फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशइम्पिरिकल डेटा देता येणार नाही

इम्पिरिकल डेटा देता येणार नाही

मोदी सरकार आणि न्यायालय(भाग ३)

विरोधी पक्षांच्या यशात मोदींच्या ‘या‘कारभाराचा वाटा
लोकसभा निवडणूक-२०२४
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
इम्पिरिकल डेटा देता येणार नाही-
प्रशासकीय कारणे व मूळ माहितीतील असंख्य त्रुटी यामुळे केंद्राकडे असेलली जातीनिहाय लोकसंख्येची संकलित माहिती(इम्पिरिकल डेटा )राज्यांना देता येणार नाही,अशी स्पष्ट भूमिका मोदी सरकारने २३ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात घेतली.जातीनिहाय जनगणनेमुळे ओबीसींची खरी संख्या समजण्यास मदत होऊ शकणार नाही,असेही मत केंद्र सरकारने मांडले.ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे इम्पिरिकल डेटा मागितला होता.
त्यावेळी महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार होती.केंद्राच्या या भूमिकेवर तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्राच्या या भूमिकेवर तीव्र शब्दात टिका केली होती.आज ते भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी आहेत,हे विशेष.ओबीसी आरक्षणाच्या प्रश्‍नात केंद्राने हात वर करण्याचे काम केले आहे.केंद्राने इम्पिरिकल डेटा दिल्यास सर्वच प्रश्‍न मार्गी लागू शकतात.मात्र,केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी आहे.आम्ही न्यायालयीन व राजकीय लढाई केंद्रासोबत सुरुच ठेवणार आहोत,असे भुजबळ म्हणाले होते.
जातीनिहाय जनगणना व इम्पिरिकल डेटा यांच्यातील त्रुटी दूर करण्यासाठी नियुक्त तज्ज्ञ गटाची समिती पाच वर्षांपासून निष्क्रिय असल्याचे केंद्राच्याच शपथपत्रातून स्पष्ट झाले!नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगडिया यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची ५ वर्षात एकही बैठक झाली नसल्याचे समाजकल्याण मंत्रालयाने म्हटले.असा डेटा राज्यांना द्यायलाच हवा,याबाबत जनगणना आयुक्त व रजिस्ट्रार जनरल यांच्यावर कोणतेही घटनात्मक बंधन नाही असेही केंद्राकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र सरकार विरुद्ध मोदी सरकार या खटल्यात केंद्राच्या या भूमिकेवर रिजाँईडर दाखल करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने चार आठवड्यांची मुदत मागून घेतली होती.महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण हा संवेदनशील मुद्दा बनला असताना केंद्रिय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या भूमिकेने नवा वाद उफाळला होता.
महत्वाचे म्हणजे जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील उपस्थित केला तसेच  यासाठी बिहारमधील सर्व पक्षांच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडे घातले होते मात्र,यासाठी केंद्राची मुळीच तयारी नसल्याचे समोर आले होते. नितीश कुमार यांनी त्यांच्या राज्यात अशी जनगणना करुन घेतली असली, तरी आता मोदी सरकारच्या बहूमताची किल्ली त्यांच्या हातात आहे. केंद्रिय सत्तेचे वाटेकरी बनलेले नितीश कुमार आता मोदींकडे देशातील जातीनिहाय जनगणनाचे मुद्दा रेटून धरणार का?असा सवाल आता विचारला जात आहे.
मोदी सरकारच्या आयटी धोरणातील दोन नियमांना न्यायालयाची स्थगिती-
टिका व विरोधी मत-विचारांचा स्वीकार करुनच लोकशाही सुदृढ होत असते.सरकारच्या उत्तम कारभारासाठीही टिकेचा स्वीकार करणे हे सुदृढतेचेच लक्षण आहे.मात्र,मोदी सरकारने माहिती-तंत्रज्ञान कागद्यांतर्गत आणलेल्या नव्या नियमातील नियम ९ लक्षात घेता सुयोग्य कारण असूनही सार्वजनिक क्षेत्रातील सेवेतील व्यक्तीविरोधात टीका करताना एखद्याला दोनदा विचार करावा लागेल.शिवाय केंद्र सरकारच्या आंतरविभागीय समितीला अशी टीका रुचली नाही तर संबंधिताला थेट कायदेशीर कारवाईसाठी खेचले जाऊ शकते!,हे भारतीय राज्यघटनेने लेखक,संपादक,प्रकाशकांना दिलेल्या भाषा व विचारस्वातंत्र्यावरच हल्ला आहे’असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने नव्या आयटी नियमांतील नियम ९(१)व ९(३)या दोन नियमांना ४ ऑगस्ट २०२१ रोजी स्थगिती दिली.
