फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपाआंबेडकर सांस्कृतिक भवन: प्रकल्पासाठी पुन्हा राजकीय ‘फिल्डिंग’!

आंबेडकर सांस्कृतिक भवन: प्रकल्पासाठी पुन्हा राजकीय ‘फिल्डिंग’!

भवनाच्या निर्मिती सोबतच प्रकल्पावरील स्थगिती उठवण्याच्या मागणी मागे कोण?
आंबेडकरी जनतेची पुन्हा होणार का भावनिक फसवणूक?बुद्धीजीवींचा प्रश्‍न 
नागपूर,ता.२७ जुलै २०२४: अंदाजे दीडशे वर्ष जुने भोेसलेकालीन अंबाझरी धरण तसेच लगतच्या  ४४ एकर मधील अंबाझरी उद्यान.या उद्यानात १०० कोटींचा अंबाझरी उद्यान विकास प्रकल्प तसेच यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन गेल्या तीन वर्षांपासून नागपूरकर,विशेषत:आंबेडकरी जनतेमध्ये चर्चेत आहे.या प्रकल्पाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मागली वर्षी जुलै मध्ये स्थगिती दिली.यश गोरखेडे या सामाजिक चळवळीतील तरुणाने पुन्हा एकदा हे स्मारक उभे राहण्यासाठी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे मात्र,नुकत्याच पार पडलेल्या आपल्या पत्रकार परिषदेत गोरखेडे यांनी हे स्मारक २० एकर जागेवर उभे राहणार असल्याचा दावा करीत असतानाच,या प्रकल्पावरील स्थगिती हटवण्याची एक नव्हे तर तिनवेळा मागणी आपल्या पत्रकार परिषदेत केल्याने, या प्रकल्पासाठी राजकीय नेते,विकासक यांनी पुन्हा एकदा ‘फिल्डिंग’लावली आहे का?अशी चर्चा आंबेडकरी बुद्धीजीवींमध्ये  ऐकू येत आहे.
गरुडा ॲम्युझमेंट पार्क प्रा.लिमिटेडला या खासकी विकासकाला हा प्रकल्प विकासाकरिता देण्यात आला मात्र, ऐन करोनाकाळात या ठिकाणी असणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे जमीनदोस्त करण्यात आले.ही बातमी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली.यानंतर आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र रोषाचा वणवा पेटला.मूळात मेट्रोचे बांधकाम होत असतानाच या सांस्कृतिक भवनात मेट्रोने आपले बांधकाम साहित्य ठेवले होते.या भवनाला गोडाऊनचे स्वरुन आले होते.ही वास्तू डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरात धम्मदीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ बांधण्यात आली होती.आंबेडकरी जनतेचे अनेक लग्नसोहळे देखील या वास्तूने अनुभवले होते.बाबासाहेबांच्या नावाने पवित्र झालेल्या या वास्तूसोबत आंबेडकरी जनतेच्या खोलवर भावना जुळल्या असल्याने,आंबेडकरी समाजात वणवा पेटल्यानंतर याचा फायदा आपले राजकीय वैराचे उट्टे काढण्यासाठी काँग्रेसचे पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना हाताशी धरुन मोठे आंदोलन उभे केले,असा आरोप केला जातो.यश गोरखेडे यांनी देखील असा आरोप उघडपणे पत्रकार परिषदेत केला आहे.
गजभिये यांनी सातत्याने अंबाझरी उद्यानातील २० एकर जागा ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीसाठी राखीव असल्याचा दावा केला.इतकंच नव्हे तर तब्बल २७२ दिवस अंबाझरीसमोर आंबेडकरी समाजाने मोठे आंदोलन उभारले.पाऊस,ऊन,थंडीची तमा न बाळगता हा समाज,विशेषत: समाजातील महिला वर्गाने तो लढा एक हाती उभारला.२७२ दिवस आंदोलन सुरु ठेवणे ही लहान बाब नव्हतीच.हा लढा चिवटपणे आपल्या बाबासाहेबांसाठी,स्वत:च्या अस्मितेसाठी,आंबेडकरी समाजाच्या सर्वच स्तरावरील महिलांनी लढला.तन,मन,धनाने लढा सुरु ठेवला.यानंतर २६ जून २०२३ रोजी गजभिये यांच्या नेतृत्वात आंबेडकरी समाजाने संविधान चौकातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवास्थानापर्यंत लाखोंच्या संख्येने एल्गार मोर्चा काढण्याचे निश्‍चित केले.मात्र,२५ जून रोजीच गजभिये यांनी आमदार विकास ठाकरे तसेच समितीचे काही लोक यांच्यासोबत समजाला न कळवता,विचारता,फडणवीस यांचे निवासस्थान गाठले.त्यांच्या या बैठकीत फडणवीस यांनी स्पष्ट म्हटले की,तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनासाठी जी २० एकर जागा मागत आहात ती कधीही स्मारकासाठी राखीव नव्हती.यावर गजभिये जे आंबेडकरी समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करीत होते म्हणतात,की आमची मागणी स्मारक भवनाची नसून २० एकर जागेची आहे.यावर फडणवीस म्हणतात,आम्ही एक-एक कागदपत्रे तपासली मात्र, कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे अंबाझरीतील २० एकर जागा ही आंबेडकर स्मारकासाठी राखीव असल्याचे आढळून आले नाही.यावर गजभिये म्हणतात,माझ्याकडे २० एकर जागा स्मारकासाठी राखीव असल्याची कागदपत्रे आहेत.त्यावर फडणवीस म्हणतात,ती कागदपत्रे मला द्या मी आताच जिल्हाधिकारी बसले आहेत त्यांना सांगतो ती २० एकर जागा स्मारकासाठी राखीव ठेवा तसेच ज्यांनी स्मारक पाडले त्यांच्यावर मी कारवाई करील.गोरखेडे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस व गजभिये यांच्यातील संभाषण देखील ऐकवले.

