नकाशात वृक्षापासून बारा मीटर दूर जागा असताना १२३ वर्ष जुने लिंबाचे वृक्ष टिनाच्या शेडमध्ये बंदिस्त
भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांची भागीदारी:मनपाच्या उद्यान विभागावर दडपण! नागपूर,ता.२८
जून २०२४: मौजा धंतोली येथे नवीन रुग्णालये,वाणिज्यिक बांधकामे यांच्या परवानग्या कायम स्वरुपी कायद्यात तरतूद करुन बंद करण्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात २०१२ पासून प्रलंबित असताना, धंतोलीतील दोन किलोमीटरच्या परिसरात तब्बल १७२ रुग्णालये असून या पुढे धंतोलीची क्षमता संपलेली असताना, नवनवीन रुग्णालयांचे बांधकाम ठिकठिकणी सुरु असल्याचे दिसून पडतंय.महत्वाचे म्हणजे मेहाडिया चौकाकडून धंतोली उद्यानाकडे जाणा-या मार्गावर जुन्या पोस्ट ऑफिसच्या जागेवर आणखी एक अद्यावत रुग्णालयाचे बांधकाम होत आहे.याचा प्रचंड विरोधत धंतोलीकर करीत आहेत.
महत्वाचे म्हणजे या बांधकामात १२३ वर्ष जुने लिंबाचे झाड तोडण्याची परवानगी संबंधित कंत्राटदाराने उद्यान विभागाला लवकरात लवकर मागितली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यासाठी ७ जून २०२४ रोजी उद्यान विभागाने जाहीरात प्रसिद्ध करुन यावर आक्षेप मागितले असून शहरातील अनेक पर्यावरणप्रेमींनी हे झाड तोडण्यासाठी प्रखर विरोध केला आहे.शहरातील सुप्रसिद्ध वृक्षमित्र सचिन खोबाग्रडे यांनी यावर आपला आक्षेप नोंदवला आहे.प्लाट क्रमांक ६९,अभ्यंकर रोड,धंतोली येथील भूखंडावर प्रस्तावित नवीन इमारतीच्या बांधकामात हे झाड अडथळा ठरत असल्याचे नोटीसमध्ये उद्यान विभागाने नमूद केले आहे!
मूळात हे झाड गेल्या १२३ वर्षांपासून त्याच ठिकाणी उभा आहे.धंतोलीतील अनेक पिढ्यांना व वाटसरुंना या झाडाने शुद्ध प्राणवायू पुरवला आहे.आता रुग्णालयाच्या बांधकामातही हे झाड बांधकामाच्या मध्ये नसून फूटपाथमध्ये असताना ,प्रशस्त इमारतीसाठी तो अडथळा ठरत असल्याचा आरोप या झाडावरच करण्यात आला आहे. त्यामुळे प्रश्न हेरिटेज वृक्षतोडीपेक्षा माणसाच्या ‘अति कृतघ्नपणाचा’ असल्याचे म्हणावे लागेल.मूळ नकाशामध्ये झाडापासून १२ मीटरचे अंतर दाखवण्यात आले आहे.रुग्णालयाच्या बांधकामासाठी करण्यात आलेला खड्डा हा देखील झाडापासून ४ मीटर सोडून निर्माण करण्यात आला आहे.अश्यावेळी नागपूर शहराची आणि नागपूरकरांची सार्वजनिक मालमत्ता असणारे झाड ,हे बांधकामात अडथळा ठरत असल्याच्या सबबीखाली खासगी कंत्राटदाराने चक्क तोडण्याची परवागनी मागितली असून यासाठी चंद्रपूर व कोराडीचे भाजपचे मोठे नेते यांचे वारंवार फोनवरुन उद्यान विभागावर दडपण आल्याची माहिती सूत्राने दिली.