नियम ९(१) अन्वये आचारसंहितेचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले.तर नियम ९(३)अन्वये डिजिटल मिडीयांच्या मजकूर व साहित्याविषयीच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी प्रथम स्वनियमन,त्यानंतर डिजिटल मीडियांच्या स्वनियमन मंचाच्या स्तरावर आणि त्यानंतर केंद्र सरकारने नेमलेल्या देखरेख समितीच्या स्तरावर निवारण करण्याची व्यवस्था करण्यात आली.
‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी(इंटमीडियायरी गाइडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड)रुल्स २०२१’या नावाने मोदी सरकारने २५ फेब्रुवारी २०२१ रोजी नवे नियम अधिसूचित केले होते.त्याअंतर्गत बातम्या व ताज्य घडामोडी प्रसिद्ध करणारे न्यूज पोर्टल व डिजिटल माध्यमे,संपादक,प्रकाशक तसेच सोशल मिडियावरही अनेक बंधने घालण्यात आली.त्यामुळे हा विषय काही महिन्यांपासून देशभरात प्रचंड चर्चेत होता.ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ॲड.अभय नेवगी यांच्यामार्फत जनहित याचिकेद्वारा तर ‘दि लीफलेट डिजिटल न्यूज पोर्टल’ने ज्येष्ठ वकीत दरायस खंबाटा यांच्यामार्फत रिटयाचिकेद्वारे या नियमांच्या वैधतेला आव्हान दिले.हे नियम म्हणजे नागरिक व माध्यमांच्या विचार व भाषास्वातंत्र्याच्या मूलभूत हक्कांचेच उल्लंघन करणारे असल्याचा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला.या नियमांमुळे भाषा व विचारस्वातंत्र्यालाच मर्यादा येत असल्याने स्थगितीची विनंती त्यांनी केली होती.
[हे ही वाचा….
सहनशक्तीची परीक्षा बघू नका:माेदी आणि न्यायालये (भाग-१)
त्याविषयी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता व न्या.गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने अंतरिम निर्णय दिला.महत्वाचे म्हणजे १४ ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकशाही व अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बूज राखणारा हा निकाल आला.
मोदीसरकारच्या ॲट्रासिटी कायद्याला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान-
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक(ॲट्रासिटी)कायद्यातील एका तरतुदीत न्यायालयाने केलेला बदल कायदादुरुस्तीने रद्द करण्याचा केंद्र सरकारच्या कृतीला सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.त्यास स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला मात्र,न्यायालयाने सहा आठवड्यात मोदी सरकारकडून स्पष्टीकरण मागण्यात आले.
संसदेने कायद्या १८-अ हे कलम घालून दुरुस्ती केली होती,याचा पुनर्विचार करावा,अशा चार याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या.त्यापैकी एक अहमदनगरच्या संजीव भोर यांची असून,त्यांची बाजू मांडताना ॲड.दिलीप तौर यांनी १८-अ तरतुदीमुळे आरोपींना लगेच अटक होईल व त्यांना जामीनही मिळणार नाही,असे सांगून रद्द करावी आणि २० मार्च २०१८ रोजीचा आदेश पुन्हा लागू करावा,अशी विनंती केली.मात्र,कायद्यामध्ये बदल करण्यास वा तरतुदीस स्थगिती देण्यास नकार देतानाच,न्यायालयाने केंद्राला बाजू मांडण्यास सांगितले.
मूळ कायद्यातही अटक झालेल्या व्यक्तीस जामीन मिळत नव्हता.त्या तरतुदींना महाराष्ट्रातील एका सरकारी अधिका-याने आव्हान दिले होते.त्यावर निकाल देताना न्यायालयाने लगेचच अटक करण्याची गरज नाही,वरिष्ठ अधिका-याने अशा प्रकरणाची चौकशी करावी व पुढील निर्णय घ्यावा,असा निर्णय दिला होता.
