अवघ्या आठ महिन्यात चार कोटींचा मुद्देमाल जप्त:नागपूर पोलिसांची कामगिरी
अम्ली पदार्थ पुरवठादार,ग्राहक दोघांवरही पोलिसांची करडी नजर
‘महाराष्ट्र बंद’आंदोलनात कोणीही कायदा हातात घेऊ नये: पोलिस आयुक्तांचा इशारा
पोलिसांच्या बदल्या अंतिम नाही
नागपूर,ता.२३ ऑक्टोबर २०२४: नागपूर पोलिसांनी अवघ्या आठ महिन्यात,जानेवरी ते ऑगस्ट दरम्यान चार कोटींचा मुद्देमाल पकडला असून यात यूनिट-३ च्या पथकाचा महत्वपूर्ण सहभाग आहे.एन.टी.पी.एस कायद्यांतर्गत आरोपींना अटक झाली असून ९०० ग्राम मेफेड्रोन जप्त करण्यात आले.या कारर्वात २३० पेक्षा जास्त गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, पोलिसांची करडी नजर अम्ली पदार्थांचे पुरवठादार व ग्राहक यांच्यावर असून,अपराध,अपघातमुक्त नागपूर हेच पोलिसांचे ध्येय असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंगल यांनी पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नंदनवन पोलिस ठाण्यांतर्गत २१ ऑगस्ट रोजी एन.डी.पी.एस पथक गुन्हे शाखा पोलिसांनी मेफेड्रोन बाळगणा-या ३ आरोपींना अटक करुन एकूण ९१,१८,०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात सुपरवायजर पदावर कार्यरत कपिल गंगाधर खोब्रागडे(वय ४० वर्ष,रा.नंदनवन झोपडपट्टी)राकेश अनंतराव गिरी(वय ३१ वर्ष,रा बौद्ध विहाराजवळ,नंदनवन झोपडपट्टी)तसेच अक्षय बंडू वंजारी(वय २५ वर्ष रा.जुना बगडगंज,बजरंग नगर,नंदनवन झोपडपट्टी)यांना अटक करुन आरोपींच्या ताब्यातून ९०७ ग्रॅम मेफेड्रोन सदृश्य पावडर ज्याची किंमत ९० लाख ७० हजार रुपये असून चार मोबाईल,इलेक्ट्रोनिक वजन काटा तसेच रोख रक्कम मिळून ९१ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कामगिरी बजावली.या गुन्ह्यात अद्याप मध्यप्रदेश सारंगपूरचा सोहेल नावाचा इसम,मकसुद अमिनुद्दीन मलिक(रा.ताजनगर टेका)गोलू बोरकर(रा.हिवरी नगर नंदनवन)अक्षय बोबडे(रा.हिंगणा)तसेच अल्लारखा(रा.हिंगणा)या आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले
धंतोली पोलिस ठाणेअंतर्गत ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक पुरुषोत्तम रामचंद्र भेदरकर यांच्या साई मंदिर येथील घरात ते गोवा येथे गेले असता घरफोडी करुन अलमारीतून सोन्याचे १० तोळ्यांचे दागिने तसेच रोख १० लाख रुपये अज्ञात इसमांनी चोरुन नेले होते.या घटनेत सागर उर्फ मंडला विजय रंभाळे(वय २२ वर्ष,रा.पहला रेल्वे फाटक,कार्पोरेशन गोडाऊन जवळ)सक्षम प्रेमनाथ मौदेकर(वय २४ वर्ष रा.परमात्मा बँगच्या बाजूला,गोळीबार चौक)तसेच रजत व्यंकटेश देवघरे(वय २६ वर्ष,गांजाखेत चौक,देवघर माेहल्ला)यांना अटक करण्यात आली असून,सतिश रतनलाल गौर(वय ३५ वर्ष,रा.ज्योती नगर,खदान)तसेच निलेश कुशल छप्परघरे(वय वर्षे ३० रा.टिमकी)यांचा शोध सुरु असल्याचे आयुक्तांनी सांगितले.युनिट-३ च्याच पथकाने ४ घरफोडी व २ वाहनचोरीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगदारांना अटक करुन त्यांच्याकडून १० लाख९६ हजर ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
