फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणपटोले,वासनिकांच्या भाषणात महिला उमेदवारीचा बोलबाला,पण....

पटोले,वासनिकांच्या भाषणात महिला उमेदवारीचा बोलबाला,पण….

Advertisements

चेहरा ,चाल ,चरित्र सर्वच राजकीय पक्षांचं सारखंच
संघटनेत महिला प्रतिनिधित्व अनिवार्य केलं…पण?
किती महिला महापौर,उपमहापौरांना स्वत्रंतरित्या काम करता आले?
निर्णय देखील फिरवावे लागले,हे वास्तव नाही का?
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.३० ऑगस्ट २०२४: काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वात काल संविधान चौकात मोठे आंदोलन झाले.महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.दिल्लीतून आलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी आपल्या भाषणातून,देहबोलीतून ,आत्मविश्‍वासातून स्त्रीमधील प्रचंड क्षमतेची,बुद्धिमत्तेची  साक्ष दिली.काँग्रेसचे स्थानिक व राज्यस्तरीय नेते मंचावर उपस्थित होते.महिला काँग्रेसचे हे यशस्वी आयोजन बघून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व रामटेकचे माजी खासदार मुकुल वासनिक यांनी महाराष्ट्रात येत्या निवडणूकीत महिलांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी देण्याची मखलाशी आपल्या भाषणात केली,उमेदवारीसाठी आलेल्या अर्जातून पारदर्शकपणे आकलन केलं तर मोठ्या प्रमाणात महिलांना काँग्रेस पक्षाची तिकीटे मिळाल्याशिवाय राहणार नाही,असे मुकुल वासनिक म्हणाले व जोरदार टाळ्या ही घेतल्या.
याच वेळी नाना पटोले यांनी महिलांच्या उमेदवारांच्या कौतूकाचं ‘पारायण’ करताना आम्ही महाराष्ट्रात ज्या महिलांना तिकीट दिले त्या तिन्ही महिला निवडून आल्या,चंद्रपूरात तर प्रतिभा धानोरकर यांनी राज्यातील पॉवरफूल मंत्र्यांना धोबीपछाड दिली असल्याचे ते म्हणाले.मुंबईत वर्षा गायकवाड तसेच सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांनी विजयाचा अटकेपार झंडा गाडला,असे कोडकौतूक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी प्रचंड महिला समुदायासमोर केले.हीच ‘रि’पकडत मुकुल वासनिक यांनी येत्या विधानसभेच्या निवडणूकीत महिलांच्या अर्जाचे पारदर्शकपणे आकलन करुन उमेदवारी देण्याची ‘टाळीखाऊ’मागणी केली.वास्तवतेत काँग्रेस असो किवा भारतीय जनता पक्ष,हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्षी पदार्पण केल्यानंतरही पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या जिंकून येण्याच्या क्षमतेवर किती विश्‍वास ठेऊन तिकीट वाटप करतात?याचे आत्मचिंतन करण्याची हीच खरी वेळ आहे.
स्व.राजीव गांधींनी पंचायत राज लागू करुन ग्रामपंचायत,नगरपालिका व महानगरपालिकेत महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू केले तेव्हा अचानक घरातून निघून राजकारणात आलेल्या महिला, या एवढ्या दशकानंतर आता राजकारणात ब-याच स्थिरावल्या आहेत.तरी देखील तिकीट वाटप करताना त्यांना डावललं जातं,ही वस्तूस्थिती आहे.याचे कारण पुरुषसत्ताक मानसिकतेतून अद्यापही,देशाचे धाेरण ठरवणारे राजकीय नेते बाहेर पडले नाहीत.श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना ही त्यांच्या डीएनएमध्येच असते,या आरोपा असत्य असे काही नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षात महिलांसाठीचे एक आदर्श धोरण स्वीकारले.फक्त स्वीकारलेच नाही तर जिल्हा,राज्य व केंद्र पातळीवर त्यांच्या पक्षासाठी बंधनकारक केले.केंद्र,राज्य किवा जिल्हापातळीवरील कोअर कमेटीमध्ये किमान एक महिला घेण्याचे तसेच तीन वर्ष संघटनेत काम करणा-या महिलांना मुख्य पद देणे बंधनकारक केले.अध्यक्ष किवा महामंत्रीचे पद या अटीमुळे भाजपमध्ये महिलांना मिळालेले दिसून पडतं.