[हे ही वाचा….
एकाच व्यक्तीवर एवढे विसंबून राहणे व्यवस्थेच्या दृष्टिने भूषणास्पद नाही
मोदी सरकार आणि न्यायालये (भाग २)
सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेबद्दल अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांनी संताप व्यक्त केला होता.त्यामुळे लगेच अटकेची तरतुद कायम ठेवण्यासाठी सरकारने संसदेत दुरुस्ती विधेयक मांडले.ते मान्य ही झाले.त्यालाच पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.कायद्यात करण्यात आलेली घटनादुरुस्ती घटनाबार्ह्य असल्याचे जाहीर करण्यात यावे,अशी याचिकाकर्त्याची विनंती होती.न्यायमूर्ती ए.के.सिकरी व न्या.अशोक भूषण यांच्या खंडपीठाने ती अमान्य केली.

ॲट्रासिटी कायद्याअन्वये एका व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करताना दूस-या व्यक्तीच्या अधिकराचे हनन होत असल्याची भूमिका मांडत सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यामध्ये लगेच जामीन देण्याची तरतूद केली मात्र,मोदी सरकारने घटनादुरुस्ती करुन त्यात बदल केला व पुन्हा याला अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आले.माेदी सरकारच्या या कृतीमुळे देशातील सवर्ण समाजामध्ये तीव्र नाराजी उमटली होती.अनेक सवर्ण संघटनांनी भारत बंदचे आव्हान करीत आंदोलने केली.मध्यप्रदेश,राजस्थान,उत्तर प्रदेश,बिहार व छत्तीसगढ मध्ये या आंदोलनाचा जोर तीव्र होता.याचीच परिणीमी भाजपला मध्यप्रदेश,राजस्थान,छत्तीगड यासारख्या राज्यात सत्ता गमावण्यात झाली.यानंतर अनुसूचित जाती-जमाती कायद्याची अंमलबजावणी राज्यांनी विचारपूर्वक व संथ गतीने करावी,असे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना सूचविले होते.मोदी सरकारचे कायद्यामंत्री म्हणाले होते की अनुसूचित जाती व जमातीचे हित जपण्यासाठी कोणत्याही थरास जाण्याची सरकारची तयारी आहे तर तत्कालीन मोदी सरकारमधील मंत्री रामविलास पासवान यांनी या दुरुस्तीला जे पक्ष विरोध करतील ते आपल्या पायाव धोंडा पाडून घेतील!

या कायद्यानुसार कोणत्याही न्यायनिर्णयात काहीही म्हटले असले,तरी ॲट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यापूर्वी तक्रारींच्या खरेपणाची शहनिशा करण्याची काेणतीही गरज नसणार,तसेच आरोपीस अटकपूर्व जामीन मागण्याचीही सोय असणार नाही.आरोपीस अटक करायची ककी नाही,हे ठरविण्याचा अधिकार दंड प्रक्रिया संहितेने तपासी अधिका-यास दिला.तो प्राथमिक चौकशीच्या नावाने काढून घेतला जाऊ शकत नाही किवा त्या अधिकारावर मर्यादा ही घालता येणार नाही.

या कायद्याच्या एवढ्या कठोर तरतुदींमुळे देशात असंतोष उफाळला होता.गंभीर गुन्ह्यांसाठी देखील जामीन मंजूर होत असताना,फक्त एका तक्रारीच्या अाधारावर अटक करण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्यावर पोहोचले असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.मात्र,मोदी सरकार यांनी कायद्याची बूज राखण्या ऐवजी राजकारणासाठी‘तुष्टिकरणाची’नीती स्वीकारली त्यामुळेच त्यांनी काँग्रेसवर तुष्टिकरणाचा आरोप बंद केला पाहिजे,अशी टिका मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर उमटली होती.अनेकांनी मोदी सरकारच्या या निर्णयाची तुलना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या शाहबानो प्रकरणाशी देखील केली.
नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा ॲट्रासिटी कायद्याच्या संदर्भात नव्याने निर्देश देत,हा गुन्हा नोंदवताना मूळ उद्देश्‍य तपासण्यात यावा,असे सांगितले आहे.
पीएम केअर्स सरकारी निधी नाही-मोदी सरकारचे दिल्ली उच्च न्यायालयात शपथपत्र
पीएम केअर्स फंड हा भारत सरकारचा निधी नाही.या माध्यमातून जी रक्कम गोळा केली जाते ती सरकारच्या एकत्रित निधीमध्ये जात नाही अशी माहिती मोदी सरकारने २३ सप्टेंबर २०२१ रोजी दिली.
पंतप्रधान कार्यालयाच्या सहाय्यक सचिवांनी याबाबतचे शपथपत्र न्यायालयात सादर केले.सध्या या निधीची जबाबदारी याच विभागकडे सोपविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.पीएम केअर्स ट्रस्टचे सगळे कामकाज हे ‘पीएमओ’ कार्यालयच सांभाळते.या ट्रस्टच्या कामकाजात पारदर्शकता आहे.ऑडिटरच्या माध्यमातून त्याचे ऑडिट देखील केले जाते.देशाचे नियंत्रण आणि महालेखापालांकडून (कॅग)स्थापन करण्यात आलेली समिती जे लेखापाल नियुक्त करते तिच्य माध्यमातून या निधीचे ऑडिट करण्यात येते असे ही मोदी सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आले.या निधीबाबत अधिक पाददर्शकता राहावी म्हणून अधिकृत संकेतस्थळावर ऑडिट रिपोर्ट प्रसिद्ध केले जातात.तसेच प्राप्त निधीचा कशासाठी वापर करण्यात आला याची माहिती देखील देण्यात येते असे पंतप्रधान कार्यालयोच सहाय्यक सचिव प्रदीपकुमार श्रीवास्तव यांनी सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले.
मुख्य न्यायमूर्ती डी.एन.पटेल आणि न्या.अमित बन्सल यांच्या खंडपीठासमोर याबाबतच्या याचिकेवर सुनावणी पार पडली.राज्यघटनेत नमूद नियमानुसार या निधीच्या कार्यप्रमाणीत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी ‘पीएम केअर्स’ फंडला राज्याचा दर्जा देण्यात यावा आणि त्यानुसार नियमांत बदल केले जावेत अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २८ मार्च २०२० रोजी पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत निधी तयार करण्यात आला.भारत सरकाररचे संरक्षण,गृह व्यवहार आणि वित्त मंत्री हे पीएम केअर फंडाचे पदसिद्ध विश्‍वस्त आहेत तर पंतप्रधान त्याचे अध्यक्ष म्हणून काम करतात.सर्वोच्च न्यायालयाने १८ ऑगस्ट २०२० रोजी पीएम केअर्स फंडमध्ये जमा झालेला निधी राष्ट्रीय आपत्ती मदत निधीत जमा करण्यास वा हस्तांतरित करण्यास नकार देत याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळून लावली.विरोधक आज देखील या फंडाचा दुरुपयोग निवडणूकांसाठी करण्यात येत असल्याचा आरोप करीत असतात.
मजुरांच्या नोंदणीचा वेग वाढवा:सर्वोच्च न्यायालयाची कानउघाडणी
देशभरातील स्थलांतरित मजुरांच्या नोंदणीच्या वेगावर सर्वोच्च न्यायालयाने २४ मे २०२१ रोजी मोदी सरकारची कानउघाडणी केली.या नोंदणी प्रक्रियेचा वेग वाढवण्याची गरज असून त्यामुळे कराेनाकाळामध्ये त्यांना विविध योजनांचा लाभा देणे शक्य होईल,असे न्यायालय म्हणालले.असंघटित कामगारांच्या नोंदणीबाबत केंद्र आणि राज्यांच्या प्रयत्नावर सर्वोच्च न्यायलयाने नाराजी व्यक्त केली.स्थलांतरित किवा असंघटित अशा दोन्ही क्षेत्रातील कामगारांची नोंदणी होणे आवश्‍यक असल्याचे सांगतानाच न्या.अशोक भूषण आणि न्या.एम.आर.शहा यांच्या खंडपीठाने त्यांची नोंदणी झालेली असेल किंवा ओळख पटली असेल त्यांच्यापर्यंत विविध याेजनांचे लाभ पोहचविता येईल,असे नमूद केले.
