नागपूर : महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्याकरिता आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” सुरु करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात शहरातही योजना यशस्वीपणे राहाविण्यात येणार असून, मोठ्या संख्येत महिलांनी “मुख्यमंत्री–माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपा समाज विकास विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना” राबवण्यात येणार असून, अर्ज करण्याची सुविधा मनपाच्या १० ही झोन कार्यालयात, अंगणवाडी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय महिला स्वतः “नारीशक्ती दूत” अॅप द्वारे अर्ज करू शकतील त्यामुळे महिलांनी मोठ्या संख्येत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित स्त्री, विधवा, घटस्फोटीत महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक २१ ते ६५ वर्षापर्यंत अविवाहित महिला. २.५ लाखापर्यत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. याकरिता किमान वयाची २१ वर्ष पूर्ण व कमाल वयाचे ६५ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
तसेच योजने साठी आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) , नसल्यास महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (Leaving Certificate) किंवा जन्म दाखला (Birth certificate) किंवा मतदार ओळखपत्र (Voter ID Card), परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर पतीचे जन्म दाखला, किंवा पतीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, किंवा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २.५ लाखापर्यंत) नसल्यास पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड, बँक खाते पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.( आधारकार्ड सोबत लिंक असावे.) हमीपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२४ असून, मोठ्या संख्येत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, श्रावणबाळ,संजय गांधी निराधार तसेच इतर शासकीय आर्थिक योजना ज्या योजने-अंतर्गत रु. १५०० लाभ प्राप्त महिला सदर योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असणार आहेत तर त्याची नोंद महिलांनी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
…………………………….