

गडकरी यांच्या विरोधात आचार संहिता भंगाची केली होती केंद्रिय निवडणूक आयोगाकडे तक्रार
काँग्रेसची चुप्पी संदेहास्पद!पत्रकारांच्या लेखी लोकसभा निवडणूकीत दोनच उमेदवार होते उभे:अपक्ष उमेदवारांची नाराजी
नागपूर,ता.९ मे २०२४: लोकसभा निवडणूकीत नागपूर मतदारसंघातून एकूण २६ उमेदवार उभे होते.यात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार व पश्चिम नागपूर विधानसभेचे आमदार विकास ठाकरे यांचा समावेश आहे मात्र,१९ एप्रिल मतदानाच्या दिवशी बूथ क्रमांक १९७,१३०,१९१,३०७,२७१ या सह शहरातील अनेक बूथवर भाजपचे कार्यकर्ते हे मतदान केंद्राजवळील बूथवरुन मतदारांना भाजपचे निवडणूक चिन्ह ‘कमळ’तसेच उमेदवार नितीन गडकरी यांचे छायाचित्र असणारी चिठ्ठ्या काढून देत असल्याचे दिसून पडले.पुरावा म्हणून याचे अनेक व्हिडीयोज देखील उपलब्ध आहेत.हा प्रकार सरळ-सरळ आदर्श आचार संहितेचे उल्लंघन असून कलम १२६(ब) तसेच १३.३३ अन्वये दंडनीय अपराध आहे.त्यामुळे भाजपच्या उमेदवारावर गुन्हा दाखल करुन संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करणारे पत्र अपक्ष उमेदवार सुशील पाटील व इतर यांनी केंद्रिय निवडणूक आयोगाला मेलनी पाठवले होते.
या पत्रासोबत अपक्ष उमेदवारांनी वर उल्लेख केलेल्या बूथवरील व्हिडीयोज पुरावा म्हणून पाठवले.त्यांच्या या पत्राची दखल घेत केंद्रिय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाकडे पुढील कारवाईसाठी पाठवले.राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्याकडे ही तक्रार पाठवून सकाळी ११ वा.तक्रारदारांचे म्हणने ऐकून घेण्याची सूचना केली.
यावर काल मंगळवार दिनांक ७ मे रोजी सकाळी ११ वा.सुशील पाटील,ॲड.सूरज मिश्रा,अरविंद मेश्राम,ॲड.संतोष चौहान, तसेच इतर अपक्ष उमेदवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले.मात्र,तत्पूर्वी शर्मा या जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या कक्षात गेल्या असल्याची माहिती सुशील पाटील यांनी माध्यमांना दिली.या वेळी सौम्या शर्मा यांनी तक्रारदारांचे संपूर्ण म्हणने ऐकून घेतले.नियमानुसार मतदानाच्या ४८ तास आधी उमेदवारांना कोणत्याही स्वरुपात मतदारांना प्रलोभन देता येत नाही.पक्षाचे चिन्ह किवा छायाचित्राद्वारे त्यांचे मत प्रभावित करता येत नाही.मात्र,शहरातील अनेक बूथवर सर्रास गडकरी यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून मतदारांना दिले जात होते.हा सरळ-सरळ ‘संवैधानिक व्याभिचारच ’असून कर्नाटकमधील राजकीय व्याभिचारापेक्षा याचे गांर्भीय कमी नसल्याचे तक्रारदार उमेदवार सांगतात.