(छायाचित्र : अंबाझरी उद्यानात नासुप्रतर्फे बांधण्यात आलेले सिमेंट-काँक्रिटचे बांधकाम!)

या संपूर्ण आंदोलना मागे आ.विकास ठाकरे यांचा पाठींबा असून,गरुडा कपंनीचे संचालक नरेंद्र जिचकार तसेच आ.विकास ठाकरे यांच्यातील आपसी वैमनस्याशी नागपूरकर चांगलेच परिचित आहेत.असे असताना अंबाझरी उद्यानाचा तब्बल १०० कोटींचा प्रकल्प जिचकार यांना मिळाल्यानंतर तो येनकेन प्रकरणे रद्द होण्यासाठीच गजभिये यांच्या माध्यमातून २७२ दिवस आंदोलन पेटवून ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात होता.अखेर हे प्रकरण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामध्ये गेले  व गेल्यावषी जुलै २०२३ मध्ये  महामंडळाने यावर स्थगिती आणली.अद्याप हा प्रकल्प महामंडळाच्या अखत्यारितीत आहे.महामंडळाने या प्रकल्पावर फक्त स्थगिती दिली जी केव्हाही उठवता येते.त्यावेळी गजभिये यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे फलित, हा प्रकल्पच रद्द करण्यात होऊ शकला असता,असे आंबेडकरवादी बुद्धीजीवी सांगतात.
आता पुन्हा स्मारकाच्या नावाखाली गोरखेडे यांनी नव्याने आंदोलन पुकारले आहे.पुन्हा एकदा आंबेडकरी जनतेला ४ ऑगस्ट रोजी लाखोंच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आव्हान करण्यात आले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावासाठी आंबेडकरी समाज हा एका हाकेवर रस्त्यावर उतरतो हा या देशाचा इतिहास राहीला आहे.त्यामुळे आंबेडकरी समाजाला पुन्हा एकदा भावनिक साद घालण्यात आली असून,निश्‍चितच यात गोरखेडे यांना देखील यश लाभेल मात्र,आंबेडकर स्मारकासोबतच या प्रकल्पावरील स्थगिती उठवण्याच्या मागणी मागे नेमके काय दडले आहे?याचा शोध आता घेतला जात आहे.

(छायाचित्र : अंबाझरी उद्यान…नासुप्रचे बांधकाम…सर्वकाही नियमाद्वारे!)

