फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनओ जानेवाले हो सके तो लौट के आना...

ओ जानेवाले हो सके तो लौट के आना…

(पुण्यतिथी विशेष)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
मुकेश आज आपल्यात नाही.ते २७ ऑगस्ट १९७६ ला हे भौतिक जग सोडून निघून गेलेत.त्यांना जाऊन ४८ वर्षांचा काळ लोटला असला तरी त्यांच्या स्वर्गीय आवाजाच्या देणगीतून ते आज ही आपल्यात चिरंतन आहेत.मुकेश यांचे गाणे आवडत नाही,असा या भू-तळावर भेटणे अशक्यच.मुकेश यांची गाणी पुढील हजार दशके तरी आणखी चिरंतन राहणार,यात शंका नाही.
मुकेश यांच्यावर गेल्या अनेक दशकात खूप काही लिहल्या गेले,सांगितल्या गेले असले तरी मुकेशच्या दर्दीले गीतांवर प्रेम करणा-या रसिकांना, तेच-तेच पुढील अनेक शतके ही ऐकले,वाचले तरी मन भरणार नाही,भारतीय चित्रपटसृष्टितील पार्श्वगायकांच्या मांदियाळीतील मुकेश  एक तळपणारा दिवा होते.
मुकेशचंद्र जोरावरचंद्र माथूर यांचा जन्म २२ जुलै १९२३ रोजी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला.त्यांचे वडील अभियंता होते.ती दहा भावंडे होती.मुकेश हे सहावे अपत्य होते.एकदा मुकेश यांनी त्यांचे नातेवाईक मोतीलाल यांच्या बहीणीच्या लग्नात गाणे गायले.मोतीलाल यांना मुकेश यांचा आवाज इतका आवडला की ते मुकेशला मुंबईत घेऊन आले.मुंबईत त्यांनी मुकेशला गायनाची शिकवणी लावली.
आपल्या ३० वर्षांच्या कारर्कीदीत त्यांनी १० हजारपेक्षा जास्त गीतांचा खजिना रसिकांवर मुक्तहस्ताने उधळला आहे.त्यांच्या पार्श्वगायनाची सुरवात १९४१ साली झाली.‘निर्दोष‘या चित्रपटात मुकेश यांनी पार्श्वगायक व अभिनेता म्हणून आपल्या कारर्कीदीची सुरवात केली होती.मात्र,त्यांना खरी ओळख मिळाली ती १९४७ साली प्रदर्शित झालेल्या ‘पहीली नजर’ या चित्रपटातून.या चित्रपटात मुकेश यांनी गायलेल्या ‘दिल जलता है जो जलने दे’या गीताने त्या काळी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले.वयाच्या फक्त २० सा व्या वर्षी त्यांनी हे गीत गायले होते जे त्यांच्या चित्रपटसृष्टितील कारर्कीदीसाठी ‘माईल स्टोन ’ठरले .या गीतामध्ये हुबेहुब सहगल यांच्या गायकीची छाप होती.हे गाणे ऐकल्यावर सहगल स्वत: इतके आत्मविभोर झाले की त्यांनी त्यांची सर्वात आवडती संवादिनी(हॉरमोनियम)मुकेश यांना भेट दिली.

