अशोक हांडे यांचा आणखी एक अभिवन प्रयोग:सोमवारी नागपूरात नि:शुल्क सादरीकरण
अत्रेंच्य शतकोत्तर रौप्यमहोत्सवी १२५ वी जयंती निमित्त शासनातर्फे आयोजन
नागपूर,ता.३ ऑगस्ट २०२४: साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जयंतीचे १२५वे म्हणजेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा कार्यक्रम सोमवार दिनांक ५ ऑगस्ट रात्री ८ वाजता कविवर्य सुरेश भट नाट्यगृह, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती लेखक, दिग्दर्शक व निर्माते अशोक हांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईच्या ‘चौरंग’ या संस्थेतर्फे प्रस्तुत, या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, निर्मिती, दिग्दर्शक व निवेदन अशोक हांडे यांचे असून महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजन केले जात आहे. हा कार्यक्रम जुन्या पिढीने तर बघावाच मात्र नव्या पिढीने बघण्यासारखा असल्याचे अशोक हांडे म्हणाले.
आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन आचार्य अत्रे यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाद्वारे साजरे करीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, आयोजक म्हणून विकास खारगे, प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग तसेच विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी जबाबदारी उचलली असल्याची माहिती त्यांनी दिली.
गेल्या ३७ वर्षांपासून ‘चौरंग’संस्थेतर्फे विविध कार्यक्रम केले त्यात मंगल गाणी दंगलगाणी,आवाज की दूनिया,माणिक मोती,गंगा-जमुना,मी यशवंत,पी.सावळाराम,आजादी-५०,आनंद यात्री,स्वर मनोहर,अमृत-लता अशी अनेक गाजलेली कार्यक्रमे सादर केल्यानंतर आचार्य अत्रेंवर हा कार्यक्रम २०१३ साली तयार केला.आतापर्यंत या कार्यक्रमाचे १२० प्रयोग झाले आहे.आचार्य अत्रेंच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ वी जयंती निमित्त महाराष्ट्र शासनातर्फे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात या कार्यक्रमाचे सादरीकरण होत असून,फडणवीस व मुनगंटीवार यांच्या खास आग्रहाखातर उपराजधानी नागपूरात याचा प्रयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.
५० कलाकारांमध्ये नागपूरचे कलाकार आहेत का?असा प्रश्न केला असता,नागपूरातील अनेक गुणी कलावंत मला येऊन भेटतात,त्यांना योग्य संधी देण्याचा मी प्रयत्न करतो.नागपूरकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे विजय दयाळ नावाचा गिटारवादक हा १९९४ साली माझ्याकडे आला.माझ्या संचासोबत काम करीत असतानाच त्याने रेकॉर्डिंगमध्ये आवड असल्याचे सांगितले.आज मुंबईत तो नावाजलेला रेकॉर्डिंग आर्टिस्ट असून अभिनेते शाहरुख,सलमान यांची देखील रेकॉर्डिंगची कामे विजय शिवाय अडतात.सुप्रसिद्ध यशराज स्टूडियोमध्ये विजय आज मुख्य रेकॉर्डिस्ट असल्याचे सांगत ‘चौरंग’हे विद्यापीठ आहे,यात प्रत्येक गुणवंत कलावंतांचे स्वागत केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.विजयला तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले असल्याचे ते सांगतात.
एका प्रश्नावर बोलताना,महाराष्ट्राच्या भूमीत ओवी आहे तर शिवी देखील आहे,पांडूरंगाची वारी आहे तर लावणीची बारी देखील आहे.कार्यक्राची संकल्पना तयार करताना,गरजेनुसार सर्वच साहित्य प्रकारांचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरात,हांडे यांचे अनेक कार्यक्रम झाले असून त्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमांचे मनावरील गारुड इतक्या दशकांनंतर देखील नागपूरकर विसरले नाही,अद्यापही ते कार्यक्रम नागपूरकरांच्या मनात चिरतरुण असून हांडे हे जसे काही दशकांपूर्वी होते तसेच आज देखील दिसून पडतात,त्यांच्या चिरतरुण असण्या मागे कलेचे गुपित आहे का?असा प्रश्न केला असता,‘घेतो झोप सुखे फिरुनी उठतो,ही ईश्वराची दया’असे सांगत,मनातील प्रचंड उत्साह मला चिरतरुण ठेवीत असल्याचे ते सांगतात.
याप्रसंगी अत्रेंच्या अनेक मराठी गीतांची चाल त्यांनी अलगद छेडली.‘दूपारी एकटी अशी का फिरतेसउन्हात,फिरतेस वनात’,‘उगवला चंद्र पुनवेचा’महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास,शाहू महाराजांचे सामाजिक कार्य याच धर्तीवर आचार्य अत्रेंच्या लेखणीची जादू,त्यांचा त्याग,धडाडी,अखंड महाराष्ट्रासाठीचा प्राणांतिक लढा,त्यांची कविता,गाणी,नाटकातील प्रवेश,या सर्व घडामोडी पावणे दोन तासांच्या कार्यक्रमात सादर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.अत्रे प्रेमींची संख्या ही आज जरी कमी झाली असली तरी ‘जे महाराष्ट्र प्रेमी आहेत ते अत्रे प्रेमी आपोआप असतात’,अशी पुश्ती त्यांनी जोडली.