कामगारांच्या नोंदणीची प्रक्रिया खूपच संथ आहे.या नोंदणीच्या अनुषंगाने विविध राज्ये आणि केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांवर देखील आम्ही समाधानी नाही आहोत.असेही खंडपीठाने नमूद केले.या सर्व प्रक्रियांवर योग्य देखरेख ठेवणेही गरजेचे आहे,असे न्यायालयाकडून सांगण्यात आले.
स्थलांतरित कामागारांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.यामध्ये कामगारांना अन्न सुरक्षा,थेट राखे पैशांचा पुरवठा,वाहतूक सुविधा आणि अन्य उपाययोजना उपलब्ध याकरुन दिल्या जाव्यात म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश दिले जावेत अशी मागणी करण्यात आली होती.यावर,न्यायालयाने मागील वर्षी म्हणजे २०२० मध्येच स्थलांतरित कामगारांच्या अनुषंगाने आदेश दिले होते,असे म्हटले.
मोदी सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले,की सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये या मुद्दयावर सुनावणी घेतली आहे.यावेळी कामागार व रोजगार मंत्रालयाने असंघटित क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचे काम सुरु केले असल्याचे म्हटले होते’यावर न्यायालयाने मेहता यांना याची सद्य:स्थिती सादर करण्याचे निर्देश दिले.योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे,नोंदणी टाळणा-या कंत्राटदाराचा परवाना रद्द झाला पाहिजे,सरकारी निधी लोकांपर्यंत पोचतो आहे की नाही,सरकारनेच आता लाभार्थ्यावर लक्ष ठेवावे अस मुद्दे न्यायालयाचे होते.
करोना काळात मोदी सरकार तसेच विविध राज्य सरकारांच्या निष्क्रियेवर सर्वाच्च न्यायालयासह देशातील मद्रासपासून गुवाहाटीपर्यंत आणि मुंबई पासून तर दिल्लीपर्यंत सर्व उच्च न्यायालयांनी नागरी सुविधा,आरोग्य,शिक्षण,वाहतूक,हवामान,लसीकरण आणि सक्तीचे लसीकरण अशा प्रश्‍नांवर वारंवार समजाच्या प्रश्‍नांची दखल घेतली.शक्य तिथे सा-या  न्यायालये कडक भूमिका घेऊन सक्त आदेश बजावले.प्रशासकीय पातळीवर या प्रश्‍नांची सोडवणूक न होणे हे मोदी सरकारचे दहा वर्षांच्या सत्ताकाळाचे अपयश नव्हते का?असा सवाल केला जातो.
अचानक लॉकडाऊन केल्याने देशातील मोठ्या प्रमाणावर असलेला कामगार वर्ग हा जिथल्या तिथे अडकला.करोनाचा प्रसार झपाट्याने होऊ नये हा जरी (अ)विचार मोदी सरकारचा असला तरी त्यानंतर देशात जो ‘अभूतपूर्व’गोंधळ निर्माण झाला,त्यातून सर्वात मोठी वाताहत कामागार व मजूर वर्गाची झाली.रेल्वे बंद,बसेस बंद,वाहतूकीची सर्व सार्वजनिकच नव्हे तर खासगी वाहतूक देखील अवघ्या काही तासात पंतप्रधान मोदींच्या टी.व्ही वरील भाषणानंतर ठप्प झाली.हातावर पोट असणा-या मजूर वर्गाला त्यांच्या-त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी मोदी सरकारने कोणतीही व्यवस्था केली नाही उलट,न्यायालयाच्या दणक्यानंतर रेल्वे सुरु झाली त्याचेही प्रत्येकी पाच हजार रुपये मजूरांकडून उकळण्यात आले!करोना मृत्यूच्या थैमानात ‘बरे आहात ना?काळजी घ्या’या सारख्या शब्दांचे मलम व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे मोदी यांचे सुरुच राहीले.किसान सन्मान योजनेचे १९ हजार कोटी शेतक-यांच्या खात्यात जमा झाले,त्याचे देखील श्रेय करोनाची दुसरी लाट पीक वर असताना व्हर्च्युअल कार्यक्रमातून मोदींना सोडावसे वाटले नाही!