सुरवातीच्या काळात मुकेश यांच्या गायकीवर सहगल यांचाच प्रभाव होता.नंतर मात्र,संगीतकार नौशाद यांच्या तालमीत मुकेश यांनी आपली वेगळी शैली विकसित केली.पुढे जाऊन भारतीय चित्रपटसृष्टिचे अर्ध्यव्यूह असणारे ‘द ग्रेट शो मॅन’ राज कपूर यांचा मुकेश हे ‘आवाज‘ झाले.राज कपूरसाठी सर्वात पहिले गाने मुकेश यांनी ‘नीलकमल’साठी गायले होते.१९४८ साली राज कपूर यांनी आर.के.फिल्म नावाने निर्माता कंपनीची स्थापना केली.आर.के फिल्मचा  पहीला चित्रपट ‘आग’साठी संगीतकार राम गांगुली यांच्या संगीत दिग्दर्शनात मुकेश यांनी गायलेले ‘जिंदा हूं इस तरह के गमे जिंदगी नही’,यानंतर ‘श्री ४२० ’साठी ‘मेरा जूता है जपानी’व यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’मधील ‘आवारा हूं’या गीताने राज कपूर यांच्यासह मुकेश यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले.१९५१ साली आलेल्या ‘आवारा’ चित्रपटातील या गीताने देशात असा सुरेल झंझावात निर्माण केला की संपूर्ण जगात भारतीय संगीताचा दरारा निर्माण झाला.
राज कपूर हे रुसमध्ये गेले असता चाहत्यांनी राज कपूर यांच्याकडे ’आवारा हूं’गीताची फरमाईश लाऊन धरली,खूप प्रयत्नातून राज कपूर यांना रुसी चाहत्यांना समजावण्यात यश आले की हे गीत त्यांनी नाही मुकेश यांनी गायले आहे.मुकेश यांच्या कारर्कीदीतील सर्वाधिक गाणी ही वेदना व विरहावर आधारित होती तरी देखील ‘पत्थर के सनम’चित्रपटातील ‘तौबा ये मतवाली चाल’सारख्या गीतात मुकेशने नायिकेला छेडणारे अल्लहड सूर लीलया कंठातून साधले.’हम हिंदुस्तानी’चित्रपटात ‘छोडो कल की बाते कल की बात पुरानी’या गीताने त्या काळी संपूर्ण हिंदूस्तानी जनतेच्या मनात खोलवर देशभक्तीचा ज्वर चढवला होता.
अनेकांना प्रश्‍न पडायचा मुकेश यांच्या स्वरात इतकी वेदना कुठून आली,याचे कारण ते स्वत: संवेदनशील मनाचे होते,इतरांचे दु:खं,त्यांना विचलित करुन जात असे.एकदा त्यांच्या घरी काही गरीब चाहते आले व त्यांना विनंती केली त्यांना मुकेश यांचे गाणे ऐकायचे आहे.मुकेश यांनी त्यांना पुन्हा रविवारी घरी येण्यास सांगितले.रविवारी त्यांनी बाकायदा संगीतकारांची व्यवस्था केली व त्यांच्या या गरीब चाहत्यांना त्यांनी भरपूर गीते ऐकवली.त्यांचे चाहते खूश होऊन घरा बाहेर पडले तेव्हा आपल्या मुलाला नितीन मुकेश याला मुकेश म्हणाले,की हे गरीब चाहते तिकीट घेऊन माझा प्रोग्राम बघू शकत नसल्यानेच मी आज त्यांची ईच्छा पूर्ण केली!’.
हिंदी पार्श्वगायनाला सर्वात आधी आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणारे मुकेश हे पहीले गायक होते.‘अंदाज’’आग’,‘बरसात‘या चित्रपटातील मुकेशच्या गाण्यांनी त्या काळातील रसिक श्रोत्यांना अक्षरश:वेड लावले होते.राज कपूरसाठी मुकेश जीवनातील शेवटच्या श्‍वासापर्यंत गायले.‘रमैया वस्तावैया,मैने दिल तुझको दिया’या गीतात मुकेश यांनी एवढ्या लांब गीतामध्ये शेवटच्या फक्त चार ओळी म्हटल्या आहेत मात्र,त्यांच्या या शेवटच्या अंतराने संपूर्ण गीताचा मूड बदलून दिला.’छलिया’चित्रपटातील गाणे ’डम डम डिगा डिगा’या गाण्याने त्या काळातील श्रोत्यांच्या मनावर संगीताच्या नशेचे गारुड पेरले होते.

