फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजवक्त से वक्त की क्या शिकायत करे...

वक्त से वक्त की क्या शिकायत करे…

ऑकेस्ट्रातील ज्येष्ठ कलावंतांचा ऑस्कर अकादमीतर्फे ‘कलाभूषण’ सन्मान
साढे चार दशक संगीत साधना करणा-या कलावंतांची एकमेकाशी भेट:रंगले गप्पांचे फड
या मंचावर बसणे माझे भाग्य: ज्वाला धोटे
नागपूर,ता.७ जुलै २०२४: सुप्रसिद्ध गझल गायक पंकज उद्यासची एक प्रसिद्ध गझल आहे ’वक्त से वक्त की क्या शिकायत करे,वक्त ही न रहा वक्त की बात है,काई चाहत ना थी बस मुद्दबत थी वो,खुद को समझा लिया वक्त की बात है’या गझलेचा नूर जणू आज सीताबर्डी,अंबाझरी रोड येथील अमृत भवनात दिसून पडला जेव्हा नागपूर शहरातील अनेक ज्येष्ठ तसेच इतर कलावंत हे सत्कारासाठी  एकत्रित आले होते.ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.आज सकाळी मूसळधार पावसाच्या साक्षीने या कलावंतांनी,कलावंतांच्या ‘ओढीने’ अमृत भवन गाठले.जवळपास साढे चार दशकांपासून एकमेकांच्या सोबतीने संगीत जगत गाजवणा-या या कलावंतांमध्ये सत्कारासोबतच,संगीत क्षेत्रात अनुभवलेल्या भूतकाळातील गप्पांचा फडच रंगला होता.
ऑस्कर अकदामीने ही संधी त्यांना प्राप्त करुन दिली होती.यावेळी ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार कलाभूषण सन्मानाने करण्यात आला.सुप्रसिद्ध अभिनेते देवेंद्र दोडके यांच्या हस्ते या कलावंतांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेविका व ‘अन्याय निवारण समिती’च्या अध्यक्षा ज्वाला धोटे तसेच प्रमोद मोहोड हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
स्टेज कलावंतांच्या कल्याणासाठी मागील तीन वर्षांपासून सतत कार्यरत असणाऱ्या
ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमीतर्फे ज्येष्ठ कलावंतांच्या सत्काराचा मानस गेल्या अनेक दिवसांपासून मनात होता,यासाठी आर्थिक बाजू देखील बघणे गरजेचे होते,आज तो योग जुळून आला आणि आमच्या परिश्रमाचे सार्थक झाले असे अकादमीचे अध्यक्ष पुरुषोत्तम ताईसक्कर (पी.कुमार )यांनी सांगितले.
सुरवातीला उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते  मागील साढे चार दशकांहून अधिक काळापासून नागपूरातील संगीत साधनेचे व्रत निष्ठेने जपणारे ज्येष्ठ कलावंत व सत्तरीच्या दशकात ‘नवनीत’ऑकेस्ट्राच्या माध्यमातून ऑकेस्ट्रा जगतात पदार्पण करणारे नवनीत ऑकेस्ट्राचे संचालक हर्षल थाॅमस, ललीता थाॅमस यांच्यासोबतच ‘बिझीज’ऑकेस्ट्रा ग्रूपचे संचालक व ज्येष्ठ कि-बोर्ड व हवाईन गिटार वादक भोला घोष, ‘मेलोडी मेकर्स’ ऑकेस्ट्राचे अनेक दशक अर्धव्यू राहणारे ज्येष्ठ स्पॅनिश गिटार वादक प्रदीप पंच, ‘शशिझंकार’ऑकेस्ट्राचे संचालक व सुप्रसिद्ध गायक पदमाकर तंत्रपाळे,म्यूझिकल व्हिर्नस’ ऑकेस्ट्राचे संचालक विजय किर्तने, ‘खांडेकर‘ ऑकेस्ट्राचे संचालक व ज्येष्ठ स्पॅनिश गिटार वादक रमेश खांडेकर, अनेक दशके मेलोडी मेकर्स व यानंतर ‘कादर’ ऑकेस्ट्रामध्ये की-बोर्ड वादन करणारे ज्येष्ठ की-बोर्ड वादक विजय नायडू, त्याकाळी नागपूरातील जवळपास सर्वच ख्यातनाम ऑरकेस्ट्रा ग्रूप्समध्ये ढोलक वादन करणारे रमेश पुसम, ऐंशीच्या  दशकापासून सुप्रसिद्ध ‘हफीज’ऑकेस्ट्रामध्ये तसेच मुंबईतील ख्यातनाम ऑकेस्ट्रामध्ये की-बोर्ड वादन करणारे पवन मानवटकर,ज्या कलावंताची बोटे कांगो तसेच सहयोगी वाद्यांवर वीजेसारखी चमकताना नागपूरकरांनी गेली अनेक दशके अनुभवली असे ज्येष्ठ ताल वादक रघुनंदन परसतवार तसेच आपल्या मखमली आवाजातून रसिक मनांची घट्ट पकड घेणारे सुप्रसिद्ध निवेदक महेश तिवारी यांना ‘कलाभूषण’सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

