पीओपी मूर्ती भाविकांनीच घेणे टाळावे
गडर लाईन्स चोकेजच्या समस्या दूर करण्यासाठी आणखी ८ गाड्या
एजी एन्वहायरो व बीव्हीजी कंपन्यांनी कचरा गाड्यांना ताडपत्री लावणे गरजेचे
इतर विभागांच्या खड्डेयुक्त रस्त्यांसाठी मनपावरच नागरिकांचा रोष
पत्रकारांशी साधला मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी संवाद
नागपूर,#nagpur ता.२ सप्टेंबर २०२४: महानगरपालिकेच्या झाेपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण( स्लम रिहॅब्लिटेशन ॲथोरिटी)(एसआरए)अंतर्गत शासनातर्फे अडीच लाखांचा निधी लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी दिला जातो,या मागील उद्देश्य आहे हा २०२२ पर्यंतच्या सर्व झोपडपट्या नष्ट करने,व गरिबांना सुविधायुक्त घरांचा लाभ मिळणे हा आहे.मात्र,या योजनेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, पात्र लाभार्थ्यांच्या फाईली दाबून ठेवल्या जातात. त्यांना मंजूर झालेल्या अडीच लाखांमधून ३० ते ५० हजार रुपये उकळण्याचा गोरखधंदा मनपाच्या या विभागातील भ्रष्ट अधिकारी एजंसीच्या मुलांना हाताशी धरुन करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.काही लाभार्थ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर, मनपाच्या या विभागाच्या या गोरखधंधावर चांगलीच आगपाखड केली.सुरवातीला एक लाख रुपये लाभार्थ्यांना दिले जाते,या नंतर एक लाख व नंतर पन्नास हजारचे हप्ते दिले जातात मात्र,शासनाने झोपडपट्टीतील गरीब,गरजू ,हातावर पोट असणा-यांसाठी सुरु केलेल्या या कल्याणाकारी योजनेत, मनपाचा भ्रष्ट अधिकारी प्रत्येक लाभार्थ्याकडून ३० ते ५० हजार रुपयांची तर एजंसीची मुले ५-५ हजार रुपयांची लाच घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून,गोरगरीबांना लृटण्याचा हा गोरखधंधा गेल्या अनेक वर्षांपासून हमखास सुरु असल्याची बाब समोर आली आहे.यावर मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांना विचारणा केली असता,एक जरी तक्रारदाता समोर आला तरी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल,तक्रारदात्यांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
आज मनपा [#nmc]मुख्यालयात पत्रकारांसोबत त्यांनी शहरातील अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत मुक्त संवाद साधला.याच विभागातील भ्रष्ट अधिकारी, एजंसीच्या मुलांसोबत कार्यालय सुटल्यानंतर उशिरा रात्रीपर्यंत थांबून मद्यपार्टी करीत असल्याची बाब समोर आली आहे.नुकतेच कोलकत्ता येथील आर.जी.कर या शासकीय रुग्णालयात तरुण महिला डॉक्टरसोबत घडलेल्या क्रोर्य व हत्येनंतर देशभरात प्रचंड रोष निर्माण झाला आहे,या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपराजधानीत मनपा मुख्यालयातील एखाद्या विभागातच जर अधिकारी व एजंसीची तरुण मुले दररोज मद्य पार्टीचा बार उडवित असेल व त्यामुळे,आर.जी.कर रुग्णालयासारखी कोणती अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असणार?असा प्रश्न केला असता,ही खरोखरच धक्कादायक बाब असून त्या विभागात सीसीटीव्ही असल्यास ते तपासले जाईल असे सांगून, सर्व विभागात सीसीटीव्ही लावले जातील,असे आश्वासन मनपा आयुक्तांनी यावेळी दिले.