(छायाचित्र : नागपूरातील अनेक बूथवर अश्या चिठ्ठ्या इलेक्ट्रोनिक मशीनवरुन सर्रास मतदारांना दिल्या जात होत्या!)
शर्मा यांनी तक्रारदात्यांना, भाजपच्या उमेदवाराच्या नावाच्या चिठ्ठ्या काढणारे इलेक्ट्रोनिक मशीन्स किती बूथवर सापडले?भाजपचे बूथ मतदान केंद्रापासून किती अंतरावर होते?एफआयआर का नाही केली?असे प्रश्न विचारले.यावर तक्रारकर्त्यांनी त्यांना देखील संपूर्ण पुरावे सादर केले.याशिवाय पोलिसांनी अनेक बूथवरुन ती यंत्रे जप्त केली पण,एफआयआर दाखल करुन घेतली नाही,असे त्यांनी सांगितले.भाजपचे बूथ ५० मीटरच्या आत असून मतदानाच्या ४८ तासांच्या आत तर सोडा सरळ-सरळ मतदानाच्या वेळी पक्ष चिन्ह व उमेदवाराचे छायाचित्र असणा-या चिठ्ठ्या मतदारांना देण्यात येत असल्याची ग्वाही तक्रारकर्त्यांनी शर्मा यांना संपूर्ण कागदाेपत्री पुराव्यानिशी दिली.
भारताच्या संविधानाला देशाची निवडणूक ही संपूर्णत: पारदर्शी होणे अपेक्षीत असून याची संपूर्ण दारोमदार स्वायत्त असणा-या निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर अवलंबून आहे.त्यामुळेच नागपूरकर जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास बसावा,अशी कारवाई आम्हाला आयोगाकडून अपेक्षीत आहे,असे सुशील पाटील सांगतात.सर्वात महत्वाचे म्हणजे सुशील पाटील यांच्या मतदारानेच गडकरी यांच्या नावांची चिठ्ठी बूथवरुन आणून दिली!
अपक्ष उमेदवारांच्या नातेवाईकांनी देखील त्या गोळ्या केल्या.त्याचे व्हीडीयोज काढले.एकीकडे अनेक देशांमधून भारताचा हा लोकशाहीचा उत्सव प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अनेक देशाचे प्रतिनिधी भारतात आले आहेत,त्यांच्या समोर कोणता आदर्श आपण स्थापित करतो आहोत?असा सवाल हे अपक्ष उमेदवार करतात.निवडणूक आयोगाने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही दिल्लीत जाऊन नागपूरची लोकसभा निवडणूक ‘गाजवणार’,असा इशारा त्यांनी दिला.
देशात राष्ट्रीय पक्ष असणा-या काँग्रेस पक्षाची चुप्पी देखील संदेहास्पद असल्याचे सुशील पाटील सांगतात.काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी नागपूरात उघड-उघड झालेली लोकशाहीची पायमल्ली,संविधानाची गळचेपी बघून सुद्धा केंद्रिय निवडणूक अायोगाकडे तक्रार करण्याची तसदी घेतली नाही,असा आरोप ते करतात.परिणामी,आम्ही सर्व पुराव्यानिशी राहूल गांधी,सोनिया गांधी ,प्रियंका गांधी व मल्लीकार्जून खर्गे यांना देखील तक्रार केली असल्याचे ते सांगतात.तुमच्या उमेदवाराने केंद्रिय निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही,असा सवाल त्यात केला असल्याचे त्यांनी सांगितले.७५ वर्षांपासून देशात काँग्रेस व भाजप याच दोन पक्षाची सत्ता आहे.हे दोन्ही पक्ष जनतेची वचननामा,जाहीरनामातून चक्क फसवणूक करतात,असा आरोप सुशील पाटील यांनी केला.
मी मात्र,जनतेला शासकीय स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रच लिहून दिले आहे.त्यात नमूद केले आहे की खासदार झाल्यावर मी जनतेला दिलेले वचन पूर्ण केले नाही तर जनतेला मला माघारी बोलावण्याचा अधिकार असेल.इतर राजकीय पक्षाचे उमेदवार हे का लिहून देत नाही?त्यांना फक्त निवडून येण्यासाठी जनतेचे मत हवे,जवाबदारी नको,बंधने नको,सत्ता हवी ती ही फक्त स्वत:च्या हितासाठी राबविण्यासाठी.महत्वाचे म्हणजे निवडणूकीत ‘रेवडी‘विषय ज्यांनी गाजवला तेच देशभर आपल्या भाषणात ‘रेवड्या’वाटत फिरत असल्याची टिका सुशील पाटील करतात.
नागपूरच्या पत्रकारांनी देखील जणू दोनच उमेदवार लोकसभेची निवडणूक लढतात आहेत,या अर्हिभावात वार्तांकन केले.देशातील लोकशाहीला,लोकशाहीच्या चौथा स्तंभाकडून अशी अपेक्षा नाही.प्रत्येक उमेदवार हा संवैधानिकरित्या तितकाच महत्वाचा नसतो का?माध्यमांनी आता तरी बदलावे आणि अपक्ष उमेदवारांचा आवाज ही जनतेपर्यंत पोहोचवावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांच्याकडे आम्ही पार पडलेल्या सुनावणीत सगळे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये दिले आहेत.बूथवर वाटप करण्यात येणा-या चिठ्ठ्या सोपवल्या.नियमानुसार हा दंडनीय अपराध आहे.त्यामुळे भाजपच्या उमेदवारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.कलम १२३ अन्वये त्वरित अटक करावी, लाखो मतदारांना या निवडणूकीत मतदानापासून वंचित ठेवण्यात आले त्यामुळे कलम ५३३ अन्वये ही निवडणूकच रद्द करावी,अशी मागणी त्यांनी केली.
येत्या तीन दिवसात निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई न झाल्यास दिल्लीत जाऊन मोठा लढा उभारण्याचा निर्धार अपक्ष उमेदवारांनी व्यक्त केला.
(अधिक संपर्कासाठी संपर्क करा: अपक्ष उमेदवार सुशील कुमार- ८६००१४३६६९)
……………………….
(तळटीप: ‘सत्ताधीश’लवकरच नव्या स्वरुपात वाचकांसमोर येणार असल्यामुळे ७ मे नंतर एका आठवड्यासाठी वेबसाईट बंद राहणार आहे,याची नोंद वाचकांनी घ्यावी)




आमचे चॅनल subscribe करा