(छायाचित्र : दोन ज्येष्ठ कलाकार पुन्हा एकदा एकाच मंचावर,हर्षल थॉमल व रमेश पुसम)

ऑकेस्ट्रा कलावंतांच्या या पहील्या पिढीनंतर नव्वदीच्या दशकात आपल्या कलेने नागपूरचे कला विश्‍व आणखी समृद्ध करणारे कलावंत यांचा सत्कार या ज्येष्ठ कलावंतांच्या हस्ते पार पडला.यात सुप्रसिद्ध गायक अविनाश घोंगे, प्रमोद देशमुख, डॉ. अर्चना देशमुख, आपल्या उत्कृष्ट निवेदनातून मंच आणि रसिकांची मने जिंकणारे निवेदनकार एम. ए. रज्जाक, नर्म विनोदी मिमिक्री करुन श्रोत्यांना वेड लावणारे व त्यांची दिलखुलास दाद मिळवणारे मिमिक्री कलावंत विनोद पुरोहित, ज्येष्ठ ड्रम प्लेअर संजय बारापात्रे, मंचावर येताच आपल्या अस्सलिखित उर्दू व हिंदीतील शेरो-शायरीने रसिकांची मने जिंकणारे व हिंदी भाषिक असतानाही त्याकाळात गाजलेले मराठीतील गाणे’जवा नवीन पोपट हा ’प्रत्येक कार्यक्रमात वन्स मोर घेणारे सुप्रसिद्ध निवेदक व गायक साजिद कुरेशी, ‘सनबिट’ऑकेस्ट्राचे संचालक व सुप्रसिद्ध ढोलक वादक सागर जरेल, मोरेश्वर निस्ताने, पंकज सिंह, चारूदत्त जिचकार, रंजना कनोजिया, मोहम्मद इकबाल भाई, नजिर शेख, मुनाफ भाई, राजेश तिवारी, अशोक ढोके,मनोज मेश्राम या सर्व कलावंतांचा सत्कार उपस्थित पाहूणे व ज्येष्ठ कलावंतांच्या हस्ते पार पडला.

(छायाचित्र : ज्येष्ठ रिद्मिस्ट रघुनंदन परसतवार यांचा सत्कार करताना ऑस्कर अकादमीचे पदाधिकारी)

संगीत क्षेत्रातील अमूल्य कामगिरीसाठी मणिक उबाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

(छायाचित्र : माणिक उबाळे यांचा सत्कार करताना ज्वाला धोटे )

याप्रसंगी ‘फनकार’ऑकेस्ट्राचे सहसंचालक व सुप्रसिद्ध की-बोर्ड वादक अब्दुल जहीर यांची प्रमुख उपस्थिती होती.

(छायाचित्र : कलावंतांसोबत ज्वाला धोटे यांचे ’फुरसत के कुछ पल’.डावीकडून अविनाश घोंगे,साजिद कुरेशी,रंजना कनोजिया,ज्वाला धोटे,ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष पी.कुमार,पवन मानवटकर,रमेश खांडेकर,चाखोरे,एम.ए.रज्जाक,अनिल सिरोटीया,भास्कर करमाकर )