याशिवाय दिनांक १६ ऑगस्ट रोजी अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरत नगर येथील ज्येष्ठ नागरिक पांडूरंग नारायण कुर्वे यांची फसवणूक करुन एटीएममधून ९० हजार रुपये काढून घेण्यात आले.तुमचा एटीएम कार्ड काम करत नाही,असे सांगून एटीएम कार्ड बदलून दिले.सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे त्या तिन्ही आरोपींना अटक करुन ९० हजारांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.आरोपी हे उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथील असल्याचे निष्पन्न झाले.अंबाझरी पोलिसांच्या पथकाने सय्यद खान कमालुद्दीन खान(वय ३४ वर्ष,रा.आयनॉक्स मॉल जवळ,वडाळा मुंबई)आलोककुमार बाळकृष्ण गौतम(वय ३२ वर्ष.रा.लालगंज उत्तरप्रदेश)मोहम्मद कलीम वल्द मो.नसीम (वय २१ वर्ष,रा.गाेवंडी वेस्ट शिवाजी नगर मुंबई)यांना ७२ तासांच्या आत अटक करण्यात आली.महत्वाचे म्हणजे या घटनेतील आरोपी यांच्याविरुद्ध देशभरात गुन्हे दाखल असून महाराष्ट्रात देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे,असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
अश्याप्रकारे १ जानेवरी २०२४ पासून २३ ऑगस्ट २०२४ पर्यंत एन.डी.पी.एस.कायद्यांतर्गत १६९ कारवाईतून एकूण २२२ आरोपींना अटक करण्यात आली असून ३ कोटी ९९ लाख ९६ हजार ०३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले तसेच त्यापैकी २ कोटी ५१ लाख ३९ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल एन.डी.पी.एस गुन्हे शाखा यांनी जप्त केले असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.
एम.डी.ची तस्करी नागपूरात संत्र्यांच्या पेट्यांमधून झाली,अशी चर्चा आहे,यात कितपत तथ्य आहे,असे विचारले असता मनपाचा कर्मचारी कपिल खोब्रागडे हा पूर्वी संत्र्याचा व्यापार करीत होता,त्यामुळे मध्यप्रदेशमध्ये त्याची ओळख आरोपी सुहेलसोबत झाली होती.अम्ली पदार्थ संत्र्यांच्या पेट्यांमधून नव्हे तर खासगी ट्रॅव्हल्स बसद्वारे नागपूरात आणण्यात आली असल्याचे उत्तर त्यांनी दिले.सोहेल हा तिथे एम.डी.चे रॅकेट चालवतो.गेल्या एक वर्षापासून नागपूरात तो थोड्या-थोड्या प्रमाणात एमडी पाठवत होता.कपिल खोबाग्रडे याने यासाठी नागपूरात खास वेगळी भाड्याची खोली घेतली होती.१ ग्राम,५ ग्राम अश्या प्रमाणात तो एमडीची विक्री करीत होता.आरोपीला घरुन अटक करण्यात आली त्यासोबतच त्याच्या ग्राहकांना देखील अटक झाली आहे.
खासगी ट्रॅव्हल्स बसेस यांची अचानक तपासणी का होत नाही?असा प्रश्न केला असता ,दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात असणा-या खासगी बसेस किवा रेल्वेची तपासणी होऊ शकत नाही मात्र,गुप्त माहितीच्या आधारे अचानक तपासणी केली जात असते,असे उत्तर त्यांनी दिले.आमचे पोलिस अधिकारी हे खासगी बसेसचे मालक यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांना तश्या सूचना देत असतात.काही संशयास्पद आढळल्यास पोलिसांना कळवण्याच्या सूचना खासगी बसेसच्या मालकांना देण्यात आले असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
येत्या गणेश उत्सवात डीजे व लेझरसाठी काही निर्देश दिले आहेत का?असा प्रश्न केला असता,या संदर्भात कालच बैठक झाली असून बैठकीत मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी तसेच गणेश मंडळांच्या आयोजकांचा समावेश होता.बैठकीत अनेक मुद्दांवर चर्चा झाली मात्र,सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डेसीबलचा आवाज मर्यादे बाहेर आढळल्यास योग्य कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला.गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश मंडळांना कशी व्यवस्था हवी ते त्यांनी आम्हाला कळवावे,अशी पुश्ती त्यांनी जोडली.