महत्वाचे म्हणजे उद्यान विभागाकडून मंजुरी न मिळताच या रुग्णालयाचा नकाशा आधी मंजूर ही झाला!यातच सर्व गौडबंगाल असून, नियम अगदी याचा विरुद्ध आहे मात्र,सत्ताधारी नेत्यांच्या कोणत्याही बांधकामाला कोणत्याही सरकारी विभागाच्या कोणत्याही मंजुरीची गरज नसते,हे पुन्हा एकदा सिद्ध झालं!
(छायाचित्र : बांधकामाचा मंजूर नकाशा)
२०१४ साली प्रा.अनिल सोले हे महापौर असताना मनपाच्या सभेत एक ठराव घेण्यात आला.ठरावात धंतोली व रामदासपेठेत या पुढे कोणतेही नवीन रुग्णालये येणार नाहीत असा ठराव तो होता मात्र,तत्कालीन मनपा आयुक्तांनी तो ठराव संमत केला नाही.यासाठी रिजनल टाऊन प्लानिंग एक्ट(एमआरटीपी)दुरुस्ती करावी लागणार असल्याची सबब मनपा आयुक्तांनी पुढे केली त्यामुळे इतका महत्वाचा प्रस्ताव बारगाळला.या ठरावाची चर्चा वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्याने धंतोलीतील काही डॉक्टरांनी त्यांचे प्लॉट्स असतानाही आपले रुग्णालय दूस-या भागात बांधले मात्र,९० टक्के डॉक्टर्स यांनी सातत्याने २०१४ पासून धंतोलीतील रुग्णालयाच्या संख्येत भर घालण्याचे काम केले.
या संपूर्ण बांधकामाचा ताण फक्त ९ मीटरचे रस्ते असणा-या वाहतूकीवर व शंभर वर्षे जीर्ण झालेल्या सिवेज लाईनवर पडला.परिणामी,धंतोलीतील सिवेज लाईन्स,पिण्याचे पाणी आणि पार्किंग अभावी वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असे नागपूर खंडपीठात धंतोलीतील विविध समस्यांसाठी पीआयएल दाखल करणारे धंतोली नागरिक मंडळाचे अध्यक्ष स्वानंद सोानी यांनी खास ‘सत्ताधीश‘सोबत बोलताना सांगितले.
महत्वाचे म्हणजे २००९ साली धंतोलीतील अमर्याद संख्येत उभारले जाणा-या रुग्णालयांच्या संदर्भात रुग्णालयांसाठी रहीवाशी भाग नसणार तर कोणता भाग असणार?असा निर्णय एका याचिकेच्या संदर्भात नागपूर खंडपीठाने दिला होता मात्र,२०१२ साली स्वानंद सोनी यांनी जनहित याचिका दाखल करीत,या संख्येला काही मर्यादा असावी की नाही,अशी न्यायालयालामार्फत नगररचना विभागाला विचारणा केली. तेव्हापासून या याचिकेवर फक्त सुनावणी पार पडत असून संबंधित विभागांना नोटीस दिल्या जात आहे.अद्याप तोडगा काहीही न निघाल्याने धंतोलीत रुग्णालयांची बजबजपुरी वाढत असून त्यामुळे होणा-या प्रदुषणात देखील भर पडली असल्याचे ते सांगतात.धंतोलीतील रुग्णालयांनी व मोठमोठ्या वाणिज्यिक ईमारतींनी पार्किंगच्या जागी केलेले अतिक्रमण तसेच रुग्णालयांची संख्या यावर मर्यादा,या याचिकेसाठी धंतोली नागरिक मंडळातर्फे ॲड.आशुतोष धर्माधिकारी व ॲड.अश्विन देशपांडे खटला लढत आहेत.
