श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समारोह समितीच्यावतीने रेशीमबाग येथील कवी सुरेश भट सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे स्वामी श्री जितेंद्रनाथ महाराज, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही यांची उपस्थीती राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जन्मशताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर आधारित ‘आधारवड’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार असून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या संस्थेला ‘‘श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर शिक्षण पुरस्कार’’ प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला विदर्भातील नागरिक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते या सगळ्यांनीच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे सचिव अजय संचेती, उपाध्यक्ष अरुण लखानी, प्रा.अनिरुद्ध देशपांडे, प्रा. बाळ दीक्षित, संयोजक भूपेन्द्र शहाणे, सहसंयोजक डॉ. रविशंकर मोर, सदस्य डॉ. विलास डांगरे, डॉ. रामदास आंबटकर, डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रा. अनिल सोले, सुनील पाळधीकर, प्रा. नारायण मेहरे, डॉ. मुरलीधर चांदेकर, विनय माहुरकर, आदींनी केले आहे.
श्रद्धेय दत्ताजी डिडोळकर यांचा परिचय :
दत्ताजी डिडोळकर यांचा जन्म बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर तालुक्यात ७ ऑगस्ट १९२३ रोजी झाला. ते एक अलौकिक, प्रभावी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. संपूर्ण भारतातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते आधारशीला होते. कन्याकुमारी येथील विवेकानंद शीला स्मारकाच्या निर्माण प्रक्रियेतल्या पहिल्या संघर्षाची ठिणगी पेटवण्यापासनं तर नागपूर विद्यापीठातल्या कार्याला आणि निर्णय प्रक्रियेला दिशा देण्यापर्यंत, जयंत ट्युटोरियल क्लासेसच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात एक आगळा प्रयोग करण्यापर्यंतचे अनेक उच्चांक दत्ताजींनी आपल्या कर्तृत्वाने नोंदवले.
जन्मशताब्दी वर्षात राबवले विविध उपक्रम :
दत्ताजींच्या एकूणच वैयक्तिक आणि सामाजिक जीवन कार्याचे स्मरण व्हावे, त्यांची कर्तबगारी नव्या पिढीला कळावी या उद्देशाने दत्ताजींची जन्मशताब्दी वर्षात विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात आले. दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन नागपूरच्या सुरेश भट सभागृहात ६ ऑगस्ट २०२३ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, नितीन गडकरी, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवशरण शाही यांची उपस्थिती पार पडले. यावेळी दत्ताजींच्या जीवनाची माहिती नवीन कार्यकर्त्यांना करून देणाऱ्या लघु पुस्तिका मराठी हिंदी आणि इंग्रजीतून प्रकाशित करण्यात आल्या. दत्ताजी ज्या संस्थेचे विद्यार्थी राहिले ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि दत्ताजींची कार्यकारिणी सदस्य म्हणून जिथे कारकीर्द गाजली, ते विद्यापीठ या दरम्यानच्या रस्त्याला दत्ताजी डिडोळकरांचे नाव देण्यात आले. प्रख्यात अध्यात्मिक मार्गदर्शक श्री एम यांचं भारत की संकल्पना या विषयावरील व्याख्यान, अभाविपच्या स्थापना दिनाचे निमित्त साधून विदर्भातल्या सर्व जिल्हा स्थानी जुन्या काळातील कार्यकर्त्यांची सम्मेलने पार पडली. ७५ पूर्वी कार्य करणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. गरीब आणि मेधावी विद्यार्थ्यांसाठी दत्ताजी डिडोळकर विद्यार्थी विकास निधीचा उपक्रम सुरू करण्यात आला, याद्वारे अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली. आता या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप येत्या ७ ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे.
………………….