मात्र,यात ‘पुरुषी’मेख अशी की मोदींनी जरी ही अट ठेवली असली तरी ‘कोणत्या’महिलेला घ्यायचं?हे मोदी ठरवत नाही!ते शेवटी राज्यातील,जिल्ह्यातील स्थानिक नेते ठरवतात.परिणामी,कोअर कमेटीमध्ये जी महिला आक्रमकपणे बोलणार नाही,जिची राजकारणात शून्यापासून सुरवात होत आहे,तश्‍या महिलेला कोअर कमेटीमध्ये ठेऊन,निर्णय स्वीकृत केले जातात!
याचा अर्थ पंचायत राजपासून राजकारणात मुरलेल्या महिला कोणत्याही पक्षाला फक्त बैठकांमध्ये उपस्थिती दर्शवण्यासाठी,आंदेलने करण्यासाठी व विधानसभा तसेच लोकसभेचा  पक्षाचा उमेदवार जिंकून आल्यानंतर प्रादेशिक कार्यालयांसमोर फूगड्या खेळून जल्लोष करण्यासाठी गरजेचे वाटतात,यापेक्षा वरच्या पातळीवर त्यांनी चढणे पुरुष नेत्यांना परवडणार नाही,असा त्याचा अर्थ होतो.
आज प्रत्येक विधानसभा व लोकसभेच्या जागेवर सक्षम अश्‍या किमान दोन तरी उमेदवार

पंचायत राज नंतर आज प्रत्येक विधानसभा व लोकसभेच्या जागेवर अश्‍या किमान दोन तरी महिला उमेदवार आहेत ज्या राजकारणात कोणत्याही पुरुष उमेदवारासारख्याच सक्षम झाल्या आहेत मात्र,तिकीट वाटप करताना सक्षम असून देखील त्यांना फक्त महिला असल्याकारणाने डावलल्या जातं,जणू जिंकून येण्याची मक्तेदारी भारताच्या संविधानाने फक्त पुरुष उमेदवारांनाच प्रदान केली आहे.आज महाराष्ट्रात भाजपसाख्या राष्ट्रीय पक्षाच्या १०८ आमदारांपैकी फक्त १२ महिला आमदार आहे.पूर्व विदर्भात आजपर्यंत सुमतीताई सुकळीकर यांच्या नंतर एका ही महीलेला भाजपने पूर्व विदर्भातून उमेदवारी दिली नाही! शोभाताई  फडणवीस २००९ पर्यंत लढल्या त्याच वेळी काँग्रेसने मात्र,कुंदाताई वियजकर यांना निदान १९८५ साली उमेदवारी दिली होती.२०१४ आणि २०१९ च्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपसारख्या राजकीय पक्षाने नागपूरसह विदर्भाच्या १२ मतदारसंघात एक ही महिला उमेदवाराल तिकीट दिली नाही.नागपूरात माजी महापौर अर्चना डेहनकर,मायाताई इवनाते,नंदा जिचकार यासारख्या महिलांना देखील भाजपच्या पर्यवेक्षकांनी मुलाखत घेतल्यानंतर ही डावलले.महापौर पद हे खासदार पदाच्या समकक्ष प्रतिष्ठेचे असतानाही उमेदवारी देताना भाजप असो किवा काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी हे पद भूषविणा-या महिला महापौरांना तिकीट न देऊन सर्वाधिक ‘अवमूल्यन’केले आहे.
२०१९ च्या विधानसभेत तर पश्‍चिम नागपूरसाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी तिस-यांदा सुधाकर देशमुखांसाठी पक्षाची उमेदवारी खेचून आणली.इतकंच नव्हे तर जाहीर सभेत मतदारांना हात जोडून,शेवटचे देशमुखांना निवडून द्या,पुढची निवडणूक वाटल्यास तर ते लढणार नाहीत,असे आश्‍वासन दिले होते!मात्र,मतदारांनी देशमुख यांना नाकारुन काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्या पारड्यात मत टाकून त्यांना विधानसभेत पाठवले.पश्‍चिम नागपूरची निवडणूक ही एकतर्फी झाली होती.या ऐवजी पक्षातील एखाद्या सक्षम,आक्रमक व लढवय्या महिला उमेदवाराला पश्‍चिम नागपूरातून भाजपने तिकीट देणे टाळले,या राजकारणाला काय म्हणावे?
