फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणविधान परिषद निवडणूक निकाल ‘रिर्टन्स‘

विधान परिषद निवडणूक निकाल ‘रिर्टन्स‘

Advertisements

पुन्हा फूटली काँग्रेसची मते:या वेळी शरद पवारांचे उमेदवार जयंत पाटलांचा पराभव
२०२२ च्या विधान परिषद निवडणूकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा झाला होता पराभव
फडणवीसांचा ‘पॅटर्न’पुन्हा यशस्वी
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता. १२ जुलै २०२४:राज्यातील  विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज झालेली लढत ही चुरशीची न होता महायुतीसाठी ‘सहज ’झाली व त्यांचे ९ उमेदवार पहील्याच क्रमांकाच्या पसंदीची मते घेत दणदणीत विजयी झाले.यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे, पराभूत होणारे १२ वे उमेदवार कोणत्या पक्षातील व कोण राहील?याकडे लागले होते.सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना अर्थातच या वेळी देखील ’काय हाटेल,काय बडदास्त,काय मज्जा’अश्‍या पंचतारांकित वातावरणात ठेवले असले, तरी विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असल्याने तिथेच ‘गुजगोष्टी’ठरल्या आणि काँग्रेसची तब्बल ८ मते फूटून शरद पवार यांचे व महाविकासआघाडी समर्थित  शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचे तोंड बघावे लागले.इतकंच नव्हे तर काँग्रेसच्या फोडाफोडी झालेल्या मतांमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पहील्या क्रमांकाच्या मतमोजणीत  २२ मतांवर अडकून राहावे लागले व दूस-या क्रमांकाच्या पसंतीच्या मतमोजणीत विजयी व्हावे लागले.या निवडणूकीत मतांचा कोटा हा २३(प्रत्येक उमेदवार)होता.
अर्थातच हा निकाल २०२२ च्या जून महिन्यातील निकालाचे ‘रिर्टन्स’(पुर्नरावृत्ती)ठरली.२० जून २०२२ रोजी राज्यसभा निवडणूकीच्या पाठोपाठ पार पडलेल्या विधान परिषदेच्या लढतीत भारतीय जनता पक्षाचे चानाक्ष रणनीतीकार,माजी मुख्यमंत्री व तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली पाचवी जागा देखील लीलया जिंकून आणली व आघाडीला जबरदस्त धक्का दिला होता.
भाजपनचे प्रवीण दरेकर,राम शिंदे,श्रीकांत भारतीय,उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार विजयी झाले होते ,तर शिवसेनेचे सचिन अहिर व आयशा पाडवी व राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर व एकनाथ खडसे विजयी झाले होते.या निवडणूकीत काँग्रेसने संख्याबळ नसतानाही आपले दोन्ही उमेदवार कायम ठेवले होते.यात भाई जगताप व चंद्रकांत हंडोरे यांच्या पैकी भाई जगताप विजयी झाले होते तर हंडोरे यांचा पराभव झाला होता.काँग्रेसचे ते पहिल्या क्रमांकाचे उमेदवार होते,परिणामी काँग्रेसवर त्यावेळी नामुष्कीची वेळ आली होती.आघाडीची जवळपास २० मते खेचून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत राज्यसभा पाठोपाठ चमत्कार घडवून आणला होता.
विधान परिषदेच्या त्या रणसंग्रामात भाजप १०६,शिवसेना ५५,राष्ट्रवादी ५३ तर काँग्रेसकडे ४४ आमदार होते.विधान परिषदेच्या १० जागांसाठी तेव्हा ११ उमेदवार रिंगणात होते.परिणामी, दहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी आमदारांची फोडाफोडी आणि घोडेबाजार झाल्याचा त्यावेळी देखील आरोप झाला होता.२० जून रोजी सकाळी ९ वा.पासून विधानभवनात मतदानाला सुरवात झाली होती.राज्यसभा निवडणूकीप्रमाणेच भाजपचे आमदार सर्वप्रथम मतदानासाठी विधानभवनात पोहोचले होते.त्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीचे आमदार टप्प्याटप्प्याने विधानभवनात दाखल झाले.शिवसेनेचे आमदार सर्वात शेवटी मतदानासाठी विधानभवनात दाखल झाले.दूपारी ४ वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.राष्ट्रवादीचे दोन आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी विधान परिषदेच्या या निवडणूकीसाठी मतदान करता यावे,यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र,मतदान संपण्यास काही क्षण बाकी असताना न्यायालयाने मलिक आणि देशमुख यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.त्यामुळे राष्ट्रवादीची २ मते कमी झाली होती.महत्वाचे म्हणजे राजकीय पक्षाचे आरोप-प्रत्यारोप,मतदानावरील आक्षेप यामुळे मतमोजणीस दोन तासांचा विलंब झाला होता.भाजपचे प्रसाद लाड,काँग्रेसचे चंद्रकात हंडोरे व भाई जगताप यांच्यात दहाव्या जागेसाठी रात्री उशिरापर्यंत चुरस सुरु होती.त्यात प्रसाद लाड विजयाकडे जात होते तर हांडोरे व जगताप यांच्यापैकी कोणालाही कोट्यातील मते देखील मिळालेली नव्हती.
अखेर त्या चुरशीत जगताप यांनी बाजी मारली तर हंडोरे यांचा पराभव झाला.भाजपला पहील्या पसंतीची १३३ मते मिळाल्यामुळे ही जास्तीची १९ मते भाजपने महाविकास आघाडीच्या गोटातून खेचल्याचे सिद्ध झाले.काँग्रेसच्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीची ४१ मते मिळाल्याने त्यांचीही ३ मते फुटल्याचे स्पष्ट झाले.वास्तविक काही अपक्षांची मते भाई जगताप यांना मिळाल्यामुळे काँग्रेसची तीनपेक्षा जास्त मते फुटल्याची चर्चा तेव्हा देखील चांगलीच रंगली होती.शिवसेनेकडे पहिल्या पसंतीची ५५ मते होती.त्यापैकी सचिन अहिर आणि आमशा पाडवी या शिवसेनेच्या दोन उमेदवारांना प्रत्येकी २६ अशी एकूण ५२ मते मिळाली होती,त्यामुळे ५५ पैकी ३ मते कुठे गेली,या चर्चेला देखील तोंड फूटले होते.
अशाप्रकारे दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची एकूण २१ मते फूटली होती.त्या निवडणूकीत मतदान करण्यासाठी भाजपचे पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप तसेच कसबा पेठेतील आमदार मुक्ता टिळक हे दोघेही थेट रुग्णवाहिकेमधून विधानभवनात पोहोचले होते.कर्करोगाशी झुंज देणा-या या दोन्ही आमदारांची प्रकृती नाजूक असताना देखील राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेच्या निवडणूकीत देखील त्यांनी मतदान केले होते.आ.लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून विधानभवनात पोहोचताच पीपीई कीट घालून मतदानासाठी गेले होते.या दोघांनाही विधानभवनात आणण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ गेले होते.
२०२२ च्या त्या लढतीत भाजपने राज्यसभा पाठोपाठ आघाडीतील पक्षांना जबरदस्त धक्का दिला तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राष्ट्रवादीचे शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच काँग्रसेचे नाना पटोले,बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना देखील फार मोठा धक्का होता.भाजपचे पाचव्या क्रमाकांचे उमेदवार प्रसाद लाड यांना २८ मते मिळाली होती.भाजपकडे ११३ मतांची बेरीज असली तरी त्यांचा पाचवा उमेदवार विजयी होण्यासाठी तब्बल २२ मतांची त्यांना गरज होती जी त्या निवडणूकीत त्यांनी खेचून आणली होती.त्यावेळी फडणवीसांना सत्ताधारी आघाडीच्या एका उमेदवाराला पराभूत करण्यात यश मिळाले होते.
यावेळी देखील फडणवीसांची रणनीती यशस्वी ठरली.यावेळी भाजपच्या पंकजा मुंडे,योगेश टिळेकर,डॉ.परिणय फुके,अमित गाेरखे आणि सदाभाऊ खोत रिंगणात होते तर शिवसेना(शिंदे गट)तर्फे भावना गवळी व कृपाल तुमाने यांना उमेदवारी मिळाली होती.राष्ट्रवादी अजित पवार गटाने राजेश विटेकर व शिवाजीराव गर्जे यांना मैदानात उतरवले होते तर काँग्रेसने डॉ.प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली होती.राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे शेकापचे जयंत पाटील आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात होते.या निवडणूकीत महायुतीकडून ९ उमेदवार तर  आघाडीकडून ३ उमेदवार रिंगणात होते.विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते.
यावेळी देखील आमदारांची बडदास्त शिवसेनेने (शिंदे गट)ताज लँड्स एन्ड(वांद्रे),राष्ट्रवादीने (अजित पवार गट)हॉटेल ललित(विमानतळ)उबाठाने आयटीसी ग्रँड मराठा(परळ) तर भाजपने प्रेसिडेंट हॉटेल(कफ परेड)येथे ठेवण्यात आली होती.तरी देखील महायुतीने काँग्रेसच्या मतांमध्ये सेंध लावण्यास यश मिळवले. विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसतानाही आघाडीने तिसरा उमेदवार रिंगणात उतरवल्याने या ही निवडणूकीत रंगत वाढली होती.भाजपच्या पंकजा मुंडे यांनी पहिल्या पसंदीची २६ मते,सदाभाऊ खोत यांनी २६ मते,डॉ.परिणय फुके यांनी पहील्या पसंतीची २६,योगेश टिळेकर यांनी पहिल्या पसंतीची २६ व अमित गोरखे यांनी पहील्या पसंतीची २६ मते मिळवित दणदणीत विजय मिळवला.
शिंदे गटाचे भावना गवळी २४ व कृपाल तुमाने यांनी पहिल्या पसंतीची २५ मते मिळवली(यावेळी मतांचा कोटा २३ होता).राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांना पहिल्या पसंतीचे २३ व शिवाजीराव गर्जे यांना २४ मते मिळाली.काँग्रेसच्या डॉ.प्रज्ञा सातव यांना पहिल्या पसंतीचे २५ मते मिळाली.उबाठाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या क्रमांकाच्या पसंतीच्या २२ मते मिळाली.फक्त १ मत नसल्याने दुस-या क्रमांकाच्या पसंतीची मते मोजण्यात आली,त्यात त्यांना २६ मते मिळाली.निर्धारित कोट्यापेक्षा ३ मते त्यांनी अधिकची मिळवली.
 भाजपकडे ११५ मते असताना त्यांना पहील्या पसंतीची ११८ मते मिळाली!काँग्रेसकडे ३७ मते असताना डॉ.प्रज्ञा सातव यांना २५ मते मिळाली.उद्वव ठाकरे यांच्याकडे १७ मते होती त्यांना ६ अतिरिक्त मतांची गरज होती.अजित पवार यांच्याकडे ४२ मते होती त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकल्यावरही ५ अतिरिक्त मते त्यांच्याकडे होती.शेकापच्या जयंत पाटील यांना शरद पवार गटाचे पूर्ण १२ मत मिळाले मात्र,त्यांचा दारुण पराभव झाला.लोकसभेच्या निकाला नंतर अजित पवार गटाने ठरऊन शरद पवारांच्या उमेदवाराचा पराभव केल्याचे बोलले जात आहे.दूसरीकडे शरद पवारांना अजित पवारांकडील आमदारांचे पाठबळ मिळवण्यास अपयश आले.तर उद्धव ठाकरे गटाला देखील शिंदे गटाच्या आमदारांचे मत फोडता आले नाही.लोकसभेच्या अपयशानंतर अजित पवार गटातील अनेक आमदार हे परतीच्या वाटेवर असल्याचे शरद पवार गटातील नेते सांगत होते.तोच दावा उद्धव ठाकरे गटाचा देखील होता. मात्र,हे दावे सपशेल फोल ठरले.याच पार्श्वभूमीवर, विधानसभेत चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, देशात एनडीए तर राज्यात महायुतीलाच भविष्य असल्याची कोटी केली.