सर्वोच्च न्यायालय राज्यांवर संतापले-
करोना काळात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांचे भरपाईचे दावे निकाली काढण्यात अपयशी ठरलेल्या राज्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले.आंध्र प्रदेशच्या मुख्य सचिंवाना तर तुमच्यावर अवमान कारवाई का करण्यात येऊ नये,अशी नोटीसच न्यायालयाने बजावली.बिहारच्या मुख्य सचिवांना देखील व्हर्च्यु्अली सुनावणीस हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले.काही राज्यांमध्ये कोरोना मृतकांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यासाठी फक्त ५० हजार रुपये इतकी कमी रक्कम का ठरविण्यात आली?अशी विचारणा न्यायालयाने केली.न्या.एम.आर.शहा आणि न्या.संजीव खन्ना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
कोरोना मृतकांच्या नातेवाईकांना भरपाई देताना राज्य सरकारे ही अवमानकारक वागणूक देत असल्याबद्दल न्यायालयाने संताप व्यक्त केला.अनेक कुटूंबासमोर मोठी आर्थिक आव्हाने आहेत.,कोरोनाच्या या महासाथीने कुटूंबातील कर्त्या व्यक्तीलाच हिरावून घेतल्याने त्यांच्यासमोरील समस्या आणखी जटील झाल्या आहेत.अशा स्थितीत मृतांच्या नातेवाईकांना मदत म्हणून ५० हजार रुपयांची मदत दिली जात आहे.कल्याणकारी राज्यामध्ये अशाप्रकारच्या मदतीचे वाटप खूप महत्वपूर्ण असते.मात्र,निधीचे वितरण हे बाबूशाहीच्या लालफितीमध्ये अडकून पडत असेल तर ते चुकीचे आहे,असे न्यायालयाने स्पष्ट केले.
याच सुनावणीच्या दरम्यान न्या.खन्ना आणि न्या.शहा यांनी‘आम्ही स्वत: या प्रकरणात लक्ष घालत असून लोकांना निधीचे योग्य पद्धतीने वितरण होत आहे किंवा नाही यावर आमचे बारीक लक्ष असेल,या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्ये आणि जिल्हा प्रशासकीय यंत्रणांना सामावून घेण्याचे आदेश देण्याचा आम्ही विचार करीत आहोत.या यंत्रणा तटस्थ आणि लोकपालाची भूमिका पार पाडतील,असे न्यायालयाने नमूद केले.न्या.शहा म्हणाले,की ज्या राज्यांतून मृतांच्या तुलनेत कमी भरपाई मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी आम्ही हस्तक्षेप करु.
याच सुनावणीत न्यायालयाने गुजरात सरकारला धारेवर धरत,भरपाईचे ४ हजार अर्ज का फेटाळण्यात आले?अशी विचारणा केली.यावेळी न्यायालयाने केरळमध्ये ४९ हजार करोना बाधितांचा मृत्यू झाला असतान केवळ २७ हजार भरपाईचे दावे निकाली काढण्याचा मुद्दा उपस्थित केला.महाराष्ट्र सरकारने मात्र लाखो लोकांना याआधीच भरपाई देण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले.आंध्रप्रदेश आणि बिहार राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावत,एवढ्या भीषण परिस्थितीनंतर देखील तुम्हाला सांगावे लागत असेल तर ती दूर्देवी बाब आहे,केंद्र व राज्यांच्या सरकारांना वाटत आहे की लोक त्यांच्या दयेवर जगत आहेत,अशा शब्दात न्यायालयाने आपली नाराजी व्यक्त केली होती.
करोनामृतांच्या वारसांना भरपाई देण्यास तयार नसल्याबद्दल राहूल गांधीनी ट्टीट करत‘आयुष्याचे मोल करणे अशक्य आहे.सरकारकडून दिली जाणारी भरपाई ही छोटीशी मदत असते.मात्र,मोदी सरकार तेवढे देखील करायला तयार नाही,आधी कोरोनावरील उपचारांचा अभाव,त्यानंतर खोटी मृतकांची आकडेवारी आणि आता त्यावर कळस म्हणजे सरकारचे क्रोर्य’.असे ट्वीट त्यांनी केले होते.कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये भरपाई देण्याची मागणी करणा-या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या.यावर नियमबाह्य असल्याने तसेच केंद्र व राज्य सरकारांना आर्थिकदृष्टया परवडणारे नसल्याने करोनामृतांच्या वारसांना भरपाई देणे शक्य नसल्याचे मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले होते.