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन(अंबाझरी)परिसर बचाव कृती समितीचे नेतृत्व  करणारे गजभिये यांच्यावर कठोर टिका, ते आंबेडकरी समाजाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप १२ फेब्रुवरी २०२४ रोजी पत्रकार परिषद घेऊन केली होती.आंबेडकरी आंदोलनाची दखल घेत शासनाने समितीची स्थापना केली होती व वस्तूस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्याबाबत विभागीय आयुक्त यांना निर्देश दिले होते.१ मार्च २०२३ रोजी विभागीय आयुक्त यांच्या आदेशाने विभागीय स्तरावर उपायुक्त(सामान्य प्रशासन) विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती नेमण्यात आली.या समितीमध्ये जिल्हाधिकारी,नागपूर प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग,नागपूर प्रभारी अधिकारी नझुल ,उपजिल्हाधिकारी नागपूर,कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,सहायक आयुक्त(भुसुधार)यांचा समावेश होता.
या समितीसमोर स्मारक बचाव समितीच्या नेतृत्वाने कोणतेही २० एकर जागा स्मारकासाठी राखीव असलेली कागदपत्रे सादर केली नसल्याचा दावा बागडे यांनी केला.अशा ‘शेरा ’ शासकीय चौकशी समितीने त्यांच्या अहवालात दिला असल्याने गजभिये यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी आंबेडकरी समाजाची दिशाभूल केली असल्याचा आरोप त्यांनी केला.परिणामी,स्मारक ज्या जागेवर होते त्याच ठिकाणी सुंदर असे आंबेडकर स्मारक खासगी विकासक किवा शासनाने, आंबेडकर जयंतीच्या पूर्वी बांधून देण्याची मागणी त्यांनी केली होती.तीच मागणी गोरखेडे यांनी देखील केल्याचे आढळून येतं.मूळात स्मारक बांधून देण्यासाठी कोणाचीही आडकाठी नाही , गरुडा कंपनीचे संचालक नरेंद्र जिचकार यांनी देखील २० हजार चाै.फू.जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क आणि छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्याची घोषणा २८ फेब्रुवरी २०२३ रोजी त्यांच्या पत्रकार परिषदेत केली होती.या प्रकल्पात जलक्रीडेसह इतर ही अनेक बाबी साकारण्यात येणार होते.यावर आंबेडकरी जनतेच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे स्थगिती आली. मात्र,आता आंबेडकर स्मारकासह, प्रकल्पावरील ‘स्थगितीच’ रद्द करण्याची मागणी होणे, या मागे पुन्हा एकदा राजकीय लॉबी सक्रीय झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकल्पासाठी जिचकार यांच्यासह भाजपचे विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांची भागीदारी असल्याचे बोलले जात आहे.परिणामी,आ.विकास ठाकरे व सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्या लॉबीतून आंबेडकरी जनतेला भावनिक उद्रेगासाठी प्रेरित करुन जे साध्य झालं होतं,आता गाेरखेडे यांच्या माध्यमातून त्यावर बोळा फिरवून पुन्हा एकदा शहरातील आणखी एक तलाव व ऐतिहासिक अंबाझरी उद्यान खासगी विकासक व राजकीय नेत्याच्या घश्‍यात घालण्याचे व नागपूर शहराचा आणखी राजकीय ‘विकास’ साधण्याचा प्रयत्न सुरु झाला असल्याची टिका शहरातील आंबेडकरवादी बुद्धीजीवी तसेच पर्यावरणवादी करतात.अंबाझरीमध्ये नागपूर सुधार प्रन्यासने नियमबार्ह्यरित्या विवेकानंद थीम पार्क साकारले असून फूटाळासारख्याचाच सिमेंट-काँक्रीटच्या पाय-या व व्यूह स्पॉट्स साकारले आहे.यामुळे अंबाझरीच्या कॅचमेंट परिसराला फार मोठा धोका निर्माण झाला असल्याचा दावा पर्यावरणवादी करतात.

(छायाचित्र : अंबाझरी उद्यान..विकास की विनाश?)
मूळात जे अंबाझरी उद्यान नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारित देण्यात आले होते.नागपूरकरांनी अनेक दशके फक्त ५ रुपयांचे तिकीट घेऊन, आपल्या बालबच्च्यांसह ४४ एकर मध्ये पसरलेल्या उद्यानाचा व ९४२ मीटरच्या अंबाझरी धरणाचा मनसोक्त आनंद लृटला होता,ते उद्यान खासगी विकासकाच्या नावाखाली आपल्याच पक्षातील नेत्याच्या किवा आमदाराच्या घश्‍यात घालण्यासाठी १०० कोटींची योजना, शासकीय स्तरावर मनपातील भाजपच्या पदाधिका-यांनी आम सभेत, अंबाझरी उद्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला विकसित करण्यासाठी देण्यामागील उद्देश्‍य लपून राहीला नाही मात्र,यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनाचे नाव घेत आंदोलन पेटवणे,आंबेडकरी जनतेच्या भावनेचा उपयोग आपापली राजकीय पोळी शेकण्यासाठी करणे सर्वथा अनुचित असल्याचे मत शहरातील अनेक आंबेडकरवादी बुद्धीजीवी करतात.
गोरखेडे यांच्या आंदोलनाचे फलित भाजपच्या कुण्या नेत्याला फायदा पोहोचविणार असेल तर त्यांनी स्मारकाविषयीच्या आंदोलनात,प्रकल्पावरील स्थगितीचा मुद्दा बाजूला सारावा,अशी अपेक्षा ते करतात.याच तरुणाईकडून अंबाझरी जैवविविधता उद्यानात वारंवार लागणा-या संश्‍यास्पद आगीविषयी व त्यात जळून गेलेल्या शेकडो हेक्टर जंगलाविषयी देखील पुढाकार घेण्याची ते अपेक्षा करतात.अंबाझरी धरण व उद्यान ही समस्त नागपूरकरांची मिल्कियत आहे,त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक २० नव्हे तर संपूर्ण ४४ एकर जागेवर बांधल्या गेले तरी नागपूरकरांना त्याचा आनंदच आहे मात्र,कोणत्याही खासगी विकासकाच्या नावावर, राजकीय नेत्यांच्या घश्‍यात,फूटाळा व त्या लगत असणा-या बॉटनिकल गार्डनसारखाच,अंबाझरी तलाव व उद्यानाचा कायापलट होऊन ,नैसर्गिक,हिरवे आच्छादित पर्यावरणाचा आणखी एक लचका तोडण्याच्या पापात, आंबेडकरी जनता व गोरखेडेसारख्या तरुणाईने सहभागी होऊ नये,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
………………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या