उपायुक्तांची चौकशी करावी:मेश्राम यांची मागणी
वाठोडा डम्पिंग परिसरात जनजीवन विस्कळीत : बाधितांना तात्काळ मदत करा
नागपूर,२० जुलै २०२४: पावसाळापूर्व तयारीच्या दृष्टीने करण्यात आलेली नालेसफाई केवळ नागपूर महानगरपालिका प्रशासनाची खानापूर्ती ठरल्याचे सिद्ध झाले आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील वाठोडा कचरा डम्पिंग यार्ड परिसरात महानगरपालिका प्रशासनाच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. येथील संपूर्ण वस्त्या जलमग्न असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बोगस पद्धतीने नालेसफाई करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार मनपाद्वारे करण्यात आल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.
नालेसफाईच्या भ्रष्टाचारात खुद्द घनकचरा व्यवस्थापन व संबंधित उपायुक्तांचेही हात रंगलेत का ? अशी शंका व्यक्त करीत ऍड. मेश्राम यांनी जलमग्न वस्त्यांतील बाधितांना तात्काळ मदत करण्याची देखील मागणी केली.
आज शनिवारी २० जुलै रोजी सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे प्रभाग क्रमांक २६ मधील पडोळे नगर, पँथर नगर, संघर्ष नगर, चांदमारी नगर, सुरज नगर, पवनशक्ती नगर, धरतीमा नगर, मानवशक्ती नगर, श्रावण नगर, वैष्णोदेवी नगर, राज नगर, अंतूजी नगर, अब्बूमिया नगर, तुलशी नगर, न्यू सुरज नगर या वस्त्या पूर्णतः जलमय झालेल्या आहेत. संपूर्ण वस्त्यांमध्ये कमरेपर्यंत पाणी जमा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. बाजूलाच भांडेवाडी डम्पिंग यार्ड असल्यामुळे येथून वाहणाऱ्या नाल्यात कचरा अडकू नये याची पूर्ण काळजी मनपा प्रशासनाने घेणे आवश्यक होते. मात्र प्रत्यक्ष नालेसफाई करताना नाल्यातील कचराच काढण्यात आलेला नाही. केवळ खानापूर्तीचे काम करून शंभर टक्के नालेसफाई झाल्याचा प्रशासनाने दिंडोरा पिटला. नागपूर महानगरपालिका प्रशासनाच्या या बेजबाबदार कामाच्या पापाची फळे स्थानिकांना भोगावे लागत आहेत.
महानगरपालिकेद्वारे नालेसफाईसाठी करोडो रुपये खर्च केल्याचे दाखविण्यात येते. मात्र प्रत्यक्षात काम झाल्याचा बनाव करून हे पैसे लाटण्याचेच काम होत असल्याचे दिसून येते. नालेसफाईची संपूर्ण जबाबदारी ही महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व संबंधित उपायुक्तांकडे आहे. त्यामुळे नाले सफाईच्या या भ्रष्टाचारात उपायुक्तांचेही हात रंगलेत का ? याची महापालिका आयुक्तांनी चौकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी देखील ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
……………………….