सोमवारच्या कार्यक्रमात अशोक हांडेपेक्षा आचार्य अत्रे किती मोठे होते,ते फक्त बघायला या,असे आवाहान त्यांनी केले.१९३४ साली त्या काळात अत्रेंनी आपल्या‘यमुना किनारी खेळू’या गीतात स्वीमिंग कॉस्ट्यूम मराठी अभिनेत्रीला घालून ,महाराष्ट्रात जी प्रचंड खळबळ माजवली,ती फक्त अत्रेंनाच शक्य होती,अत्रे एवढे बोल्ड होते,सोमवारच्या कार्यक्रमात ‘पर्दे पे देखिये’असे सांगून नागपूरकर रसिकांना ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’चा प्रयोग हाऊसफूल करण्याची साद त्यांनी घातली.
‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा कार्यक्रम म्हणजे आचार्य अत्रे यांची संगीतमय जीवन गाथा आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते अखेरपर्यंत त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा, त्यांच्या नाटक व चित्रपटातील गाणी, कविता कथा विनोदी भाषणे, विनोदी किस्से आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईच्या माध्यमातून मांडला जातो. शिक्षक, मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, वक्ते, नाटककार, चित्रपटकार, कथा, पटकथा, संवाद लिहिणारे, नाट्यपदं आणि चित्रपटातील गाणी लिहिणारे निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, संपादक, विनोद, काव्य, साहित्य आणि आपल्या तडाखे बंद आणि विनोदी भाषणांनी महाराष्ट्राला परीचित असलेले आचार्य अत्रे म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व. राजकारणात उडी घेऊन त्यांनी पुण्याचा विकास केला व पुढे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे सेनापतीपद भूषविले आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा पुरेपूर वापर करून महाराष्ट्र घडवला.
आचार्य अत्रे कोण होते? त्यांची विद्वत्ता, वक्तृत्व, राजकीय कर्तृत्व, त्यांनी शालेय अभ्यासक्रमात आणलेले ‘नवनीत वाचनमाला’, पत्रकार आणि संपादक म्हणून त्यांचे योगदान, नाटक आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेली देदीप्यमान कामगिरी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी निभावलेली ऊतुंग भूमिका यांचा यात समावेश राहणार आहे.
५० कलाकारांचा सहभाग –
चौरंगचे ५० कलाकार हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार पद्धतीने सादर करतात. या कार्यक्रमासाठी आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि आचार्य अत्रे यांचे नातू ॲडव्होकेट राजेंद्र पै यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून ध्वनी संयोजन दिलीप बोनाटे यांचे असून प्रकाश योजना सुमेध कळस्कर, रंगभूषा प्रसाद ठक्कर, व्हिडीओ शैलेंद्र म्हात्रे, निर्मिती व्यवस्था मुरलीधर जाधव व उदय शेटटी यांची प्रमोद सोहोनी, सचिन मुळ्ये, रुद्रेश कानविंदे मैथिली जोशी, स्मिता जोशी आणि निलाक्षी पेंढारकर हे गायक कलाकार आणि महेश खानोलकर, नीला सोहोनी, सत्यजित प्रभू अमित गोठीवरेकर, अभिमान आपटे, मंदार पेडणेकर, अविनाश मयेकर, नारायण साळुंके, भावेश पाटील, राहुल मयेकर, गोविंद हडकर, गौतम सोनावणे, रेणूका पानसे या वादक कलाकारांचा कार्यक्रमात सहभाग आहे.
नि:शुल्क प्रवेशिका येथून प्राप्त करा –
हा कार्यक्रम नि:शुल्क असून प्रवेशिका सुरेश भेट सभागृह व विष्णुजी की रसोई, बजाजनगर येथे उपलब्ध राहतील. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. प्रथम येणा-या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाईल.
……………………………………………….
अशोक हांडे यांचा उद्या ४ ऑगस्ट रोजी कलाकारांशी ‘गप्पा-टप्पा’
विविध कला क्षेत्रातील कलावंतांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नागपुरी कलाकार कट्टामध्ये प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, देखक व निवेदक तसेच, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबईचे विश्वस्त अशोक हांडे हजेरी लावणार आहेत.नागपुर कलाकार कट्टातर्फे रविवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता विष्णू जी की रसोई, बजाजनगर येथे ‘अशोक हांडे यांच्याशी गप्पा-टप्पा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कलावंत, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयेाजकांनी केले आहे.