संगीत मुकेश यांच्यासाठी एक साधना होती त्यामुळेच मुकेश यांनी गायलेली हजारो गाणी अजरामर झाली.मुकेश यांच्या स्वरांची जादू त्या काळातील जवळपास सर्वच प्रस्थापित अभिनेत्याच्या डोक्यावर चढून बोलत होती.हिंदी चित्रपटसृष्टितील शहनशांह दिलीप कुमार पासून तर शतकाचा महानायक अमिताभ बच्चनपर्यंत मुकेश यांनी पार्श्वगायन केले आहे.अमिताभ बच्चनसाठी गायलेले ‘कभी कभी मेरे दिल मे ख्याल आता है‘‘मै पल दो पल का शायर’ही गाणी आज ही तितकीच लोकप्रिय असून अमिताभ बच्चनला या सुरांसोबत पुन्हा-पुन्हा पडद्यावर बघणे आज ही प्रेक्षकांना तितकंच सुखद वाटतं.खलनायक अजितसाठी मुकेश यांनी ‘बारात’चित्रपटात ’मुफ्त हूये बदनाम’,शत्रुघ्न सिन्हा यांच्यासाठी ‘मिलाप’चित्रपटात ’कई सदियो से कई जन्मो से’शम्मी कपूरसाठी ‘ब्लफ मास्टर’साठी ‘सोचा था प्यार हम ना करेंगे’ही आगळीवेगळी गाणी मुकेश यांनी गायली.मुकेश यांनी राजकपूर यांचे मोठे चिरंजीव रणधीर कपूर यांच्यासाठी ’कल आज और कल’तसेच ’धरमकरम’चित्रपटात पार्श्वगायन केले.
संगीतकार नौशाद,शंकर जयकिशन,रोशन,खैय्याम,मदनमोहन,सलील चौधरी,कल्याणजी आनंदजी,लक्ष्मीकांत प्यारेलाल,उषा खन्ना,ब्रजभूषण,अनिल विश्‍वास,कनु घोष,सोनिक आेमी या सर्व संगीतकारांसोबत मुकेश यांनी पार्श्वगायन केले.
मुकेश यांना अनेक ‘फिल्म फेअर ’तसेच ‘राष्ट्रीय ‘पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.१९५९ साली आलेल्या ‘अनाडी‘चित्रपटातील ‘सब कुछ सिखा हमने ना सिखी होशियारी’,१९७० साली आलेला चित्रपट ‘पहचान’मधील ’सबसे बडा नादान वही है’,१९७२ मधील ’बेईमान’चित्रपटातील ’जय बोलो बेईमान की’,१९७६ साली प्रदर्शित झालेला ’कभी कभी’चित्रपटातील ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता हैं’या सर्व गीतांसाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाता तर १९७३ साली आलेल्या ‘रजनी गंधा’चित्रपटातील ’कई बार यूं भी देखा है,ये तो किस्मत की रेखा है’या गीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.१९७६ मध्ये ‘कभी कभी’साठी फिल्म फेअरसाठी नावाची घोषणा जेव्हा झाली त्यावेळी मुकेश या जगात नव्हते!
‘यहूदी’चित्रपटातील ‘ये मेरा दिवानापन है’,होठो पे सच्चाई रहती है’ (जिस देश में गंगा बहती है)‘ज्योत से ज्योत जलाते चलो’,(संत ज्ञानेशवर)‘फूल तुम्हे भेजा है खत में’(सरस्वती चंद्र)’दिवानो से ये मत पुछो दिवानो पे क्या गुजरी है’ (उपकारचित्रपटातील ’चांद सी मेहबूबा हो मेरी कब’ ),(हिमालय की गोद मे) ’दूनिया बनानेवाले कया तेरे मन मे समाई’ (तिसरी कसम)’मुबारक हो सबको’,(मिलन),’आया ना हमको प्यार जताना’(पहचान),जाने कहां गये वो दिन’(मेरा नाम जोकर),‘आंसू भरी है ये जीवन की राहे’(परवरिश),तारो मे सजके,मुकेश यांनी गायलेल्या या अजरामर गीतांचा विसर होणे शक्य नाही.
२७ ऑगस्ट १९७६ साली अमेरिकेच्या डेट्रॉएट शहरात कार्यक्रमासाठी गेले असता ह्दयघाताने त्यांचा मृत्यू झाला.लता मंगेशकर या देखील त्या कार्यक्रमात त्यांच्यासोबत होत्या.लता मंगेशकर यांना या मानसिक धक्क्यातून सावरायला खूप काळ जाऊ द्यावा लागला.मुकेश यांच्या मृत्यूनंतर लता मंगेशकर यांनी परदेस दौ-यावर जाणे थांबवून दिले होते,असे एका मुलाखतीत लता मंगेशकर यांनीच सांगितले होते.राज कपूर यांनी तर ’माझी आवाज मी गमावून बसलो’अशी भावूक प्रतिक्रिया दिली होती.
त्या स्टेज शो मध्ये मुकेश ’एक दिन बिक जाएगा माटीके मोल,लग मे रह जायेंगे प्यारे तेरे बोल’हे गाणं सादर करीत असताना त्यांना ह्दयाघात झाला.वयाच्या ५३ व्या वर्षी आपल्या गायनक्षेत्रातील कारर्कीदीच्या सर्वोत्तम शीर्षस्थानावर असताना त्यांचा मृत्यू झाला.

आज ही मुकेश यांची गाणी रेडिया,मोबाईल किवा दूरचित्रवाणीवर ऐकताना ती किती दैवी,पवित्र आणि संवेदनांनी भारलेली होती,याचा प्रत्यय येतो,त्यामुळेच वारंवार मुकेश यांना त्यांचे रसिक श्रोते अंतरआत्म्याच्या तळातून ‘ओ जानेवाले हो सके तो लौट के आना’अशी आर्त साद देताना दिसून पडतात.
…………………………………
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या