याचिकाकर्त्यांपैकी एक असणारे ॲड.गौरवकुमार बन्सल यांनी असा युक्तीवाद केला की,करोनाची साथ ही आपत्ती असल्याची घोषणा करण्यात आली आहे.८ एप्रिल २०१५ रोजीच्या आदेशानुसार,आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना ४ लाख रुपये भरपाईस पात्र राहतील.त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ च्या कलम १२(३)अनुसार प्रत्येक करोनामृताच्या कुटूंबाला ४ लाख रुपये नुकसान भरपाई मिळायला हवी.
आकड्यांमध्ये प्रचंड तफावत-
राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आकडेवारीमध्ये प्रचंड तफावत होती.काही राज्यांना प्राप्त झालेल्या करोना भरपाईच्या दाव्यांची संख्या करोनाबळींच्या अधिकृत संख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती!मोदींच्या गुजरातमध्ये मृतांची संख्या गुजरात सरकारने जाहीर केलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा नऊ पट जास्त होती तर तेलंगणामध्ये सात पट जास्त होती,हे भरपाईसाठी आलेल्या दाव्यांवरुन सिद्ध झाले.महाराष्ट्रात देखील करोनाबळींची अधिकृत संख्या व भरपाई दाव्यांमधील अंतर सर्वाधिक होते.
करोनाबळींच्या संख्येसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे व्यापक आणि अधिक उदारमतवादी होती.यानुसार,एखाद्या व्यक्तीची करोनाचाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर ३० दिवसांच्या आत आत्महत्येसह सर्व मृत्यूंची नोंद करणे अनिवार्य आहे.सर्व कराेनाबळींच्या वारसांना भरपाई मिळायलाच हवी,असे आदेशच न्यायालयाने दिले होते.या आदेशाच्या अंमलबजावणीवर स्वत: न्यायालय लक्ष ठेऊन होती.त्यासाठी सर्व राज्यांनी करोनाबळींची अधिकृत आकडेवरी सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती.या आकडेवारीनुसार गुजरातमध्ये करोनाबळींची संख्या १० हजार ९४ तर दाव्यांची संख्या ८९ हजार ८३३ इतकी होती.या पैकी ६७,३७० दावे गुजरात सरकारने मंजूर केले तर ४,३३४ दावे फेटाळण्यात आले.तेलगंणामध्ये करोनामृतांची अधिकृत संख्या ३,९९३ असून २९ हजार दावे प्राप्त झाले.यापैकी १५ हजार२७० दावे राज्य सरकारने मंजूर केले.महाराष्ट्रात करोनामृतांची अधिकृत संख्या १ लाख ४१ हजार असून दाव्यांची संख्या २ लाख १७,१५१ हजार इतकी होती.आकड्यांमध्ये ही इतकी मोठी तफावत कशी काय?असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले होते.भरपाईसाठी आलेला एक ही अर्ज निव्वळ तांत्रिक कारणांसाठी  बाद होता कामा नये,भरपाईस पात्र असलेल्या प्रत्येकाला भरपाई मिळालीच पाहिजे,असे न्यायालयाने राज्यांना त्यावेळी बजावले होते.
याच वेळी न्यायालयाने बिहार सरकारची आकडेवरी फेटाळून लावित बिहारमध्ये करोनामुळे केवळ १२ हजार लोकच मृत्युमुखी पडलेत यावर आमचा विश्‍वास नाही,असा तडाखा दिला.आम्ही या सरकारी आकड्यावर विश्‍वास ठेवणारच नाही,असे न्यायालय म्हणाले.केरळमध्ये करोनाबळींची संख्या ४९ हजार ३०० इतकी नोंदवली गेली असताना भरपाईसाठी २७ हजार २७४ अर्ज आले,याकडे लक्ष् वेधत ‘केरळमध्ये हे काय चालले आहे?अशी खरडपट्टी न्यायालयाने काढली.करोनाबळींचे तपशील तुमच्याकडे आहेत मग तुमचे अधिकारी त्यांचे वारस शोधण्याचे कष्ट का घेत नाहीत?त्यांनी गावात,तालुक्यात जाऊन वारस शोधून काढावे,असे आदेश न्यायालयाने दिले.
………………………………………….
(पुढील भागात लस आणि मोदी सरकार)
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या