मूळात जे ‘नागपूर’राज्याला व दिल्लीला ‘दिशा’दाखवण्याचे काम करते किमान त्या नागपूरातून तरी सक्षम महिलांच्या उमेदवारीबाबत ‘योग्य’संदेश देशात जायला हवा मात्र,असे घडत नाही.नाना पटोले यांनी देखील काल संविधान चौकातील आंदोलनातील भाषणात संघ हा स्त्री-पुरुष भेदभाव करणारा असून ,संघात कोणतीही महिला स्वयंसेवक होऊ शकत नसल्याचा टोला हाणला.देशसेवेसाठी राष्ट्र सेविका समिती आहे मात्र ,महिलांना संघात स्थान नसल्याचा उपहास केला होता.अश्‍या संघाकडून राजकारणात महिलांना बरोबरीच्या हिस्सेदारीसाठी पुढाकार घेण्याची काय अपेक्षा ठेवणार?नुकतेच लोकसभेच्या निवडणूकीत अकोल्यात काय घडले?सक्षम महिला उमेदवार का डावल्यात आली?त्या महिला उमेदवाराला तिकीट दिले असते तरी अकोल्याची जागा भाजपच्याच खात्यात राहीली असती,यात कोणालाही संशय वाटत नाही मात्र,असे घडले नाही.
महिलांना उमेदवारी नाकारण्यासाठी आणखी एक कारण सांगितले जाते,महिलांमध्ये व्यापक विचार करण्याची क्षमता नाही!जी स्त्री असह्य वेदना सहन करुन सृजनाला जन्म देते,बाळाचे संगोपन करते,शिक्षीत करते,संस्कारित करते त्या स्त्रीमधील क्षमता ही निसर्गत:असते,ती सिद्ध करण्याची गरज नसते.अर्थात पुरुषांना पण अनेक सामाजिक दायित्व असतात,ज्याचा ते प्रोपाेगंडा करीत नाही,पुरुष स्पर्धक हे समोरासमोर आले तरी मनातील शत्रूत्व चेह-यावर उमटू देत नाही,महिलांना मात्र हे ‘कसब’ निसर्गत:जमत नाही.याचाच फायदा घेत महिलांनाच महिलांच्या विरोधात सहज लढवत ठेवणे, पुरुष सहज साधून जातात,ज्याचे नुकसान महिलांनाच भोगून द्यावे लागतात.
२००७ मध्ये पहिल्यांदा नगरसवेक झालेले सुधाकर कोहळे यांच्यावर विश्‍वास ठेवत विधानसभेची तिकीट देण्यात आली मात्र,त्यांच्याही पूर्वीपासून नगरसेविका म्हणून राजकारणात मुरलेल्या महिलांवर भाजपचं नेतृत्व विश्‍वास टाकू शकले नाही!हा त्यांच्यावर अन्याय नव्हात का?
मध्य मधून विकास कुंभारे यांना तिकीट देण्यात आली. महापौर पद भूषवणारे प्रा.अनिल सोले,प्रवीण दटके यांना आमदारकी बहाल करीत विधान परिषदेत पाठवले मात्र,आपल्याच पक्षाच्या महिला महापौरांच्या बाबतीत भाजप तितकाच ‘अनुदार’राहील्याचा इतिहास काय सांगतो? येत्या विधान सभेत ‘मध्य’ची जागा काढण्यासाठी पुन्हा परिषदेत गेलेले आमदार यांनाच तिकीट देण्याचा घाट घातल्या जात असल्याची चर्चा आहे,जर मध्य नागपूरात हलबा समाजातील उमेदवार भाजप यंदा देणार नसेल तर महिला उमेदवार का देऊ शकत नाही?हा प्रश्‍न अस्वस्थ करतो.