संपूर्ण नागपूर शहरासाठी अतिशय चिंताजनक बनलेला विषय डेंग्यू,चिकनगुनिया यावर प्रश्न केला असता,साचलेल्या पाण्यात स्प्रे केला जात असून सर्व झोनमध्ये मशीनद्वारे औषधांची फव्वारणी केली जात असल्याचे उत्तर त्यांनी दिले.मात्र,नागरिकांनी काळजी घ्यावी, त्यांच्या घराजवळ,कार्यालयाच्या ठिकाणी तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दूषित पाणी साचू नये,असे आवाहन त्यांनी केले.आम्ही रिकाम्या भूखंडधारकांवर सर्वाधिक कारवाई केली असून ५० च्यावर एफआयआर दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगणा टी-पॉईट ते एमआयडीसी मार्गावर सिमेंटचा रस्ता उखडल्यावर आता त्यावर डांबरीकरण केले जात असल्याचे सांगितले असता,तो रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येत असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.नागपूरात अनेक किलोमीटरचे रस्ते हे विविध विभागांतर्गत येतात मात्र,नागरिकांची ही मानसिकताच बनली आहे,ते मनपावर संताप व्यक्त करतात.इतक्या मोठ्या प्रमाणात कोणते रस्ते मनपाचे व कोणते रस्ते नासुप्र,पीडब्ल्यूडी किवा मेट्रो अंतर्गत येतात याविषयीची नामफलक लावणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्व नागपूरात आणखी १०० किलोमीटरचे सिमेंट रस्ते बांधल्या जाणार असून यासाठी निधी देखील प्राप्त झाला आहे.त्यात यावेळी तरी पावसाळी नाल्या व ड्रेनेजसाठी जागा सोडल्या जाणार आहेत का?असा प्रश्न केला असता,पूर्व नागपूरात बांधल्या जाणा-या सर्व मोठ्या रस्तयांमध्ये ड्रेन टाकल्या जातील,यासाठी पाईप देखील खरेदी झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.जीर्ण झालेल्या गडर लाईन्स विषयी विचारले असता,अनेक भागात ड्रेनेज लाईन या ४० पेक्षा अधिक वर्ष जुन्या झाल्या आहेत.लोकसंख्या प्रचंड वाढली,त्याचाही ताण जीर्ण ड्रेनेज लाईन्सवर आला.यामुळे चोकेज दूर करण्यासाठी आम्ही एक वेगळी चमूच गठीत केली असल्याचे त्यांनी सांगितले.लाड पागे समिती अंतर्गत ५० सदस्यांची चमू गठीत करण्यात आली असून चोकेज़च्या समस्या दूर करण्यासाठी मनपाकडे आधी ५ गाड्या होत्या,आता ८ नव्या गाड्या विकत घेण्यात आल्या असून १२ गाड्या भाडेतत्वावर घेण्यात आल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.आमचा भर फक्त तक्रारी दूर करत बसण्यावर नसून उपाययोजनेवर असल्याचे ते म्हणाले.जपानच्या जायका कंपनीसोबत झालेल्या करारानुसार नाग नदीच्या सौंदर्यीकरणाच्या कामातच या शहरातील ड्रेनेजसंबंधी समस्यांचे खूप मोठ्या प्रमाणात निराकरण होणार असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
शहरात एजी एन्वहायरो व बीव्हीजी कपंनीच्या गाड्या कचरा उचलण्यासाठी अनेक इमारतींसमोर किमान १० ते १५ मिनिटांसाठी उभ्या असतात,मात्र,तितक्या वेळेत संपूर्णत खुल्या असणा-या त्या कचरा गाड्यांमधूनच हजारो मच्छर हे विविध रहीवाशी इमारतींच्या आत शिरतात,याशिवाय संपूर्ण शहरात या कंपनीच्या उघड्या कचरा गाड्या, वायू प्रदुषण करीत फिरत असतात,यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो,यावर उत्तर देताना मनपा आयुक्तांनी या दोन्ही कंपनीच्या कचरा गाड्यांवर ताडपत्री लावण्याची सूचना केली होती मात्र,अनेक कारणांसाठी कंपनीवर वारंवार आर्थिक दंड बसवूनसुद्धा त्यांच्या कामात सुधारणा होत नसेल तर आम्ही आणखी दंड लावू,अनेक भागात आठ-आठ दिवस कचरा उचलल्या जात नाही,या तक्रारीत तथ्य असल्याचे आयुक्तांनी मान्य केले.मात्र,शहरात रोगराई पसरण्याचे हे एकमात्र कारण नसल्याचे ते म्हणाले.शहरभर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे त्यात डास निर्माण झाल्याने रोगराई पसरली असल्याचे ते म्हणाले.‘डोर टू डोर’ कचरा जमा करण्याची जबाबदारी या दोन्ही कंपनीची आहे.ठरवून दिलेल्या रुटवर काम पूर्ण न केल्यास आम्ही त्यांच्यावर जबर आर्थिक दंड बसवतो,असे ते म्हणाले.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव या विषयी विचारले असता,पीओपी मूर्ती विक्रेत्यांकडून आतापर्यंत दोन लाखांच्या वर आम्ही दंड वसूल केला आहे मात्र,ज्या विक्रेत्याकडे दुस-यांदा पीओपीची मूर्ती जप्त होईल त्याचा परवाना आम्ही कायमचा रद्द करु,असा सज्जड दम मनपा आयुक्तांनी दिला.अनेक पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी दंडाची पावती ग्राहकांना दाखवित,आता दंड भरल्याने ते पीओपीची मूर्ती विकू शकतात,अशी दिशाभूल चालवली आहे,याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले असता,आमचे पथक पुन्हा दोन-तीन दिवसांनंतर त्याच दूकानाची पुन्हा तपासणी करतील असे आश्वासन त्यांनी दिले.
नागपूर शहरात समृद्धी महामार्गावरुन गुजरात,मुंबई इत्यादी राज्य व शहरांतून मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्ती घेऊन ट्रक येत असल्याने शहरात दाखल होण्यापूर्वीच नाकेबंदी का केली जात नाही?असा प्रश्न केला असता यावर पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांच्यासोबतच्या बैठकीत यावर चर्चा झाली असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.मात्र,कोणतीही सुधारणा समाजात कायद्यापेक्षा जनजागृतीने होत असल्याचे ते म्हणाले.भाविकांनीच ठरवले ते पीओपीची मूर्ती विकत घेणार नाहीत तर मूर्तीकार ती घडवणे एक दिवस थांबवतील,असे आयुक्त म्हणाले.मनपाचे एनडीएस पथक हे माती,शाडू किवा पीओपीची मूर्ती कशी ओळखतात?असा प्रश्न केला असता,पारंपारिक मूर्तीकारांनी त्यांना मार्गदर्शन केले असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले.