फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमपाटातली बाई...

पाटातली बाई…

नागपूर,ता.१९ ऑगस्ट २०२४: एखाद्या स्त्रीसाठी‘पाटातली बाई’या शब्दाचा अर्थ हा बोली भाषेत असभ्य समजला जातो,तिचा सन्मान दुखावणारा असतो,तिच्या अस्तित्वावर ओरखडे ओढणारा असतो,तिच्या मनाला रक्तबंबाळ करणारा असतो,असे असताना एखाद्या स्त्रीला वारंवार असे संबोधन ऐकावे लागत असेल तर,तिच्या मनाची अवस्था आणि जगण्यातील दयनीयता याचा सहज अंदाज बांधता येतो.याउपर ही समाजातील काही रसुखदार ‘ठेकेदार’पुरुषांद्वारे रात्रीच्या ११.३० वा.तिच्या छातीवर बसून तिचे अर्ध्याहून जास्त केस मूळासकट उपडूण तिला जबर मारहाण करण्याची घटना घडते ,तेव्हा आपण आजही कोणत्या आदिम आणि बुरसटलेल्या मानसिकतेच्या समाजात जगतोय,असा गंभीर प्रश्‍न पडतो. भारतीय जनता पक्षाचे आमदार समीर मेघे यांच्या हिंगणा मतदारसंघातील कळमेश्‍वर तालुक्यातील,नागपूर जिल्ह्यातील  ‘वलनी’  या गावात अशीच धक्कादायक घटना घडली.
२१ एप्रिल २०२४ रोजी रात्री साढे अकराच्या सुमारास मीना मुन्नाजी पन्नासे या महिलेसोबत शेजारील दोन महिला व चार पुरुषांनी नेहमीसारखेच किरकोळ कारणासाठी भांडण उकरुन काढले.मीना व तिचे पती हे दोघेही अत्यंत गरीब असून शेत मजुरी करतात.त्यांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले.घरकुलाचे बांधकाम करताना रस्त्याच्या कडेला गिट्टी,रेती ठेवण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता.महत्वाचे म्हणजे त्याच घरकुला शेजारी इतर चार जणांची देखील घरे बनत होती व त्यांची देखील गिट्टी,रेती ही रस्त्याच्या कडेलाच ठेवण्यात आली होती.मात्र,मीना यांच्यावरच विशेष खुन्नस असणा-या दोन महिलांनी व त्यांच्या कुटूंबियांनी रात्री त्या गिट्टी,रेतीवरुन भांडण उकरुन काढले.परिणामी,मुन्ना यांनी रागाच्या भरात शिवीगाळ केली.
वाद वाढतच गेला व यानंतर रघुनाथ केशवराव रामगुंडे,अनिता रघुनाथ रामगुंडे,दादाराव महादेवराव रामगुंडे,कुंदा दादाराव रामगुंडे,अनिकेत दादाराव रामगुंडे,अनिकेत दादाराव रामगुंडे व प्रवीण उर्फ सोनू दिलीप पन्नासे यांनी मुन्ना यांना लकडी काठी व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.या मारहाणीत मुन्ना यांचे डोके फूटले,त्यांच्या पाठीवर व डाव्या मांडीला गंभीर दुखापत झाली.पतीची ही दयनीय अवस्था पाहून मीना यांनी पतीला वाचवण्यासाठी धाव घेतली.त्यावेळी प्रवीण दिलीप पन्नासे यांनी तिचे केस ओढून तिला खाली पाडले.तिच्या चेह-यावर थापडांचा जबर मारा केला.तिला खाली पाडून तिच्या छातीवर बसून,तिचा गळा जोरात दाबला.

सार्वजनिक ठिकाणी तिला खाली पाडून तिच्या छातीवर बसून तिला लज्जा उत्पन्न होईल,असे वर्तन केले.याउपरही अभ्रद भाषेतील तिला शिवीगाळ सुरुच होती.या संपूर्ण वादात महिलांनी देखील तिला बुक्क्यांनी मारले.विनय भंगासह,जीवे मारण्याचा प्रयत्न यावर कारवाईसाठी कळमेश्‍वर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार या पती-पत्नींनी केली,या मध्ये वरील सहा जणांच्या विरुद्ध त्यांनी कारवाईची मागणी केली.इतकी गंभीर घटना असून देखील पोलिसांनी गंभीर कलमा लावल्याच नाही.

