फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजअंभोरा:जुन्या वैभवाला लागणार सौंदर्यीकरणाचे कोंदण

अंभोरा:जुन्या वैभवाला लागणार सौंदर्यीकरणाचे कोंदण

Advertisements

(भाग-१)
सार्वजनिक बांधकाम विभाग साकारणार २४८ कोटींचा विकास प्रकल्प
‘सत्ताधीश’ऑन द स्पॉट
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.१ ऑगस्ट २०२४: नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात ‘अंभाेरा‘ हे प्रसिद्ध तीर्थस्थळ आता आपली कात टाकून नव्याने सुशोभित होणार आहे.या ठिकाणी असणारा प्रदीर्घ घाट,पुरातन मंदिरे तसेच सभोवतालच्या नयनरम्य परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या निर्णयाला शासनस्तरावर स्वीकृती मिळून  यासाठी २४८ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विदर्भ विकास मंडळाला मिळाले आहे.यातील २०० कोटींचे सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करणार असून ४८ कोटी रुपये विदर्भ विकास मंडळ नदीच्या पलीकडील घाट इत्यादीच्या सौंदर्यीकरणावर खर्च करणार आहे.या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या असून येत्या दोन वर्षात अंभाेरा तीर्थस्थळाचे संपूर्ण कायापलट झालेले वैदर्भियांना दिसून पडेल.‘सत्ताधीश’ने खास अंभाेरा तीर्थस्थळाला भेट देत,या विकास प्रकल्पाची पार्श्वभूमी समजून घेतली.
वैनगंगा नदीच्या किनारी अंभाेरा हे गाव वसले असून पाच नद्या वैनगंगा,कन्हान,आंब,मुर्जा आणि कोलारी या नद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव आहे.दाट वनराई,सर्वदूर अथांग पसरलेले पाणी आणि टेकडीवर चैतन्येश्‍वर महादेवाचे मंदिर हे अंभो-याचे लखलखते वैभव आहे. चैतन्यश्‍वेर मंदिर यासोबतच परिसरातील हरिनाथ मंदिर,गणेश मंदिर,मारुती इत्यादी मंदिरांचा मूळ गाभारा तसाच ठेऊन या पुरातन मंदिरांचे संपूर्ण कायापलट झालेले येत्या दोन वर्षात भाविक तसेस या ठिकाणी येणा-या पर्यटकांना दिसणार आहे.

 

अंभाेरा हे ठिकाण नागपूरपासून ८० किलोमीटर तर भंडारापासून फक्त १८ किलोमीटरच्या अंतरावर आहे.पूर्वी अंभो-याला जायचे असल्यास मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी नदी ओलांडून जावे लागत असे.त्यासाठी इथे होड्या असतात. त्यांना इथल्या बोली भोषत ‘डोंगा’म्हणतात.अंभो-याला असणा-या टेकड्यांना ब्रम्हगिरी पर्वत म्हटले जाते.चहूकडे भरगच्च पसरलेली झाडी,नद्यांचे विस्तृत पात्र,टेकडीला वळसा घालून चंद्राकार झालेली आंब नदी आणि निसर्ग सौंदर्याने भारलेल्या उंच ठिकाणी महादेवाचे हेमाडपंथी मंदिर,मनात चैतन्य निर्माण करुन जात असल्यानेच या मंदिराला म्हणूनच चैतन्यश्‍वेवर हे नाव पडले असावे.१२ वर्षांच्या महाव्रतानंतर ब्रम्हगिरीवर झालेल्या महायज्ञातून इथे चैतन्येश्‍वर प्रकट झाले असे म्हणतात.

 

इथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.मध्यप्रदेश,छत्तीसगढ आणि संपूर्ण विदर्भातून भाविक इथे दर्शनाला येतात.त्यावेळी या ठिकाणी असंख्य राहूट्यांचा डेरा पडलेला असतो.या शिवाय कार्तिक स्नान समाप्ती आणि दशाहार,गंगापूजन असे काही उत्सव इथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.

