फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशस्वातंत्र्यातही पारतंत्र्याचे जगणे....

स्वातंत्र्यातही पारतंत्र्याचे जगणे….

Advertisements

ईडीच्या कारवाईतून अनेकांना पारतंत्र्यात जगणे नशीबी
पक्ष,जात,धर्मविरहीत लोकशाही भारतात रुजलीच नाही तरीही प्रगल्भ लोकशाहीची वल्गना!
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१५ ऑगस्ट २०२४: स्वातंत्र्याच्या ७८ वा महोत्सव संपूर्ण देशात पुन्हा एकदा उत्साह आणि उल्लाहसात साजरा झाला मात्र,या स्वातंत्र्याच्या महोत्सवात अनेक असे आरोपी आहेत ज्यांना ईडी तसेच तत्सम केंद्रिय तपास यंत्रणांनी अटक करुन तुरुंगात डांबले आहे ते ही अनेक वर्षांपासून,ज्यांना जामीन ही मिळाला नाही आणि न्यायासाठी अद्याप त्यांचा लढा संपलेला नसून पारतंत्र्याचे जगणे त्यांच्या वाटेला आले आहे.
आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन पार पडले.शांतता,समृद्धी आणि एकतेचा संदेश पोहोचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन होते.भारतासारख्या लोकशाही देशात या मूल्यांना निश्‍चितच फार महत्व आहे मात्र,भारतीय नागरिकांच्या जीवनात कितपत या मूल्यांचा उपयोग होतो,यावरही जनजागृतीची गरज प्रतिपादीत केली जात आहे.विधीचा विषय आल्यानेच सव्वा दोन वर्षांपूर्वी नागपूरात ॲड.सतीश उके यांच्यावर केलेल्या ईडीच्या कारवाईची आठवण देखील प्रकर्षाने येणे क्रमाप्राप्त होते.३१ मार्च २०२१ रोजी सक्तवसुली संचालनालय(ईडी)चे अधिकारी रामेश्‍वरी येथील त्यांच्या घरी धडकले.त्यांचा लॅपटॉप व इतर साहित्य जप्त करण्यात आले.कोणताही समन्स त्यांना पाठवण्यात आला नव्हताच.जमीन हडपणे,बंदूक दाखवणे यासारख्या फौजदारीच्या खटल्यात महाराष्ट्र पोलिस विभागा ऐवजी चक्क ईडीने कारवाई करीत उके बंधूंना अटक करीत मुंबईत पीएमएलच्या विशेष कोर्टात हजर केले,यानंतर आजतागायत उके बंधू मुंबईच्या कारागृहात बंदिस्त आहे.संविधानाच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास गेल्या दोन वर्षांपासून देशाचा स्वातंत्र्य दिवस ते पारतंत्र्यात साजरा करीत आहेत.
ॲड.सतीश उके यांच्या खटल्याची आठवण येण्या मागे आणखी एक कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी,१३ ऑगस्ट रोजी दिलेली स्पष्टोक्ती ‘विशेष कायद्यामध्ये ही जामीन हाच नियम’या मुळे ,नागपूरात वकीली जगात देखील याची चांगलीच चर्चा रंगली व त्या अनुषंगाने ॲड.सतीश उके यांच्या जामीनाचा विषयही नकळत चर्चिला गेला.
सन १९७७ मध्ये जामीन हा नियम,हे सर्वप्रथम ‘राजस्थान सरकार विरुद्ध बालचंद’ या खटल्यात उद्धत करण्यात आले होते.त्यात जामीन कधी नाकारायला हवा,हे ही सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेले होते.जिथे आरोपी पलायन करु शकतो,न्यायात अडथळा आणू शकतो,पुन्हा पुन्हा गुन्हे करु शकतो,साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो,अशा वेळीच जामीन ‘नाकारता’येऊ शकेल अन्यथा,जामीन मिळायला हवा.सर्वोच्च न्यायालयाच्या या दिशानिर्देशाचे, देशातील कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायदानात १९७७ पासून कितपत पालन झाले,हा संशोधनाचा विषय आहे.