यावेळी बोलताना ज्वाला धोटे म्हणाल्या,की या मंचावर बसणे हेच माझे भाग्य आहे.आज या मंचावर केवळ ज्येष्ठ कलावंतच नाही तर माझे वडील विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांचे क्रांतीकारी अनुयायी देखील बसले असल्याचा अभिमान मला वाटतो.अनेक ज्येष्ठ कलावंत ज्यांचा या मंचावर आज सत्कार झाला,त्यांनी जांबुवंतराव धोटे यांच्या अनेक आंदालनात नारे लावले होते आणि ते अभिमानाने हे सांगत आहेत.या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंतंाना ऐकण्याचं भाग्य मला लाभलं नाही मात्र,स्क्रीनवर या प्रत्येक कलावंतांची संगीत साधना वाचली असता माझंच मन अभिमानाने भरुन आलं.हे कलावंत नागपूर शहराची अमूल्य धरोहर असून हा मंच आणि कलाभूषण पुरस्कार,या कलावंतांच्या चरणधुळीने सन्मानित झाले असल्याचे भावेद्गार ज्वाला धोटे यांनी काढले.

(छायाचित्र : दोन दिग्गज कलावंत पुन्हा एकदा मंचावर.यावेळी की-बोर्ड आणि गिटार हातात नसून सम्नानचिन्ह आणि चेह-यावरचे सुहास्य होते.रमेश खांडेकर,पवन मानवटकर यांचा सत्कार करताना)

थोडक्यात,कोसळणा-या पावसात एकमेकांशी भेटण्याच्या ओढीने नागपूरच्या कानाकोप-यातून ऑकेस्ट्राच्या कलावंतांनी आज सकाळी अमृतभवन गाठले.जुन्या आठवणींना उजाळा देत ‘वक्त से वक्त की क्या शिकायत करे’असंच जणू वयाची सत्तरी ओलांडलेल्या व सत्तरी गाठू पाहणा-या ज्येष्ठ कलावंतानी एकमेकांशी भेटी दरम्यान भाव प्रकट केले.

(छायाचित्र : ज्येष्ठ कलावंत हर्षल थॉमस व लिली थॉमस यांच्यासह ज्वाला धोटे.‘वक्त ही ना रहा वक्त की बात है’जणू वयाची ज्येष्ठता हसत मुखाने सांगत असताना.सोबत पवन मानवटकर,अविनाश घोंगे व चाखोरे)

 याप्रसंगी शहरातील कलावंतांची मुले ज्यांनी दहावी -बारावी परीक्षा गुणवत्तेत उत्तीर्ण केली अशा विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .त्यात विराज संजय शुध्दलवार, स्वरांकीत संदीप तामगडे, अनुष्का वैशाली चंदेल, हिमानी सुनील गाडगे, दिव्यांनी श्रीराम वाठ, अदिती चन्द्रशेखर शामकुवर, राम प्रशांत खडसे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे सदस्य शितल दहीकर, वैशाली चंदेल,राम खडसे, अदिती शामकुवर, चैतन्य जाणे यांनी मोलाची मदत केली.

(छायाचित्र : विजय नायडू यांचा सत्कार करताना हर्षल थॉमस व ऑस्करचे पदाधिकारी)

ऑस्कर सांस्कृतिक संगीत कलावंत अकादमी नागपूरचे अध्यक्ष पुरूषोत्तम ताईस्कर(पी.कूमार), उपाध्यक्ष राजू व्यास, कोषाध्यक्ष प्रशांत खडसे, सचिव रिनेश जाणे, सहसचिव चन्द्रशेखर शामकुवर, सदस्य राजेश गजभिये, संगीता गावंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्र संचालन प्रमोद देशमुख, रिनेश जाणे, राजू व्यास यांनी केले.

…………………

काही अविस्मरणीय क्षण….

(छायाचित्र : ज्येष्ठ कलावंत रघुनंदन परसतवार सुप्रसिद्ध ड्रमर संजय बारापात्रे यांचा सत्कार करताना)

(छायाचित्र : ‘हफीज’ऑकेस्ट्राचे संचालक व गायक मोहम्मद हफीज यांचा सत्कार करताना रघुनंदन परसतवार व ऑस्कर अकादमीचे राजू व्यास)

(छायाचित्र : कोणाचे निवेदन जास्त सरस?ऑकेस्ट्राचा मंच लिलया जिंकणारे एम.ए.रज्जाक व महेश तिवारी )
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या