मारहाण झाल्यानंतर हे पती-पत्नी स्वत: उपचारासाठी दवाखान्यात गेले होते.त्यामुळे त्यांच्यावर झालेल्या प्राणांतिक हल्ल्याचा अहवाल त्यांच्याकडे पुरावा म्हणून सुरक्षीत राहीला.पोलीस ठाण्यात रितसर तक्रार केल्यानंतर या पती-पत्नीला वाटले आता त्यांच्या तक्रारीवर पोलिस कारवाई करेल मात्र,पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.उलट,‘कार्यतत्पर’ पोलिसांनी फिर्यादींनाच फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम ११७,११६(३)अन्वये कायदा व सुव्यवस्था भंग केल्याची नोटीस बजावली!हे दाम्पत्य दोन वेळा तहसीलमध्ये हजेरी लाऊन गेले.
मूळ तक्रारीत देखील सहा ऐवजी चारच जणांवर किरकोळ कलमा लाऊन थातूर-मातूर कारवाई केली.दोन आरोपींची नावे मूळ तक्रारीतून गहाळ करुन फिर्यादी मीना यांना दुसरी तक्रार लिहण्यास बाध्य करण्यात आले!आज ही हे दाम्पत्य न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.ट्रेजेरी कार्यालयात आरोपींपैंकी एक रसूखदार कार्यरत असल्याने त्याने तहसील पोलिसांना ‘मॅनेज’केले असल्याचा आरोप केला जात आहे.

(छायाचित्र : फिर्यादींनाच पाठवलेली कलम ११७ ,११६(३)ची नोटीस!)

मीना यांचे पहीले लग्न मध्यप्रदेशच्या छिंदवाडा येथे झाले होते मात्र,त्यांच्या भास-यांनी स्वत:च्या १४ वर्षीय मुलीची विहीरीत ढकलून हत्या केली व स्वत: देखील आत्महत्या केली.यामुळे मीना यांच्या आई-वडीलांनी अवघ्या लग्नाच्या सहा महिन्यातच तिला घरी परत आणले.काही वर्षांनंतर पुन्हा तिचे रितसर लग्न लाऊन दिले.त्यांना आता एक १४ वर्षीय मुलगा आहे.मात्र,तिच्या शेजारी राहणा-या दोन्ही महिला तिला ‘पाटातली बाई,तू,जाणती आहे,तू ठोकेली आहे,तू करणी करते’असे वारंवार टोमणे मारुन घायाळ करीत असतात.मीना व त्यांच्या पतीने सातत्याने त्यांच्याकडे र्दूलक्ष केले.गरीब,मजूर असल्या कारणाने कोणतेही पाठबळ त्यांच्या मागे नव्हते.मात्र,२१ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी झालेल्या भांडणाची अती झाली.