‘जामीन हा नियमच आहे आणि तुरुंगवास हा अपवाद‘असे सर्वोच्च न्यायालयाने म्हणायची ही पहीली वेळ नाही.दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना तुरुंगवासाच्या १८ महिन्यानंतर,गेल्या शुक्रवारी जामीन मंजूर करतानाही न्यायालयाने अशीच टिपण्णी केली होती.त्या आधी मार्च मध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हे सूत्र ठलकपणे अधोरेखित केले होते.त्यावेळी त्यांनी आक्षेप घेतला होता तो जिल्हा न्यायालये,उच्च न्यायालये यांच्या कार्यपद्धतीवर.जामीन मंजूर करण्यास ही न्यायालये फारशी ‘उत्सूक’ नसल्याने मग आरोपी सर्वोच्च न्यायालयात दाद मागतात आणि खटल्यांचे ढिग  वाढत जातात.दहशतवाद,धार्मिक रंग,जातीय रंग अशा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयांनी जामीन नाकाल्याची अनेक उदहारणे आहेत.अशा प्रकरणात आरोपांचा नेमका विचार होण्यापेक्षा आरोपींची पार्श्वभूमी व आरोपांची पार्श्वभूमी,जनमानसातील धारणा या गोष्टींचा अधिक विचार होतो का?यावरही विचार करण्याची वेळ आली आहे.
योग्य प्रकरणामध्ये जामीन नाकारणे अयोग्य,तसे झाल्यास मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असून गंभीर आरोपांतही जामिनाचा विचार करणे हे न्यायालयाचे कर्तव्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.फिर्यादीचे आरोप अत्यंत गंभीर असू शकतात पण,कायद्यानुसार जामिनासाठी खटल्याचा विचार करणे हे न्यायालयाचे कर्तव्य आहे.जामीन हा नियम आहे आणि तुरुंगवास हा अपवाद आहे.हे तत्व विशेष कायद्यांनाही लागू होते.योग्य प्रकरणामध्ये न्यायालये जामीन नाकारु लागली,तर हे कलम २१ अंतर्गत हमी दिलेल्या(आयुष्य जगण्याच्या)अधिकाराचे उल्लंघन होईल,असे सर्वोच्च न्यालयाने स्पष्ट केले.बेकायदा कृत्ये प्रतिबंधक कायद्यासारख्या(यूएपीए)विशेष कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांनाही ‘जामीन हा नियम,तुरुंगवास हा अपवाद’,हे कायदेशीर तत्व लागू असल्याचा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला.दहशतवाद विरोधातील कडक कायद्याअंतर्गत बिहारमधील जलालुद्दीन खान नावाच्या आरोपीला जामीनावर मुक्त करताना न्यायमूर्ती अभय.एस.ओक व न्या.ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले.बंदी घातलेल्या ‘पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया‘(पीएफआय)संघटनेच्या कथित सदस्यांना पाटणा येथील फुलवारीशरीफ भागातील आपल्या घराच्या वरच्या मजल्यावर भाड्याने घर दिल्याबद्दल जलालुद्दीनला ११ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७८ व्या वर्षातील इतिहासात कोणत्याही राज्यातील गृहमंत्र्यांना ईडीने अटक केली नसावी,ते अद् भूत कृत्य महाराष्ट्र नावाच्या पुरोगामी राज्यात घडले!१०० कोटींच्या खंडणी प्रकरणातून गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला,यानंतर ते १३ महिने ईडीच्या कोठडीत होते.ॲड.सतीश उकेंनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवली,असा आरोप केला होता.या प्रकरणात फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करुन खटला चालविण्यात यावा,अशी तक्रार उके यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालया पुढे केली होती.हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातपर्यंत गेले होते.सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी खटला चालविण्यात यावा,असे आदेश दिले होते.
