नागपूरच्या जीर्ण ड्रेनेज लाईन्समध्ये सुधारणा अत्यधिक गरजेची:आयुक्तांची कबुली
सिमेंट रस्त्यांची जोडणी वस्त्यांमधील पाणी वाहून नेणा-या वाहीन्यांसोबत जुळली नाही
सिमेंट रस्ते टप्पा-४ मध्ये शास्त्रीय पद्धतीचा करणार वापर-आयुक्तांची ग्वाही
नागपूर,ता.२४ जुलै २०२४: याच महिन्याच्या सुरवातीला राज्यात पार पडलेल्या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांवर टिका करीत,आयुक्त स्वत:ला बादशाह समजतात का?अशी जहाल टिका केली होती.आयुक्तांवर झालेल्या या स्तरावरील टिकांमुळेच मनपा आयुक्तांनी कार्यमुक्त करुन, बदली मागितली असल्याचे पत्र मंत्रालयातील सचिवांना दिले असल्याची चांगलीच चर्चा रंगली हाेती.या चर्चेत कितपत तथ्य आहे,अशी विचारणा केली असता ,ही चर्चा बेबुनियाद असल्याचे उत्तर मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी दिले.ते आज मनपा मुख्यालयात आयोजित पत्रकारांशी वार्तालाप ,या उपक्रमात बोलत होते.
गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत नगरसेवक नाहीत.महापौर नाहीत,स्थायी समिती नाही.सगळे अधिकार प्रशासनाकडेच आहेत.छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.आयुक्त,अधिकारी,प्रशासक हे स्वत:ला बादशहा समजत असल्याची टिका भाजप आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत केली होती.अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या दरम्यान विधान परिषदेत,राज्यभरातील महापालिकेच्या कारभारावर टिकेची झोड उठविण्यात आली होती.दटके यांनी देखील नागपूर मनपातील गैरकारभाराचे अनेक प्रकार समोर आणले होते.या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त नाराज झाले असून त्यांनी कार्यमुक्त करण्याची विनंती सचिवांना केली असल्याची चर्चा रंगली होती मात्र,आज आयुक्तांनी ती ‘बेबुनियाद’ठरवली.
शनिवार,दिनांक २० जुलै रोजी नागपूरात पावसाने जी धुळधाण माजवली,त्या विरोधात नागरिकांमध्ये मनपाच्या कारभारा विरोधात तीव्र असंतोष आहे.एकाच पावसाने नागपूर शहराचे रुपांतर चक्क तलावात झाले होते.तीन-तीन दिवस अनेक भागात पाण्याचा निचरा झाला नाही.लाखो नागरिकांना आर्थिक फटका बसला.तीन जणांना प्राणाला मुकावे लागले.शहरात अपूर्ण उड्डाणपुले,सिमेंट-काँक्रिटचे सदोष बांधकाम,ठिकठिकाणी नागपूरकर नागरिकांना करावा लागत असणारा ट्रॅफिक जामचा सामना,शहरात व्यापलेला डेंगी,मलेरियाचा प्रकोप,शहरातील अनेक भागांचे डंपिंग यार्डमध्ये झालेले परिवर्तन,लाखो झाडांची कत्तल,कंत्राटदारांची मुजोरी,मनपा अधिकारी व कर्मचा-यांची कर्तव्याप्रति बेफिकिर वृत्ती ,विविध प्रकल्पांवरील वारेमाप उधळपट्टी इत्यादी या सर्व पार्श्वभूमीवर नागपूरकर जनतेच्या मनातील रोष व समस्यांवर आयुक्तांसोबत चर्चा करण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना,राज्य शासनाच्या सूचनेनुसार नागपूरात २० जुलैच्या पावसात नुकसान झालेल्या ४५६ वस्त्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.घरांच्या झालेल्या नुकसानीला १० हजार तर दूकांनासाठी ५० हजारांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.पावसाळ्यात शहरातील अनेेक वस्त्यांमध्ये पाणी साचण्याचे कारण पाणी निकासीच्या पावसाळी नाल्या या तुंबल्या असल्याचे त्यांनी सांगितले.या शिवाय सिमेंट-काँक्रिटच्या तिन्ही टप्प्यातील बांधकामात वस्त्यांमधील पावसाळी नाल्यांचे समायोजन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या बाजूला नाल्या निर्माण करुन करण्यात न आल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात तुंबत असल्याचे आयुक्त म्हणाले. वस्त्यांमधील पावसाळी नाल्यांची ही संपूर्ण व्यवस्था योग्य नियोजन करुन बदलावी लागेल,त्यांचे समायोजन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांसोबत करावे लागेल असे ते म्हणाले.