२०१४,१०१९ मध्ये रवि भवनात भाजपचे केंद्राचे निरीक्षक आलेत.बायोडेटा तपासला,फक्त विचारणा झाली,कहां से लढने के लिये इच्छूक हो?बस…यानंतर काही नाही. घोषित झालेल्या पुरुष उमेदवाराच्या प्रचाराला लागा,एवढीच सूचना मिळते,उमेदवारी मिळत नाही.यंदा विजयवर्गीय आले आहेत.त्यांच्याकडे पूर्व व पश्‍चिम विदर्भाच्या १२ जांगांची जबाबदारी आहे.पुन्हा तेच घडेल,मुलाखती घेतल्या जातील मात्र?किमान पूर्व विदर्भातून तसेच नागपूरातून एक महिला उमेदवार देऊन अनेक दशकांचा सोकावलेला काळ कैलाश विजयवर्गीय बदलतील का?
नाना पटोले, मुकुल वासनिक यांची शाब्दिक बोळवण किमान मुंबईत महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे सारख्या महिलेला तसेच नागपूरच्या महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष ॲड.नंदा पराते यांना विधान सभेसाठी पात्र ठरवतील का?ज्यांनी नागपूरात सत्ताधा-यांच्या नाकावर टिच्चून महिलांचे यशस्वी आंदोलन करुन दाखवले.काँग्रेसचाही नागपूरातील महिला उमेदवारांच्या बाबतीत राजकीय इतिहास गौरवास्पद राहीला नाही.आभा पांडे याचे ज्वलंत उदाहरण आहेत.मनपाचे सभागृह गाजवाणा-या रणरागिनी आभा पांडे यांच्यासोबत स्थानिक पातळीवरील काँग्रेसने काय केले?आपल्या मुलाखतीत आभा पांडे यांनी सांगितले आहे की, सभा संपल्यानंतर देवडिया भवनाच्या पाय-यांवरुन ढकलून त्यांना जीवे मारण्यचाही प्रयत्न झाला!आज त्या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या असून, राज्य महिला आयोगाच्या सदस्य आहेत मात्र,उघडपणे पूर्व नागपूरातून भाजपच्या कृष्णा खोपडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.त्यांच्या मागे महायुतीतील त्यांचा पक्ष कितपत उभा राहतो,हे त्यांच्या मतदारसंघातील मतदार बघतीलच, नाही तर पुन्हा ‘अपक्ष’लढण्याची वेळ देखील आभा पांडे यांच्यावर येऊ शकते,यात दुमत नाही.

(व्हीडीयो: आंदोलनस्थळी ॲड.नंदा पराते यांच्या समर्थक महिला, त्यांच्या नेतृत्वात आगे बढो च्या घोषणा देताना!टेकडी गणपतीपासून संविधान चौकापर्यंत पायी वारी करीत त्या पोहोचल्या होत्या,याला म्हणतात ‘निष्ठा’आणि ‘नेतृत्व’ जे नंदा पराते यांनी सिद्ध केलं)
थोडक्यात,येत्या विधानसभेच्या निवडणूकीत महायुतीच्या सर्वपक्षीय नेत्यांचे‘लाडकी बहीण’वर उतू जाणारे प्रेम बघता,तसेच पटोले व मुकुल वासनिक यांचे आंदोलनकारी महिलांचे यश बघून भरुन आलेले ऊर बघता,हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष येणा-या विधानसभेच्या निवडणूकीत किती महिलांना उमेदवारी देतात,याकडे आता महिला मतदारांचे लक्ष लागले आहे.२०२९ मध्ये तर देणारच आहात ना?मग कसे थांबवाल महिलांच्या संवैधानिक प्रतिनिधित्वाला? त्यापेक्षा यंदाच आपल्या ‘पुरुषसत्ताक’ मानसिकतेला आवर घालून मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांना तिकीट देण्याचे औदार्य दाखवावे,असे ’छूपे’आव्हान ते करताना दिसून पडतात.मोठ्या प्रमाणात महिला या विधानसभेत व लोकसभेत गेल्यास राजकाणातील भ्रष्टाचार व अपराधीकरणाला आपसूक चाप बसेल,यात वाद नाही.
………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या