवली.साधनाने मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत या सर्व गोष्टींचा उलगडा केला होता.साधना आणि आशा भोसले यांच्यात या संपत्तीला घेऊन मोठी कायदेशीर लढाई सुरु राहीली होती.या लढाई दरम्यान साधना यांना कर्क रोगाने गाठले.१५ डिसेंबर २०१५ रोजी साधना यांचे निधन झाले.कर्क रोगाने पिडीत साधनाला अश्यारितीने न्यायालयाच्या चकरा मारायला लावणा-या आशा भोसले यांच्यावर लोकांनी प्रखर टिका केली मात्र,आशा ही शेवटी आशा आहे,त्यांनी या ही घटनांना आपल्या जीवनात कुठलेच स्थान दिले नाही.
आशा यांनी आज ८ सप्टेंबर २०२४ रोजी वयाचे ९२ वे वर्ष ओलांडले आहे.आयुष्यात त्यांनी मिळवलेली ‘एव्हरग्रीन अाशा’या पदनामामागे फार मोठा इतिहास आहे,संघर्ष आहे,कट कारस्थाने आहेत,नशीब आहे,परिश्रम आहे,जबरदस्त आवाजाची देणगी आहे,व्हर्सेलिटी आहे,त्यांच्या हजारो अजरामर गाण्यांचे स्मरण करीत आशा भाेसले यांना ‘सत्ताधीश‘चा मानाचा मुजरा.
………………………………….