याशिवाय सिमेंट काँक्रिटच्या चौथ्या टप्प्यासाठी पाणी निकासीची योग्य व्यवस्था प्राथमिकतेतून करण्यात येणार आहे.यासाठी व्हीएनआयटीतील तज्ज्ञ यांच्यावर देखरेखीची जबाबदारी सोपवली जाईल,यासाठी अतिरिक्त खर्च आला तरी चौथ्या टप्प्यातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते हे शास्त्रशुद्धरित्या बनवले जाईल,अशी हमी त्यांनी दिली.मात्र,आधीच्या तिन्ही टप्प्यांच्या रस्त्यांचे काय?असा प्रश्न केला असता,पाणी कुठे अडतं याचा शोध घेऊन उपाययोजना करु असे ‘प्रशासकीय’उत्तर त्यांनी दिले.‘जायका’ सोबत मनपाचा झालेला करार यामुळे देखील शहरातील उत्तर आणि मध्य नागपूरात मलनिस्सारण वाहीन्यामध्ये अमुलाग्र बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यांवरील खड्डे याबाबत बोलताना मनपाच्या हॉट मिक्स प्लान्टची संख्या पाच झाली असून दोन झोन मागे एक प्लान्ट काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.मूळात नागपूरात फक्त मनपाच्या अखत्यारितीतील रस्त्यांशिवाय,एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभाग व नागपूर सुधार प्रन्यासचे देखील रस्ते असून त्या रस्त्यावरील खड्ड्यांसाठी देखील मनपाला दोषी धरल्या जात असल्याचे ते म्हणाले.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे लवकरच नागपूरातील जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी मनपा मुख्यालयात जनसंपर्क अभियान घेत आहेत याचा अर्थ मनपा कामच करत नाही,असा आहे का?असा प्रश्न केला असता,यात तथ्य नाही असे सांगत,मनपा मुख्यालयात गडकरी जनसंपर्क अभियान का घेत आहेत, याचे उत्तर मंत्री महोदयच योग्यरित्या देऊ शकतील असे सांगून त्यांनी प्रश्न टोलवला.
अजनी प्रकरणात उच्च न्यायालयाने मनपाला धारेवर धरत अवैध वृक्षतोड तसेच वृक्ष प्राधिकरण समितीत वृक्ष तज्ज्ञ सदस्याची नियुक्ती नसणे यावर बोट ठेवले.याबाबत छेडले असता,आम्ही सर्व नियमांचे पालन केले असून फक्त समितीत वृक्ष तज्ज्ञाचा समावेश नव्हता,लवकरच वृक्ष तज्ज्ञाचा समावेश समितीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरातील ११०० सीसीटीव्ही बंद असल्याकडे लक्ष वेधले असता,शहरात सातत्याने विविध प्रकल्पांसाठी खोदकाम सुरु असून अनेक ठिकाणी फायबर ऑपटिकल्सचे नुकसान झाले असल्याचे ते म्हणाले.आम्ही वारंवार संबंधित एजंसीला त्याची दुरुस्ती करुन देण्याबाबत पत्र दिले आहे मात्र, त्या एजंसीज ते दुरुस्त करुन देत नाही.स्मार्ट सिटी विभागासोबत आम्ही चर्चा केली असून,याबाबत प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी यांना पाठवणार असल्याचे ते म्हणाले.डीसीपीच्या निधीतून ५ ते ६ कोटींची मागणी आम्ही केली आहे.याशिवाय एनएचएआय व ओसीडब्ल्यूवर देखील या फायबर ऑप्टिकच्या नुकसानीच्या बाबत जवाबदारी निश्चित करु,असे आश्वासन त्यांनी दिले.
सी-२० च्या वेळी शहरात अनेक नाल्यांना कव्हर करण्यासाठी व सुशोभीकरण करण्यासाठी अनेकांना कंत्राट देण्यात आले होते.डीएलपीचा एक वर्षाचा काळखंड असताना देखील काहीच महिन्यात अनेक नाल्यांवरील सुशोभीकरणाला भगदाडे पडलीत,या विषयी छेडले असता,मुख्य रस्त्यांवरील १५ मोठे नाल्यांना आम्ही डेव्हलप करणार असून क्राॅसिंगच्या लहान नाल्यांवर देखील नागरिकांनी कचरा टाकू नये यासाठी बारीक जाळ्या बसवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा यावर देखील प्रश्न करण्यात आला मात्र,याचे कोणतेही समाधानकारक उत्तर यावेळी मनपा आयुक्तांकडे नव्हते.
थोडक्यात,शहरात २० जुलै रोजी आलेला महापूर व यात राज्याच्या उपराजधानीची झालेली दैना,याविरोधात नागरिकांच्या मनातील मनपाविषयीचा रोष कमी करण्यासाठी मनपा आयुक्तांनी कधी नव्हे ते,पत्रकारांसोबत संवाद साधला,असे या वार्तालपानंतर चर्चा ऐकू आली.