महाराष्ट्रात सत्ता मनसेचीच:आमची ब्ल्यू प्रिंट रेडी: धोत्रे यांचा दावा
मराठीला अभिजात दर्जा,जनताच उत्तर देईल
नागपूर,ता.१ ऑगस्ट २०२४: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी-मनसे वाद हा बराच चिघळला असून मनसे ही अद्याप सत्तेवर देखील आली नाही तरी देखील मुद्दाचं राजकारण सोडून गुद्दाचं राजकारण करतेय,मिटकरी प्रकरणात मनसे कायदेशीर करवाई करु शकली नसती का?असा प्रश्न आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भ पर्यवेक्षक दिलीप धोत्रे यांना रवि भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला असता,अमोल मिटकरी या माणसाचं काम फक्त लोकांमध्ये भांडणं लावणे,टिका करणे,भुरटेगिरी करणे,स्वत:ची प्रसिद्धी मिळवणे,अजित पवारांची हुजरेगिरी करणे आणि त्यांच्या अगदी जवळ कसे पोहोचता येईल,हे बघणे असून या मिटकरी सारख्या लोकांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे,असे जहाल उत्तर धोत्रे यांनी दिले.राज ठाकरेंनी सांगितले आहे,एकदा हात जोडून सांगा,दुस-यांदा हात जोडून सांगा,तिस-यांदा….!आमच्या नेत्याबद्दल भुरटा माणूस काहीही बोलेल तर आम्ही ते सहन करणार नाही.अश्यांची मस्ती जिरवावीच लागते.राज ठाकरे आमचे दैवत आहेत.त्यांच्याविषयी आम्ही एक ही अपशब्द ऐकून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी याप्रसंगी दिला.लांगूनचालनातून आमदारकी मिळवणा-याने आम्हाला शिकवू नये,असा टोला त्यांनी हाणला.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,मिटकरी प्रकरणात आमच्या पक्षाने योग्य काम केलेलं आहे,मनसेकडे कायदेशीर मार्ग ही निश्चितपणे होता,ते ही करुन आम्ही बघितलं पण किती तोंड सुटलंय मिटकरीचं?असा प्रश्न त्यांनी केला.माध्यमांसमोर यायचं,मोठमोठ्या नेत्यांवर टिका करायची आणि स्वत:ची प्रसिद्धी मिळून घ्यायची,त्यामुळेच मिटकरींसोबत जे काही झालं त्याचं आम्ही समर्थन करतो,निश्चितपणे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे,अशी नाळ ठेचलीच पाहिजे,मनसैनिकांच्या अकोलामधील कृतीचे असे समर्थन दिलीप धोत्रे यांनी केलं.
अकोलामध्ये जे झाले,त्याचा आदेश राज ठाकरेंनी दिला होता का?असा प्रश्न केला असता,आम्हाला आदेशाची गरज नसते,असे धोत्रे म्हणाले.आमच्या दैवतबद्दल अपशब्द आम्ही सहन करीत नसतो.उद्वव व राज ठाकरे हे एकत्रित येतील का?असा प्रश्न केला असता,बाळा नांदगावकर यांनी याचे उत्तर दिलेच आहे,असे धोत्रे म्हणाले.एका बाजूने हात पुढे करुन चालत नाही.याचा अनुभव आम्ही २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत घेतला आहे.शब्द देऊन एबी फॉर्म थांबवले,गद्दारी केली,धोका दिला हा पूर्वानुभव बघता पुन्हा विश्वास करता येणार नाही,असे धोत्रे यांनी सांगितले.आम्हाला आता दोन शिवसेना,काँग्रेस आणि दोन राष्ट्रवादीविरुद्ध लढायचे आहे,असे ते म्हणाले.
नागपूरात मनसेची काय स्थिती आहे?उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध लढण्यासाठी मनसेकडे उमेदवार आहे का?या प्रश्नावर बोलताना,फडणवीस यांच्याविरुद्ध लढण्यासाठी आमच्याकडे १० ते १२ उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले.