नुकतेच पार पडलेल्या सुनावणीत नागपूर खंडपीठाने मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांना चांगलेच फैलावर घेत येत्या २४ जुलैपर्यंत रुग्णालयाच्या जागेवर असणा-या अनाधिकृत पार्किंगचे बांधकाम तोडण्यासंबंधी प्रतिज्ञापत्र देण्याचे तसेच मनपाचे उपायुक्त अजय चारठाणकार यांना न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.न्यायालयाने एका महिन्या ऐवजी फक्त एका आठवड्याची मुदत या अधिका-यांची कर्तव्यशून्यता बघून, देण्याची गरज होती,असे अनेक नागरिकांचे मत आहे.
शहरातील सुप्रसिद्ध वास्तूविशारद मोबीन सयद यांनी देखील धंतोलीतील १२३ वर्ष जुने वृक्ष कापण्यात येऊ नये व त्याचे संरक्षण करावे यासाठी मनपा आयुक्त यांना पत्र लिहले असून याची एक प्रत या प्लाॅटचे मालक श्री.तन्मय बिडवई ज्यांच्या रुग्णालयाचे बांधकाम सुरु आहे त्यांना देखील पाठवली आहे.शहरातील अनेक पर्यावरणवाद्यांनी डिजिटल माध्यमात या झाडाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला असून, फार मोठी चळवळ उभारली आहे. सामान्य नागपूरकरांच्या देखील त्यांच्या पोस्ट्स वर प्रखर टिका आढळून येत आहेत.मेट्रोच्या अट्टहासातून फ्रीडम पार्कपासून बांधण्यात येणा-या बोगद्यासाठी अनेक हेरिटेज वृक्षांचा बळी जाणार आहे.त्या याचिकेत देखील न्यायालयाने २६ जून रोजी मेट्रोला वृक्षतोडीबाबत, उद्यान विभागात अर्ज केला असला तरी न्यायालयाच्या परवानगीशिवाय वृक्ष तोडण्यात येऊ नये असे मौखिक आदेश दिले आहे.यावरुन शहरातील बेसुमार वैध व अवैध वृक्षतोड तसेच बिघडलेले पर्यावरण याविषयी न्यायालये देखील सजग असल्याचे दिसून पडतं.
शहरातील वृक्षांसाठी पर्यावरणवादी यांच्यासोबतच जागरुक नागरिकांच्या ‘ग्रीन नागपूर’या व्हॉट्स ॲप ग्रूपवर शहरातील राजकीय नेते यांचा पर्यावरणविषयीचा उदासिन दृष्टिकोण,शहरात सातत्याने विविध खासगी व सरकारी प्रकल्पांसाठी बेसुमार होणारी वृक्षतोड,सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळे रस्त्यालगतच्या झाडांचा चोंदलेला श्वास,कंत्राटदारांची मुजोरी,उद्यान विभागावर सत्ताधारी नेत्यांचे दडपण इत्यादी विषयांविषयी तीव्र नाराजी आढळून येत असून,येत्या विधान सभेच्या निवडणूकीत शहरातील तरुणाई ही विकासाच्या नव्हे तर पर्यावरण -हासाच्या मुद्दावर मतदान करण्यास सज्ज झालेली दिसते.कर्नाटक उच्च न्यायालयाने तर कोणत्याही व्यवसायिक तसेच खासगी प्रकल्पासाठी शहरातील एक ही वृक्ष तोडता कामा नये,असा स्पष्ट आदेश दिला असून,युडीसीपीआर कायद्यानुसार बांधकामाच्या आत वृक्ष येत असतील तर बांधकामाचा नकाशा बदलण्याचा नियम आहे.असे असताना धंतोलीतील १२३ वर्षे जुने वृक्ष हे बांधकामाच्या मध्ये कोणताही अडथळा ठरत नसताना,बांधकामानंतर रुग्णालयाच्या मुख्य द्वार दिसण्यावर, हे झाड अडथळा ठरणार असल्यानेच, त्यावर कु-हाड चालविण्याची नेत्यांना घाई झाली आहे,असा संताप वृक्ष् मित्र सचिन खोब्रागडे व्यक्त करतात.
या वृक्षासाठी मोठे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पर्यावरणवादी देत आहे.