उद्या महाविकासआघाडीतर्फे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे,यावर पोलिसांची काय तयारी आहे?असे विचारले असता,‘पीसी टू सीपी’रस्यांवर हजर राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. याविषयावर आजच सकाळी आमची बैठक पार पडली.आमची पूर्ण तयारी झाली आहे.कोणीही कायदा हातात घेऊ नये.मुंबई उच्च न्यायालयाने बंद ला नकार दिला असल्याकडे लक्ष वेधले असता,अद्याप मी न्यायालयाचा निर्णय वाचला नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
नुकतेच पोलिस विभागात बदली पर्व साजरे झाले,यात अनेकांच्या बदल्या वादग्रस्त ठरल्या.अंबाझरी येथील एका पोलिस अधिका-याची बदली झाल्यावर देखील आठच दिवसात पुन्हा त्यांना अंबाझरी पोलिस ठाण्यातच परत पाठवण्यात आले,याकडे लक्ष वेधले असता,बदल्यांची कार्यपद्धती विचारुनच अमलात आणल्या गेली असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.पोलिसांची कार्यपद्धती,ते कुठे गुंतले आहेत का?त्यांची पार्श्वभूमी लक्षात घेऊनच बदल्या केल्या जातात.अनेक असे आहेत ज्यांनी पोलिस मुख्यालयात कधीच काम केले नाही.आम्ही या पदावर आलो ते सर्वच विभागात कामाचा अनुभव घेऊन पोहोचलो आहोत.ज्यांच्या खरोखरंच प्रामाणिक समस्या आहे,त्यांचा पुन्हा बदल्यांच्या संदर्भात विचार केला जाईल.आता वाहतूक विभागात २२५ जागेवर भर्ती होत असून नवीन अधिकारी येतील.बदल्यांच्या संदर्भात प्रत्येकाला शंभर टक्के संतुष्ट करता येत नाही,असे ते म्हणाले.एवढ्या मोठ्या संख्येत काही दोन-पाच कर्मचा-यांच्या बदल्यांबाबत असे घडले असेल,मात्र,बदली ही फायनल नसते,ती बदलू शकते,असे त्यांनी सांगितले.
तसहील पोलिस ठाण्यात १५ ऑगस्ट रोजी पोलिस वर्दीवर नृत्य आणि गायन केल्यामुळे चार पोलिस कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले,मात्र,९० टक्के जनमानस या कारवाईच्या विरोधात असल्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले असता,या घटनेबाबत दोन वेगवेगळे विचार प्रकर्षाने समोर आले असल्याचे ते म्हणाले.यावर कारवाई केली नसती तर सर्वांना सूट मिळाली असती.हे असंच चालू झालं असतं.परवानगी घेऊन कोणतेही काम पोलिसांनी केले पाहिजे.स्वत: व्हिडीयो बनवने आणि व्हायरल करने हे मर्यादेत बसत नसल्याचे आयुक्त म्हणाले.
कंत्राटदारांसोबत पोलिस आयुक्तांनी बैठक घेऊन देखील अनेक रस्ते बंद केले असून रस्त्यांचे व पाईप लाईनचे काम सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.अजनी,घाटरोड,लोखंडी पूल या सारखे रस्ते एकसाथ बंद करण्यात आले आहे याकडे लक्ष वेधले असता,कंत्राटदारांना रस्ते बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांना अाधी सूचना देण्यास सांगितले आहे,असे घडले असल्यास याचा मागोवा घेऊ,असे उत्तर त्यांनी दिले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात नागपूरात अम्ली पदार्थांची धरपकड होते,या पदार्थांचे सेवन म्हणजे अपराध आणि अपघातांना निमंत्रण नाही का?असा प्रश्न केला असता,पूर्वी पालक हे या विषयावर बाेलत नव्हते.शाळा,महाविद्यालयांमध्ये आम्ही जनजागृती केल्यावर आता त्यांचे पाल्य हे अम्ली पदार्थाचे सेवन करीत असतील तर कळवायला लागले आहेत,असे त्यांनी सांगितले.
एका १६ वर्षाच्या विद्यार्थ्याच्या आईने स्वत:हून सांगितले त्यांचा मुलगा एमडी घेतोय! पूर्वी हीच एवढी गंभीर बाब ते दाबून ठेवली जात होती.अम्ली पदार्थाच्या सेवनातून विस्फोटक परिस्थिती निर्माण होत असून आम्ही,आमचे अधिकारी सतत यावर कारवाई करीत आहोत.कोणत्याही परिस्थितीत नागूपरात अम्ली पदार्थांची तस्करी,सेवन खपवून घेतल्या जाणार नाही,अशी सख्त सूचना अधिका-यांना देण्यात आली आहे.आम्हाला नागपूरातून ड्रग्ज तडीपार करायचे आहे,नागपूरकरांना अपराध आणि अपघातमुक्त शहर देण्यासाठी आम्ही तत्पर असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
पत्रकार परिषदेत पोलिस उपायुक्त अस्वती दोरजे,सह पोलिस आयुक्त(क्राईम) संजय पाटील,डीसीपी डिटेक्शन क्राईम राहुल माकणीकर,एसीपी(क्राईम)अभिजित पाटील आदी उपस्थित होते.