त्यानंतर प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणी खटला सुरु झाला.ॲड.उके यांनी सुनावणी दरम्यान युक्तीवाद तसेच साक्षी पुरावे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती.यानंतर कायदेशीर प्रक्रियेनुसार आरोपीला न्यायालयात बयानासाठी हजर राहावे लागते.१५ एप्रिल २०२३ रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही.ए.देशमुख यांच्यासमक्ष उपस्थित झाले.यानंतर ८ सप्टेंबर २०२३ रोजी न्यायालयाने उके यांची याचिका फेटाळली व फडणवीस यांची निर्दोष मुक्तता केली.तत्पूर्वी ॲड.उके व त्यांचे बंधू यांना ईडीने ३१ मार्च २०२२ रोजी एका जमीनीच्या गैरव्यवहारासंबंधात अटक केली,उके यांचा जामीन अर्जही पीएमएलए व त्यानंतर मुंबई उच्च न्यायालाने फेटाळला आहे.या घटनेला जवळपास ८ महिन्यांचा कालावधी होत असून ॲड.उके यांनी जामीनासाठी अद्याप सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली नसल्याने, त्यांचे शुभचिंतक वकील मित्र आश्‍चर्य व्यक्त करतात.उके बंधूंवर ईडीच्या कारवाईसोबतच कठोर असा ‘मकोका’देखील लावण्यात आला आहे,हे विशेष.
एकंदरित ईडीच्या कारवाई संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा ईडी अधिका-यांना धारेवर धरले.एखाद्या आरोपीला ब-याच कालावधीपर्यंत तुरुंगात ठेवण्यासाठी आणि त्याच्या नियमित जामीनाला विरोध करण्यासाठी पुरवणी आरोपपत्र सादर केले जात असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले.सुनावणी शिवाय आरोपीला तुरुंगात ठेवण्याची ही पद्धत सर्वोच्च न्यायालयाला त्रासाची ठरत असल्याचेही न्या.संजीव खन्ना आणि न्या.दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले.झारखंडमधील बेकायदा खाणकाम प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदवले.या प्रकरणातील आरोपी प्रेमप्रकाश यांचा झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याशी निकटचा संबंध असल्याचा ईडीचा दावा आहे.प्रेमप्रकाश १८ महिने तुरुंगात असल्यामुळे जामीन मिळण्यास पात्र असल्याचे मत त्यांच्या वकीलाने मांडले होते.दीर्घकाळ तुरुंगात असलेल्या आरोपींविरोधात सबळ पुरावा नसल्यास आणि जामीनावर बाहेर असताना गुन्हा करण्याची शक्यता नसल्यास,त्याला नियमित जामीन मिळण्याचा हक्क असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
तपास पूर्ण होईपर्यंत तुम्ही आरोपीला अटक करु नये,हाच नियमित जामिनाचा उद्देश्‍य आहे.तुम्ही आरोपीला अटक करु शकत नाही आणि तपास पूर्ण नाही म्हणून सुनावणी सुरु करता येत नाही,असेही म्हणू शकत नाही.सुनावणीशिवाय आरोपीला तुरुंगात ठेवण्यासाठी तुम्ही सातत्याने पुरवणी आरोपपत्र सादर करु शकत नाही,असे न्या.खन्ना यांनी ईडीला सुनावले.या प्रकरणातील अारोपी १८ महिन्यांपासून तुरुंगात आहे,ही बाब आम्हाला खटकत आहे.तुम्ही आरोपीला अटक करताच सुनावणीला सुरवात होणे आवश्‍यक होते,असेही खंडपीठाने स्पष्ट केले.यावरुन ईडीची कारवाई कशी चालते याचा प्रत्यय येतो.
याच सर्वोच्च न्यायालयाने ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉंडरिंग‘कायद्यांतर्गत अटकेसाठी ईडीचे अधिकार कायम ठेवले आहे.या तरतुदींना घटनात्मक आव्हान देणा-या याचिका न्या.ए.एम.खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने फेटाळ्या.या कायद्याचा वापर ईडीकडून विशेषत:काळ्या पैशाच्या विरोधातील कारवाईसाठी केला जातो.कार्ती चिदंबरम,माजी गृहमंत्री अनिल देशमुख,मेहबूबा मुफ्ती यांच्यासह २४२ याचिकाकर्त्यांनी या कायद्यांतर्गत ईडीने केलेली अटक,जप्ती आणि तपास प्रक्रिया यांना सर्वोच्च न्यायालयात घटनात्मक आव्हान दिले होते.