काँग्रेसची मते फूटणार असल्याचे भाकीत आधीच आ.गोरंट्याल यांनी उघडपणे माध्यमांकडे वर्तविली होती.ते खरे ठरले.काँग्रेसची तब्बल ८ मते फोडण्यात महायुती यशस्वी ठरली.या निवडणूकीत काँग्रसेचा उमेदवार जरी जिंकला असला व चंद्रकांत हंडोरे सारखी पराभवाची स्थिती काँग्रसेवर ओढवली नसली तरी देखील, जयंत पाटील यांच्या पराभवाचे खापर हे काँग्रेसवरच फूटले असून,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तातडीने,दगा फटका करणा-या आमदारांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
तर,याही निवडणूकीत आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाला, काँग्रेसच्या दिल्लीश्‍वरांना पटोले यांचे अपयश दाखवून, पुन्हा एकदा पक्षातील पटोले विराेधक सक्रीय होणार,यात शंका नाही.२०२२ च्या विधान परिषदेच्या मतदानानंतर त्याच रात्री शिवसेना फूटली व सूरत येथे डेरेदाखल झाली.शिवसेनेचे तब्बल ४० आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकजुट झाली व  याची परिणीती आघाडी सरकार कोसळण्यात झाली होती.या निवडणूकीचा निकाल हा आघाडीमध्येच फूट पाडणार का,याकडे आता महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.
……………………
(तळटीप- 
-मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या फोनच्या प्रतिक्षेत आढळले.त्यांची सूचना मिळाल्यानंतरच मतदानासाठी सज्ज झाले.याशिवाय बहूजन विकास आघाडीची तीन मते ही देखील निर्णायक ठरली,यात शंका नाही.मतदानासाठी जाताना बहूजन विकास आघाडीचे आ.हितेंद्र ठाकूर यांची देहबोली खूप काही सांगून जाणारी होती.
-आ.प्रकाश सर्व्हे,बबनराव पातपुते,अमीन पटेल हे मतदानासाठी व्हीलचेअरवर आले होते.
– भाजपचे गोळीबार प्रकरणात बहूचर्चित झालेले आमदार गणपतराव गायकवाड हे निवडणूक आयोगाच्या परवानगीने मतदानासाठी आले असता, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपच्या या कृतीला ‘सत्तेचा दुरुपयोग’अशी भर्त्सना केली.उबाठाचे नेते संजय राऊत यांनी देखील गायकवाड यांच्या मतदानावर चांगलेच तोंडसुख घेतले.अनिल देशमुख व नवाब मलिकांना २०२२ च्या विधान परिषदेच्या निवडणूकीत मतदानासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी नाकारल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मात्र,तिथे ही त्यांना अंतरिम दिलासा मिळाला नाही.तेच निवडणूक आयोग मात्र गायकवाड यांच्यावर ऐन पाेलिस ठाण्याच्या आत दुसरे आमदार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न, यासारखा गंभीर गुन्हा दाखल असताना मतदानाची परवानगी बहाल करते,यालाच ‘सत्ता असे नाव’ही टॅग लाईन सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली.निवडणूक आयोगाने रमेश कदम यांच्या केसचा दाखला देत गायकवाड यांना मतदानाची संमती दिली असल्याचे सांगण्यात आले.
– भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी विधान सभेत असताना फाईलमध्ये पैसे ठेवतानाचा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला,यावर मला सर्दी व कणकण वाटत असल्याने आपल्या स्वीय सहायकाकडे औषध आणण्यासठी फाईलमध्ये ठेऊन पैसे पाठवल्याचा खुलासा त्यांनी केला मात्र,सर्दी व कणकणसाठी हजारो रुपयांची औषधे येतात का?यावर सोशल मिडीयावर बराच सर्च झाला)
……………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या