फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममुख्यमंत्री शहरात..लाडकी बहीण पोलिस ठाण्यात!

मुख्यमंत्री शहरात..लाडकी बहीण पोलिस ठाण्यात!

(छायाचित्र : पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी आज अनेक तास भटकत असताना तक्रारकर्त्या कुंदा आदमने यांची कन्या)

भाजप नेत्याच्या भावानेच केली महिलेची पाच लाखांनी फसवणूक
नागपूर,ता.३१ ऑगस्ट २०२४: एकीकडे ‘लाडकी बहीण’ योजनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले. मात्र दुसरीकडे भाजप नेत्यांचे खास अभिजित मुजूमदार यांचे बंधू प्रसन्नजीत मुजूमदार यांनी आपल्याच आनंद पूर्ति सुपर बाजार प्रा. ली मध्ये २३ वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी केलेल्या महिलेची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. तक्रारकर्ता महिलचे नाव कुंदा सुनिल आदमने असून वय वर्षे ५९ आहे.
ऑगस्ट २००१ पासून कुंदा आनंद पूर्ती बाजारात संगणक ऑपरेटर म्हणून कार्यरत होत्या.३० नाेव्हेंबर २०२३ पर्यंत त्यांनी तिथेच इमानेइतबारे नोकरी केली.या दरम्यान प्रतिष्ठानाचे मालक यांच्याशी कुंदा यांचा थेट संपर्क येत होता.दोन दशकांपेक्षा अधिक जुनी ओळख असल्याने घरगुती संबंध निर्माण झाले होते.कौटूंबिक नाते निर्माण झाल्याने एकमेकांच्या कौटूंबिक सोहळ्यात सहभागी होत असे.
कुंदा व त्यांचे पती सुनील आदमने यांनी १९९१ मध्ये आपल्या एकुलत्या एक मुलीसाठी भविष्यासाठीची गुंतवणूक म्हणून रामटेक नगर येथे एक प्लॉट विकत घेतला होता. मुलीच्या लग्नासाठी २०२२ मध्ये कुंदा यांनी तो प्लॉट विकण्याचा निर्णय घेतला. प्रसन्नजीत मुजुमदार हे बिल्डर असल्या कारणाने प्लॉट विकण्याच्या संदर्भात त्यांना देखील सांगून ठेवले होते मात्र,त्यांच्याकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे एका ग्राहकाला एप्रिल २०२२ मध्ये तो प्लॉट विकला.दरम्यान प्लॉट विकला की नाही या संदर्भात प्रसन्नजीत मुजुमदार यांनी चौकशी केली.मुलीच्या लग्नासाठी तसेच काही कर्ज फेडण्यासाठी प्लॉट विकला असल्याचे प्रसन्नजीत यांना सांगितले.
प्रसन्नजित यांनी त्यांना पैशांची नितांत गरज असल्याचे सांगून भाऊ अभिजित मुजुमदार यांच्याकडून पैेसे मिळणार असून, ऑक्टोबर २०२२ मध्येच दिवाळीपर्यंत पैसे परत करण्याचे आश्‍वासन दिले.२२ वर्षांपासूनचे संबंध असल्याकारणाने विश्‍वासाने,पतीशी चर्चा करुन ५ लाख रुपये प्रसन्नजीत मुजूमदार यांना कुंदा यांनी दिले. १६ एिप्रल २०२२ रोजी कुंदा यांनी इंडियन ओव्हरसिज बॅंक रामदासपेठ शाखेतून आरजीटीएसद्वारे प्रसन्नजित यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र कर्वेनगर शाखेतील खात्यात पैसे जमा केले.एका महिन्यात पैसे परत करणार असे प्रसन्नजीत मुजूमदार यांनी सांगितले होते. मात्र आता २ वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला असतानाही त्यांनी पैसे परत केले नाही. याच तणावात कुंदा सतत राहत आहेत.
आनंद पूर्ती सुपर बाजार सप्टेंबर २०२३ मध्ये रिनोव्हेशनसाठी एक महिना बंद ठेवण्यात आले व सर्व कर्मचा-यांना रिनोव्हेशननंतर ऑक्टोबर २०२३ च्या दिवाळी पूर्वी परत बोलवणार असे सांगण्यात आले.मात्र,मी आनंद पूर्ती बाजार बंद करीत असून सर्व माल विक्री करतोय,त्यामुळे एक महिना माल विक्री होईपर्यंत कामावर या,जे येणार नाही त्याला पगार मिळणार नाही असे ठणकावून सांगत,दुसरी नोकरी ही शोधण्यास सांगण्यात आले.