महत्वाचे म्हणजे,मुन्ना यांनी केलेली शिवीगाळ ही चांगलीच व्हायरल झाली मात्र,त्यानंतर पती-पत्नीला झालेली जबर मारहाण याचा कोणीही व्हिडीयो काढलाच नाही!पोलिसांनी देखील शिवीगाळसाठी मुन्ना यांनाच दोषी ठरवले,मात्र,त्या शिवीगाळला एक प्रदीर्घ अशी पार्श्वभूमी आहे,जी माणसांच्या आत्मसन्मानाशी जुळलेली आहे,हे तपासण्याची साधी तसदी देखील पोलिस खाते घेत नाही.
मीना यांना घरकुल योजना मंजूर झाल्याने रामगुंडे यांना ते सहन झाले नसल्यानेच भांडण उकरुन काढण्यात आले असल्याचे खास ‘सत्ताधीश’कडे मीना सांगतात.मूळात तिचे आयुष्य हे तिने कसे जगावे?कोणासोबत जगावे?लग्नाने,बिगर लग्नाने जगावे,सोडचिठ्ठी घेऊन किवा बिगर सोडचिठ्ठी घेता जगावे?हे ठरविणारा समाज कोण होतो?ही ठेकेदारी कपाळावर कुंकुवाचा टिळा मिरविणा-या महिलांना कोणी दिली?एखाद्या अबला महिलेच्या छातीवर बसून तिचे अर्ध्याहून जास्त केस मूळासकट उपडण्याचा आणि तिला असह्य वेदनामध्ये ढकलण्याचा अधिकार समाजातील पुरुषांना कोणी दिला?याच प्रवृत्तीने अनेक महिलांना ‘चेटकीण’ठरवून आयुष्यातून कायमचे उठवून दिल्याचा अनेक घटना याच प्रगत,पुरोगामी महाराष्ट्रात घडल्या आहेत,त्यामुळे मीना यांचा संघर्ष,लढा हा किती गंभीर आहे,याचे ही गांर्भीर्य तहसील पोलिसांना राहत नसेल तर याचा अर्थ,त्यांच्या रेकॉर्ड डायरीतील आणखी एखादे पान,एखाद्या मीना पन्नासेचा जमावाद्वारे ‘चेटकीण,करणी करणारी बाई’ठरऊन मॉब लिंचिंगच्या घटनेची नोंद होण्याची वाट पाहत आहेत का?असा प्रश्‍न उपस्थित होतो.
‘मी २१ एप्रिलच्या त्या रात्री पासून झोपली नाही’मीना यांची ही व्यथा काय सांगते?तिच्या आत्मसन्मानावर किती गहीरी चोट बसली आहे,याची जाणीव हे कृत्य करणारे रसूखदार,पोलिस विभाग व स्वत: स्त्रीच्या जातीत जन्म घेणा-या त्या दोन महिलांना तरी होणार का?महाराष्ट्रसारख्या राज्यात एखाद्या स्त्रीची झालेली इतकी पराकोटीची विटंबना कळमेश्‍वर पोलीस ठाण्यातील पोलिसांसाठी ही आयपीसी ३२४ अन्वये किरकोळ गुन्ह्याची नोंद ठरली?ते ही सहा ऐवजी चारच आरोपींवर ती दाखल झाली?तिच्या छातीवर बसणारा तिला ‘ठोकेली’म्हणत असताना तिच्या देहासोबत केलेले कृत्य,हा पुरुषार्थाच्या कोणत्या कलमाखाली अपराध ठरतो?हे कळमेश्‍वर पोलिस ठाण्यातील पीआय श्री.कलामे सांगतील का?खूनाचा प्रयत्न,महीलेचा विनयभंग,जादूटोणा विरोधी कलमे न लावणय्ा मागे पोलिसांचा काय हेतू होता?

(छायाचित्र : काय करायचे या पंतप्रधान घरकुलाचे?त्यांच्या देशातील पोलिस विभागाकडूनच न्याय मिळत नसेल तर!)

या घटनेला आता चार महिन्यांचा काळ लोटला असून एका महिला वकीलाच्या मार्फत पिडीत दाम्पत्यांनी न्यायालयात दाद मागितली आहे.मात्र,तोच न्याय ,न्यायाची सर्वात पहिली पायरी असणा-या एफआयआरमध्ये उमटायला हवा होता.पोलिसांचे काम रसूखदार यांची पाठराखण करणे नव्हे तर सज्जनांचे रक्षण करने हे आहे.कर्तव्यावर रुजू होताना घेतलेल्या शपथेची आठवण ,मुखंड बघून नाही तर घटना आणि कायदा बघून त्यांना व्हायला हवी,दूर्देवाने असे घडत नाही त्यामुळेच एखादी मीना ही अन्यायाच्या आगीत न्यायाचा प्रतीक्षेत…. अशी होरपळून जळत राहते…!
आपापसातील किरकोळ वाद एवढीच ही घटना नसून,एका स्त्रीला खाली पाडून तिच्या छातीवर बसून तिचा गळा आवळणे हे कृत्य करुन, एका पुरुषाने जो ‘पुरुषार्थ’ दाखवला आहे,त्या पुरुषाला तुरुंगात डांबण्यासाठी व तिच्या पतीचे डोके फोडून रक्तबंबाळ करणा-यांवर कठोर कारवाई करण्यासाठी ,पोलिस विभागाने त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे अन्यथा पुरोगामी महाराष्ट्रात ‘बाई’ही कधीही ‘लाडकी बहीण’होऊ शकणार नाही, यात दूमत नाही.
(बातमीतील पहीले छायाचित्र : मीना यांचा गळा आवळल्यानंतर उमटलेले व्रण !)
……………………………..
(सपंर्क क्रमांक-मुन्ना विठोबाजी पन्नासे- 8390485170)
(वलनी ग्राम पंचायत सरपंच-संपर्क क्रमांक – 8605262087)
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या