 

मंदिराच्या पश्‍चिमेला तीन समाधी मंदिर आहे.यामध्ये एक समाधी नेपाळच्या राजाच्या मुलाची आहे.श्री हरिनाम महाराज आणि त्यांचे शिष्य श्री रघुनाथ उर्फ रामचंद्र महाराज यांची संजीवनी समाधी इथे आहे.येथील पुजारी गंगाधर वाडीभस्मे यांनी खास ‘सत्ताधीश’ला सांगितल्याप्रमाणे, गुरु-शिष्याची समाधी एकाच ठिकाणी असून या समाधीस्थळाच्या गाभा-यात अमावस्या,पोर्णिमेला ‘ओंकाराची’ध्यान धारणा करण्यासाठी बसल्यास, समाधीतून ‘ओंकार’चा ध्वनि स्पष्टपणे ऐकू येतो! येथील हरिनाथ मंदिरात असलेल्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे ‘मराठीचे आद्य कवि श्री मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ इथे लिहिला आहे’पुढील शतकात श्री मुकुंदराज यांच्याच विवेक सिंधू ग्रंथाला प्रेरणा मानून ज्ञानदेवाने जगासाठी पसायदान मागणारी ‘ज्ञानेश्‍वरी’लिहली.ज्ञानदेवाने याचा उल्लेख आपल्या ज्ञानेश्‍वरीत अगदी सुरवातीलाच केला आहे.

 

हरिनाथ समाधी मंदिराच्या परिसरातच मारुती व गणपतीचे मंदिर आहे.गणपतीच्या मंदिराखाली पाताळ गंगेचे मंदिर आहे.दशाहराला येथे असंख्य भाविक गंगापूजनासाठी गर्दी करतात.ज्येष्ठ महिन्याच्या रणरणत्या उन्हाळ्यातही ज्येष्ठ शुद्ध दशमीला नदीचे पात्र विस्तारते,अशी भाविकांची श्रद्धा आहे.
https://youtu.be/gP3heEFxFFw?si=Y8HcCHAKvgarWKPa

पाच नद्यांचा संगम हे अंभो-याचे वैशिष्ठ असले तरी  पर्वतामधून पाच धारा अव्याहतपणे खाली कोसळत असतात.ते दृष्य विलोभनीय असतं.यातीलच वैनगंगा पुढे मार्कंंड्याला मिळते.याच पर्वतराजीमध्ये एका पुरातन किल्ल्याचे अवशेष बघायला मिळतात.या किल्ल्यातून सर्व दूर पसरलेली खेडी आणि शहरे दिसून पडत होती.आता हे गाव अंभो-यापासून ४ ते ५ किलोमीटर अंतरावर जाऊन वसले असून एका अंभोराचे ‘चार’गाव झाले असल्याची माहिती पुजारी गंगाधर वाडीभस्मे सांगतात.मात्र,ग्रामपंचायत एकच असून सरपंच देखील आहे.अंभोरा गावात नदीमुळे वारंवार येणारा पूर यामुळे हे गाव नदीपासून काही किलोमीटर अंतरावर वसविण्यात आल्याची माहिती ते देतात.

 

अंभो-याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे.मंदिर परिसरातच भक्तांसाठी राहण्याची सोय असली तरी ती अपुरी असल्याने याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी १०-१० खोल्यांचे यात्री निवास,भक्त निवासाच्या सुविधा उभारणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता प्रगती माटे यांनी दिली.पुरातन मंदिरांचे मजबुतीकरण केले जाईल.या ठिकाणचे प्रसादगृह नव्याने बांधल्या जाईल.चार एकर परिसरात पसरलेले अस्थायी दूकानांचे गाळे पाडून,नवीन दूकाने व पार्किंगची व्यवस्था नव्याने उभारल्या जाईल.या परिसरात एक ओपर थिएटर बांधले जाणार असून गायत्री मंत्र व भगवान बुद्धांची तत्वे वीस-वीस मिनिटांच्या अंतराने वाजवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.विद्यमान अस्थि विसर्जनाच घाट हा देखील परिजनांसाठी अद्यावत करणार असून अस्थि विसर्जनानंतर महिलांना आंघोळीसाठी व नंतर पर्याप्त सुविधा उपलब्ध नसल्याची जाणीव आम्हाला आहे.त्या अनुषंगाने देखील योग्य व्यवस्था विकसित होणार असल्याचे त्या सांगतात.

अंभोरा येथील अतिशय शांत,अस्पर्श निसर्ग आणि नद्यांच्या संगमाला,पर्यावरणीय दृष्टिने कोणतीही हानि न पोहोचता सिमेंट-काँक्रिटचे बांधकाम व त्या अनुषंगाने निर्माण होणारे सिवेज या विषयी कोणती योजना आहे?असा प्रश्‍न केला असता, विद्यमान सिवेज लाईन्सलाच मोठे करणार असल्याचे त्या सांगतात.महत्वाचे म्हणजे अंभाे-यापासून दीड किलोमीटर अंतरावर उद्यान देखील विकसित केले जाणार असून, उद्यानात सिवरेज प्लान्टची निर्मिती केली जाणार असल्याचे त्या सांगतात.सिवेजच्या पातळीवर बायो-डायजस्टर,रेडीमेड फिक्स टँक,पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया इत्यादी हे सर्व टप्पे राबविले जाणार असून अंभोरा नदीमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही,याची खबरदारी घेतली जाणार असल्याची हमी त्या देतात.अस्थि विसर्जनाचा घाट जो विकसित होणार आहे त्या ठिकाणी एक भव्य शंकराची मूर्ती बसवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता टेंभूर्णे यांनी दिली.