आठ दिवसांपूर्वीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभेच्या २५० च्या वर जागा लढणार असल्याची घोषणा केली.त्या पार्श्वभूमीवर मनसे निरीक्षक प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मतदारसंघाचा आढावा घेत असल्याचे त्यांनी सांगितले.विदर्भात १२ विधानसभा मतदारसंघ आहेत,त्याचा गौरव वालाऊकर व मी आढावा घेतला.पदाधिका-यांच्या बैठका घेतल्या.कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे,उत्साहाचे वातावरण आहे,राज ठाकरेंविषयी प्रेम आणि आदर आहे.त्यामुळे यावेळी महाराष्ट्रातील जनता ही मनसेलाच मतदान करणार असून राज्यात सुरु असलेला ‘राजकीय चिखल’ याला महाराष्ट्रातील जनता आता कंटाळली आहे,असे धोत्रे म्हणाले.
महाराष्ट्रातील जनतेने सर्वच पक्षाना ओळखले आहे.जनतेच्या कामापेक्षा,हा जेलमध्ये गेला,तो बाहेर आला,हेच सुरु असून जनता दूर्लक्षीत राहीली.सत्ताधा-यांनी जनतेचे भले केले नाही तर विरोधकांनी आपली भूमिका चोख बजावली नाही.परिणामी,जनता ही राज ठाकरेंना येऊन भेटत होती आणि राज ठाकरे आपल्यापरिने जनतेचे प्रश्न सोडविल राहीले.यामुळेच जनता ही राज ठाकरे यांच्या पाठीशी असून येत्या निवडणूकीत मनसेची सत्ता येणार असल्याची खात्री,धोत्रे यांनी दिली.
विदर्भात मनसेचे नेटवर्क नाही,असा प्रश्न केला असता,मग ही गर्दी कसली आहे?असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.मनसेला विदर्भात प्रचंड प्रतिसाद मिळत असून इच्छूकांची गर्दी हेच अधोरेखित करते,असे ते म्हणाले.लोकसभेत मनसेने युतीला पाठींबा घोषित केला होता,याकडे लक्ष वेधले असता,तो पाठींबा महायुतीला नसून पंतप्रधान मोदींना होता,असे धोत्रे यांनी सांगितले.मोदी तिस-यांदा पंतप्रधान व्हावे यासाठी राज ठाकरेंनी मोदींना पाठींबा जाहीर केला,असे ते म्हणाले.निवडणूकीच्या काळात इतर पक्षातून उमेदवार आल्यास मनसे कार्यकर्त्यांना संधी मिळेल का?असा प्रश्न केला असता मनसे कार्यकर्त्यांना प्रथम प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.वेगळ्या विदर्भाविषयी प्रश्न केला असता,विदर्भाचा विकास झाला पाहिजे मात्र मनसे अखंड महाराष्ट्राचा समर्थक असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
लोकसभा निवडणूकीसाठीच्या मुंबईतील जाहीर सभेत एकच मंच शेअर करताना राज ठाकरे यांनी मोदींकडे मायमराठीला ‘अभिजात’दर्जा देण्याची मागणी केली होती.आता मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाले आहे,त्या मागणीचे काय झाले?असा प्रश्न केला असता,राज ठाकरेंची मायमराठीला अभिजात दर्जा,छत्रपती शिवाजी महाराजांचे गड,किल्ले यांचे संवर्धन इत्यादी बाबींसाठी मोदींना पाठींबा दिला होता,बघू आता पुढे काय होतं,मोदी पंतप्रधान होऊन दोन-तीन महिनेच झाले आहेत,मनसेचे याकडे लक्ष राहणारच आहे,असे ते म्हणाले.
विदर्भ वैधानिक विकास मंडळाचा प्रस्ताव गेल्या दोन वर्षांपासून केंद्राकडे धूळ खात पडला आहे,याकडे लक्ष वेधले असता,उपमुख्यमंत्री फडणवीस किवा भाजपचे केंद्रिय मंत्री गडकरी हे हा मुद्दा दिल्लीत का लाऊन धरत नाही?असा टोला त्यांनी हाणला.
मनसे नेते राज ठाकरे हे याच ऑगस्ट महिन्यात विदर्भ दौ-यावर येणार असल्याची माहिती धोत्रे यांनी दिली.पत्रकार परिषदेला मनसेचे शहराध्यक्ष विशाल बडगे व जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर उपस्थित होते.
…………………….