कुंदा यांनी देखील नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ती बाजारात शेवटचा एक महिना काम केले तसेच पाच लाख परत करण्याची मागणी केली.यावर,पैसे कुठेही जाणार नसल्याचे प्रसन्नजित मुजुमदार यांनी सांगितले.यानंतर आनंद पूर्ती बाजार भाड्याने चालविण्यास देण्यात आल्याचे कळल्यानंतर कुंदा या प्रसन्नजित यांच्या घरी गेल्या.मात्र,जेव्हा पैसे येतील तेव्हा देईल,असे सांगत याबाबत बाहेर कुठेही वाच्यता केल्यास एक रुपया देखील मिळणार नाही तसेच बाहेर वाच्यता केल्यास तुमचे काय होईल,याची जबाबदारी पूर्णपणे तुमची राहील अश्‍या शब्दात प्रसन्नजित यांनी कुंदा यांना ठणकावले.
परिणामी,कुंदा यांनी प्रसन्नजित यांच्या आईला या व्यवहाराबद्दल सांगितले असता,त्यांनी कुंदा यांना पोलिस ठाण्यात खोटी तक्रार देऊन अटक करण्याची धमकी दिली!सामन्य लाेकअसल्याकारणाने कुंदा व कुटूंबिय गप्प बसलेत मात्र,मुलीचे वय २९ वर्ष झाल्यामुळे लग्नासाठी त्यांना पैशांची गरज आहे.
गेल्या आठवड्याभरापासून  महिलेची प्रकृती खराब होती. मात्र काल रात्री प्रकृती बिघडल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरु आहे. त्या महिलेची मुलगी प्रसन्नजीत मुजूमदार यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी आपल्या मावशीसोबत कोतवाली पोलिस ठाण्यात गेली असताना सुरुवातीला तिला टाळाटाळ करण्यात आली. तसेच नंतर पीआय साहेब मुख्यमंत्र्‍यांच्या बंदोबस्तात असून तुम्ही उद्या या असा अजब सल्ला पोलिसांनी दिला.!
त्या मुलीचे वडीलही अपघातग्रस्त असल्यामुळे त्या मुलीवरच सर्व जबाबदारी आहे. आता मी रुग्णालयात आईकडे लक्ष देऊ की तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्याच्या चकरा मारु असा प्रश्न त्या मुलीला पडला आहे.
मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण नाही का? मला न्याय मिळणार नाही का? असा सवालही मुलीने उपस्थित  केला . दुपारपासून पोलिसांच्या फिरवा-फिरवी नंतर अखेर सीताबर्डी ठाण्यातून सायंकाळी तक्रारदाराची तक्रार घेऊन तिला रिसिव्ह कॉपी देण्यात आली.
कुंदा यांचे पती सुनील आदमने वय वर्षे ६८ हे देखील कुठेही नोकरी करीत नसून त्यांचा एक पाय अपघातग्रस्त असल्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी कुंदा यांच्या मुलीवर असून कष्टाचे पैसे परत मिळवून देण्याची विनंती सीताबर्डी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत त्यांनी केली आहे.
राज्याचे गृहमंत्री ज्या शहरात राहतात,त्याच शहरात एका सर्वसामान्य कुटूंबातील कष्टकरी महिलेची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक होते,व न्यायासाठी दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला असल्याने ,गृहमंत्र्यांनी पोलिसांना कुंदा आदमने यांच्या तक्रारीवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देत,सर्वात आधी त्यांच्या शहरातील ’लाडक्या बहीणी’ला न्याय देण्याची अपेक्षा त्या व्यक्त करतात.
………………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या