 

थोडक्यात ,विस्तीर्ण  नदी पात्र,विहंगम निसर्ग आणि अतिशय निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या या ठिकाणाचे ‘सरकारी’ सौंदर्यीकरण होणार आहे, त्यामुळे अनेक गावकरी हे धस्तावलेले आहेत.विकासाला विरोध नाही मात्र,तो पर्यावरणाला पूरक आणि शाश्‍वत असावा,अशी त्यांची अपेक्षा आहे.पर्यटनातून रोजगार वाढावा,हातांना काम मिळावे,अशी त्यांची अपेक्षा असून आज या ठिकाणी काही असुविधा देखील असल्या तरी येणा-या भाविकाला किवा पर्यटकाला येथील निसर्ग व नद्यांचा संगम बघून ‘भौतिक‘सोयी सुविधांचा विसर पडतो,यात दुमत नाही.

 

मंदिर परिसराच्या विरुद्ध भागातील परिसरात अनेक लहान-लहान अस्थाई खाद्य पदार्थांची दूकाने आहेत.त्या दूकानांच्या मागे एक मजार व गणपतीचे मंदिर देखील दिसून पडले.
पूर्वी ते गणपतीचे मंदिर हे अंभोरा गावातील गावक-यांसाठी श्रेद्धेचे ठिकाण राहीले आहे मात्र,अंभोरा नदीला वारंवार येणारा पूर,यामुळे हळूहळू गाव दूर वसले आणि गणपती मंदिराचा भव्य चौथरा याला जलपर्णीचा व झाडी झुडपांचा विळखा पडला.त्यातूनही ते इवलेसे मंदिर आपल्या अस्तित्वाची साक्ष देत उभे आहे.दूकानांच्या मधल्या भागांमधून ‘सत्ताधीश’ने श्री गणेश मूर्तींचे चित्रिकरण केले त्यावेळी उपस्थित गावक-यांनी सांगितले,त्यांना देखील त्यांच्या लाडक्या गणपतीला अश्‍या अराजकतेमध्ये सोडून जाण्याची ईच्छा नव्हती.त्यामुळे गणपतीची मूर्ती काढून गावात दूसरीकडे प्रतिष्ठपना करण्याचा प्रयत्न केला असता,मूर्ती आपल्या जागेवरुन तसूभरही हलली नाही.उलट जेसीबीच बंद पडली व मोठा नाग मूर्ती जवळ फणा काढून उभा झाला!यानंतर गावक-यांनी त्या स्वयंभू गणपतीला तिथेच ओसाड नदी पात्रा सोडून दिले आहे.

 

अंभो-याचे कोट्यावधीचे सौंदर्यीकरण होत असताना,एकेकाळी संपूर्ण गावक-यांची यात्रा भरत असणा-या या लहानशा गणपती मंदिराचे देखील साैंदर्यीकरण व्हावे व या पुरातन मंदिराला ही गतवैभव, सार्वजनिक बांधकाम विभागाने मिळवून द्यावे,अशी अपेक्षा गावक-यांनी केली आहे.

 

याशिवाय नाग नदीचे प्रदुषित पाणी जे अंभोरापर्यंत येतं त्याला धरणाच्या खालूनच वळवून टाकण्याची मागणी ही ते करतात.पुढे या नागनदीचे जे डबके साचते त्याची दूर्गंधी असहय्य होत असल्याचे येथील दूकानदार लखन हे सांगतात.

अंभोरा येथील २४८ कोटींचा सौंदर्यीकरणाच्या हा विकास प्रकल्प विकसित झाल्यानंतर तेथील ग्रामपंचायतीला तो हस्तांतरित करण्यात येईल व त्या अनुषंगाने अंभोरा गाव समृद्ध होईल की खासगी विकासकाच्या हातात हा प्रकल्प जाऊन हे पर्यटन स्थळ देखील व्यवसायिक उत्पन्नाचे साधन होईल?अद्याप ही बाब गुलदस्त्यातच आहे.
…………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या