तमिळनाडू-मदुराईतील ईडीचे अधिकारी अंकित तिवारी यांना २० लाख रुपयांची लाच घेताना अटक झाली,ही घटना अद्याप कोणाच्या विस्मरणात गेलेली नाही.पं.बंगाल पासून महाराष्ट्रपर्यंत अनेक प्रकरणांमध्ये ईडीच्या कारवाया सुरु आहेत.शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत पत्राचार घोटाळाप्रकरणी तुरुंगवास भोगून आले व सध्या जामीनावर आहेत.काँग्रेसचे शीर्षस्थ नेते सोनिया गांधी व राहूल गांधी .हे नॅशनल हेरल्ड प्रकरणी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत.महत्वाचे म्हणजे ईडी देशभरात कारवाया करीत असली तरी या सगळ्या छापे,खटले यांचा तार्किक शेवट आरोपींच्या शिक्षेत होण्याचे प्रमाण जेमतेम अर्धा टक्का आहे! 

ईडी ही केंद्रिय अर्थखात्याच्या महसूल विभागाअंतर्गत असलेली संस्था आहे.भारतीय महसूल सेवा,

भारतीय पोलिस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी ईडीमध्ये कार्यरत आहेत.१९५६ मध्ये ईडीची स्थापना झाली होती.व्हिएन्ना परिषदेत ठरल्याप्रमाणे ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग’कायदा लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी देशात ईडीकडून केली जाते.या ईडीच्या मार्च २०२३ अखेर गुन्ह्यांच्या तपशीलात,५,९०७ तक्रारी ईडीने दाखल केल्या.५३१ छापा टाकलेल्या तक्रारी होत्या यात आमदार,खासदारांची संख्या १७६ एवढी होती.प्रलंबित तक्रारी ४०,९०४ होत्या तर ५१३ आराेपींना अटक करण्यात आली होती.एकूण ११४२ आरोपींवर गुन्हे दाखल झाले,२५ आरोपांची चौकशी पूर्ण झाली होती,शिक्षा झालेल्या आरोपांची संख्या केवळ २५ होती.गुन्ह्यातील शिक्षेचे प्रमाण शून्य दशमलव ५ टक्के असून जप्त रक्कम १५ हजार ६२३ कोटी होती.
याच महिन्यात म्हणजे मार्च २०२३ मध्ये बंगळूरमध्ये चाळीस लाखांची लाच घेतल्याचा आरोपावरुन भाजपचे आमदार पूत्र प्रशांत वीरुपाक्ष्प्पा यांना लोकायुक्तांनी अटक केली.त्याच्या घरातून ६ कोटी व कार्यालयातून २ कोटींची बेहिशोबी रक्कम जप्त केली.या कारवाईनंतर भाजपचे आमदार के.मडाळ वीरुपाक्षप्पा यांनी कर्नाटक सोप अँड डिसर्ज़ंट् लि.(केएसडीएल)अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.कनार्टकात काँग्रेसची सरकार आल्यानंतर भाजपच्या आमदार पूत्रावर ही कारवाई झाली हे विशेष.हा आमदार पूत्र बंगळूर पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचा मुख्य लेखापाल होता!ही कारवाई ईडीने न करता लोकायुक्तांनी केली होती,हे विशेष!संपूर्ण देशात ईडीचा छापा एकाही भ्रष्ट भाजप नेत्यावर पडला नसून भ्रष्टाचाराचे आरोप असणा-यांवर भाजपसोबत युती केल्यानंतर ईडीकडून साधा चौकशीचा देखील समन्स गेला नाही,अशी ओरड विरोधक करताना आढळतात.
थोडक्यात,खुनशी,मूल्यहीन व संधीसाधू राजकारणातून देशातील कानाकोप-यातील तुरुंगात पारतंत्र्यात जगणा-यांची संख्या ही येत्या काळातही वाढत राहणार असून,स्वातंत्र्यात ही पारतंत्र्यातील जगणे हीच या देशाची नियती झाली आहे,असेच आता म्हणावे लागेल.सामान्य जनतेला मात्र,धार्मिक,जातीय आणि पक्षीय मूल्यांवर मतदान करण्यातच,आज ही धन्यता वाटते,संविधानातील मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे आघात,याच्याशी सामान्य जनतेला ,बुद्धीवाद्यांना काहीही घेणेदेणे नसल्यामुळे,पुढे आम्ही स्वातंत्र्यांचा शतकोत्तर महोत्सव जरी साजरा केला तरी देखील ख-या अर्थाने भारतीय लोकशाही ही प्रगल्भ झाली असल्याची वलग्ना करु शकत नाही,यात दूमत नाही.
…………………………………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या